आव्हानास सामोरे जाणे
गतकाळात एडीएचडीवर उपाय म्हणून बऱ्याचशा उपचारपद्धती सुचवण्यात आल्या आहेत. यांपैकी काहींनी आहारावर भर दिला. तथापि, काही अभ्यासांतून असे दिसते की पूरक अन्नांमुळे सहसा अतिक्रियाशीलता उद्भवत नाही आणि आहारासंबंधी उपाय अनेकदा निरूपयोगी ठरतात. औषधोपचार, वर्तन रूपांतर आणि बोधीय प्रशिक्षण यांद्वारे देखील एडीएचडीवर उपचार करण्यात येतो.a
औषधोपचार. एडीएचडीचा मेंदूच्या अपक्रियेशी संबंध असल्यामुळे, योग्य प्रकारचे रासायनिक संतुलन पूर्ववत करण्यासाठी औषधोपचार केल्याने अनेकांना फायदा झाला आहे.b परंतु, औषधोपचार शिक्षणाची जागा घेऊ शकत नाही. औषधोपचारामुळे फक्त लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलाला मदत मिळते, ज्याच्या आधारावर तो नवीन कौशल्ये आत्मसात करू शकतो.
एडीएचडी असलेल्या अनेक प्रौढांनाही औषधोपचारामुळे मदत मिळाली. तरीपण, तरुणांनी तसंच प्रौढांनीही—काळजी बाळगणे शहाणपणाचे आहे कारण एडीएचडीच्या उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या काही उत्तेजक औषधांचे व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्तन रूपांतर. मुलास एडीएचडी असल्यामुळे शिस्त लावण्याच्या जबाबदारीतून आईवडिल मोकळे होत नाहीत. यासंबंधाने मुलाच्या काही खास गरजा असल्या तरीसुद्धा बायबल आईवडिलांना आदेश देऊन म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (नीतिसूत्रे २२:६) तुमचे अतिक्रियाशील मूल (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लेखिका बार्बरा इंगरसॉल सांगतात: “जे पालक वैफल्यग्रस्त होऊन आपल्या मुलाला ‘मन मानेल तसं वागण्याची मोकळीक’ देतात ते त्याचं भलं करीत नाहीत.” इतर मुलांप्रमाणेच, सुसंबंद्ध शिस्तीची व एक व्यक्ती या नात्याने आदराची गरज अतिक्रियाशील मुलालाही असते. याअर्थी त्याच्यासाठीही सुस्पष्ट मर्यादा घालून देणे, उचित बक्षीस देणे आणि शिक्षा देणे आवश्यक आहे.”
म्हणूनच, आईवडिलांनी चांगले वळण लावणे अगत्याचे आहे. शिवाय, रोजच्या कामांसाठी शिस्तबद्ध नित्यक्रम असायला हवा. होमवर्क करण्यासाठी, अभ्यास, आंघोळ या सर्वांसाठी वेळ ठरवताना आईवडिलांनी मुलाला थोडी मोकळीक द्यावी. मग वेळोवेळी हा नित्यक्रम कसा चाललाय ते पडताळून पाहावे. ठरवलेला नित्यक्रम पाळला जात आहे याची खात्री करावी. फाय डेल्टा कॅप्पा हे नियतकालिक सांगते: “एडीडी किंवा एडीएचडी असल्याचे निदान झाल्यामुळे वाटेल तसं वागण्याची मुभा मिळत नाही, उलट हा खुलासा झाल्यामुळे संबंधित मुलाला आवश्यक ती मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होतो हे त्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांनाही समजावून सांगण्यास डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, शाळा अधिकारी आणि शिक्षक बांधील आहेत.”
बोधीय प्रशिक्षण. यामध्ये मुलाला त्याच्या स्वतःबद्दलचा आणि त्याच्या विकाराबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यात मदत करणे समाविष्ट आहे. डॉ. रॉनल्ड गोल्डबर्ग यांनी निरीक्षण केल्याप्रमाणे, “एकाग्रता अभाव विकार असणाऱ्यांना, ते आकर्षक, हुशार आणि चांगले असले तरीही, आपण कुरूप, मूर्ख आणि वाईट आहोत असं वाटतं.” म्हणून, एडीडी किंवा एडीएचडी असलेल्या मुलास स्वतःच्या महत्त्वाबद्दल एक माफक दृष्टिकोन असण्याची गरज आहे आणि एकाग्रतेसंबंधी आपल्या समस्या हाताळणे शक्य आहे याची त्याला जाणीव असणे आवश्यक आहे; विशेषतः पौगंडावस्थेत. एडीएचडी असलेल्या मुलाने किशोरावस्थेत पोहंचेपर्यंत मित्रांकडून, शिक्षकांकडून, भावंडांकडून आणि कदाचित स्वतःच्या आईवडिलांकडूनही बरीच टीका सहन केली असल्याची शक्यता आहे. आता त्याने सुसाध्य ध्येये डोळ्यासमोर ठेवण्याची आणि कठोर नव्हे तर वाजवी मापदंडांनी स्वतःची पारख करण्याची गरज आहे.
वरील उपचार एडीएचडी असलेले प्रौढ लोकही घेऊ शकतात. डॉ. गोल्डबर्ग लिहितात की, “वयानुसार थोडेफार बदल करावे लागतात, पण गरज भासेल तसा औषधोपचार, वर्तन रूपांतर आणि बोधीय [प्रशिक्षण]—या तिन्ही आधारभूत उपचारपद्धती सबंध आयुष्यात गुणकारक ठरतात.”
आधार देणे
एडीएचडी असलेल्या एका किशोरवयीन मुलाचे वडील, जॉन, त्यांच्यासारख्याच परिस्थितीला तोंड देणाऱ्या इतर पालकांना सल्ला देतात: “या समस्येविषयी शक्य होईल तेवढी माहिती मिळवा. जाणतेपणाने निर्णय घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मुलाला भरभरून प्रेम द्या, स्वाभिमान विकसित करण्यास त्याला मदत करा. कमस्वाभिमान मारक ठरू शकतो.”
एडीएचडी असलेल्या मुलाला पुरेसा आधार मिळावा म्हणून आईवडिल दोघांनी सहयोग दिला पाहिजे. डॉ. गॉर्डन सरफाँटाइन यांनी लिहिल्यानुसार, “आपल्या घरात आपल्यावर सर्वजण प्रेम करतात आणि या प्रेमामागे आईवडिलांना एकमेकांविषयी असणारे प्रेम आहे” याची एडीएचडी असलेल्या मुलाला जाणीव झाली पाहिजे. (तिरपे वळण आमचे.) पण नेहमीच असे प्रेम दाखवले जात नाही ही खेदाची बाब आहे. डॉ. सरफाँटाइन पुढे म्हणतात: “ज्या कुटुंबात [एडीएचडी असलेले मूल] असते, त्या कुटुंबात वैवाहिक ताणतणाव आणि विवाह मोडकळीस येण्याची शक्यता सर्वसामान्य कुटुंबांच्या तुलनेत तेहतीस टक्क्यांनी जास्त असते, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.” अशाप्रकारचे ताणतणाव टाळण्यासाठी, एडीएचडी असलेल्या मुलाच्या वडिलांनीही त्याचे संगोपन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. ही जबाबदारी एकट्या आईच्या भरवशावर टाकण्यात येऊ नये.—इफिसकर ६:४; १ पेत्र ३:७.
कुटुंबाचे सदस्य नसलेले आप्तेष्ट देखील बराच आधार देऊ शकतात. कशाप्रकारे? याआधी उल्लेखलेला जॉन म्हणतो, “दया दाखवा. डोळ्यांना दिसतं त्याही पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. त्या मुलाला जवळ करा. त्याच्या आईवडिलांजवळही विचारपूस करा. कसं काय चाललंय? त्यांना दररोज कोणकोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं?”—नीतिसूत्रे १७:१७.
ख्रिस्ती मंडळीतले सदस्य देखील एडीएचडी असलेल्या मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना आधार देण्यात मोठा हातभार लावू शकतात. तो कसा? त्यांच्याकडून अपेक्षा करताना समंजस असण्याद्वारे. (फिलिप्पैकर ४:५) काहीवेळा कदाचित एडीएचडी असलेले मूल गोंधळ घालत असेल. अशा वेळेस, “तुम्हाला तुमच्या मुलाला ताब्यात ठेवता येत नाही का?” किंवा “तुम्ही त्याला चांगली शिक्षा का करत नाही?” असं कठोरपणे म्हणण्याऐवजी, एडीएचडी असलेल्या मुलाचे संगोपन करण्यात सामील असलेल्या दैनंदिन आव्हानांना तोंड देता देता आईवडिलांची आधीच पुरेवाट होत असेल याची एक विचारशील सहविश्वासू बांधव जाणीव ठेवील. अर्थात, मुलाच्या गोंधळ घालण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आईवडिलांनी आपल्या परीने सर्व प्रयत्न केले पाहिजेत. तथापि, विश्वासात एका घरचे झालेल्यांनी रागाच्या भरात कठोरपणे बोलण्याऐवजी “समसुखदुःखी” असावे आणि ‘आशीर्वाद देण्याचा’ प्रयत्न करावा. (१ पेत्र ३:८, ९) खरंच, देव सहसा सहानुभूतीशील सहविश्वासूंच्या माध्यमानेच “दीनांचे सांत्वन” करतो.—२ करिंथकर ७:५-७.
बायबलचा अभ्यास करणाऱ्यांना जाणीव आहे की अध्ययन असमर्थता आणि एडीएचडी यांच्यासहित सर्वच मानवी अपरिपूर्णता आपल्याला पहिला मनुष्य आदाम याच्याद्वारे मिळालेल्या आहेत. (रोमकर ५:१२) त्यांना हे देखील माहीत आहे की निर्माणकर्ता यहोवा, कोणतेच दुःखदायक आजारपण नसलेले नीतिमान नवीन जग आणण्याचे आपले अभिवचन जरूर पूर्ण करील. (यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:१-४) एडीएचडी यासारख्या विकारांचे परिणाम भोगणाऱ्यांना या खात्रीलायक अभिवचनातून सर्वात मोठा आधार लाभतो. जॉन सांगतो, “वय, प्रशिक्षण, आणि अनुभवाच्या मदतीने आमच्या मुलाला, त्याला असलेल्या विकाराची समज प्राप्त होऊ लागली आहे आणि आता तो त्याला तोंड द्यायला शिकला आहे. पण, या व्यवस्थीकरणात तो कधीच पूर्णपणे बरा होऊ शकणार नाही. दररोज आम्हाला याच आशेने सांत्वन मिळतं की नव्या जगात, यहोवा आमच्या मुलाचा विकार दूर करील आणि मग तो जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकेल.”
[तळटीपा]
a सावध राहा! कोणत्याही विशिष्ट उपचारपद्धतीचे समर्थन करत नाही. आपण निवडलेली उपचारपद्धत बायबलच्या तत्त्वांच्या विरोधात नाहीय याविषयी प्रत्येक ख्रिश्चनाने काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी.
b काहींना औषधोपचारामुळे, चिंता आणि इतर काही भावनिक समस्यांच्या रूपात त्रासदायक दुष्परिणाम भोगावे लागतात. याशिवाय, टूरेट सिंड्रोम यासारख्या पेशी-आकुंचन विकार असलेल्या रुग्णांमध्ये उत्तेजक औषधींमुळे स्नायूंचे आंचके वाढू शकतात. म्हणूनच डॉक्टरांच्या देखरेखीखालीच औषधोपचार करण्यात यावा.
[८ पानांवरील चौकट]
पालकांना इशारा
वास्तविकतः सर्वच मुलांमध्ये कधीकधी एकाग्रतेचा अभाव, उतावीळपणा आणि अतिक्रियाशीलता यांसारखी लक्षणं आढळतात. ही चिन्हं नेहमीच एडीएचडी असल्याचे सूचित करीत नाहीत. वेळ निघून जाण्याआधी, (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. स्टॅन्टन ई. सॅमनो सांगतात: “मी कितीतरी वेळा पाहिलंय, एखाद्या मुलाला एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसते, तेव्हा त्याला कोणतीतरी असमर्थता किंवा विकार जडलाय असे समजून आणि यात त्याचा काहीही दोष नाही असे मानून त्याच्या मर्जीप्रमाणे वागण्याची परवानगी दिली जाते.”
डॉ. रिचर्ड ब्रॉमफील्ड देखील एक इशारा देतात. त्यांनी असे लिहिलेय, “एडीएचडी झालाय असं ज्यांचं निदान करण्यात येतं त्यांपैकी काहींना न्युरॉलॉजिकल विकार झालेला असतो आणि त्यांना औषधोपचार आवश्यक असतो यात वाद नाही. पण, याच विकाराला आता गैरफायदा घेणे, ढोंग करणे, दुर्लक्ष करणे आणि इतर सामाजिक दुष्कृत्यांसाठी जबाबदार ठरवले जात आहे ज्यांचा एडीएचडीशी सहसा तिळमात्रही संबंध नसतो. खरं तर, एडीएचडीमध्ये आढळते तशाप्रकारची अस्वस्थता, कोणत्याही न्युरॉलॉजिकल अभावापेक्षा, आधुनिक जीवनशैलीतल्या नीतिमूल्यांच्या अभावामुळे, भयंकर हिंसा, मादक पदार्थांचा दुरुपयोग यांमुळे आणि थोड्या कमी तीव्रतेच्या कारणांबद्दल बोलायचे झाल्यास, गैरशिस्तपणा आणि सतत गोंधळ असलेल्या घरांतील वातावरणामुळे वाढते.”
म्हणूनच डॉ. रॉनल्ड गोल्डबर्ग यांनी एडीएचडीचा एक “सर्वसमावेशक निदान” म्हणून गैरवापर करण्याविरुद्ध दिलेला इशारा अगदी रास्त आहे. ते सल्ला देतात की, “प्रत्येक संभाव्य निदानाचा समग्र विचार केल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नये.” एडीएचडीशी मिळतीजुळती लक्षणं आढळल्यास ती अनेक शारीरिक किंवा भावनिक समस्यांपैकी एखाद्या समस्येस सूचित करू शकतात. यामुळे, अचूक निदान करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांचे साहाय्य घेणे आवश्यक आहे.
निदान झाल्यावरही, आईवडिलांनी औषधोपचाराविषयी पूर्ण साधकबाधक विचार करणं शहाणपणाचं ठरेल. रायटॅलिनमुळे त्रासदायक लक्षणं नाहीशी होऊ शकतात, पण त्यामुळे निद्रानाश, तीव्र चिंता आणि अस्वस्थता यांसारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणूनच, फक्त लक्षणं नाहीशी करण्यासाठी मुलांवर औषधोपचार करण्याची घाई करू नये असा डॉ. रिचर्ड ब्रॉमफील्ड इशारा देतात. ते म्हणतात, “बहुतेक मुलांना आणि मोठ्या प्रमाणावर प्रौढांनाही गरज नसताना रायटॅलिन दिले जात आहे. माझ्या अनुभवानुसार पालक आणि शिक्षक, मुलांची वागणूक कितपत सहन करू शकतात यावरच रायटॅलिन देणे न देणे बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. माझ्या माहितीत अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना गरज आहे म्हणून नव्हे, तर त्यांना शांत करण्यासाठी ते देण्यात येतं.”
या कारणास्तव, पालकांनी अविचारीपणे आपल्या मुलांवर एडीएचडी किंवा अध्ययन असमर्थतेचा शिक्कामोर्तब करू नये. उलट त्यांनी एखाद्या निपुण तज्ज्ञाच्या साहाय्याने सर्व पुराव्यांचा काळजीपूर्वक विचार करावा. एखाद्या मुलास अध्ययन असमर्थता आहे अथवा त्याला एडीएचडी झालाय हे सिद्ध झाल्यास, आईवडिलांनी या समस्येविषयी सांगोपांग माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांना सर्वात फायदेकारक पावलं उचलता येतील.
[९ पानांवरील चित्र]
एडीएचडी असलेल्या मुलांना प्रेमळ तरीसुद्धा सुसंबद्ध शिस्तीची गरज असते
[१० पानांवरील चित्र]
आईवडिलांनी केलेली प्रशंसा फार मोलाची असते