“स्वस्थ बसून लक्ष दे!” एकाग्रता अभाव व अतिक्रियाशीलता विकार नावाचे आव्हान
“जिमचं सुरवातीपासून हेच म्हणणं होतं की कॅल लाडामुळे वाया गेलाय, ते असंही म्हणायचे की आम्ही —म्हणजे विशेषतः मी—त्याच्याबाबतीत कडक झाले तर तो आपोआपच सुधारेल. आणि आता हे डॉक्टर आम्हाला सांगताहेत की चूक माझी, आम्हा दोघांची किंवा कॅलच्या शिक्षकांचीही नव्हती: खरं तर आमच्या बिचाऱ्या कॅललाच काहीतरी झालं होतं.”
कॅलला, एकाग्रता अभाव व अतिक्रियाशीलता विकार (अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिविटी डिसॉर्डर, एडीएचडी) जडलाय; हा विकार एका अशा स्थितीला सूचित करतो ज्यात एकाग्रतेचा अभाव, उतावीळ वर्तन आणि अतिक्रियाशीलता यांसारखी लक्षणं आढळतात. हा विकार अंदाजे ३ ते ५ टक्के शाळकरी मुलांना होतो. शिक्षण तज्ज्ञ प्रिसिल्ला एल. वेल यांच्या मते, “चॅनल निवडण्याचं सिलेक्टर बिघडलेल्या टीव्हीसारखं या मुलांचं मन असतं. त्यांचे विचार एकापाठोपाठ एक सुरूच असतात, त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ किंवा शिस्तबद्धता नसते.”
आपण एडीएचडीची तीन मुख्य लक्षणं विचारात घेऊ.
एकाग्रतेचा अभाव: एडीएचडी असलेले मूल अनावश्यक माहिती वगळून कोणत्याही एका विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच, बाहेरची दृश्ये, आवाज आणि वासांमुळे त्याचं लक्ष सहज विचलित होतं.a तो लक्ष देतोय, पण आजूबाजूच्या परिसरातील कोणतीही एक गोष्ट त्याचं लक्ष केंद्रित करू शकत नाही. कशावर आधी लक्ष एकाग्र करावं हे त्याला ठरवता येत नाही.
उतावीळ वर्तन: एडीएचडी असलेले मूल विचार न करता, परिणाम लक्षात न घेता कृती करते. त्याच्या वागण्यातून त्याला योजना आखण्याची आणि निर्णय घेण्याची चांगली क्षमता नसल्याचे दिसून येते आणि काहीवेळा तर त्याच्या कृती धोकेदायकही असतात. डॉ. पॉल वेन्डर लिहितात, “तो एकाएकी रस्त्यावर पळतो, मग कठड्यावर चढतो, लगेच झाडावर चढतो. यामुळे त्याच्याबाबतीत कापणे, भाजणे, खरचटणे यांसारखे प्रकार आणि डॉक्टरांकडे फेऱ्याही दुसऱ्या मुलांपेक्षा जरा जास्तच असतात.”
अतिक्रियाशीलता: अतिक्रियाशील मुलांची सारखी चुळबुळ चाललेली असते. त्यांना स्वस्थ बसणं माहितच नसतं. गुप्त अपंगत्व (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डॉ. गॉर्डन सरफाँटाइन लिहितात, “बारकाईने निरीक्षण केल्यास, या लोकांत प्रौढ झाल्यावरही पायांची, पावलांची, हातांची, पंजांची, ओठांची किंवा जिभेची कोणत्या न कोणत्या प्रकारची एकसारखी हालचाल चाललेली असते.”
तरीसुद्धा, लक्ष एकाग्र करण्यास असमर्थ असणारी आणि उतावीळपणे वागणारी काही मुलं अतिक्रियाशील नसतात. त्यांच्या विकाराला काहीवेळा फक्त एकाग्रता अभाव विकार (अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर, एडीडी) म्हणतात. डॉ. रॉनल्ड गोल्डबर्ग स्पष्ट करतात की काहीवेळा एडीडीमध्ये “अतिक्रियाशीलता अजिबातच नसते. किंवा विशिष्ट प्रमाणात अतिक्रियाशीलता असते—काही वेळा कदाचित कळूनही येणार नाही इतक्या, किंवा चीड यावी इतक्या, किंवा मग अगदीच असमर्थ होण्याइतक्या प्रमाणात ही अतिक्रियाशीलता असू शकते.”
एडीएचडी कशामुळे होतो?
गतवर्षांत एकाग्रतेसंबंधी समस्यांसाठी, पालकांकडून चांगले संगोपन न केले जाण्यापासून अनुस्फुरक प्रकाशापर्यंतची बहुविध कारणं देण्यात आली आहेत. पण आता असे म्हटले जाते की एडीएचडीचा संबंध मेंदूच्या विशिष्ट कार्यांत आलेल्या अडथळ्यांशी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थने १९९० साली, एडीएचडीची लक्षणं असलेल्या २५ प्रौढ व्यक्तींची चाचणी घेतली आणि त्यांना असं आढळलं की मेंदूच्या ज्या भागांचे हालचाल आणि एकाग्रतेवर नियंत्रण असते, नेमक्या त्याच भागांत या लोकांमध्ये ग्लुकोजची चयापचय क्रिया फार मंद होती. एडीएचडीच्या केसेसपैकी ४० टक्क्यांत आनुवंशिक घडणाचा प्रभाव असण्याची शक्यता दिसली. अतिक्रियाशील मुलाबद्दलचे पुस्तक (इंग्रजी) यानुसार गर्भावस्थेत आईने मद्य किंवा मादक पदार्थ घेणे, शिसे विषबाधा आणि काही तुरळक केसेसमध्ये आहाराचा देखील एडीएचडीशी संबंध असू शकतो.
पौगंडावस्थेत आणि प्रौढावस्थेत एडीएचडी
अलीकडच्या वर्षांत डॉक्टरांना आढळले आहे की एडीएचडी हा केवळ बालपणात होणारा विकार नाही. डॉ. लॅरी सिल्वर सांगतात की “सहसा आईवडिल आपल्या मुलांना उपचारासाठी आणतात आणि म्हणतात, ‘लहानपणी मी असाच होतो/होते.’ मग ते कबूल करतात की रांगेत उभं राहणं, सभांमध्ये स्वस्थ बसणं, कोणतंही काम पूर्ण करणं त्यांना अजूनही कठीण जातं.” आता असं समजलं जातं की एडीएचडी असलेल्या एकूण मुलांपैकी जवळजवळ निम्म्या मुलांची निदान काही लक्षणं तरी त्यांच्या पौगंडावस्थेत आणि प्रौढावस्थेतही कायम राहतात.
एडीएचडी असणाऱ्यांचं धोकेदायक वर्तन पौगंडावस्थेत, अपराधीपणाच्या वर्तणुकीकडे झुकू लागतं. एडीएचडी असलेल्या एका पौगंडावस्थेतील मुलाची आई सांगते, “तो कधी कॉलेजमध्ये जाऊ शकेल किंवा नाही याची मला पूर्वी काळजी असायची. पण आता तर त्याला अटक होऊ नये अशी मी सतत प्रार्थना करत असते.” अशाप्रकारची भीती साधार असू शकेल हे १०३ अतिक्रियाशील मुलांचा आणि हा विकार नसलेल्या १०० मुलांच्या एका नियंत्रक समूहाचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर दिसून आलं. न्यूजवीक या नियतकालिकाच्या वृत्तानुसार, “विशी गाठण्याच्या सुमारास, विकार नसलेल्या मुलांच्या तुलनेत अतिक्रियाशील समूहातल्या मुलांना गतकाळात अटक झाली असावी अशी दुप्पट, गंभीर गुन्ह्यांत त्यांना दोषी ठरवण्यात आले असावे अशी पाचपट आणि त्यांनी तुरुंगवास भोगला असावा अशी नऊपट जास्त शक्यता असते.”
प्रौढावस्थेत एडीएचडीमुळे काही खास प्रकारच्या समस्या सामोऱ्या येतात. डॉ. एड्ना कोपलंड म्हणतात: “सहसा जो मुलगा लहानपणी अतिक्रियाशील असतो तो मोठा झाल्यावर वारंवार नोकऱ्या बदलतो, पुन्हा पुन्हा नोकरीवरून काढला जातो, दिवसभर टवाळकी करतो आणि सतत अस्वस्थ असतो.” कारण न समजल्यास ही लक्षणं एखाद्या विवाहात समस्या आणू शकतात. एडीएचडी असलेल्या एका माणसाची पत्नी म्हणते: “साध्या गप्पागोष्टी करताना देखील, माझ्या बोलण्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष नसायचं. ते जणू आपल्याच तंद्रीत असायचे.”
अर्थात, ही लक्षणं सर्वसामान्यपणे—निदान काही प्रमाणात, अनेक लोकांत आढळतात. डॉ. जॉर्ज डॉरी म्हणतात, “ही लक्षणं पूर्वीपासूनच होती का असं आम्ही त्यांना विचारतो.” उदाहरणार्थ, ते सांगतात की नोकरी गेल्यावर किंवा आपल्या बाळाच्या जन्मानंतर एखादा माणूस विसरभोळा बनला असल्यास हा काही विकार नव्हे.
शिवाय, जर एखाद्याला खरंच एडीएचडी असला तर त्याची लक्षणं व्यापक असतात, अर्थात, जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांचा प्रभाव पडतो. गॅरी नावाचा एक ३८ वर्षांचा हुशार, उत्साही माणूस अशाच परिस्थितीत सापडला; लक्ष विचलित न होता, त्याला एक ही काम पूर्ण करता येईनासं झालं. त्याने आजवर १२० पेक्षा जास्त नोकऱ्या करून पाहिल्या आहेत. तो म्हणाला, “आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही असा माझा स्वतःविषयी ग्रह झाला होता.” पण गॅरी आणि त्याच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या अनेकांना—ज्यांत, मुले, तरुण आणि प्रौढही सामील आहेत—एडीएचडीला तोंड देण्यासाठी साहाय्य लाभले आहे. कशाप्रकारे?
[तळटीपा]
a मुलींपेक्षा हा विकार मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे आपण पुल्लिंगी संबोधन वापरू.