तरुण लोक विचारतात . . .
देवाचा मित्र बनण्यासाठी मी काय करावे?
“विश्वासूपणा.” “वैयक्तिक एकनिष्ठता.” आपल्या सर्वात जवळच्या माणसांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या अनुबंधांचे वर्णन करताना लोक सहसा अशाच संज्ञांचा उपयोग करतात. तथापि, या विलक्षण विश्वाच्या महान निर्माणकर्त्याशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या अनुबंधाचे वर्णन करण्यासाठी देखील या संज्ञांचा उपयोग करता येऊ शकतो—अर्थात, स्वतः देव तुमचा जिवाभावाचा मित्र बनू शकतो याची तुम्हाला कल्पना होती का? हो, बायबलमध्ये ईश्वरी निष्ठा असण्याविषयी सांगितलेले आहे, आणि या संज्ञेत केवळ देवाच्या आज्ञांनुसार चालण्याचाच नव्हे, तर देवाशी एक घनिष्ट नातं, कृतज्ञ अंतःकरणातून उत्पन्न होणारं नातं असण्याचाही अभिप्रेत अर्थ आहे.
असं हे नातं सुसाध्यच नव्हे तर लाभदायकही आहे हे या मालिकेतील यापूर्वीच्या लेखांतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.a पण, देवासोबत अशी जिवाभावाची मैत्री करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? ही मैत्री जन्मतःच किंवा देवभीरू आईवडिलांकडून तुम्हाला आपोआप आनुवंशिकतेने मिळालेली नसते. उलट, प्रांजळ प्रयत्नांनीच ही मैत्री संपादन करता येते. प्रेषित पौलाने तरुण तीमथ्याला, “सुभक्तीविषयी [ईश्वरी निष्ठेविषयी] कसरत कर,” असे सांगितले. म्हणजेच, एखादा खेळाडू कसरत करताना जशी मेहनत करतो तशाच प्रकारची मेहनत तीमथ्याला करायची होती! (१ तीमथ्य ४:७, ८, १०) तुम्हाला देवाशी मैत्री जोडायची असल्यास तुम्ही देखील असेच केले पाहिजे. पण या बाबतीत कसरत करण्यास तुम्ही कशी सुरवात करू शकता?
देवाविषयी वैयक्तिक ज्ञान
देवाबद्दल एकनिष्ठता अंतःकरणातून उत्पन्न होत असल्यामुळे तुम्ही तुमचे अंतःकरण देवाच्या ज्ञानाने जणू भरून टाकावे. सांगण्यास खेद वाटतो की ५०० पेक्षा अधिक तरुणांना, “एकांतात तुम्ही कितीवेळा बायबलचे वाचन करता?” असे विचारण्यात आले, तेव्हा ८७ टक्के तरुणांची उत्तरं, “कधी कधी,” “क्वचितच,” किंवा “कधीच नाही” अशी होती. अधिकांश तरुणांना बायबलचं वाचन निरस आणि कंटाळवाणं वाटतं असं दिसतं. पण हे तुमच्या हातात आहे! विचार करा: तरुण मंडळीपैकी काहीजण स्पोट्र्सविषयी इत्थंभूत माहिती किंवा आपल्या आवडत्या गाण्यांचे बोल का तोंडपाठ करतात बरं? कारण त्यांना त्या गोष्टींत रस असतो. तसेच, बायबलच्या अभ्यासात तुम्ही चित्त एकाग्र केल्यास तुम्हाला त्याविषयी गोडी वाटू लागेल. (१ तीमथ्य ४:१५) प्रेषित पेत्राने प्रोत्साहन दिले: “वचनरूपी निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, पं.र.भा.) होय, तुम्ही शास्त्रवचनांत अशाच प्रकारची गोडी निर्माण किंवा विकसित केली पाहिजे. यासाठी कदाचित प्रयत्न करावे लागतील, पण यातून मिळणाऱ्या फायद्यांमुळे तुम्हाला प्रयत्न केल्याचा कधीच खेद होणार नाही.b
पहिला फायदा म्हणजे, देवाच्या वचनाचे तसेच बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन आणि अध्ययन केल्यामुळे तुम्हाला ‘परमेश्वराच्या मनोहर रूपाचे’ जणू दर्शन घडेल. (स्तोत्र २७:४) अंबर नावाच्या एका ख्रिस्ती मुलीने संपूर्ण बायबल वाचून काढण्याचा निर्धार केला. याला जवळजवळ एक पूर्ण वर्ष लागलं. अंबर सांगते, “खूप वेळ खर्ची घालावा लागला, खूप प्रयत्न करावे लागले, पण असं करूनही इतके असंख्य फायदे मिळवून देणारं इतर कोणतं काम मी आजवर केलं असेल असं नाही वाटत मला. वाचताना मला असं वाटायचं जणू एखाद्या लहान बाळाचे बाबा त्याला शिकवतात तसं यहोवा मला मांडीवर बसवून प्रेमानं शिकवतो आहे. मी त्याच्याबद्दल कितीतरी गोष्टी शिकले—त्या गोष्टी समजल्यामुळे मी त्याच्या आणखीनच जवळ आले आणि यापुढे आयुष्यभर त्याला भिऊन वागायचं असं मी मनोमन ठरवलं.”
बायबल वाचताना, यहोवानं त्याच्या मित्रांना विश्वासूपणे आधार दिलेल्या अनेक प्रसंगांविषयी तुम्हाला शिकायला मिळते. (स्तोत्र १८:२५; २७:१०) त्याचे आदर्श नेहमीच सर्वोत्तम असतात आणि आपल्या चिरकल्याणासाठी असतात हे तुम्हाला कळून येते. (यशया ४८:१७) प्रीती आणि बुद्धी यांसारख्या त्याच्या अतुलनीय गुणांविषयी वाचून तुम्हाला त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळते. (इफिसकर ५:१) पण, या माहितीचा तुमच्या अंतःकरणावर परिणाम होण्याकरता मनन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. वाचताना स्वतःला विचारा: ‘यातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? मी हे माझ्या विचारांत आणि कृतींत कसं उतरवू शकतो? यहोवाच सर्वात चांगला मित्र आहे हे यातून कसं कळून येतं?’
वैयक्तिकपणे आणि मंडळीत केलेल्या अभ्यासाद्वारे देवाविषयी मिळणाऱ्या ज्ञानाकरवी तुम्हाला आणखीन एका प्रकारे त्याच्या जवळ यायला मदत मिळेल. फ्रेंच भाषेत एक म्हण आहे: “खरे मित्र तेच जे एकमेकांसारखेच विचार करतात.” पण आपण देवाच्या “सारखेच” विचार कसे करू शकतो? डिनीस नावाची एक तरुणी सांगते, “आपण एखाद्या विषयावर जितका अभ्यास आणि संशोधन करतो तितकाच आपल्याला त्या विषयावर यहोवाचा दृष्टिकोन आणखीन स्पष्ट होतो. त्याचे एखाद्या विषयावर कसे विचार आहेत ते जाणून घेतल्यामुळे साहाय्य मिळते.”
नीतिमान वर्तन आवश्यक
देवाच्या नैतिक आदर्शांचा आदर करणाऱ्यांनाच तो आपले मित्र म्हणून निवडतो. नीतिसूत्रे ३:३२ (सुबोध भाषांतर) म्हणते, “जो नीतिमान आहे त्याला तो मित्र मानतो.” नीतिमान होण्याकरता झटणारा तरुण ‘यहोवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतो.’ (२ राजे १०:३१) अशा आज्ञाधारक वर्तनामुळे एखादी व्यक्ती देवाच्या किती जवळ येऊ शकेल? येशू ख्रिस्ताने म्हटले: “माझा पिता त्याच्यावर प्रीति करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.” (योहान १४:२१-२४) किती सुखावह कल्पना! विश्वातल्या दोन सर्वात महान व्यक्ती कुणा मानवाविषयी सतत विचार करतात आणि काळजी घेतात असा जरा विचार करून पाहा! तुम्ही यहोवाच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालण्याची खबरदारी घेतल्यास हे तुमच्या बाबतीतही खरं ठरेल.
नीतिमान होण्याचा अर्थ तुम्ही परिपूर्ण असावे असा आहे का? निश्चितच नाही! दुर्बलतेमुळे तुमच्या हातूनही एखादी चूक घडल्यास तुम्ही ‘देवाच्या आज्ञांचा मार्ग’ त्यागला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. (स्तोत्र ११९:३५) दावीद राजाविषयी बायबल आपल्याला काय सांगते ते विचारात घ्या. देवाचा विश्वासू मित्र असूनही दुर्बलतेमुळे त्याने काही गंभीर चुका केल्या. तरीसुद्धा, यहोवाने म्हटले की तो “खऱ्या मनाने व सरळतेने” चालला. (१ राजे ९:४) आपल्या हातून कोणतीही चूक घडल्यास राजा दावीद मनापासून पश्चात्ताप व्यक्त करायचा आणि देवाच्या मर्जीप्रमाणे चालण्याचा कसोशीनं प्रयत्न करायचा.—स्तोत्र ५१:१-४.
दावीदाचे देवावर प्रेम असले तरीसुद्धा काही वेळा योग्य पाऊल उचलणे किती जड जाऊ शकते याची त्याला कल्पना होती. म्हणून त्याने देवाजवळ विनवणी करत म्हटले: “तू आपल्या सत्पथाने मला ने.” हो, त्याने देवाला नाराज करण्याविषयी प्रांजळ भीती मनात निर्माण केली. म्हणूनच तो म्हणू शकला: “परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्याशी असते.” (स्तोत्र २५:५, १४) ही एक विकृत भीती नसून निर्माणकर्त्याविषयी अंतःकरणापासून वाटणारी श्रद्धा आणि त्याला दुखावण्याचे हितावह भय आहे. हे ईश्वरी भय उचित वर्तनासाठी आधारभूत आहे. स्पष्टीकरणासाठी, जॉशुआ नावाच्या एका ख्रिश्चन तरुणाचे उदाहरण पाहा.
जॉशुआच्या शाळेतल्या एक मुलीने त्याला एका चिठ्ठीतून कळवले की तिला तो आवडतो आणि त्याच्यासोबत “प्रेमसंबंध” असावेत अशी तिची इच्छा आहे. जॉशुआलाही तिच्याविषयी आकर्षण होतं, पण सत्य न मानणाऱ्या व्यक्तीसोबत सलगी केल्यामुळे पुढे अनैतिक कृत्य घडू शकेल आणि यहोवासोबत त्याची मैत्री धोक्यात येईल याची त्याला कल्पना होती. म्हणून आपल्याला हा संबंध वाढवण्याची इच्छा नाही असे त्याने तिला स्पष्ट शब्दांत सांगितले! ही समस्या आपण कशी सोडवली हे जेव्हा त्याने त्याच्या आईला सांगितले तेव्हा ती सहज बोलून गेली, “जॉशुआ, अरे तिला किती वाईट वाटलं असेल!” जॉशुआने उत्तर दिले: “कबूल आहे आई, पण यहोवाला वाईट वाटण्यापेक्षा तिला वाईट वाटलेलं मला चालेल.” त्याच्या ईश्वरी भयामुळे, अर्थात, स्वर्गात राहणाऱ्या आपल्या मित्राला दुखावण्याच्या भीतीमुळे त्याला नीतिमान वर्तन कायम ठेवण्याची प्रेरणा मिळाली.
चांगल्या सोबत्यांशी संगत ठेवा
उलटपक्षी, लिन नावाची एक तरुणी पुन्हा पुन्हा संकटात सापडायची. तिची समस्या? नको त्या लोकांबरोबर सलगी असणे हीच तिची समस्या होती. (निर्गम २३:२; १ करिंथकर १५:३३) उपाय? नवीन मित्र शोधणे! शेवटी लिन म्हणाली, “यहोवावर प्रेम करणाऱ्या मित्रांच्या सहवासात राहिल्यास आपला विवेक संवेदनशील राहतो आणि आपण संकटंही टाळतो. ते जेव्हा वाईट कृत्यांबद्दल आपली घृणा व्यक्त करतात तेव्हा आपल्यालाही त्यांच्यासारखंच वाटू लागतं.”
खरं पाहता, अनुचित सोबती निवडल्यामुळे देवाशी मैत्री जोडण्यात एक मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. अठरा वर्षांच्या ॲनने कबूल केले: “सोबत्यांचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असतो. पाहता पाहता, आपणही त्यांच्याचसारखे बनतो. आपल्या विचारसरणीवर त्यांचा प्रभाव पडतो. गप्पागोष्टी सहसा लैंगिक विषयांवरच असतात. त्यामुळे मनात कुतूहल निर्माण होतं. अनुभव घेऊन पाहण्याची इच्छा बळावते.” ॲनला एका कटू अनुभवातून हा धडा मिळाला. ती सांगते: “मला याचा खरेपणा पटलाय. मी १५ वर्षांच्या वयातच अनैतिक संबंधांत गुंतून गरोदर राहिले.”
“जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे,” या बायबलच्या शब्दांच्या सत्यतेची ॲनला शेवटी खात्री पटली. (याकोब ४:४) तिला जगाशी मैत्री करण्याची इच्छा होती, नव्हे तिने जणू तसा निर्धारच केला होता. पण यामुळे वारंवार तिच्या भावनांची राखरांगोळीच होत राहिली. सुदैवाने, शेवटी तिचे डोळे उघडले. आपल्या कृत्यांबद्दल तिला पस्तावा झाला आणि तिने आपल्या आईवडिलांकडून तसंच मंडळीच्या वडिलांकडून साहाय्य मागितलं. ती नवीन मित्रमैत्रिणींच्या संगतीत राहू लागली. (स्तोत्र १११:१) अनेक प्रयत्नांती, ॲन देवाची मैत्री पुन्हा मिळवण्यात यशस्वी झाली. आज अनेक वर्षे उलटल्यावर, ती म्हणते: “मी पूर्वीपेक्षा यहोवाच्या कितीतरी जवळ आलेय.”
बायबलचा वैयक्तिक अभ्यास व मनन करण्याद्वारे, नीतिमान वर्तन तसेच श्रेयस्कर सोबत्यांचा सहवास राखण्याद्वारे तुम्हीसुद्धा देवासोबत एक घनिष्ट मैत्री संपादन करू शकता. तथापि, ही मैत्री टिकवून ठेवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. अडचणी आणि वैयक्तिक कमकुवतपणाला तोंड देऊन असं करणं कसं शक्य आहे? या मालिकेतील पुढचा लेख हा विषय विचारात घेईल.
[तळटीपा]
a जुलै २२ आणि नोव्हेंबर २२, १९९५ हे सावध राहा! (इंग्रजी) अंक पाहा.
b आमच्या ऑगस्ट ८, १९८५ (इंग्रजी) अंकातील “तरुण लोक विचारतात . . . बायबल का वाचावे?” हा लेख पाहा.
[१३ पानांवरील चित्र]
माझे सोबती देवाचा मित्र बनण्यासाठी मला सहायक ठरतील का?