सहिष्णुता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत
काश्मीरच्या खोऱ्याचे सृष्टीसौंदर्य पाहून अचंबित झालेले १६ व्या शतकातील एक तत्त्ववेत्ते म्हणाले: “जर जगात कुठं नंदनवन असलं तर ते हेच आहे!” स्पष्टतः, जगाच्या त्या भागात भावी काळात काय घडून येईल याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नव्हती. मागील पाच वर्षांत कमीतकमी २०,००० लोक, तेथील विभक्ततावादी आणि भारतीय सेना यांच्यातील चकमकीत ठार झाले आहेत. जर्मन वृत्तपत्र स्यूटडॉइक सायटन त्या प्रदेशाचे वर्णन आता “अश्रूंचे खोरे” असे करते. काश्मीरचे खोरे एक साधा तरी अत्यंत बहुमोल धडा शिकवून जाते: असहिष्णुता एखादे संभवनीय परादीस धुळीस मिळवू शकते.
सहिष्णू असण्याचा अर्थ काय होतो? कॉलिन्स कोबिल्ड इंग्लीश लँग्वेज डिक्शनरी यानुसार, “तुम्ही सहिष्णू असल्यास इतरांना आपापल्या प्रवृत्ती अथवा विश्वासानुरूप जगण्यास किंवा एखादी विशिष्ट पद्धत तुम्हाला आवडत नसली अथवा मान्य नसली तरी त्यानुसार त्यांना वागण्याची अनुमती देणे.” किती हा वांच्छनीय गुण! ज्या लोकांचे विश्वास आणि प्रवृत्ती आपल्यापेक्षा कितीतरी भिन्न असताही ते आपल्या विश्वासांचा आणि प्रवृत्तींचा आदर करतात तेव्हा अशांच्या सहवासात आपणास निश्चित सुखावह वाटते.
सहिष्णुतेपासून हटवादापर्यंत
सहिष्णुतेचे विरुद्ध असहिष्णुता आहे जिच्या तीव्रतेचे विविध स्तर आहेत. दुसऱ्या एखाद्याचे वागणे अथवा काही गोष्टी करण्याची पद्धत यांसंबंधी असणाऱ्या एका संकुचित मनोवृत्तीच्या नापसंतीमुळे असहिष्णुतेचा जन्म होऊ शकतो. संकुचित मनोवृत्ती जीवनातील आनंद पार आटवून टाकते आणि नवनवीन कल्पनांना एखाद्याच्या मनात प्रवेश करू देत नाही.
उदाहरणार्थ, एखाद्या धीरगंभीर व्यक्तीला एखाद्या मुलाचा अतिउत्साह कदाचित आवडणार नाही. वयोमानात आपल्यापेक्षा कोणा मोठ्या व्यक्तीच्या चिंतनशील वागणुकीमुळे एका तरुणास कंटाळा येईल. एखाद्या दूरदर्शी व्यक्तीस एका साहसी व्यक्तीच्या जोडीने कार्य करावयास लावले तर त्या दोघांचेही जमणार नाही. नावड, कंटाळा येणे आणि न जमणे यांच्या मागे कोणते कारण असावे बरे? प्रत्येक परिस्थितीत एखाद्याला दुसऱ्याची प्रवृत्ती अथवा वागणे सहन करणे जड जाते, हे त्याचे कारण होय.
जेथे असहिष्णुता वाढते तेथे संकुचित मनोवृत्ती पूर्वग्रहापर्यंत मजल मारू शकते; पूर्वग्रह हा एखादा गट, जात, अथवा धर्म यांच्याप्रती असणारा तिरस्कार होय. हटवाद हा पूर्वग्रहापेक्षाही अतितीव्र स्वरूपाचा असून त्याचे प्रकटन हिंसक द्वेषातही होऊ शकते. याचा परिणाम, दुःस्थिती आणि रक्तपात असा होतो. धर्मयुद्धांदरम्यान, असहिष्णुतेचा काय परिणाम झाला याचा विचार करा. आजही, बॉस्निया, र्वांडा आणि मध्य पूर्वेतील संघर्षामागे असहिष्णुता हेच कारण आहे.
सहिष्णुतेकरता समतोलाची आवश्यकता असते आणि उचित समतोल राखणे तितके साधेसोपे नाही. घड्याळाच्या लंबकासारखे आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झुलत असतो. काही वेळा आपण अत्यल्प सहिष्णुता दर्शवितो तर काही वेळा अतिरेक करतो.
सहिष्णुतेपासून अनैतिकतेपर्यंत
प्रमाणापेक्षा अधिक सहिष्णू असणे शक्य आहे का? अमेरिकेच्या सेनेटचे सभासद डॅन कोट्स यांनी १९९३ साली बोलताना, “सहिष्णुतेचा अर्थ आणि आचरण यावरील एक संग्राम” असे त्याचे वर्णन केले. असे म्हणण्याचा त्यांचा अर्थ काय होता? सेनेटच्या त्या सभासदाने असे दुःखद अभिप्राय मांडले, की सहिष्णुतेच्या नावाखाली काही जण “नैतिक सत्यावरील विश्वास—चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य यांवरील विश्वासाचा त्याग करतात.” चांगले वर्तन कोणते आणि वाईट वर्तन कोणते हे ठरविण्याचा हक्क समाजाच्या हातात नाही असे या लोकांना वाटते.
सन १९९० साली ब्रिटिश राज्यकर्ते लॉर्ड हेलशेम यांनी लिहिले: “अनीश्वरवाद, अज्ञेयवाद, भौतिकवाद, लोभ अथवा स्वीकारहार्य कारणांपैकी इतर कोणतेही कारण नैतिकेचा सर्वात प्राणघातक शत्रू नव्हे. नैतिकतेचा खरा शत्रू शून्यवाद—अक्षरशः हरएक गोष्टीवरून उडालेला विश्वास हा होय.” साहजिकच मग, जर कशावरच आपला विश्वास नसला तर आपल्याजवळ योग्य वर्तनाचे मापदंड उरणार नाहीत आणि सर्व काही सहनीय होऊ शकते. परंतु, प्रत्येक प्रकारचे आचरण सहन करणे योग्य आहे का?
डेनिश माध्यमिक शाळेतील एका मुख्याध्यापकांनुसार, नाही. त्यांनी १९७० च्या दशकारंभी वृत्तपत्रात एक लेख लिहिला; त्यात त्यांनी, वृत्तपत्रांत बीभत्स मनोरंजनासंबंधी पशू आणि मानवांमधील लैंगिक समागम रेखाटणाऱ्या जाहिरातींविरुद्ध तक्रार केली. ह्या जाहिरातींना डेन्मार्कच्या ‘सहिष्णुतेमुळेच’ परवाना मिळाला होता.
खरेच, केवळ अत्यल्प सहिष्णुता दाखवल्यानेच नव्हे तर खूपच अधिक सहिष्णुता दाखवल्यानेही समस्या उद्भवत असतात. टोकाची स्थिती टाळून योग्य समतोल राखणे कठीण का आहे? कृपया पुढील लेखही वाचा.
[३ पानांवरील चित्र]
मुलांच्या चुकांसंबंधी टोकाची प्रतिक्रिया दाखवणे त्यांच्याकरता अपायकारक असू शकते.
[४ पानांवरील चित्र]
मुले करत असलेल्या सर्वच गोष्टी सहन करणे त्यांना त्यांच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या पेलण्यास सिद्ध करणार नाहीत