आमच्या वाचकांचे मनोगत
पान न् पान वाचते मला सावध राहा! आवडतं पण पूर्वी मी फक्त मला आवडतील असेच लेख वाचायचे. आता मात्र मी पान न् पान वाचते आणि म्हणून आधी जे लेख मी वगळायचे ते विषय सुद्धा आता मला आवडतात. उदाहरणार्थ, मी एवढ्यातच, “प्राचीन अमेरिकन इंडियन परंपरा” (मार्च ८, १९९६, इंग्रजी) हा लेख वाचला आणि मला अतिशय आवडला!
ई. ए. एस., ब्राझील
मन दुखावणे “बायबलचा दृष्टिकोन: तुम्ही इतरांचे मन दुखावता तेव्हा काय करावे” (फेब्रुवारी ८, १९९६, इंग्रजी) हा लेख अगदी वेळेवर आला. एका ख्रिस्ती बहिणीने माझ्याशी अचानक बोलणं बंद केलं. तिचं मन मी दुखावलं का असं मी तिला विचारलं आणि माफी मागितली. पण तिच्यात काही बदल झाला नाही. मला याचं अतिशय वाईट वाटलं आणि यहोवाला माझी सेवा मान्य नाही असा मी विचार करू लागले. पण त्या लेखातला शेवटचा परिच्छेद वाचल्यावर मला केवढा दिलासा मिळाला! त्यात असं म्हटलंय “एकदा तुम्ही समेट करण्याचा प्रयत्न केला, तर मग यहोवाला तुमची उपासना स्वीकारण्यास आवडेल.”
एम. आर., अर्जेंटिना
नाग “नागाला भेटावयास तुम्हाला आवडेल का?” (मार्च २२, १९९६) हा लेख खूप सुंदर होता. पण पृष्ठ १६ वरील एका चित्राचा मथळा असे म्हणतो: “उष्ण खडकावर ऊन खात असताना एक काळा नाग त्याची फणा काढतो.” माझ्या मते, नागाला धोक्याची चाहूल लागते किंवा त्याला डिवचले तरच तो आपली फणा काढतो.
आर. एफ., जर्मनी
याचे स्पष्टीकरण, त्या लेखातील पृष्ठ १८, परिच्छेद १ आणि पृष्ठ २०, परिच्छेद २ यात दिले आहे. भारतामधील आमच्या बातमीदारानुसार, छायाचित्रकाराच्या सहाय्यकाने नागाला डिवचल्यामुळे त्याने त्या फोटोत फणा काढली होती.—संपादक.
अपंग चालक “अपंग असतानाही गाडी चालवता येणे” (मे ८, १९९६, इंग्रजी) हा लेख अगदीच समयोचित होता. मी अपंग असल्यामुळे माझी ख्रिस्ती सेवा मर्यादित आहे असं मला वाटतं. आता यहोवाच्या कृपेमुळे माझ्याकडे एक खास कार आहे आणि या लेखामुळे माझी सेवा वाढवायला मला प्रेरणा मिळाली आहे.
ए. ए. व्ही., ब्राझील
नाच मला फावल्या वेळात शास्त्रीय, लॅटिन आणि सॉफ्ट पॉप्युलर संगीतावर नाचायला आवडतं. “बायबलचा दृष्टिकोन: नाचणे ख्रिश्चनांकरता योग्य आहे का?” (मे ८, १९९६, इंग्रजी) या लेखाची मला खरोखर कदर वाटते. यामुळे, मनोरंजनाच्या या प्रकाराविषयी आणखी न्याहाळून पाहायला मला मदत मिळाली. तुम्ही त्यात जे आत्म-परीक्षक प्रश्न विचारले होते त्यांच्यामुळे मला निर्दोष आणि “जगापासून निष्कलंक” राहायला मदत मिळेल.—याकोब १:२७.
डी. डी. जी., त्रिनिदाद
मी १५ वर्षांची आहे आणि नाचण्याच्या बाबतीत, उचित कोणतं आणि अनुचित कोणतं हे ठरवायला मला अतिशय कठीण वाटलंय. त्या लेखात दिलेल्या मार्गदर्शनामुळे—त्याचप्रमाणे तेथे दिलेल्या बायबलमधल्या शास्त्रवचनांमुळे—मला आता उचित गोष्टींची निवड करता येईल.
एम. आर., संयुक्त संस्थाने
कर्णबधिरांकरता तरतुदी मी कर्णबधिर आणि अंधळी आहे आणि “संकेत करणाऱ्या हातांद्वारे पोहंचणे” या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. (एप्रिल ८, १९९६, इंग्रजी) त्यामध्ये, अमेरिकन सांकेतिक भाषेतील “आनंदी स्तुतीकर्ते” या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनांबद्दल सांगितलं होतं. अंध आणि कर्णबधिर असलेले पुष्कळजण तिथं उपस्थित होते हे कळाल्यावर मला खूप प्रोत्साहन मिळालं. आमचं अधिवेशन डिसेंबर १९९५ मध्ये इथं होतं तेव्हा ज्यांनी अधिवेशन कार्यक्रम आमच्याकरता अनुवादित केला त्यांचे मी खूप आभार मानते. मी ब्रेल कधी शिकले नाही, म्हणून लोकांना प्रचार करायला मी १२१ बायबल वचने पाठ केली आहेत. यशया ३५:५, ६ इथं सांगितल्याप्रमाणे, बहिरे ऐकू लागतील आणि मुके बोलू लागतील या देवाच्या अभिवचनाची पूर्णता पाहायची माझी इच्छा आहे. येणाऱ्या परादीसमध्ये मला यहोवाला स्तुतीचे गीत गायचेत!
ए. एफ. ए., अर्जेंटिना