जगावरील दृष्टिक्षेप
सेल्युलर फोनचा धोका
जपानमधील अलीकडच्या एका अभ्यासाने यास पुष्टी दिली, की सेल्युलर टेलिफोनमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे, रुग्णालयीन वैद्यकीय उपकरणांसंबंधी गंभीर समस्या उदभवू शकतात. असाही ईव्हनिंग न्यूझ म्हणते: “एका चाचणीत, ४५ सेंटीमीटरच्या अंतरावर वापरलेल्या सेल्युलर फोनमुळे एक हृदय-फुप्फुस यंत्रणा बंद पडली.” संशोधकांच्या निदर्शनास हे देखील आले, की द्रवीय संक्रमण पंपांपासून तसेच ॲन्टीकॅन्सर औषधांचा पुरवठा करणाऱ्या पंपांपासून ७५ सेंटीमीटरवर वापरलेल्या सेल्युलर फोनमुळे सदर उपकरणावरील गजर एक विशिष्ट प्रकारचा आवाज करू लागला. त्याचप्रमाणे, क्ष-किरण यंत्रणा तथा तान अथवा दाबमापक म्हटलेल्या यंत्रणावरही याचा प्रभाव पडला. या संशोधनांवर आधारित डाक व दूरसंचार मंत्रालय शिफारस करते, की शस्त्रक्रिया शाला अथवा अति दक्षता विभागात सेल्युलर फोन घेऊन प्रवेश करू नये. एका सर्वेक्षणानुसार टोकियोतील काही २५ वैद्यकीय संस्थांनी सेल्युलर फोनचे विनियमन करण्यास सुरवात केली असून यांपैकी १२ संस्थांनी तर सेल्युलर फोनवर पूर्णपणे बंदीही घातली आहे.
सर्वसाधारण वाढीची खात्री करणे
बाळाची वाढ केवळ अनुवंशिकतेमुळेच नव्हे तर आणखी दुसऱ्या गोष्टीनेही प्रभावित होते असा अहवाल झॉर्नल डो ब्रॉझील देते. हेच वृत्तपत्र अशी टिपणी करते की, “उत्तम पोषाहार ही योग्य वाढ होईल याची हमी आहे” आणि आणखी पुढे ते असेही म्हणते, की मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये देखील निकृष्ट आहार सर्वसामान्य आहे. “वाढीसाठी असणारा आणखी एक मूलभूत प्रेरक म्हणजे नियमित स्वरूपाचा व्यायाम हे आहे,” असे अंतःस्राव विज्ञानाचे प्राध्यापक ऑमेल्यो गोडाइ मॉटॉस यांनी निरीक्षिले. “बाळ निद्रिस्त असताना वाढीची संप्रेरक तयार होत असल्यामुळे बाळाला पुरेशी शांत झोप मिळत असल्याची खात्री केली पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच, भावनिक समस्या मुलातील वाढ मंदावू शकतात. अंतःस्राव शास्रज्ञ वॉलमीर कोटीन्यू यांच्या मते, “तासन्तास दूरदर्शन पाहत बसणे, विशेषकरून हिंसक चित्रपट हे मुलाच्या झोपेकरता बाधक असून त्यांची नैसर्गिक वाढ बिघडवू शकते.”
आशावाद आरोग्यपूर्ण असू शकतो
फिनलंडमध्ये संचालित केलेल्या एका अलीकडील अभ्यासाने, ह्या विश्वासास पुन्हा पुष्टीकरण दिले, की निराशावाद हा मानसिक व शारीरिक व्याधींचे धोके अधिक वाढवतो तर आशावाद उत्तम आरोग्याला बढती देतो. ४२ ते ६० या वयोगटांतील सुमारे २,५०० पुरुषांचे, ४ ते १० वर्षांपर्यंतच्या काळात निरीक्षण करण्यात आले होते. विज्ञान वार्ता (इंग्रजी) ह्या नियतकालिकानुसार, वैज्ञानिकांनी असा अहवाल दिला की, ज्या पुरुषांमध्ये “साधारण अति निराशा होती त्यांचे मृत्युप्रमाण, . . . कमी ते काहीच निराशा नसलेल्यांपेक्षा दोन ते तीन पट अधिक होते; पहिल्या गटामध्ये कर्करोग व हृदयविकाराचे झटके देखील वारंवार उद्भवले.”
नन्स कराटे शिकतात
स्त्रियांवरील हिंसेच्या वाढत्या भयामुळे, दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातल्या मादवरम येथील सेंट ॲन्स प्रोव्हिंशिएट नन्सचा एक गट, कराटेचे प्रशिक्षण प्राप्त करू लागला आहे. ऑल इंडिया ईशिनऱ्यू कराटे असोसिएशनचे अध्यक्ष शीहन हुसेनी म्हणतात, की कराटे शिक्षक या नात्याने मागील २४ वर्षांदरम्यान त्यांनी प्रशिक्षित केलेल्या इतर स्त्रियांपेक्षा या नन्सनी अधिक चांगली कामगिरी बजावली आहे. ते म्हणतात: ‘मला असं वाटतं, की त्यांच्यामध्ये असणारा सुप्त जोम व शिस्त याच्याशी त्याचा काहीतरी संबंध असावा.’ नन्सना वापरण्यास शिकविले जाणारे एक हत्यार म्हणजे सेन को हे आहे. हे क्रूसाच्या आकाराचे असून “ह्या हत्याराने प्रहार करणाऱ्याला ठार देखील मारता येते.” असा हुसेनी यांचा दावा आहे.
पायचे मूल्य
अनेकांनी जसे शाळेत शिकले आहे त्याप्रमाणे पाय हे वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर होय. बहुतेक लोकांना पायचे आसन्न मूल्य अर्थात ३.१४१५९, याचा उपयोग करून समाधानकारकरित्या हिशेब करता येतो, परंतु पायची संख्या ही एक निश्चित संख्या नसल्यामुळे पायचे दशमान मूल्य अपरिमित आहे. १८ व्या शतकात, पायचे मूल्य १०० दशांस स्थळांपर्यंत काढण्यात आले होते आणि १९७३ साली दोन फ्रेंच गणितज्ज्ञांनी याचे मूल्य दहा लाख दशांस स्थळांपर्यंत काढले. सध्या, जपानच्या टोकियो विद्यापीठाचे यॉसूमॉसॉ कॉनॉडॉ यांनी संगणकाच्या साहाय्याने सहा अरबपेक्षा अधिक दशांस स्थळांपर्यंत हे मूल्य काढले आहे. लंडनच्या द टाइम्सने पुढीलप्रमाणे टिप्पण केले आहे: “केवळ ३९ दशांस स्थळे, ज्ञात असणाऱ्या विश्वास वेढणाऱ्या वर्तुळाच्या परिघाचा ते हायड्रोजन अणूतील त्रिज्येचा हिशेब करण्यास पुरेशी आहेत,” यास्तव ह्या संख्येचा, कल्पना करण्याजोगा दुसरा कुठलाही उपयोग नाही. प्राध्यापक कॉनॉडॉ म्हणाले, की पायचा हिशेब करण्यास त्यांना खूप आवडते “कारण त्यात एक आव्हान आहे.” परंतु, त्यांचे उत्तर पाठ करत बसू नका. “त्यासाठी अखंडपणे, प्रती सेकंदाला एक अंक, या वेगाने सुद्धा जवळजवळ २०० वर्षे लागतील,” असे द टाइम्स म्हणते.
भारताला बफेलो पोक्सचा जबर तडाखा
“देवी विषाणूंच्या प्रकारातीलच एका विषाणूपासून” उद्भवणारा बफेलो पॉक्स, पश्चिम भारतातील बीड जिल्ह्यात असल्याचे निदर्शनास आले आहे, असा अहवाल द टाइम्स ऑफ इंडिया देते. हा विषाणू देवीच्या विषाणूपेक्षा कमी घातक असला तरीसुद्धा याच्या फैलावासंबंधी शास्त्रज्ञ निश्चित चिंतातूर झाले आहेत. “ह्या विषाणूची गांभिर्याने दखल घेण्यास हवी” असे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. “हा विषाणू किती गंभीर आहे हे आपण सांगू शकत नाही.” दूरवरच्या ग्रामीण क्षेत्रांत, जेथे वैद्यकीय सुविधा नगण्य आहेत तेथे या पॉक्सचा संभाव्य फैलाव होण्याची शक्यता ही चिंतेची एक मोठी बाब आहे. मानवातील बफेलो पॉक्समुळे ताप, लसिका ग्रंथींना येणारी सूज, शरीरावर बहुसंख्य देवीसारखे व्रण आणि साधारण अशक्तपणा येतो.