वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. ४-८
  • लक्षणे ओळखून हालचाल करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लक्षणे ओळखून हालचाल करणे
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • घडले असे. . .
  • प्रत्यक्ष झटका
  • इस्पितळात
  • डॉक्टरांचे स्पष्टीकरण
  • अनिश्‍चित फलानुमान
  • हृदय विकार—जीवितास धोका
    सावध राहा!—१९९७
  • धोका कमी करण्यासाठी काय करावे?
    सावध राहा!—१९९७
  • आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल
    सावध राहा!—१९९७
  • तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. ४-८

लक्षणे ओळखून हालचाल करणे

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसतात तेव्हा ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण झटका आल्यानंतर मृत्यू ओढवण्याचा सर्वाधिक धोका पहिल्या एका तासात असतो. तात्काळ उपचार केल्यास हृद्‌स्नायूंना कायमचे नुकसान होण्यापासून बचावले जाऊ शकते. हृद्‌स्नायूचा जितका अधिक भाग बचावला जातो तितक्याच अधिक प्रभावकारीपणे, झटक्यानंतर हृदय रक्‍त पंप करू शकेल.

तथापि, काही हृदयविकाराचे झटके मूक असतात, अर्थात त्यांत कोणतीही बाह्‍य लक्षणे दिसून येत नाहीत. अशा केसेसमध्ये, आपल्याला हृद्‌रोहिणी विकार (सीएडी) आहे याविषयी कदाचित रुग्ण अनभिज्ञ असेल. दुर्दैवाने, काहींना तीव्र झटका येतो तेव्हाच आपल्याला हृदयविकार आहे याची पहिल्यांदा जाणीव होते. हृद्‌स्तंभन (हृदयाची पंपिंग क्रिया बंद पडणे) घडते तेव्हा तातडीने वैद्यकीय सहायक कार्यकर्त्यांची मदत घेऊन लागलीच हृद्‌-फुफ्फुस संजीवनाचा उपचार सुरू न केल्यास, रोग्याचा प्राण वाचणे फार कठीण असते.

हार्वर्ड हेल्थ लेटर मधील वृत्तानुसार, सीएडीची लक्षणे असणाऱ्‍यांपैकी बहुतांश लोक तात्काळ वैद्यकीय मदत घेण्यात अळमटळम करतात. का? “कारण बहुतेक वेळा, एकतर त्यांना त्यांच्या लक्षणांचा अर्थ कळत नाही किंवा ते या लक्षणांकडे कानाडोळा करत असतात.”

हृदयविकाराच्या झटक्याचा रुग्ण असलेला जॉनa नामक एक यहोवाचा साक्षीदार कळकळीने म्हणतो: “काहीतरी गडबड आहे याची चाहूल लागल्यावर, आपण अतिशयोक्‍ती करीत आहोत असं लोकांना वाटेल या भीतीने, वैद्यकीय मदत घेण्यास उशीर लावू नका. तातडीने पाऊल न उचलल्यामुळे माझ्या स्वतःवर जीव गमावण्याची पाळी आली होती.”

घडले असे. . .

जॉन सांगतो: “मला हृदयविकाराचा झटका येण्याच्या दीड वर्षापूर्वी, एका डॉक्टरांनी, माझ्या शरीरात सीएडीतील एक प्रमुख धोक्याचा घटक अर्थात अतिरिक्‍त कोलेस्टेरॉल आहे म्हणून बजावलं होतं. पण, आपण तर तरुण आहोत—अद्याप चाळीशी गाठलेली नाहीय—आणि त्यातल्या त्यात आपण निरोगी आहोत या विचाराने, मी याबाबतीत हयगय केली. मी वेळीच हालचाल केली नाही याचा आता मला फारच पस्तावा होतोय. इतरही धोक्याच्या सूचना मला मिळाल्या होत्या, उदाहरणार्थ, नेहमीपेक्षा थोडी जास्त शारीरिक मेहनत केल्यावर दमछाक होत असे, इतर दुखणीही होती, पण अपचनामुळे असावीत असे समजून मी गप्प बसलो, शिवाय झटका येण्यापूर्वी कितीतरी महिन्यांपासून, मला कमालीचा थकवा जाणवत असे. यांपैकी बहुतेक लक्षणं जागरणामुळे व कामाच्या नको तितक्या व्यापामुळे होतायत असा निष्कर्ष मी काढला. हृदयविकाराचा झटका येण्याच्या तीन दिवसांआधी माझ्या छातीत कळ उठली पण स्नायू आकुंचन असेल असं समजून मी दुर्लक्ष केलं. पण तीन दिवसांनंतर आलेल्या तीव्र झटक्यापूर्वीचा तो एक सौम्य झटका होता.”

छातीत वेदना होणे अथवा दडपल्यासारखे वाटणे यास अँजायना म्हणतात आणि हृदयविकाराचा झटका येणाऱ्‍यांपैकी जवळजवळ निम्म्या लोकांना याकरवी धोक्याची पूर्वसूचना मिळते. काहींच्या बाबतीत दम लागणे किंवा थकवा येणे व अशक्‍तपणा जाणवणे यांसारखी लक्षणे आढळतात व हृद्‌रोहिणीरोधामुळे हृदयास पुरेसा ऑक्सिजन मिळत नाहीय हे यावरून सूचित होते. या धोक्याच्या सूचनांनी सावध होऊन रोग्याने तातडीने डॉक्टरांकडे जाऊन हृदयाची तपासणी करून घ्यावी. डॉ. पीटर कोन म्हणतात: “अँजायनावर उपचार करूनही, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टळला असे छातीठोकपणे म्हणता येत नाही, पण निदान संभाव्य झटक्याचा धोका तरी यामुळे कमी होतो.”

प्रत्यक्ष झटका

जॉन पुढे सांगतो: “त्या दिवशी आम्ही सॉफ्टबॉल खेळायला जायचं ठरवलं. दुपारच्या जेवणात एक हॅम्बर्गर आणि फ्राइड पोटेटोज मी नेहमीपेक्षा थोड्या घाईगडबडीनेच खाल्ले; तेव्हाच मला काहीसं अस्वस्थ, मळमळल्यासारखं, छातीत दाटल्यासारखं वाटत होतं पण मी त्याकडे काही विशेष लक्ष दिलं नाही. मैदानात गेल्यावर आम्ही खेळायला सुरवात केली तेव्हा मात्र काहीतरी नक्कीच बिघडलं असल्याचं मला जाणवलं. नंतर दुपारी मला जास्तच त्रास होऊ लागला.

“अधून मधून कितीदातरी, मी बाकावर उताणा पडून छातीचे स्नायू ताणण्याचा प्रयत्न केला, पण मला आणखीनच दाटल्यासारखं वाटू लागलं. खेळताना, मला राहून राहून घाम येऊन अशक्‍तपणा वाटत असल्यामुळे, ‘कदाचित आपल्याला फ्लू झाला असावा,’ असे मी मनोमन म्हणालो. धावायला गेलो तेव्हा तर माझी अगदीच दमछाक झाली. मी पुन्हा बाकावर पडलो. उठून बसलो तेव्हा मात्र आता आपलं काही खरं नाही, याची मला खात्री झाली. मी ओरडून माझ्या मुलाला, जेम्सला हाक मारली व म्हणालो: ‘मला हॉस्पिटलला घेऊन चला, आत्ताच्या आत्ता!’ माझी छाती दडपून गेलीय असं जाणवत होतं. वेदना इतकी भयंकर होती, की मला उभं राहणंही अशक्य झालं. अशातही मी विचार केला, ‘छे, हा हृदयविकाराचा झटका असूच शकत नाही! आपले वय तर अजून अडतीसच आहे!’”

हे सर्व घडले तेव्हा १५ वर्षांचा असणारा जॉनचा मुलगा सांगतो: “काही क्षणातच डॅडी अगदीच गळून गेले, आम्हाला त्यांना कारपर्यंत अक्षरशः उचलून न्यावं लागलं. माझा मित्र कार चालवताना डॅडींना क्षणोक्षणी काय होतंय, हे जाणून घेण्यासाठी त्यांना सारखे प्रश्‍न विचारत होता. शेवटी डॅडींना उत्तरही देता येईना. माझ्या मित्राने ओरडून हाक मारली, ‘जॉन!’ पण डॅडी तरीसुद्धा गप्पच होते. मग त्यांना जोरदार धक्का लागल्यासारखं झालं आणि यानंतर वारंवार झटके देऊन ते ओकू लागले. मी पुन्हा पुन्हा ओरडून म्हणत होतो, ‘डॅडी! आय लव यू डॅडी, मला सोडून जाऊ नका!’ या आकस्मिक झटक्यानंतर, त्यांचे संपूर्ण शरीर निश्‍चेष्ट पडले. ते गेले की काय असं मला वाटलं.”

इस्पितळात

“आम्ही मदतीसाठी इस्पितळाकडे धाव घेतली. डॅडी गेले असा मला भास होऊन आता दोन तीन मिनिटं झाली होती, पण तरीही त्यांना पुन्हा बरं करता येईल अशी मी मनोमन आशा बाळगून होतो. मैदानात आमच्यासोबत असलेल्या साधारण २० यहोवाच्या साक्षीदारांना वेटिंग रूममध्ये पाहून मला आश्‍चर्य वाटलं. त्यांनी दिलेल्या सांत्वनामुळे व प्रेमामुळे मला त्या कठीण प्रसंगी फार मोठा आधार मिळाला. जवळजवळ १५ मिनिटांनी डॉक्टर आले व ते मला समजावत म्हणाले, ‘तुझ्या बाबांची स्थिती आता थोडी सावरलीय, पण त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आलेला असल्यामुळे सध्याच काही सांगता येणार नाही.’

“मग त्यांनी मला थोडा वेळ डॅडींना पाहण्याची परवानगी दिली. डॅडींच्या शब्दाशब्दातून, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी ओथंबून वाहणाऱ्‍या जिव्हाळ्यानं मी भारावून गेलो. वेदनेमुळे त्यांना बोलणंही कठीण झालं होतं, पण तरीही ते म्हणाले, ‘बाळा, आपल्या जीवनात यहोवा देवच सर्वात महत्त्वाचा आहे हे कधीही विसरू नकोस. त्याची सेवा करत राहा, आईला आणि तुझ्या भावांनाही त्याची सेवा करत राहण्यासाठी मदत कर. आपल्याजवळ पुनरुत्थानाची पक्की आशा आहे ना; आणि माझं काही बरंवाईट झालं तरी, मी परत येईल तेव्हा मला तुम्हा सर्वांना पाहायचंय.’ प्रेम, भीती, उमेद अशा कितीतरी भावनांनी मनात गर्दी केली होती आणि आम्हा दोघांच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.”

यानंतर एका तासाने जॉनची पत्नी, मेरी तेथे आली. “मी इमर्जेन्सी रूममध्ये आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, ‘तुमच्या मिस्टरांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आहे.’ मला धस्सच झालं. त्यांनी मला समजावले की जॉनच्या हृदयाला आठ वेळा डीफिब्रिलेट करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या स्थितीत करण्यात येणाऱ्‍या या विशिष्ट उपचारात, विद्युत्‌ शक्‍तीचा उपयोग करून हृदयाची अनियंत्रित झडप थांबवून त्याची सामान्य गती पूर्ववत केली जाते. हृद्‌-फुफ्फुस संजीवन, ऑक्सिजन व आंतरनीला औषधं देण्यासोबत डीफिब्रिलेशन ही देखील एक अत्याधुनिक जीवनरक्षणाची पद्धत आहे.

“मी जॉनला पाहिलं तेव्हा माझ्या हृदयाला अक्षरशः पीळ पडला. तो पांढरा फिकट पडला होता आणि असंख्य ट्यूब्स व वायर्सनी त्याचं शरीर यंत्राना जोडण्यात आलं होतं. मी मनोमन यहोवाला प्रार्थना केली, निदान आमच्या तीन मुलांसाठी तरी या संकटाला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी शक्‍ती द्यावी आणि पुढे जे काही घडेल त्यासंबंधी सुयोग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. जॉनच्या पलंगाजवळ एकेक पाऊल टाकताना मी विचार करत होते, ‘अशा वेळेस आपल्या माणसाला कोणत्या शब्दांत धीर द्यावा? या जिवावर बेतलेल्या आकस्मिक प्रसंगाला कसं तोंड घ्यावं?’

“जॉन मला म्हणाले, ‘तुला खरं सांगतो, मी यातून बाहेर पडेन असं वाटत नाही. पण काही झालं तरी तू व मुलांनी यहोवाला विश्‍वासू राहिलं पाहिजे, हे व्यवस्थिकरण संपायला फारसा काळ राहिलेला नाहीय व मग आजार आणि मृत्यू कायमचे जातील. त्या नव्या जगात माझे डोळे उघडतील तेव्हा मला तुम्ही सर्व दिसायला हवेत.’ आम्हा दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.”

डॉक्टरांचे स्पष्टीकरण

“नंतर डॉक्टरांनी मला बाजूला नेऊन सांगितलं की डावीकडील अग्र उतरत्या रोहिणीत १०० टक्के अंतर्क्लथन झाल्यामुळे जॉनला हृदयविकाराचा झटका आला असल्याचं तपासणीतून दिसून आलं. त्याच्या आणखी एका रोहिणीतही अंतर्क्लथन झालेले होते. डॉक्टरांनी मला सांगितले की जॉनच्या उपचारासंबंधाने मला निर्णय घ्यायचा होता. आमच्यासमोर वेगवेगळे पर्याय होते, त्यांपैकी दोन म्हणजे औषधोपचार किंवा अँजिओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया. त्यांच्या मते दुसरा उपाय अधिक गुणकारक होता आणि म्हणून आम्ही अँजिओप्लॅस्टी निवडली. तरीसुद्धा, डॉक्टरांनी कोणतंही आश्‍वासन दिलं नाही कारण अधिकांश रोगी अशाप्रकारच्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचत नाहीत.”

अँजिओप्लॅस्टी ही विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रियेची पद्धत आहे ज्यात फुगीर टोक असलेले कॅथेटर रोहिणीत निवेशित करून रोहिणीचा अवरुद्ध मार्ग खुला करण्यासाठी त्यास फुगवतात. ही प्रक्रिया रक्‍तप्रवाह पुनःस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारक आहे. पुष्कळ रोहिण्या गंभीररित्या अवरुद्ध असल्यास सहसा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो.

अनिश्‍चित फलानुमान

अँजिओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया झाल्यावर पुढच्या ७२ तासांपर्यंत जॉनवर मृत्यूची टांगती तलवार होती. शेवटी एकदाचे त्याचे हृदय त्या जबर धक्क्यातून हळूहळू सावरू लागले. पण, आता ते पूर्वीपेक्षा निम्म्या गतीने पंपिंग करत होते व त्यातील पुष्कळसा भाग स्कार टिश्‍यू झाला होता आणि यामुळे आता जॉनचे हृदीय विकलांग बनणे अपरिहार्य होते.

मागे वळून पाहताना, जॉन म्हणतो: “आपला निर्माणकर्ता, घरची माणसं, आध्यात्मिक भाऊबहिणी या सर्वांचा आणि आपल्या स्वतःच्या कल्याणाचा विचार केल्यास, या धोक्याच्या सूचनांकडे लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आपल्यावर नैतिक जबाबदारी येते—विशेषतः आपण धोक्यात असल्यास यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. इतरांच्या आणि स्वतःच्याही आनंदाला किंवा दुःखाला, पुष्कळ प्रमाणावर आपण स्वतःच जबाबदार ठरू शकतो; निवड आपल्याला करायचीय.”

जॉनची केस गंभीर होती आणि ताबडतोब लक्ष देणे आवश्‍यक होते. पण जळजळीसारखा त्रास असणाऱ्‍या सर्वांनी लागलीच डॉक्टरचा दवाखाना गाठण्याची गरज नाहीय. तरीसुद्धा, जॉनचा अनुभव धडा घेण्यासारखा आहे आणि आपल्यामध्ये अशी काही लक्षणे दिसताहेत असे वाटणाऱ्‍यांनी जरूर तपासणी करून घ्यावी.

हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी कोणता उपाय आहे? पुढच्या लेखात यावर विचार करण्यात आला आहे.

[तळटीपा]

a या लेखांमधील नावे बदलण्यात आली आहेत.

[६ पानांवरील चौकट]

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

● काही मिनिटांपर्यंत छातीत दडपल्यासारखे, पिळल्यासारखे वाटणे अस्वस्थ होणे किंवा कळ येणे. ही लक्षणे दिसतात तेव्हा अतिशय जळजळ होत असल्याचा गैरसमज होण्याचा संभव आहे

● जबडा, मान, खांदे, हात, कोपर, किंवा डावा हात—या भागांत वेदना पसरणे—किंवा यांपैकी विशिष्ट भागांत वेदना असणे

● पोटाच्या वरच्या भागात प्रदीर्घ वेदना असणे

● श्‍वास घेताना त्रास होणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, घाम फुटणे किंवा शरीराला स्पर्श केल्यास चिकटपणा वाटणे

● थकवा—झटका येण्याच्या कितीतरी आठवड्यांपूर्वी जाणवू शकतो

● मळमळ किंवा उलटी होणे

● जास्त शारीरिक मेहनत न करताही वारंवार अँजायनाचे झटके येणे

लक्षणे सौम्य किंवा तीव्र असू शकतात आणि प्रत्येक हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळेस सर्व दिसतीलच असे नाही. पण, यांपैकी कोणतीही लक्षणे एकाचवेळी दिसून आल्यास, तात्काळ मदत घ्या. तथापि, काही केसेसमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; यांना मूक (सायलेंट) हृदयविकाराचा झटका म्हणतात.

[७ पानांवरील चौकट]

जीव वाचवण्यासाठी करावयाची हालचाल

स्वतःमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्या कोणामध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसल्यास:

● लक्षणे ओळखा

● हातातले काम टाकून एकतर खाली बसा किंवा झोपा

● लक्षणे काही मिनिटांपर्यंत कायम राहिल्यास स्थानिक इमर्जेन्सी टेलिफोन नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची शंका आहे असे तेथील कर्मचाऱ्‍याला सांगा आणि तुमच्या मदतीला येण्यासाठी आवश्‍यक माहिती त्यांना द्या

● स्वतः गाडी चालवून रुग्णाला इस्पितळाच्या इमर्जेन्सी कक्षात लवकर नेता येईल असे वाटत असल्यास, तसे करा. तुम्हाला स्वतःला हृदयविकाराचा झटका आला आहे अशा वेळेस, कोणालातरी तुम्हाला इस्पितळात न्यायला सांगा

तातडीची सेवा करणाऱ्‍या वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांची वाट पाहात असताना:

● घट्ट कपडे, उदाहरणार्थ बेल्ट किंवा नेकटाय सैल करावा. रुग्णाला होता होईल तेवढा आराम द्यावा, गरज असल्यास उशा लावून टेकवून बसवावे

● तुम्ही स्वतः रुग्ण असाल किंवा मदत करणारे असाल, शांत राहणे आवश्‍यक आहे. चलबिचल झाल्यास रुग्णाच्या हृदयाची झडप अनियंत्रित होऊन जिवाला अधिक धोका संभवतो. शांत राहण्याकरता प्रार्थना केल्यास पुष्कळ मदत मिळू शकते

रुग्णाचा श्‍वासोच्छ्‌वास बंद पडू लागल्यास:

● मोठ्या आवाजात, “माझा आवाज ऐकू येतो का?” असे विचारा. उत्तर न मिळाल्यास व रुग्णाचा श्‍वासोच्छ्‌वास बंद असल्यास हृद्‌-फुफ्फुस संजीवन क्रिया सुरू करा

● हृद्‌-फुफ्फुस संजीवन क्रियेचे तीन मुख्य टप्पे लक्षात ठेवा:

१. रुग्णाची हनुवटी वर उचला ज्याकरवी हवामार्ग मोकळा होईल

२. हवामार्ग मोकळा ठेवून हाताच्या बोटांनी रुग्णाच्या नाकपुड्या दाबून बंद कराव्यात, छाती फुगेपर्यंत दोन वेळा तोंडात हळूहळू हवा फुंका

३. हृदय व छातीतून रक्‍त पुढे ढकलण्यासाठी छातीच्या मध्यभागी १० ते १५ वेळा दाब द्यावा. श्‍वसनक्रिया सुरू होईपर्यंत किंवा इमर्जेन्सी कर्मचारी येईपर्यंत दर १५ सेकंदांना, दोन श्‍वसन व त्यानंतर १५ दाबांचा क्रम सुरू ठेवावा.

खरे तर, हृद्‌-फुफ्फुस संजीवन हे कोणा प्रशिक्षित व्यक्‍तीकडूनच केले जावे. पण कोणी प्रशिक्षित व्यक्‍ती हजर नसल्यास, इमर्जेन्सी हृदय सेवेचे संचालक डॉ. आर. कमिन्झ यांच्या मते, “अजिबातच काही उपचार नसण्यापेक्षा, प्रशिक्षित नसलेल्याने दिलेले हृद्‌-फुफ्फुस संजीवन केव्हाही बरे.” कुणीतरी ही पावलं उचलल्याशिवाय रुग्ण हाती लागण्याची फारच कमी शक्यता उरते. मदत उपलब्ध होईपर्यंत हृद्‌-फुफ्फुस संजीवनाने वेळ निभावून नेता येते.

[५ पानांवरील चौकट]

हृदयविकाराचा झटका आल्यावर तात्काळ उपचार केल्यास मनुष्य हाती लागू शकतो आणि हृदयाला होणारे नुकसान कमी करता येते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा