प्रवाळ धोक्यात व नष्ट होण्याच्या मार्गावर
उष्णकटिबंधापेक्षा इतर कोठेही सागर इतका नितळ नाही. स्फटिकासारखा नितळ. निळ्या स्फटिकासारखा. १५ मीटर खोल असलेला पांढऱ्या वाळूचा तळ अगदी स्पर्श करता येईल इतका जवळ असल्यासारखा वाटतो! स्विम फिन्स आणि मुखाच्छादन परिधान करा. गरम पाण्यात डुबकी मारल्यावर तुमचा हवानळ नीट लावा, क्षणभर बुडबुड्यांमुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही. मग खाली पाहा. त्या तिकडे! तो पाहा लाल व निळ्या रंगाचा मोठा पॅरेट फिश कसा प्रवाळ खाऊन त्याचे लहान लहान तुकडे बाहेर टाकत आहे, हे तुकडे रेताळ तळाचा भाग बनतात. इतक्यात, उष्णकटिबंधातील माश्यांचे चंदेरी मेघधनुष्य—लाल, पिवळा, निळा, नारंगी, जांभळा रंग असलेले—जवळून झळकत जाते. सगळीकडे जीवन क्रियाशील असलेले दृष्टीस पडते. तुम्ही थक्क होता.
हे प्रवाळ जंगल होय. खालच्या रेताळ तळापासून वर उठून हे हजारो जिवंत बहुशुंडकांसारखे दिसतात. पुढे एल्कहॉर्न कोरलचे एक भव्य मांडण आहे जे सहा मीटरपेक्षा उंच आणि जवळजवळ तितकेच रूंद आहे. सुमारे २३ मीटर दूरवर स्टॅगहॉर्न कोरल आहे, ते एल्कहॉर्नपेक्षा लहान असून त्यांच्या सडपातळ बहुशुंडकांनी संपूर्ण जागेला जंगलाप्रमाणे व्यापून टाकले आहे. या प्रवाळांना किती उचित नावे दिली आहेत—ते प्रत्यक्षात प्राण्यांच्या शिंगांप्रमाणेच दिसतात! मासे आणि इतर जलचर जिवांना त्यांच्या शाखांमध्ये अन्न तसेच आसरा मिळतो.
प्रवाळ, वनस्पतींनी बनलेले असल्याचा पूर्वी विचार होता, पण आता ते पॉलिप नावाच्या प्राण्यांच्या वसाहतींनी निर्माण केलेल्या चुनखडीचे आवरण असल्याचे समजले जाते. बहुतांश पॉलिप लहान, २.५ सेंटीमीटरपेक्षाही कमी व्यासाचे असतात. लवचीक शरीराचा हा प्रवाळ पॉलिप स्वतःला चिकट ऊतकाने शेजारच्या प्रवाळाशी जोडून घेतो. दिवसा प्रवाळ खडकाप्रमाणे दिसतात, कारण पॉलिप त्यांच्या सांगाड्यांमध्ये स्वतःला आकसून घेतात. पण रात्री त्यांचे परिवर्तन होते, त्यांची बाहेर काढलेली बहुशुंडके हळुवारपणे डुलत असतात व त्यामुळे खडकाला मऊ, बारीक लवदार आच्छादनाचे स्वरूप येते. पॉलिप ज्यात एकत्र मिळून राहतात तो दगडी “वृक्ष” त्यांचा संयुक्त सांगाडा असतो व तो समुद्राच्या पाण्यातून शोषलेल्या कॅल्शियम कार्बोनेटने जोडलेला असतो.
प्रत्येक प्रकारची प्रवाळ वसाहत अद्वितीय सांगाड्याचा आकार तयार करते. संपूर्ण जगभरात, ३५० पेक्षा अधिक विविध प्रकारचे प्रवाळ आहेत व त्यांचे आश्चर्यकारक आकार, विस्तार आणि रंग देखील आहेत. त्यांची सर्वसामान्य नावे तुम्हाला जमिनीवरील गोष्टींची आठवण—जसे की, ट्री, पिलर, टेबल किंवा अंब्रेल्ला कोरल—अथवा वनस्पतींची आठवण करून देतील—जसे की, कार्नेशन, लेटीस, स्ट्रॉबेरी किंवा मशरूम कोरल. तो पाहा भला मोठा ब्रेन कोरल? त्याला त्याचे नाव कसे मिळाले ते पाहणे सोपे आहे!
या पाण्याखालील जंगलात गजबजून जीव भरलेले आहेत, त्यात सूक्ष्मदर्शक वनस्पती आणि प्राण्यांपासून ते रे शार्क, मोठे मोरे ईल आणि कासव राहतात. तसेच येथे असे मासे आहेत ज्यांच्याविषयी तुम्ही कदाचित आधी ऐकले नसेल—गर्द पिवळ्या रंगाचा क्लाऊन फिश, जांभळा बीओ ग्रेगोरिझ, काळेपांढरे मूरिश आयडल्स, नारंगी ट्रंपेट फिश, गर्द निळा सर्जनफिश, निळसर जांभळे हॅम्लेट्स किंवा तपकिरी-तांबूस रंगाचे लायन फिश. तसेच बार्बरशॉप कोळंबी, रंगीत लॉब्स्टर किंवा लाल हॉक फिश यांच्याबद्दल काय? सर्व रंगांचे, सर्व आकारमानांचे. काही सुंदर दिसणारे तर काही विलक्षण—पण सगळेच मनोवेधक. पाहा, त्या पिलर प्रवाळामागे एक ऑक्टपस लपला आहे! त्याने एक शिंपला फोडला आहे आणि त्याची मेजवानी चालली आहे. जमिनीवरील जंगलांप्रमाणेच या सागरी दुनियेतील वातावरणात एकमेकात गुंफलेले प्रचंड वैविध्यपूर्ण जीवन आहे, हे सर्व त्यातील विविधतेवर अवलंबून आहे. प्रवाळांचे प्रजोत्पादन चक्र आणि सागरी प्रवाहांवर प्रवास करून नवीन खडकांच्या वसाहती बांधण्याची क्षमता यांविषयी तपशीलवार माहिती सावध राहा! (इंग्रजी) याच्या जून ८, १९९१ अंकात दिली होती.
प्रवाळ खडक हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या जैविक संरचना आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यापलीकडील ग्रेट बॅरिअर रीफ २,०१० किलोमीटर विस्ताराचे असून ते इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन्हींच्या आकाराची जागा व्यापते. प्रवाळ पुष्कळ टन वजनाचे असून सागराच्या तळापासून नऊ मीटर उंचीपर्यंत वाढू शकतात. प्रवाळ खडक उष्णकटिबंधातील सर्व उथळ पाण्यात आणि ६० मीटर खोली असलेल्या ठिकाणीही वाढतात. वेगवेगळ्या भागांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असल्यामुळे प्रवाळाच्या एका तुकड्याचे परीक्षण करून ते कोठे वाढले त्या सागराचे नाव आणि स्थानाचे ठावठिकाण देखील तज्ज्ञ सांगू शकतात. प्रवाळ खडकांच्या वाढीसाठी पाण्यात मर्यादित पोषके असलेले वातावरण आवश्यक असते व यावरून तो सागर त्यांच्या परिसरात इतक्या असामान्यपणे नितळ का असतो याचे स्पष्टीकरण मिळते. प्रवाळाकरता पोषण, पॉलिपच्या पारदर्शक शरीरात जगणाऱ्या शैवालाद्वारे (याचे शास्त्रीय नाव झूझॅनथले असे आहे) त्याचप्रमाणे प्रवाळाच्या बहुशुंडकांमध्ये जखडलेल्या सूक्ष्मदर्शक जीवांद्वारे देखील पुरवले जाते. या सर्वाचा शेवटचा परिणाम म्हणजे प्रवाळ खडक, जे एरवी आसरा नसलेल्या सागरात हजारो सागरी जातींचे घर बनते.
प्रवाळ खडक सर्व सागरी परिस्थितीकींपेक्षा जैविकरित्या सर्वात उत्पादनशील देखील आहेत. यु.एस.न्यूझ ॲन्ड वर्ल्ड रिपोर्टने त्याचे वर्णन असे केले: “खडक हे उष्णकटिबंधातील वर्षारण्यांचे सागरी समतुल्य आहेत, त्यात असंख्य प्रमाणात जीवित प्राण्यांचे वैपुल्य असते: जसे की, डोलणारे सी फॅन्स आणि सी व्हीप्स, लवदार क्रिनॉईड, नीऑन-रंगाचे मासे आणि स्पाँज, कोळंबी, लॉबस्टर व स्टारफिश तसेच काही भयानक शार्क आणि महाकाय मोरे ईल. हे सर्व निवासक्षेत्रासाठी प्रवाळाच्या चालू उत्पादनावर अवलंबून राहतात.” प्रवाळ खडक, आदळणाऱ्या लाटा आणि किनारपट्ट्या यांमध्ये अडथळा निर्माण करून व उष्णकटिबंधातील हजारो द्वीपांकरता पाया घालून जमिनीवरील जीवनाला देखील मदत करतात.
चांगले प्रवाळ, पारदर्शक प्रवाळ-पॉलिप पोषकात राहणाऱ्या शैवालाच्या प्रकारावर अवलंबून तपकिरी, हिरवे, लाल, निळे किंवा पिवळे असते. ही सूक्ष्मदर्शक शैवाल वनस्पती आपल्या प्राणी सहजीवींमधून चकाकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करते आणि स्वतःच्या पोषणासाठी पॉलिपचे उत्सर्गी पदार्थ त्याचप्रमाणे कार्बन डाय-ऑक्साइड देखील शोषून घेते. या बदली, प्रकाशसंश्लेषणाद्वारे ही शैवाल वनस्पती प्रवाळ ऊतकांना ऑक्सिजन, अन्न आणि ऊर्जा पुरवते. शैवाल वनस्पतींसोबत अशी भागीदारी असल्यामुळे प्रवाळ उष्णकटिबंधातील कुपोषित पाण्यात वेगाने वाढतात आणि तग धरतात. या दोघांनाही वनस्पती आणि प्राणी जगाचा सर्वोत्तम आनंद लुटता येतो. किती उत्कृष्ट आणि बुद्धिमान ही रचना!
रंग विटलेले जीवनरहित सांगाडे
खाली इतकी कार्यहालचाल होते यात काही आश्चर्य नाही! पण ते काय? रंग विटलेले जीवनरहित सांगाडे. शाखा मोडलेल्या असून त्यांचे तुकडे झाले आहेत. काहींचे तर आधीच विघटन झालेले आहे. प्रवाळ जंगलाचा हा भाग मेलेला अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मासे नाहीत. कोळंबी नाहीत. लॉबस्टर नाहीत. काहीच नाही. हे पाण्याखालचे वाळवंट आहे. तुम्ही अविश्वासाने डोळे फाडून पाहतच राहता. केवढा हा धक्का! तुमचा हा सुंदर अनुभव नष्ट होतो. बोटीवर पुन्हा आल्यावरही तुमच्या मनात भेडसावणारे प्रश्न राहतातच. हा नाश कशामुळे घडला असावा? अपघात? रोग? नैसर्गिक घटक? तुम्हाला याची उत्तरे हवी असतात.
खडकासमान प्रवाळ हे मजबूत भासत असले तरी ते अतिशय नाजूक असते. मानवी स्पर्शाने हानी पोहंचू शकते, म्हणून पाण्यात सूर मारणाऱ्या सुज्ञ व्यक्ती त्यास हाताळत नाहीत, आणि काळजीपूर्वक बोटीचे चालक त्यावर नांगर टाकत नाहीत. प्रवाळाला हानी पोहंचवणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे रासायनिक प्रदूषण, तेल सांडणे, वाहित मल, वाहतूक, शेतातील गाळ, निकर्षण, अवपातन आणि गोड्या पाण्याचे अंतर्वेशन. नौकातलाचा थेट जोर पडल्याने तर अर्नथच ओढवतो. तसेच, टोकाच्या तापमानामुळे प्रवाळाला हानी पोहंचू शकते व ते मरू शकतात. तणाव निर्माण होतो तेव्हा प्रवाळ आपल्यातील सर्व शैवाल वनस्पती घनदाट ढगांच्या रूपात बाहेर टाकते आणि मासे त्यांना लगेच फस्त करतात. काही आठवड्यापर्यंत किंवा महिन्यांपर्यंत तणावपूर्ण स्थिती कायम राहिल्यास, रंग विटतो आणि प्रवाळ मरते. तसेच, प्रवाळ मेल्यावर खडकातील वातावरण नष्ट होते. ते गुंफलेले जीवन सुटते आणि मग नाहीसे होते.
सर्व उष्णकटिबंधीय सागरांमध्ये रंग विटणे सार्वत्रिक प्रमाणात घडत आहे. परिणामस्वरूप, जगभरात सागरी विज्ञान समाजात जागरूकता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रंग विटल्यावर ती हानी भरून काढता येत नाही. अलीकडील वर्षांमध्ये जगातील उष्णकटिबंधीय समुद्रात जे घडले आहे त्यामुळे प्रवाळांचे रंग विटण्याचे प्रमाण आणि त्यानंतरचा त्यांचा मृत्यू याकडे दुःखदायकपणे जगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून वारंवार आणि स्थानिकपणे प्रवाळांचे रंग विटणे घडले असले, तरी अलीकडील उद्भवांचा तीव्रपणा अभूतपूर्व असून तो जागतिक प्रमाणावर घडत आहे. जगभरात जिवंत प्रवाळांच्या बहुतांश प्रकारांवर कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हल्ला होत आहे आणि परिणामस्वरूप, खडक वातावरणे ढासळत आहेत.