वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १०/८ पृ. ११-१३
  • सुज्ञपणे औषधांचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुज्ञपणे औषधांचा वापर करा
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लाभ विरुद्ध धोके
  • प्रतिजैव औषधे —प्रबळता आणि कमतरता
  • इंजेक्शने गोळ्यांपेक्षा उत्तम असतात का?
  • बनावटी औषधे
  • गरिबीची समस्या
  • तुम्हाला औषधाची खरोखरच गरज आहे का?
  • तुम्हाला उत्तम आरोग्य कसे उपभोगता येईल?
    सावध राहा!—१९९८
  • एड्‌सचे लोण आटोक्यात येईल? कसे?
    सावध राहा!—२००३
सावध राहा!—१९९६
g96 १०/८ पृ. ११-१३

सुज्ञपणे औषधांचा वापर करा

नायजेरियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

एका स्त्रीने तिला डोकेदुखी आणि पोटदुखी असल्याची तक्रार केली. डॉक्टर तिच्याशी थोडेसे बोलले. त्यानंतर त्यांनी हिवतापासाठी तीन दिवसांकरता घ्यावयाची इंजेक्शने, डोकेदुखी थांबण्याकरता पॅरासिटामोल (ॲसटामिनोफेन), पोटात कदाचित क्षते निर्माण झाली असल्यामुळे ती कमी करण्यासाठी दोन औषधे, तिच्या क्षुब्ध मनःस्थितीसाठी ट्रँक्वीलायझर्स आणि या सर्वांव्यतिरिक्‍त शेवटी मल्टीविटॅमिनचा कोर्स घ्यायला सांगितले. याचे बिल खूपच होते पण त्या स्त्रीने तोंडातून ब्र शब्द काढला नाही. जाताना ती फारच खूष होती आणि त्या औषधांमुळे तिचा त्रास नाहीसा होईल याची खात्री तिला होती.

अशाप्रकारचे सल्ले घेणे पश्‍चिम आफ्रिकेत मुळीच असामान्य नाही. सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य-निगा कार्यकर्ते प्रत्येक रुग्णाला दर खेपेस सरासरी ३.८ विविध औषधे घेण्यास सांगतात असे एका मोठ्या राष्ट्रातील सर्वेक्षणावरून दिसून आले. खरे म्हणजे, अनेक लोकांच्या मते, चांगला डॉक्टर म्हणजे पुष्कळ औषधे विहित करणारा डॉक्टर.

पण पश्‍चिम आफ्रिकेतील आधीची आरोग्य स्थिती लक्षात घेता तेथे औषधांवर इतका भरवसा का ठेवला जातो हे समजण्याजोगे आहे. ४० पेक्षा जास्त वर्षांआधी, लेखक जॉन गनथर यांनी आधीच्या काळाविषयी असे लिहिले: “या स्लेव्ह कोस्टने केवळ . . . काळ्या लोकांचाच जीव घेतला नाही; त्याने तर गोऱ्‍या लोकांचा देखील जीव घेतला आणि ‘गोऱ्‍या माणसाची कबर’ अशी प्राचीन कथा असलेल्या आफ्रिकेचा तो भाग आहे. अनेक शतकांपासून गिनी कोस्टचा निर्विवाद राजा होता डांस. पीत ज्वर, कृष्णमूत्रज्वर, हिवताप ही या राजाची निवडक व अपायकारक हत्यारे होती. पश्‍चिम किनारपट्टीच्या हवामानाचा अनिष्टसूचक घातकपणा कोणा जमान्यातील अहवालाची बाब नव्हे पण जिवंत स्मृतीची बाब आहे. अलीकडेच नायजेरियात बदली झालेल्या एका वाणिज्य अधिकाऱ्‍याने स्वतःच्या निवृत्तीवेतनाविषयी विचारणा केली असे वर्णन एका आवडत्या कथाप्रसंगात दिले आहे. ‘निवृत्तीवेतन?’ असे वसाहत कार्यालयातील प्रमुख म्हणाला. ‘माझ्या प्रिय बंधू, नायजेरियात जाणारा कोणीही निवृत्ती होईतोवर जिवंत राहात नाही.’”

काळ बदलला आहे. केवळ मच्छरांद्वारे फैलावणाऱ्‍या रोगांविरुद्धच नव्हे तर इतर अनेक रोगांविरुद्ध लढण्यासाठी आज औषधे आहेत. लशींनीच गोवर, डांग्या खोकला, धनुर्वात आणि घटसर्प यांमुळे घडणाऱ्‍या मृत्यूची संख्या नाट्यमयरित्या कमी केली आहे. लशींमुळेच देवीचे निर्मूलन करण्यात आले आहे. पोलियो हा रोग देखील कदाचित लवकरच गतकाळात जमा होईल.

आज अनेक आफ्रिकी लोकांचा औषधाच्या मूल्यावर खूप विश्‍वास आहे ही इतकी काही नवलाईची गोष्ट नाही. अर्थात, अशाप्रकारचा विश्‍वास केवळ पश्‍चिम आफ्रिकेपुरताच सीमित नाही. संयुक्‍त संस्थानांत, डॉक्टर दर वर्षी ५५ अरबपेक्षा अधिक विहितक देतात. फ्रान्समध्ये लोक दर वर्षी सरासरी ५० गोळ्यांचे डबे विकत घेतात. तसेच जपानमध्ये सामान्य व्यक्‍ती, वैद्यकीय औषधांवर वर्षाला ४०० (अमेरिकन) डॉलर खर्च करते.

लाभ विरुद्ध धोके

आधुनिक औषधांनी मानवजातीला मदत करण्यास बरेच काही केले आहे. उचितपणे वापर केल्यावर, ते चांगल्या आरोग्यास कारणीभूत ठरतात पण अनुचितपणे वापर केल्यास ते हानी पोहंचवू शकतात, एवढेच काय तर प्राण देखील घेऊ शकतात. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत, दर वर्षाला सुमारे ३,००,००० लोकांना वैद्यकीय औषधांच्या उलट परिणामांमुळे रुग्णालयात दाखल केले जाते आणि १८,००० जण त्यामुळे दगावतात.

औषधांचा सुज्ञपणे वापर करण्यासाठी, धोक्याची एक बाजू नेहमीच असते हे ओळखणे महत्त्वपूर्ण आहे. कोणतेही औषध, अगदी ॲस्प्रिनमुळे देखील हानीकारक दुष्परिणाम घडू शकतात. तुम्ही एकाच वेळी विविध औषधे घेत असल्यास, दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या शरीरातील औषधाच्या कार्यावर खाण्यापिण्याचा देखील परिणाम होतो आणि यामुळे त्याचा प्रभाव तीव्र अथवा अक्रियाशील केला जाऊ शकतो.

इतरही धोके आहेत. एखाद्या विशिष्ट औषधामुळे तुम्हाला ॲलर्जीची विक्रिया होत असेल. विहित केल्यानुसार—योग्य कालावधीसाठी योग्य त्या प्रमाणात—तुम्ही औषधे घेत नसल्यास त्यांचा कदाचित तुम्हाला काहीच लाभ होणार नाही आणि ती तुम्हाला हानी देखील पोहंचवू शकतात. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला चुकीचे औषध अथवा अनावश्‍यक औषधे विहित केली असल्यास, तोच परिणाम होऊ शकतो. जुनी, हलक्या प्रतीची किंवा बनावट औषधे घेतल्यानेही तुम्हाला धोका संभावू शकतो.

हे धोके कमी करण्यासाठी, तुम्ही घेत असलेल्या औषधाबद्दल तुम्हाला होता होईल तितकी माहिती असली पाहिजे. वस्तुस्थिती जाणल्याने तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

प्रतिजैव औषधे —प्रबळता आणि कमतरता

सुमारे पन्‍नास वर्षांआधी प्रतिजैव औषधे बनवण्यात आल्यापासून त्यांनी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांनी महारोग, क्षयरोग, न्यूमोनिआ, लोहितांग ज्वर आणि उपदंश यांसारख्या प्राणघातक रोगांना काबूत आणले आहे. इतर संसर्ग बरे करण्यातही त्यांनी मुख्य भूमिका पार पाडली आहे.

संयुक्‍त संस्थानांतील टफ्ट्‌स विद्यापीठ वैद्यकीय शाळा येथील वैद्यकाचे प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट लिवी यांनी म्हटले: “[प्रतिजैव औषधांनी] वैद्यकांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. ती एकच साधक आहेत ज्यांनी वैद्यकीय इतिहासात सर्वात जास्त बदल घडवून आणला आहे.” आणखी एक वैद्यकीय तज्ज्ञ असे म्हणतात: “आधुनिक वैद्यक ज्यावर उभारण्यात आले आहे असा ती कोनशिला आहे.”

तथापि, आपल्या डॉक्टरांकडे आताच जाऊन ती घेण्याआधी त्यांच्या नकारात्मक पैलूंचा विचार करा. अयोग्यपणे वापर केल्यास, प्रतिजैव औषधांचा फायदा होण्याऐवजी तुम्हाला अधिक हानी पोहंचेल. याचे कारण असे की, शरीरातील सूक्ष्मजंतुंवर हल्ला व त्यांचा नायनाट करण्याद्वारे प्रतिजैव औषधे कार्य करतात. पण ते नेहमीच सर्व अपायकारक सूक्ष्मजंतुंचा नाश करत नाहीत; काही सूक्ष्मजंतुंचे प्रकार त्या हल्ल्यापुढे टिकाव धरतात. हे प्रतिकारक प्रकार केवळ बचावतच नाहीत तर त्यांची वाढ होऊन एका व्यक्‍तीकडून दुसऱ्‍या व्यक्‍तीकडे त्यांचा प्रसार होतो.

उदाहरणासाठी, पेनिसिलीन हे एके काळी संक्रमणाला बरे करण्यात अतिशय परिणामकारक होते. आता, काही अंशी सूक्ष्मजंतुंच्या अधिकाधिक प्रतिकारक प्रकारांमुळे, औषध कंपन्या शेकडो विविध प्रकारच्या पेनिसिलीनचा व्यापार करतात.

समस्या टळाव्यात म्हणून तुम्ही काय करू शकता? तुम्हाला खरोखरच प्रतिजैव औषधांची आवश्‍यकता असल्यास, ती कार्यक्षम डॉक्टरांकडून विहित केली जातात आणि कायदेशीर ठिकाणाकडून प्राप्त केली जातात याची खात्री करा. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रतिजैव औषधे विहित करावीत असा त्यांच्यावर जोर करू नका—विहित केलेले औषध तुमच्या आजारावर योग्य आहे का याची खात्री करण्यासाठी त्यांना तुमची प्रयोगशाळेतील तपासणी घ्यायची असेल.

तसेच योग्य कालावधीपर्यंत योग्य डोस घेणे देखील तुमच्याकरता महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रतिजैव औषधांचा संपूर्ण कोर्स घेतला पाहिजे मग तो संपण्याआधीच तुम्हाला बरे वाटू लागले तरीही.

इंजेक्शने गोळ्यांपेक्षा उत्तम असतात का?

“मला इंजेक्शन द्या!” असे उद्‌गार विकसनशील देशांमध्ये अनेक आरोग्य कार्यकर्त्यांना ऐकायला मिळतात. अशी ही विनंती यासाठी केली जाते कारण अनेकांचा असा विश्‍वास आहे की हे औषध थेट रक्‍तप्रवाहात अंतःक्षेपित केले जाते त्यामुळे ते गोळ्यांपेक्षा जास्त शक्‍तिशाली उपाय आहे. काही देशांमध्ये परवाना नसलेले ‘इंजेक्शन डॉक्टर’ बाजारात दिसणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे.

इंजेक्शनांमुळे असे काही धोके संभवतात जे गोळ्यांमुळे संभावत नाहीत. सुई स्वच्छ नसल्यास, रुग्णाला हेपाटायटीस, धनुर्वात आणि एडस्‌चा देखील संसर्ग होऊ शकतो. अस्वच्छ सुईमुळे वेदनादायक फोड देखील येऊ शकतो. अयोग्य व्यक्‍तीने इंजेक्शन दिल्यास धोके अधिक वाढतात.

तुम्हाला खरोखरच इंजेक्शनची गरज असल्यास, वैद्यकीयरित्या पात्र असणाऱ्‍या व्यक्‍तीकडून तुम्हाला ते देण्यात येते याची खात्री करा. तुमच्या संरक्षणास्तव, सुई तसेच पिचकारी या दोन्ही गोष्टी निर्जंतुक केल्या आहेत याची नेहमी खात्री करा.

बनावटी औषधे

जागतिक औषध उद्योग हा मोठा व्यवसाय आहे जो जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) दर वर्षी १७० अरब (अमेरिकन) डॉलर मिळवतो. या परिस्थितीचा अयोग्यरितीने फायदा घेण्यासाठी विवेकरहित लोकांनी नकली औषधे निर्माण केली आहेत. नकली औषधे खऱ्‍या औषधांसारखीच दिसतात—त्यांचे लेबल व आवरणे देखील अगदी तशीच दिसतात—पण ती निरुपयोगी असतात.

बनावटी औषधे सगळीकडे उपलब्ध असली, तरी विशेषतः विकसनशील देशांमध्ये ती सर्वसामान्य आहेत आणि त्यांच्यामुळे भयंकर परिणाम घडतात. नायजेरियात, औद्योगिक विद्रावकयुक्‍त वेदनाशामक सिरप घेतल्यानंतर मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे १०९ मुले मरण पावली. मेक्सिकोत भाजलेल्या व्यक्‍तींना, भुसा, कॉफी आणि घाण यांचे मिश्रण असलेल्या तथाकथित उपायांमुळे अत्यंत वेदनादायक त्वचेचे संसर्ग झाले. म्यानमार येथे, बनावटी औषध घेतल्याने पुष्कळ गावकरी हिवतापामुळे मृत्यूमुखी पडले असावेत कारण त्या औषधाने हिवतापाचा प्रतिकार केला नाही. डब्ल्यूएचओ म्हणते, “पुन्हा एकदा, अतिशय गरीब लोक सर्वात धोक्यात असणारे आहेत ज्यांना काहीवेळा असे वाटते, की प्रसिद्ध कंपनीचे परिणामकारक भासणारे औषध खरेदी करणे किफायतशीर आहे.”

तुम्ही बनावटी औषधांपासून स्वतःचे रक्षण कसे करू शकता? तुम्ही खरेदी करत असलेले औषध एखाद्या सुविख्यात ठिकाणाकडील अर्थात रुग्णालयाच्या औषधालयातले आहे याची खात्री करा. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करू नका. नायजेरियातील बेनिन शहराचा एक औषध विक्रेता असा इशारा देतो: “रस्त्यावरील विक्रेत्यांचा औषधं विकणे हा नुसता एक धंदा आहे. जणू गोळ्या-बिस्कीटं असल्याप्रमाणेच ते औषधं वाटतात. ते जी औषधं विकतात ती बहुधा जुनी झालेली किंवा बनावट असतात. या लोकांना, ते विकत असलेल्या औषधांविषयी काहीच माहीत नसतं.”

गरिबीची समस्या

एका व्यक्‍तीला जो वैद्यकीय उपचार मिळतो तो बहुधा तिच्याजवळ किती पैसे आहेत यावरून ठरवला जातो. हा खर्च चुकवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी विकसनशील देशातील लोक डॉक्टरांकडे न जाता कदाचित थेट औषधालयात जाऊन अशी औषधे विकत घेतील ज्यांच्याकरता कायद्यानुसार विहितक असावे लागते. त्यांनी ते औषध आधी घेतलेले असल्यामुळे अथवा त्यांच्या मित्रांनी त्यांना ते घेण्यास सांगितल्यामुळे त्यांच्या आजाराकरता त्यांना जे हवे असते ते त्यांना माहीत असते. पण त्यांना जे हवे असते त्याची कदाचित त्यांना गरज नसेल.

लोक इतर मार्गांनीही खर्च वाचवण्याचा प्रयत्न करतात. एक डॉक्टर प्रयोगशाळेतील तपासणी करून एखादे विशिष्ट औषध विहित करतात. तो रुग्ण ते विहितक औषधालयात घेऊन जातो पण त्याची किंमत जास्त असल्याचे त्याला समजते. म्हणून, जास्त पैसे आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी लोक बहुतेकवेळा एखादे स्वस्त औषध किंवा विहित केलेल्यापैकी फक्‍त मोजकेच औषध विकत घेतील.

तुम्हाला औषधाची खरोखरच गरज आहे का?

तुम्हाला औषधाची खरोखरच गरज असल्यास, तुम्ही काय घेत आहात ते आधी पाहा. विहित केलेल्या औषधाबद्दल डॉक्टरांकडे अथवा औषध विक्रेत्याकडे विचारपूस करण्यासाठी कचरू नका. त्याविषयी जाणून घेण्याचा तुमचा हक्क आहे. कारण तुमच्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो.

तुम्ही योग्यपणे तुमचे औषधपाणी केले नाही तर तुम्ही बरे होणार नाही. ते किती घ्यावे, केव्हा घ्यावे आणि केवढ्या कालावधीसाठी घ्यावे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. ते घेत असताना खाण्यापिण्याच्या कोणत्या गोष्टी आणि इतर कोणती औषधे किंवा कार्यहालचाली टाळाव्यात हे देखील जाणून घेण्याची जरूरी आहे. तसेच, संभाव्य दुष्परिणाम कोणते आहेत आणि ते उद्‌भवल्यावर काय केले जावे याची माहिती तुम्हाला असली पाहिजे.

तसेच हेही लक्षात असू द्या, की औषधे ही प्रत्येक वैद्यकीय समस्येवरील उपाय नाहीत. कदाचित तुम्हाला औषधांची गरजच नसेल. डब्ल्यूएचओचे प्रकाशन असलेले जगाचे आरोग्य (इंग्रजी) हे नियतकालिक असे म्हणते: “आवश्‍यकता असतानाच औषधाचा वापर करा. आराम, चांगले अन्‍न आणि पुष्कळ पेय बहुधा एका व्यक्‍तीला बरे करण्यात पुरेशी असतात.”

[१२ पानांवरील चौकट/चित्र]

“हजार व्याधींवर हजार उपाय असतात,” असे एका रोमन कवीने सुमारे २,००० वर्षांआधी लिहिले. आज, त्या कवीने कदाचित असे लिहिले असते, ‘हजार व्याधींवर हजार औषधे असतात’! खरे म्हणजे, प्रत्येक व्याधीवर औषध आहे असे दिसते, मग ती खरी असो अथवा कल्पित. वर्ल्ड बँकनुसार, जगभरात सुमारे १,००,००० प्रकारची औषधे आहेत व ती ५,००० पेक्षा अधिक क्रियाशील पदार्थांनी बनलेली आहेत.

[१३ पानांवरील चौकट]

औषधोपचाराचा सुज्ञ वापर

१. जुनी औषधे वापरू नका.

२. सुविख्यात ठिकाणातून खरेदी करा. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून विकत घेऊ नका.

३. तुम्ही त्यावरील सूचना समजून घेता आणि त्यांचे पालन करता याची खात्री करा.

४. दुसऱ्‍या व्यक्‍तीसाठी विहित केलेली औषधे घेऊ नका.

५. इंजेक्शन देण्याचा आग्रह करू नका. तोंडावाटे घेतलेली औषधे देखील तितक्याच प्रभावीपणाने कार्य करतात.

६. औषधे थंड ठिकाणी व मुलांपासून दूर ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा