तुमच्या जीवनावर आता ताबा मिळवा!
मानवी वर्तन आणि अभिप्रेरणा यावरील वैज्ञानिक संशोधन आपल्याकरता अनेक मार्गांनी फायदेकारक ठरले आहे. कदाचित एखाद्या आजाराची सखोल समज प्राप्त केल्याने त्याचा सामना करण्यास आपल्याला मदत मिळाली आहे. त्याचवेळी, संवेदनाशील व खासकरून प्रस्थापित तत्त्वांच्या विरोधात असल्याचे भासणाऱ्या सिद्धान्तांच्या बाबतीत सावध असणे सुज्ञपणाचे आहे.
आनुवंशिकी आणि वर्तन या विषयांवर असे प्रश्न उपस्थित राहतात: आपल्या जबाबदाऱ्या त्यागून आपल्या कार्यांसाठी दोष स्वीकारण्यास आपण नकार देऊ शकतो का? कोणत्याही असुज्ञ किंवा अपराधी कार्यातून अंग चोरून अथवा इतर कोणावर वा दुसऱ्या एखाद्या गोष्टीवर दोष ढकलून आपण “तो मी नव्हेच” पिढीच्या वाढत्या संख्येला जाऊन मिळू शकतो का? मुळीच नाही. पुष्कळ लोक जीवनातील कोणत्याही यशाचे श्रेय स्वेच्छेने स्वीकारतात, मग अशाचप्रकारे स्वतःच्या चुकांकरता जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा त्यांनी का दाखवू नये बरे?
यास्तव, आपण असा प्रश्न विचारू शकतो, आपल्या जीवनांवर आज ज्या व्यक्तीचा अथवा गोष्टीचा ताबा आहे याविषयी देवाचे वचन, पवित्र बायबल आपल्याला काय सांगू इच्छिते?
बायबलचा दृष्टिकोन काय आहे?
सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण सर्वजण आपले मूळ मातापिता, आदाम आणि हव्वेकडून आनुवंशिकपणे प्राप्त झालेल्या पापात जन्मलो आहोत. (स्तोत्र ५१:५) शिवाय आपण ‘शेवटले काळ’ म्हणवल्या जाणाऱ्या अशा खास काळात जगत आहोत जेथे लोक ‘कठीण दिवसांचा’ अनुभव घेत आहेत. (२ तीमथ्य ३:१) यावरून असे सूचित होते, की सर्वसामान्यपणे पाहिल्यास, आपल्या पूर्वजांपेक्षा आपल्याला आपल्या जीवनांवर हितकारक नियंत्रण राखताना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागते.
तथापि, सर्व मानव स्वतंत्र नैतिक प्राणी आहेत व ते स्वतः वैयक्तिक निवड करू शकतात. त्याअर्थी, त्यांचे जीवन त्यांच्याच ताब्यात आहे. हे आरंभीच्या काळापासून असेच होते आणि यहोशवाने इस्राएल राष्ट्राला उद्देशून म्हटलेल्या या शब्दांवरून ते पाहता येऊ शकते: “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा.”—यहोशवा २४:१५.
दियाबल सैतानाला स्वर्गातून खाली टाकण्यात आले आहे आणि आता पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात तो संपूर्ण मानवजातीवर दुष्ट उद्देशाने जोरदार प्रभाव पाडत आहे असे बायबल मान्य करते. प्रेषित योहानाच्या काळातही, सगळे जग त्या दुष्टाला वश होते असे देखील ते आपल्याला सांगते. (१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९, १२) तरीही, सर्वसमर्थ देव आपल्या प्रत्येक कार्यहालचालीवर नियंत्रण ठेवत नाही किंवा मात्र त्यालाच ठाऊक असलेल्या शेवटासाठी तो आपल्याला पूर्वनियोजित करत नाही त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक चुका अथवा अपयशांचा दोष आपण थेट सैतानावर लादू नये. समतोल साधणारे शास्त्रवचनीय सत्य असे आहे की “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” (याकोब १:१४, १५) प्रेषित पौलाने हे प्रेरित शब्द लिहिले: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.
म्हणजे, यहोवा देव आपल्या प्रत्येकाला आपापल्या कार्यांसाठी जबाबदार ठरवतो. आपली आनुवंशिक घडण आणि वारशाने प्राप्त झालेली अपरिपूर्णता यांची सबब देऊन आपण स्वतःचे अंग काढून घेण्याचा प्रयत्न न करण्याविषयी दक्ष असले पाहिजे. देवाने प्राचीन सदोम व गमोराच्या हिंसक, समलैंगिक समाजाला त्यांच्या भ्रष्ट कृत्यांसाठी जबाबदार ठरवले. हे स्पष्ट आहे, की देवाने त्या रहिवाश्यांना विशिष्ट गृहीत आनुवंशिक दोषामुळे दुष्टपणाबद्दल काहीच न करू शकणारे गरीब, दुर्दैवी प्राणी असे लेखले नाही. त्याचप्रमाणे, नोहाच्या दिवसांतील लोकांभोवती अनेक दुष्ट प्रभाव होते; परंतु लवकरच येणाऱ्या प्रलयातून बचाव करून घ्यावयाचा असल्यास त्यांना निवड करावयाची होती म्हणजेच व्यक्तिगत निर्णय घ्यावयाचा होता. फारच अल्प जणांनी योग्य निवड केली. बहुतेकांनी तशी निवड केली नाही.
यहेज्केल हा इब्री संदेष्टा याची खात्री पटवून देतो, की आपल्याला देवाची कृपा प्राप्त करावयाची असल्यास व्यक्तिगत नियंत्रण आवश्यक आहे: “तू त्या पातक्यांस बजाविले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव बचाविला असे होईल.”—यहेज्केल ३:१९.
उपलब्ध असलेली सर्वोत्तम मदत
अर्थात, आपणा सर्वांना आपल्या दररोजच्या जीवनात व्यक्तिगत नियंत्रण राखण्यास मदत लागते आणि आपणापैकी पुष्कळांकरता हे मोठे आव्हान आहे. पण आपल्याला निराश होण्याची गरज नाही. वारशाने प्राप्त झालेला आपला पापाकडील कल देवाला अस्वीकृत असला, तरी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करायची असल्यास तो त्याचा पवित्र आत्मा आणि त्याचे प्रेरित सत्य अशी उपलब्ध असलेली सर्वोत्तम मदत आपल्याला पुरवतो. आपली एखादी आनुवंशिक प्रवृत्ती व आपल्यावर परिणाम करणारे बाह्य प्रभाव असतानाही ‘जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, तो आपण धारण करू शकतो.’—कलस्सैकर ३:९, १०.
करिंथ मंडळीतील अनेक ख्रिश्चनांनी त्यांच्या वर्तनात नाट्यमय बदल केले. प्रेरित अहवाल आपल्याला असे सांगतो: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.
यास्तव, आपण आपल्या अपरिपूर्णतेशी झगडत असल्यास, त्यांच्यापुढे नमते घेऊ नये. आधुनिक काळातील अनेक ख्रिश्चनांनी हे सिद्ध केले आहे, की यहोवाच्या मदतीने ते ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर करू’ शकले आहेत. सत्य, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, सद्गुणाचे, स्तुतीदायक अशा गोष्टींनी ते आपले मन भरवतात; आणि “त्यांचे मनन” करतात. ते जड आध्यात्मिक अन्न घेतात आणि त्याचा उपयोग करून आपल्या ज्ञानेंद्रियांना चांगले आणि वाईट समजण्याची सवय लावतात.—रोमकर १२:२; फिलिप्पैकर ४:८; इब्री लोकांस ५:१४.
त्यांचे झटणे, त्यांचे तात्पुरते अपयश आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीने कालांतराने मिळणारे त्यांचे यश हे सर्व जाणणे उल्लसित करणारे आहे. देव आपल्याला हमी देतो, की वर्तनाचा बदल म्हणजे त्यात बहुधा आपले हृदय आणि त्याच्या वासना यांचा समावेश होतो: “ज्ञान तुझ्या चित्तांत प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील; म्हणजे कुमार्गापासून . . . तुला दूर ठेवील.”—नीतिसूत्रे २:१०-१२.
यास्तव, तुम्हाला सार्वकालिक जीवन—दुष्ट जगाचे त्रास नसलेले आणि कमकुवत करणाऱ्या अपरिपूर्णतेपासून मुक्त असलेले जीवन—हे तुमचे ध्येय ठेवायचे असल्यास स्वतःच्या जीवनावर आता ताबा मिळवण्याचा आणि स्वर्गीय बुद्धीने मार्गदर्शित होण्याचा “नेटाने यत्न करा.” (लूक १३:२४) यहोवाच्या पवित्र आत्म्याची मदत घ्या जेणेकरून तुम्ही आत्म-संयमाचे फळ उत्पन्न करू शकता. तुमचे जीवन देवाच्या नियमांच्या एकवाक्यतेत आणण्याची मनस्वी इच्छा बाळगा आणि या सल्ल्याकडे कान द्या: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) देवाचे नवीन जग—ज्यात यहोवा देव सर्व आनुवंशिक न्यूनतेला येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावरील विश्वासाच्या आधारावर बरे करील—त्यामधील “खरे जीवन” प्राप्त करणे हे या जगात तुमच्या जीवनावर ताबा मिळवताना केलेल्या प्रयत्नांसाठी सार्थ ठरेल!—१ तीमथ्य ६:१९; योहान ३:१६.
[९ पानांवरील चित्र]
बायबलचा अभ्यास केल्याने खोलवर रूजलेल्या कमतरतांवर मात करण्यास आपल्याला सामर्थ्य मिळू शकते
[९ पानांवरील चित्र]
बायबल अभ्यास आपल्याला देवाच्या नैतिक दर्जांप्रमाणे जगण्यास मदत करू शकतो