आपल्या जनुकांद्वारे आपण पूर्वनियोजित केलेले आहोत काय?
“आपले नशीब नक्षत्रांवर अवलंबून आहे असा आपण एकेकाळी विचार करत होतो. आता आपल्याला ठाऊक आहे, की आपले नशीब मोठ्या प्रमाणात आपल्या जनुकांवर अवलंबून आहे.” असे जेम्स वॉटसन यांनी, जनुक दंतकथेचा गौप्यस्फोट या रूथ हब्बर्ड आणि इलायजा वॉल्ड यांच्या पुस्तकाच्या सुरवातीला उद्धृत केल्याप्रमाणे म्हटले. तथापि, वॉटसन यांच्या शब्दांच्या खालोखाल आर. सी. लवॉन्टन, स्टीवन रोझ आणि लीऑन जे. केमन यांचे हे शब्द उद्धृत केले आहेत: “आपल्या जनुकांमध्ये अशी कोणतीही महत्त्वपूर्ण मानवी सामाजिक वर्तणूक अंतर्गत नाही की जी सामाजिक परिस्थितींनुसार आकार घेऊ शकत नाही.”
त्या पुस्तकाचे आवरण, त्यातील थोड्याफार मजकुराचा सारांश देते आणि सुरवातीलाच असा निर्णायक प्रश्न विचारते, “मानवी वर्तणूक आनुवंशिक आहे का?” दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, एखाद्या जीवातील आनुवंशिक जैविक गुणलक्षणे आणि वर्तनवैशिष्ट्ये परिवाहन करणारी जनुके यांद्वारेच मानवी वर्तणूक निश्चित केली जाते का? काही विशिष्ट प्रकारची अनैतिक वर्तणूक आनुवंशिक असण्याच्या आधारावर स्वीकारली जावी का? गुन्हेगार त्यांच्या जननिक सांकेतिक वर्णाचे बळी आहेत असे समजून त्यांच्याशी व्यवहार करण्यात यावा का तसेच आनुवंशिक प्रवृत्तीमुळे जबाबदारी कमी होण्याचा दावा ते करू शकतात का?
शास्त्रज्ञांनी या शतकात अनेक फायदेकारक शोध लावले आहेत हे मान्य आहे. यांपैकीचा एक शोध म्हणजे, विलक्षण डीएनए, आपल्या आनुवंशिक रचनेची तथाकथित नीलप्रत आहे. जननिक सांकेतिक वर्णात जी माहिती आहे तिने शास्त्रज्ञ तसेच सामान्य मनुष्यांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. आनुवंशिकता विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाने खरोखरच कोणता शोध लावला आहे? पूर्वकार्यक्रमण अथवा पूर्वनियोजन यांच्या आधुनिक सिद्धान्ताचे समर्थन करायला संशोधनांचा उपयोग कसा करण्यात येतो?
जारकर्म आणि समलैंगिकता यांविषयी काय?
द ऑस्ट्रेलियन यात प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखानुसार, काहीसे आनुवंशिक संशोधन असे ठासून सांगते की, “जारकर्म हा कदाचित आपल्या जनुकांमध्येच असावा. . . . आपली फसवी प्रवृत्ती पूर्वनियोजित केली गेली आहे असे दिसते.” स्वैर जीवनशैली जगून आपण त्यासाठी तितकेसे जबाबदार नाही असा दावा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पळवाट देऊन ही मनोवृत्ती विवाहांमध्ये आणि कुटुंबांमध्ये किती अनर्थ ओढवेल याची क्षणभर कल्पना करा!
समलैंगिकतेविषयी, न्यूझवीक या नियतकालिकामध्ये असा ठळक मथळा होता, “जन्मलेली की निपजविलेली?” त्या लेखात असे नमूद केले होते: “समलैंगिकता ही आनुवंशिकीमुळे असू शकते संगोपनामुळे नव्हे असे दर्शवणारे नवीन संशोधन समजून घेण्याचा प्रयत्न विज्ञान आणि मनोदोषचिकित्सा करत आहेत. . . . समलैंगिकांच्या समाजामध्येच, समलैंगिक प्रवृत्ती गुणसूत्रांमध्ये सुरू होते हे चिन्ह अनेकजण मान्य करतात.”
मग त्या लेखात डॉ. रिचर्ड पिलर्ड यांचे हे शब्द उद्धृत केले आहेत: “आनुवंशिक घटकांमुळे लैंगिकतेकडे कल असल्यास, ‘ती विकृती नाही, आणि यात तुमचा काहीच दोष नाही.’” “विकृती नसण्याचा” हा मुद्दा पुढे आणखी बळकट करून समलैंगिकतेवरील एक संशोधक फ्रेडरिक व्हीटम यांनी असे निरीक्षण केले, की “समलैंगिकता जैव असल्याचे सांगितल्यावर लोक बहुधा सुटकेचा निःश्वास सोडतात. त्यामुळे कुटुंबे आणि समलिंगी व्यक्तींवरील दोष नाहीसा होतो. याचा अर्थ असाही होतो, की समाजाला आता समलिंगी शिक्षक यासारख्या गोष्टींबद्दल चिंता करण्याची गरज नाही.”
काहीवेळा प्रसार माध्यमाकरवी, समलैंगिक प्रवृत्ती जनुकांद्वारे निश्चित केली जाते हा तथाकथित पुरावा, संभावना आणि अनिर्णायक असल्याचा प्रस्तुत करण्याऐवजी वास्तविक आणि निर्णायक असल्याचा प्रस्तुत केला जातो.
नवे मुत्सद्दी आणि समाज (इंग्रजी) हे नियतकालिक प्रभावशाली आलंकारिकपणाला नाउमेद करून म्हणते: “चकित झालेल्या वाचकाने प्रत्यक्ष वास्तविक पुराव्याच्या अर्धवटपणाकडे—किंवा, स्वैराचार ‘पुरूषाच्या जनुकांमध्ये सामावलेला असतो आणि पुरूषाच्या मेंदूतील सर्किटबोर्डावर छापलेला असतो या वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट [धडधडीत] निंदास्पद दाव्याचा आधार मुळीच नाही याकडे दुर्लक्ष केले असेल.’” सांकेतिक वर्ण उघड करणे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात डेविड सूझूकी आणि जोसफ लवाईन अलीकडील आनुवंशिकी संशोधनाबद्दल आपली चिंता व्यक्त करून असे म्हणतात: “सर्वसामान्यपणे पाहिले, तर जनुक हे वर्तणुकीला प्रभावित करतात असा वाद करणे शक्य असले, तरी एखादा विशिष्ट जनुक—अथवा जनुकांची जोडी किंवा पुष्कळ जनुके देखील—एखाद्या प्राण्याने वातावरणाप्रती दाखवलेल्या प्रतिक्रियेच्या विशिष्ट तपशीलांवर प्रत्यक्षात नियंत्रण करतात हे दाखवणे एक वेगळीच बाब आहे. या क्षणी, शोधणे आणि फेरबदल करण्याच्या तंतोतंत रेणवीय अर्थामध्ये कोणालाही विशिष्ट वागणुकींवर पूर्वनियोजित पद्धतीने प्रभाव पाडणारे डीएनएचे धागे मिळाले आहेत का असे विचारणे न्याय्य आहे.”
मद्यासक्ती आणि गुन्हेगारी वृत्तींसाठी कारणीभूत असलेली जनुके
मद्यासक्तीच्या अभ्यासाने बऱ्याच वर्षांपासून अनेक आनुवंशिक संशोधकांना आकर्षिले आहे. काहींच्या दाव्यानुसार अभ्यासांनी असे दाखवून दिले आहे, की विशिष्ट जनुकांचे अस्तित्व अथवा त्यांचा अभाव मद्यासक्तीसाठी जबाबदार आहे. उदाहरणार्थ, द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन याने १९८८ मध्ये असे वृत्त दिले, की “गत दशकात, मद्यासक्ती आनुवंशिक वर्तनवैशिष्ट्य असल्याचा निर्णायक पुरावा तीन वेगवेगळ्या तपासांनी दिला आहे.”
तथापि, व्यसनाच्या क्षेत्रातील काही विशेषज्ञ, मद्यासक्ती ही मोठ्या प्रमाणात जैविक घटकांनी प्रभावित होते या दृष्टिकोनाला आव्हान देत आहेत. बॉस्टन ग्लोब याच्या एप्रिल ९, १९९६ मधील एका अहवालाने असे नमूद केले: “मद्यासक्तीचे जनुक दृष्टिपथात नाहीत आणि काही संशोधक हे मान्य करतात, की जास्तीत जास्त त्यांना कदाचित हे आढळून येईल की आनुवंशिकी विकारक्षमतेमुळे काही लोक अधिक पिऊनही झिंगत नाहीत—या वर्तनवैशिष्ट्यामुळे मद्यासक्तीकडे त्यांचा कल असेल.”
द न्यूयॉर्क टाईम्सने, “आनुवंशिकताशास्त्र आणि गुन्हेगारी वागणुकीवरील संशोधनाचा अर्थ व महत्त्व” असे शीर्षक असलेल्या मॅरीलंडच्या विद्यापीठामधील एका परिषदेचा अहवाल दिला. गुन्हेगारी जनुकाची कल्पना आकर्षकपणे सरळसोपी आहे. अनेक टीकाकार या विचारपद्धतीचे समर्थन करण्यास अतिउत्सुक आहेत. द न्यूयॉर्क टाईम्स मॅग्झीन यात एका विज्ञान लेखकाने असे लिहिले, की दुष्टपणा हा कदाचित “आपल्या पालकांकडून गर्भधारणेच्या वेळी आपल्याला दिल्या जाणाऱ्या गुणसूत्रांच्या वेटोळ्यांमध्ये अंतर्गत असावा.” द न्यूयॉर्क टाईम्स यातील एका लेखाने असे वृत्त दिले, की गुन्हेगारी वृत्तीच्या जनुकांची सतत चर्चा केल्याने असे भासते की गुन्ह्याचे “एकच मूळ कारण आहे—ते म्हणजे मेंदूची विकृती.”
जेरोम केगन हे हार्वर्ड मानसशास्त्रज्ञ असे प्रतिपादन करतात, की अशी एक वेळ येईल जेव्हा आनुवंशिकी चाचण्यांद्वारे हिंसक वृत्तीच्या बालकांना ओळखता येईल. काही लोक असे सुचवतात, की सामाजिक सुधारणेऐवजी जैविक हाताळणीद्वारे गुन्हेगारावर नियंत्रण राखण्याची कदाचित आशा असेल.
वर्तणुकीच्या आनुवंशिक आधारासंबंधी असलेल्या कल्पनांच्या वृत्तांमध्ये जी भाषा वापरली जाते ती बहुधा संदिग्ध आणि अनिश्चित असते. जनुक दंतकथेचा गोप्यस्फोट या पुस्तकात लिंकन ईव्स या वर्तन अनुवंशज्ञांच्या एका अभ्यासाबद्दल सांगितले आहे, ज्यांनी असे म्हटले, की विषण्णतेच्या आनुवंशिक कारणाचा पुरावा त्यांना मिळला. विषण्णतेला प्रवण असल्याचा विचार केल्या जाणाऱ्या स्त्रियांचे सर्वेक्षण घेतल्यावर, ईव्सने “असा विचार मांडला, की [स्त्रियांच्या] विषण्ण दृष्टिकोनामुळे आणि पद्धतीमुळे कदाचित अशाप्रकारच्या अनियत समस्या घडण्याची शक्यता अधिक वाढली असावी.” “अनियत समस्या”? ज्या स्त्रियांचा अभ्यास केला होता त्यांच्यावर “बलात्कार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता अथवा त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.” तर मग विषण्णतेमुळे या आघातजन्य घटना घडल्या का? “हा कसला तर्क?” असे ते पुस्तक पुढे म्हणते. “त्या स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता किंवा त्यांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकले होते आणि त्या विषण्ण होत्या. जितक्या अधिक आघातजन्य घटनांचा त्यांनी अनुभव घेतला तितकीच त्यांची विषण्णता चिरकालीन होती. . . . विषण्णता ही जीवनातील कोणत्याही अनुभवाशी संबंधित नव्हती हे त्यांना [ईव्स यांना] आढळले असते तर आनुवंशिकी दुवा शोधणे अधिक मोलाचे ठरले असते.”
तेच प्रकाशन म्हणते, की या कथा “प्रसार माध्यम तसेच वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये आनुवंशिकतेवरील [वर्तन] वृत्तांच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आपल्या जीवनात जनुकांचे किती महत्त्व आहे याविषयी त्यांमध्ये मनोवेधक वस्तुस्थिती, आधार नसलेले अनुमान आणि पाठपुरावा नसलेल्या अतिशयोक्त्या यांचा समावेश आहे. यातील पुष्कळशा लेखनाची एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याचा अस्पष्टपणा.” ते पुढे म्हणते: “मेंडेल यांच्या आनुवंशिकतेच्या सिद्धान्ताचे अनुसरण करणाऱ्या परिस्थितींशी जनुकांना संबद्ध करणे आणि कर्करोग किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या जटिल अवस्थांचे स्पष्टीकरण देण्यासाठी परिकल्पित आनुवंशिक ‘प्रवृत्तींचा’ उपयोग करणे यात जमीन अस्मानचा फरक आहे. मानवी वर्तनांचे स्पष्टीकरण देण्यात आनुवंशिकताशास्त्राचे संशोधन मदत करू शकते असे शास्त्रज्ञ सुचवतात तेव्हा ते अविचारीपणाने निष्कर्ष काढतात.”
तथापि, मागील सर्व बाबींना आता विचारात घेता, बहुतेकवेळा उपस्थित होणारे प्रश्न अद्यापही तसेच राहतात: आपल्या जीवनात बदललेल्या वर्तनरीती निर्माण होत असल्याचे आपल्याला काहीवेळा का आढळते? तसेच अशा परिस्थितींमध्ये आपल्याजवळ कोणते नियंत्रण आहे? आपल्या जीवनावरील ताबा आपण कसा मिळवू शकतो आणि टिकवू शकतो? पुढील लेख या प्रश्नांची काही उत्तरे देण्यात मदतदायी सिद्ध होईल.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
जनुक उपचारपद्धत—अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का? जनुक उपचारपद्धतीविषयी—रुग्णांमधील उपजत आनुवंशिक रोग बरे करण्यासाठी त्यांच्यामध्ये विशुद्धक जनुकांचे अंतःक्षेपण करण्याविषयी काय? काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांच्या मोठमोठ्या अपेक्षा होत्या. डिसेंबर १६, १९९५ चे अर्थशास्त्रज्ञ (इंग्रजी), “जनुक उपचारपद्धतीचे तंत्र उपयोगात आणण्याची वेळ आली आहे का?,” असा प्रश्न करते व म्हणते: “तिच्या व्यवसायींच्या जाहीर विधानांमुळे आणि वर्तमान पत्रात पुष्कळदा छापले गेल्यामुळे तुम्ही कदाचित असा विचार कराल. परंतु, अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञांचा गट याजशी असहमत आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थांचे (एनआयएच) अध्यक्ष हेरॉल्ड वॉरमस यांनी चौदा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांना या विषयाची उजळणी करण्यास सांगितले. सात महिने सखोल विचार केल्यावर मागील आठवडी प्रकाशित झालेल्या अहवालात त्यांनी असे म्हटले, की जनुक उपचारपद्धत आशादायक असली तरी आतापर्यंत तिच्याद्वारे साध्य केलेल्या गोष्टींची ‘अतिशयोक्ती’ करण्यात आली आहे.” बाह्य जनुकांची भर घालून उपचारास योग्य असल्याचा विचार केलेली अडेनोसीन डेमिनेस (एडीए) कमतरता किंवा इतर डझनावारी रोगांमधील एखादा रोग असलेल्या ५९७ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या. “त्या गटानुसार,” अर्थशास्त्रज्ञ म्हणते, “एकाही रुग्णाला अशा परीक्षेत भाग घेतल्याने स्पष्ट दिसणारा फायदा झालेला नाही.”
[७ पानांवरील चित्र]
काहीजणांनी आनुवंशिक प्रवृत्तीविषयी दावा केला असला तरीही कसे वागावे याची निवड लोक स्वतः करू शकतात