पाँपेई जेथे समय गतिहीन झाला
इटलीमधील सावधराहा! नियत कालिकाच्या बातमी दाराकडून
एका निर्मनुष्य, वियुक्त व ओसाड नगरीत—चुलीवर पातेली असलेली स्वयंपाकघरे, सामानाने लदबदलेली दुकाने, सुकलेले कारंजे, अखंड रस्ते—अगदी सर्वकाही जसे असायचे तसेच आढळते. हे आहे पाँपेई, जेथे समय जणू गतिहीन झाला असे भासते.
१,९०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वीच्या त्या विध्वंसकारी दिवशी नेपल्स उपसागरासमोर असलेल्या ज्वालामुखीचा अर्थात व्हेसुव्हिअस पर्वताचा उद्रेक झाला तेव्हापासून सर्वकाही जसे होते तसेच आहे. त्या ज्वालामुखीमुळे पाँपेई, हर्क्युलेनिअम, स्टाबिया तसेच सभोवतालचा खेड्यापाड्याचा भाग, राख व लाव्हारसात गाडला गेला.
पाँपेई नामक ग्रंथानुसार, “पुरातन काळातील सुसंस्कृत लोकांना व्हेसुव्हिअस हा ज्वालामुखीजन्य आहे याबद्दल केवळ एक पुसटशी कल्पना होती व ते सहसा त्यास दाट जंगले व ठिकठिकाणी आल्हादक द्राक्षमळे असलेला एक हिरवागार पर्वत समजत होते.” परंतु, सा. यु. ७९ मध्ये ऑगस्ट २४ रोजी अनेक वर्षांच्या निःशब्दतेनंतर हा पर्वत अतिशय प्रचंड उद्रेकासहित जागा झाला.
सा. यु. ७९ चा उद्रेक
ज्वालामुखीच्या उद्रेकासह वायू, शिलारस व खडकांच्या लहानमोठ्या कणांचा एक लोंढा बाहेर फेकला गेला; त्यामुळे आकाश अंधारले गेले व राख आणि लॅपिलीचा (अर्थात लाव्हारसाच्या लहान तुकड्यांचा) भयंकर वर्षाव झाला. अवघ्या दोन दिवसात पाँपेई व खेड्यापाड्याचा एक मोठा भाग, सरासरी अडीच मीटर खोलवर एका सांद्र थराखाली झाकला गेला. विध्वंसक धक्के अद्यापही जमिनीला हादरून सोडत होते त्यावेळेस, विषारी वायूंच्या एका अदृष्य परंतु अनर्थकारी अशा महाकाय ढगाने त्या नगरीला आच्छादून, तिला जणू आपल्या विनाशकारी बाहुपाशात जखडले. पाँपेई हळूहळू गाडले जात होते पण हर्क्युलेनिअम मात्र क्षणार्धात दृष्टिआड झाले. रीस्कोप्रीर् पाँपेई (पाँपेईचा पुनःआविष्कार) या ग्रंथानुसार हर्क्युलेनिअम, “समुद्रकिनाऱ्याजवळ बावीस मीटर [७२ फूट] खोलवर, खडकांचे तुकडे व पंकाच्या” प्रवाहात बुडाले.
पाँपेईच्या सुमारे १५,००० रहिवाशांच्या प्रतिक्रिया बहुविध होत्या. ज्यांनी तात्काळ पलायन केले, केवळ तेच स्वतःला वाचवू शकले. तथापि, काहींना आपली घरे व त्यांतील वस्तू वाऱ्यावर टाकून जाववेना; यास्तव, धोका टळून जाईल या आशेने ते तेथेच थांबले. इतर काही, आपल्या मौल्यवान वस्तू वाचवू पाहत होते व पळ काढण्याचा लगेच निर्णय न घेता रेंगाळत राहिले; अशातच, ते राखेच्या भाराने कोसळणाऱ्या त्यांच्या घरांच्या छतांखाली चिरडले गेले.
एक उदाहरण “फॉन निवासाच्या” मालकिणीचे आहे, जिला आपले वैभव त्यागण्याचे धाडस झाले नाही असे दिसते. ला वी कॉटीड्येन आ पाँपेई (पाँपेई येथील दैनंदिन जीवन) या आपल्या पुस्तकात, रॉबर्ट एट्येन म्हणतात, “सदर निवासाच्या मालकिणीने घाईगर्दीत आपल्या सर्पाकृती बांगड्या, अंगठ्या, केशाभुषणे, कर्णाभुषणे, एक रुपेरी आरसा व सुवर्ण नाण्यांनी भरलेली एक पिशवी—अर्थात आपली सर्वात मौल्यवान रत्ने गोळा केली—व ती पळ काढण्यास तयार झाली.” कदाचित, राखेच्या वर्षावाने भयभीत झाल्यामुळे ती घरातच थांबली. एट्येन पुढे सांगतात, “यानंतर थोड्याच वेळाने छत कोलमडले व ती दुर्दैवी स्त्री आणि तिचा खजिना तेथेच गाडला गेला.” इतरांचा, सर्वत्र पसरलेल्या विषारी वायूंमुळे गुदमरून अंत झाला.
ज्यांनी विलंब केला होता त्यांना आता आपला जीव घेऊन पळून जाण्यासाठी, तेवढ्या वेळेपर्यंत तयार झालेला लाव्हा व राखेचा थर ओलांडून जाणे भाग पडले. विनाशकारी वायू आत घेतल्यामुळे ते गुदमरून जेथे होते तेथेच कोसळले व राखेच्या अतिसूक्ष्म कणांच्या सतत होणाऱ्या वर्षावामुळे झाकले गेले. त्यांचे हृदयद्रावक अवशेष कित्येक शतकांनंतर सापडले, तेव्हा त्यांच्या मौल्यवान वस्तू अद्यापही त्यांच्या शेजारीच पडलेल्या होत्या. हे नगर व त्याचे रहिवाशी, २० फुटांपेक्षा अधिक खोल असलेल्या राखेच्या थराखाली गाडले गेले होते.
तथापि, त्या प्राणघातक वर्षावामुळे त्या नगरातील रहिवाशी सुद्धा पुन्हा दृष्टिक्षेपात आले आहेत. हे कसे शक्य झाले, ते तुम्हाला माहीत आहे का? या पृष्ठावरील त्यांच्या शरीरांच्या, ओतीव स्वरूपातील सांगाड्याचे निरीक्षण करा. ही कशी तयार करण्यात आली? कुजलेल्या मांसामुळे राखेत निर्माण झालेल्या पोकळीत, प्लॅस्टर ऑफ पॅरिस ओतून पुरात्त्ववेत्त्यांनी आपल्याला त्या असाहाय्य मृतकांच्या शेवटल्या व्याकुळ हावभावांचे दर्शन घडवले आहे—“हातावर डोके टेकवून पडलेली तरुणी; धूळ व विषारी वायूंपुढे निरुपयोगी ठरलेल्या रुमालाने तोंड झाकलेला एक माणूस; श्वासस्थगनामुळे आळेपिळे व झटके देतांना विचित्र अवस्थेत पडलेले सार्वजनिक स्नानगृहातील परिचर; . . . अखेरच्या दयनीय व व्यर्थ आलिंगनात आपल्या चिमुकल्या मुलीला कवटाळत असलेली एक आई.”—आर्खेयो.
हर्क्युलेनिअम येथे आश्रय नाही
पाँपेई येथपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्क्युलेनिअममध्ये ज्यांनी ताबडतोब पळ काढला नाही ते कोंडीत सापडले. कदाचित, समुद्रावाटे पलायन करण्याच्या आशेने अनेकांनी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने धाव घेतली पण समुद्रात झालेल्या एका जोरदार कंपनामुळे, नावा किनारा सोडून जाऊ शकल्या नाहीत. हर्क्युलेनिअम येथील पुरातन समुद्रकिनाऱ्यावर अलीकडील उत्खननांत ३०० पेक्षा अधिक सांगाडे सापडले आहेत. हे लोक समुद्रासमोर असलेल्या एका गच्चीखाली आडोसा घेण्याच्या प्रयत्नात असताना, पंक व खडकांच्या ज्वालामुखीजन्य तुकड्यांच्या एका भयंकर प्रवाहामुळे जिवंत गाडले गेले. येथेही अनेकांनी सुवर्णाभुषणे, रुपेरी पात्रे, वैद्यकीय चिकित्सेच्या उपकरणांचा एक संपूर्ण संच यांसारख्या आपल्या सर्वात मौल्यवान वस्तू वाचवण्याचा प्रयत्न केला होता—या सर्व वस्तू त्यांच्या मालकांच्या अवशेषांपाशी अद्यापही, व्यर्थ पडलेल्या आहेत.
समय गतिहीन झाला
पाँपेई हे सृष्टीच्या शक्तींपुढे जीवनाच्या शक्तीहीनतेची प्रभावी साक्ष देते. जगातील सर्व उत्खनन क्षेत्रांपैकी एकमात्रपणे पाँपेई व सभोवतालच्या क्षेत्रातच आधुनिक विद्वानांना व जिज्ञासू लोकांना बारकाईने अभ्यास करण्यासाठी, सा. यु. पहिल्या शतकातील दैनंदिन जीवनाची जणू एक ओझरती झलक प्राप्त होते.
या प्रदेशाची सुबत्ता विशेषतः कृषी, उद्योग व व्यापार यांमुळे होती. गुलाम व स्वतंत्र मनुष्यांना दररोज भाड्याच्या स्वरूपात कामावर ठेवण्याकरवी मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करण्यात येत होता—यामुळे खेड्यापाड्यातील सुपीक प्रदेशांत भरघोस उत्पन्न होत असे. नगरातील अनेक उद्योग खाद्यपदार्थांच्या व्यापाराशी संबंधित होते. पाँपेईला भेट देणारा पर्यटक आजही, मका दळण्यासाठी असलेल्या चक्क्या, भाजीपाल्याची बाजारपेठ तसेच फळ विक्रेत्यांची दुकाने व दारूचे गुत्ते पाहू शकतो. एकेकाळी व्यापारासाठी—अर्थात लोकरीवर व तागावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच औद्योगिक स्तरावर सूतकताई व कापडाचे विणकाम करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या इमारती आढळतात. जवाहिऱ्याच्या दुकानापासून हार्डवेअरच्या दुकानापर्यंत, इतर अनेक लघु उद्योगांना थारा देणाऱ्या या इमारती, शिवाय घरे यांनी हे नगर बनले होते.
अरुंद व एकेकाळी गजबजलेले रस्ते चिरेबंदी आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला उंच पार्श्वमार्ग व जलनलिकांच्या कल्पक यंत्रणेच्या साहाय्याने चालणारे सार्वजनिक कारंजे आहेत. मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्यांवर कुतूहल जागृत करणारे एक वैशिष्ट्य आढळते. आधुनिक पादचारी मार्गांच्या प्राचीन पूर्वस्वरूपात, रस्त्यांच्या मधोमध खडकांच्या उंच फरशा बसवलेल्या होत्या; यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांचा मार्ग सुकर होई व पाऊस पडल्यास त्यांचे पाय ओले होण्यापासून वाचवण्यास मदत होत असे. नगरात गाड्या चालवणाऱ्यांना त्या उंच दगडी फरशांपासून दूर राहण्यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत असे. त्या फरशा अद्यापही तेथेच आहेत! काहीएक बदललेले नाही.
खाजगी जीवन
पाँपेई नगरातील रहिवाशांच्या खाजगी जीवनाभोवती असलेले अंतर्मुखपणाचे वलय देखील आधुनिक दर्शकांच्या अविचारी नजरेचा प्रतिकार करू शकत नाही. राजसी दागदागिन्यांनी सजलेली एक स्त्री एका धंदेवाईक रोमन योद्ध्याच्या बराकीत त्याच्या कुशीत मृतावस्थेत पहुडलेली पाहावयास मिळते. घरांची व दुकानांची दारे सताड उघडी आहेत. स्वयंपाकघरे पाहण्याकरता मांडलेली आहे; त्यांत चुलींवर पातेली, ओव्हनमध्ये अजूनही अर्धशिजलेला ब्रेड व भिंतीला टेकून ठेवलेली मोठमोठी रांजणे आहेत, जणू काही क्षणापूर्वीच कोणीतरी ते सारे सोडून गेले असावे असा भास होतो. येथे, उत्कृष्ट चुनेगच्चीचे मूर्तिकाम, भितींवरील चित्रे व फरशा यांनी सजवलेल्या खोल्या आहेत ज्यांत गर्भश्रीमंत लोक अतिशय शुद्ध चांदीचे पेले व पात्रे वापरून जेवणावळींचा मनसोक्त आनंद लुटत असत. प्रसन्न अंतरस्थ बगिचे चहुकडून स्तंभावलींनी वेढलेले असून, आल्हाददायक कारंज्यांनी सजवलेले आहेत, मात्र आता हे कारंजे निष्क्रिय झाले आहेत. तसेच, नाजुक कलाकुसर असलेले ब्राँझचे पुतळे व कुळदैवतांची देवघरे देखील पाहावयास मिळतात.
तथापि, अधिकांश लोकांची राहणी तुलनात्मकपणे फारच साधी होती. अनेक जणांच्या घरांत स्वयंपाक करण्यासाठी सोयी नसल्यामुळे ते सहसा विविध खाणावळींमध्ये जात असत. तेथे त्यांना अगदी कमी किंमतीत, गप्पागोष्टी करण्याची, जुगार खेळण्याची किंवा जेवण व पेय विकत घेण्याची सोय उपलब्ध होती. यांपैकी काही खाणावळी म्हणजे दुर्लौकिक लाभलेली ठिकाणे असावीत, जेथे ग्राहकांना पेय दिल्यानंतर, वाढपिणी म्हणून काम करणाऱ्या, सहसा गुलामांच्या घरच्या मुली वेश्यागिरी करत असत. अशाप्रकारच्या असंख्य खाणावळींव्यतिरिक्त, उत्खननातून दुर्लौकिक लाभलेली वीसपेक्षा अधिक इतर ठिकाणे उजेडात आली आहेत; अत्यंत बीभत्स अशी चित्रे व लिखाणे ही सहसा या ठिकाणांची वैशिष्ट्ये होती.
ही पावले उचलण्याची घटका आहे
पाँपेईचा आकस्मिक विनाश एखाद्याला विचार करण्यास भाग पाडतो. स्पष्टपणे, तेथे मृत्यूमुखी पडलेल्या सहस्त्रावधी लोकांनी, येणाऱ्या संकटाचा इशारा देणारी चिन्हे दिसताच, अर्थात वारंवार होणारे भूकंप, ज्वालामुखीचे स्फोट व लॅपिलीचा भयंकर वर्षाव पाहताच पुरेशा तत्परतेने कृती केली नाही. ते रेंगाळत राहिले, कारण त्यांना कदाचित त्यांच्या ऐषारामाच्या जीवनाचा व त्यांच्या संपत्तीचा त्याग करायचा नव्हता. कदाचित धोका सरून जाईल, किंवा जरी परिस्थिती आणखी बिकट झालीच तरी पळ काढायला नक्कीच वेळ मिळेल अशी त्यांना आशा होती. दुःखद बाब अशी की त्यांचा अंदाज चुकीचा निघाला.
शास्त्रवचने आपल्याला माहिती देतात, की विद्यमान काळात सबंध जग काहीशा सारख्याच परिस्थितीत आहे. आपण ज्यात जगतो, तो नीतिभ्रष्ट समाज देवापासून दुरावलेला आहे. तो आकस्मिकपणे नाहीसा होण्याच्या बेतात आहे. (२ पेत्र ३:१०-१२; इफिसकर ४:१७-१९) सर्व पुरावे सूचित करतात की ती घटका जवळ आहे. (मत्तय २४:३-४२; मार्क १३:३-३७; लूक २१:७-३६) पाँपेईचे शोचनीय अवशेष, द्विधावृत्तीच्या मूर्खपणाला मूक साक्ष देत उभे आहेत.
[२० पानांवरील चौकट]
ख्रिस्ती क्रूस?
एका बेकरीच्या भिंतीवरील चुनेगच्चीच्या क्रूसाव्यतिरिक्त पाँपेई येथे अनेक विविध क्रूस सापडल्यामुळे, सा. यु. ७९ मध्ये या नगरीचा नाश होण्यापूर्वी तेथे ख्रिस्ती लोक होते याचा हा पुरावा आहे असा काहींनी अर्थ लावला आहे. हा अंदाज साधार आहे का?
अर्थातच नाही. प्रीझेन्स ग्वीडाइके ए क्रीस्त्याने आ पाँपेई (पाँपेई येथे यहुदी व ख्रिस्ती अस्तित्व) या ग्रंथात, लेखक आन्ताँन्यो वारोने म्हणतात, की “मूर्त रूपातील क्रूसाची सुविकसित उपासना केवळ चौथ्या शतकातच” आढळते; “तेव्हा सम्राटाचे व अनेक गैरख्रिस्तीयांचे धर्मांतर झाल्यामुळे अशाप्रकारची उपासना त्यांच्या आध्यात्मिक भावनांशी अधिक सुसंगत होती.” वारोने पुढे म्हणतात की, “दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातही व कॉन्स्टन्टाईनच्या काळापर्यंत, ख्रिस्ती विश्वासाच्या स्पष्ट संबंधात अशाप्रकारचे प्रतीक क्वचितच आढळते.”
ख्रिस्ती नसल्यास, अशा प्रतिकांचे मूळ काय असावे? क्रूस समजले जाणाऱ्या या प्रतिकाची ओळख पटवून देण्यासंबंधाने व त्याच बेकरीत एका सर्पाकृती दैवताचे चित्र सापडण्यासंबंधाने अनेक शंकाकुशंका तर आहेतच, पण त्याशिवाय वारोने यांच्या शब्दांत “येथे असेही काही अत्यंत बीभत्स शोध लागले आहेत ज्यांची या बेकरीत राहणाऱ्या भाडेकरूच्या तथाकथित ख्रिस्ती आध्यात्मिक भावनांशी सांगड घालणे कठीण आहे.” ते पुढे म्हणतात: “संस्कृतीच्या उदयापासून, क्रूसाच्या आकाराचे बोधचिन्ह हे पापातून मिळणाऱ्या मुक्तीचे प्रतीक बनण्याच्या कितीतरी काळापूर्वी, स्पष्टपणे जादुटोणा व धार्मिक संस्काराच्या संबंधाने उपयोगात आणले जात असे हे सर्वज्ञात आहे.” हे विद्वान स्पष्ट करतात, की प्राचीन काळात, क्रूस हा सर्व विघ्नकारक प्रभावांचे निवारण करण्यास व त्यांचा नाश करण्यास समर्थ आहे असे समजले जात असे व एक मंत्रसिद्ध ताईत म्हणून त्याचाच सर्वाधिक उपयोग केला जात असे.
[१९ पानांवरील चित्र]
कॅलिगुलाची कमान व मागे व्हेसुव्हिअस पर्वत
[१९ पानांवरील चित्र]
वरती: पाँपेईच्या रहिवाशांचे प्लास्टर वेष्टित सांगाडे
डावीकडे: निरोच्या कमानीचे दृश्य व ज्यूपिटरच्या मंदिराचा काही भाग
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
Photos on page 19: Soprintendenza Archeologica di Pompei