तरुण लोक विचारतात . . .
मला मौजमजा कशी करता येईल?
“मला वाटतं आम्हाला मौजमजा करण्याचे अनेक प्रसंग नक्कीच मिळतात. आमच्या मंडळीत तर आम्ही एकत्र येण्याचा अक्षरशः प्रयत्न करत असतो. आम्ही करतो ती मौजमजा हितकर असते. जगातली अधिकांश मुलंमुली असा दावा करू शकणार नाहीत.”—जेनिफर.
मनोरंजन—वेळोवेळी सर्वांनाच याची गरज भासते. वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यानुसार मनोरंजन हे “एखाद्या व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या अनुषंगाने मोलाचा हातभार” देखील लावू शकते. किंबहुना, “हसण्याचा समय” असतो, म्हणजेच आनंद लुटण्याचेही क्षण असतात असे स्वतः बायबल म्हणते!—उपदेशक ३:१, ४.a
“मनोरंजन” या अर्थबोधाचा इंग्रजी शब्द “रेक्रीएशन” हा, लॅटिन भाषेत “नव्याने निर्माण करणे, पुनःस्थापित करणे, नवचैतन्य आणणे” या अर्थांच्या एका संज्ञेतून उदयास आला आहे. (वेबस्टर्स न्यू कॉलेजिएट डिक्शनरी) दुःखाने म्हणावे लागते की ‘मौजेखातर’ तरुण लोक जे काही करतात त्यांपैकी पुष्कळसे—उदाहरणार्थ बेफाम पार्ट्यांमधील सहभाग घेणे, मादक पदार्थांचा व मद्याचा गैरवापर करण्यात किंवा अवैध लैंगिक संबंधात स्वतःस गुरफटणे—हे खऱ्या अर्थाने नवचैतन्य आणविणारे तर नसतेच, पण त्याउलट ते विघातक असते. यास्तव, आनंदविणाऱ्या व त्याच वेळेस हितकर असणाऱ्या मनोरंजनपर कृती शोधून काढणे हे खरोखर आव्हानात्मक ठरू शकते. तथापि, सुरवातीला जिचे शब्द उद्धृत करण्यात आले आहेत त्या जेनिफरने सुचविल्याप्रमाणे हे सुसाध्य आहे!
एकत्र मिळून मनोरंजनपर कृती करणे
अलीकडेच सावध राहा! ने या विषयावर अनेक तरुण लोकांच्या मुलाखती घेतल्या. यांपैकी बरेचसे असे म्हणाले, की त्यांना इतर तरुणांसोबत एकत्र येण्यास आवडते. तुम्हालाही असे वाटत असून—सहसा तुम्हाला आमंत्रित करण्यात येत नाही असे आढळते का? असे असल्यास, तुम्ही स्वतः पुढाकार का घेऊ नये? उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील ली नावाची एक मुलगी म्हणते: “एखादा विशिष्ट चित्रपट मला पाहायचा असल्यास मी माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कुणालातरी फोन करते व आम्ही इतरांनाही त्याविषयी सांगतो.” ते सहसा उशीर होणार नाही या दृष्टीनेच शो निवडतात. त्यानंतर, त्यांचे आईबाबा त्यांना घ्यायला येतात व ते सर्व मिळून एखाद्या स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवतात.
खेळ व क्रीडा देखील स्वास्थ्यकारक व्यायामासाठी व श्रेयस्कर सहवासासाठी संधी उपलब्ध करून देतात. (१ तीमथ्य ४:८) रोलीन नामक तरुणी म्हणते: “मला कुठे जायचे आहे याबद्दल मी आधी माझ्या कुटुंबासोबत विचारविनिमय करते, मग आम्ही काही मोजक्याच लोकांना आमच्या सोबतीला येण्याचे निमंत्रण देतो.” खरोखर, ख्रिस्ती तरुणांनी इतरांसोबत सहभागी होता येईल अशाप्रकारच्या श्रेयस्कर खेळांची एक उल्लेखनीय यादीच शोधून काढली आहे: स्केटिंग करणे, सायक्लिंग, जॉगिंग करणे तसेच टेनिस, बेसबॉल, फुटबॉल व व्हॉलिबॉल यांसारखे खेळ खेळणे, हे तिच्यातील काही आहेत.
नाही, मौजमजा करण्यासाठी तुम्ही खूपसा पैसा खर्च करावा किंवा महागडी साधने विकत घ्यावीत हे काही आवश्यक नाही. एक किशोरवयीन ख्रिस्ती मुलगी म्हणते, “जवळपासच्या डोंगरांवर व वन्य प्रदेशांत, माझे आईबाबा व माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मी अनेकदा हायकिंग करण्याचा आनंद लुटला आहे. चांगल्या सोबत्यांच्या सहवासात मोकळ्या हवेत बाहेर फिरायला जाण्यातही एक आगळाच आनंद आहे!”
उत्साहवर्धक सामाजिक मेळावे
तथापि, अनेक तरुणांच्या बाबतीत सामाजिक मेळाव्यांत सहभागी होणे हा मौज करण्याचा अर्थ असतो. अवेडा नामक युवती म्हणते, “आम्हाला मित्रमैत्रिणींना आमंत्रित करून त्यांच्यासोबत जेवण व संगीताचा आनंद घ्यायला आवडतं.” ख्रिश्चनांच्या बाबतीत पाहू जाता, सामाजिक मेळाव्यांचे आपले एक स्थान आहे. येशू ख्रिस्त स्वतः विशेष जेवणावळींत, लग्नांत व इतर सामाजिक मेळाव्यांत सहभागी होत असे. (लूक ५:२७-२९; योहान २:१-१०) त्याचप्रकारे आरंभीचे ख्रिश्चन लोक देखील एकत्र येऊन जेवणाचा व उत्साहवर्धक सहवासाचा आनंद घेत असत.—पडताळा यहूदा १२.
तुमच्या पालकांनी तुम्हाला असा एखादा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिल्यास, समस्या उद्भवू नयेत व सर्वांना निर्भेळ आनंद प्राप्त व्हावा याची खात्री करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? विचारपूर्वक आखणी हेच उत्तर आहे. (नीतिसूत्रे २१:५) स्पष्टीकरणार्थ: सर्वांकडे सुयोग्यपणे लक्ष देता येईल इतक्याच मित्रमैत्रिणींना आमंत्रण देण्यात अर्थ आहे. लहान मेळाव्यांचे ‘रंगेल’ अथवा ‘विलासी’ स्वरूपाच्या कार्यक्रमांत रूपांतर होण्याची शक्यता कमी असते.—गलतीकर ५:२१; पंडिता रमाबाई भाषांतर.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना ‘अव्यवस्थितपणाने वागणाऱ्यांसोबत’ मैत्रिपूर्ण सहवास टाळण्याची ताकीद देण्यात आली होती. (२ थेस्सलनीकाकर ३:११-१५) आजच्या काळात, दंगलखोर व उच्छृंखल असल्याची ख्याती असणाऱ्या तरुणांना आमंत्रित केल्यास कार्यक्रमाचा बट्याबोळ हा ठरलेलाच आहे. तुम्ही कोणास आमंत्रित करावे याबद्दल विचारपूर्वक असण्यासोबतच, त्याच त्या मित्रांच्या घोळक्यापर्यंत स्वतःला सीमित ठेवू नका. ‘आपले अंतःकरण विशाल करा,’ व मंडळीतील इतर काही लोकांशी, त्याअर्थी वयोवृद्धांशीही मैत्री करा.—२ करिंथकर ६:१३.
तुम्ही अल्पोपहार देखील देणार का? असे असल्यास, तुमच्या पाहुण्यांना आनंद मिळावा यासाठी हे खायचे पदार्थ चमचमीत व महागडे असावेत हे काही अनिवार्य नाही. (लूक १०:३८-४२) दक्षिण आफ्रिकेतील एक मुलगी, सांचिया म्हणते, “काही वेळा आम्ही पीट्झाचा बेत करतो.” सहसा पाहुणे देखील स्वेच्छेने काही पदार्थ आणण्यास तयार होतील.
निव्वळ टी. व्ही. पाहणे, संगीत ऐकणे व गप्पागोष्टी करणे याशिवाय—एखाद्या कार्यक्रमात तुम्ही आणखी काय काय करू शकता? सांचिया म्हणते, “आम्ही त्या विशिष्ट संध्याकाळी काय काय करणार हे सहसा आधीच ठरवतो. कधी आम्ही निरनिराळे खेळ खेळले तर कधी एखाद्याला पियानो वाजवायला लावला व त्यासोबत आम्ही सर्व मिळून गाणी गायली.” मॉसेने नामक एक आफ्रिकन तरुण म्हणतो: “कधी आम्ही पत्ते, सोंगट्यांचा खेळ [चौसार] व बुद्धीबळ खेळतो.”
जेनिफर, जिचे उद्गार याआधी उद्धृत करण्यात आले, तिने सावध राहा! यास सांगितले: “आमच्या मंडळीतील एक वडील आम्हाला बायबलवर आधारित खेळ खेळण्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित करतात. उत्तमरित्या खेळायचे असल्यास तुम्हाला बायबलचे चांगले ज्ञान असण्यास हवे.” सावध राहा! च्या प्रतिनिधीने इतर युवकांना विचारले: “बायबलवर आधारित खेळ खेळणे हे तुम्हाला विचित्र नाही का वाटत?” त्यांनी अक्षरशः ओरडून उत्तर दिले, “नाही!”
एक किशोरवयीन मुलगी म्हणाली, “ते आव्हानात्मक असतं.” आणखी एक मुलगी म्हणाली की “ते मजेशीर असतं.” बायबलवर आधारित खेळ मौजेखातर खेळले जातात व स्पर्धात्मक मनोवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यात येते तेव्हा हे खेळ आनंदप्रद व माहितीपर ठरू शकतात!—सावध राहा! च्या जून २२, १९७२ (इंग्रजी) अंकातील “कार्यक्रमांना आनंदप्रद तरीही हितकारक बनविणे,” हा लेख पाहा.
कौटुंबिक मौज
बायबल काळात कुटुंबांचे एकत्र मिळून विविध मनोरंजनपर प्रकारांचा आनंद लुटणे हे काही असामान्य नव्हते. (लूक १५:२५) तथापि, पालकांबद्दल मुलांचे पुस्तक (इंग्रजी) याचे तरुण लेखक असे निरीक्षण करतात की, “पालक व मुले आजकाल आपापल्या कामांत एवढे गुंतलेले असतात की कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कोणालाही सवड नसते . . . आमच्या मते प्रत्येक आठवडी निव्वळ मौज म्हणून पालकांनी व मुलांनी न चुकता थोडा वेळ एकत्र यावे हे अत्यावश्यक आहे.”
पाकी नावाची एक आफ्रिकन तरुणी म्हणते, “शुक्रवार हा आमचा कुटुंबाचा दिवस असतो. आम्ही सहसा एकत्र मिळून निरनिराळे खेळ खेळतो.” अर्थातच, तुमच्या भावंडांना विसरून चालणार नाही. ब्रॉन्वन ही तरुणी म्हणते: “मला माझ्या धाकट्या बहिणीसोबत चित्रं काढण्यास व इतर कलाकृती तयार करण्यास खूप आवडतं.” स्वतः पुढाकार घेऊन तुमच्या कुटुंबासोबत करता येतील असे काही मौजमजेचे कार्यक्रम तुम्हाला सुचविता येतील का?
तुम्ही एकटे असता तेव्हा
तुम्ही एकटे असला तर काय? त्याअर्थी तुम्हाला कंटाळवाणे व एकलकोंडे वाटावे असे काही नाही. अशा वेळांचाही सदुपयोग करण्याचे कितीतरी आनंददायक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, छंद. बायबल काळापासून स्त्रीपुरुषांना संगीताचा अभ्यास हा वृद्धिंगत करणारा असल्याचे दिसून आले आहे. (उत्पत्ति ४:२१; १ शमुवेल १६:१६, १८) रेचल म्हणते, “मी पियानो वाजवते. हे, कंटाळा येतो तेव्हा करता येण्यासारखे आहे.” संगीताकडे तुमचा कल नसल्यास तुम्हाला शिवणकाम, बागकाम, पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करणे किंवा नवीन भाषा शिकणे यांपैकी काही शिकून घेण्यास कदाचित आवडेल. अतिरिक्त लाभाच्या स्वरूपात, पुढील आयुष्यात उपयोगी ठरतील अशी काही कौशल्येही तुम्ही संपादन करू शकाल.
बायबल आपल्याला सांगते की इसहाकासारखे, इतर विश्वासूजन मनन करण्यासाठी काही काळ एकांतात घालवत असत. (उत्पत्ति २४:६३) हान्स नावाचा एक तरुण ऑस्ट्रियन माणूस म्हणतो: “काहीवेळा मी सहज बगिच्यातील एखाद्या शांत ठिकाणी जाऊन सूर्यास्त पाहात बसतो. असे केल्यामुळे मला अतिशय आनंद होतो आणि मला माझा देव, यहोवा याच्या अधिक जवळ आणण्यास हे सहायक ठरते.”
यहोवाच्या सेवेतील “संतोष”
यहोवाची सेवा करण्यास ख्रिस्ताला “संतोष” होईल असे बायबलने भाकीत केले. (यशया ११:३) देवाची पवित्र सेवा ही मनोरंजनाचा एक प्रकार नसली तरीही, ती चैतन्यदायी व अनुरंजक ठरू शकते.—मत्तय ११:२८-३०.
ज्याचे शब्द यापूर्वी उद्धृत करण्यात आले होते, तो हान्स आणखी एका संतोषकारक अनुभवाची आठवण सांगतो. तो म्हणतो: “[उपासनेसाठी] एका संमेलन सभागृहाच्या बांधकाम प्रकल्पावर मी व माझे मित्र सप्ताहांती काम करत असू, त्या दिवसांची आम्ही मोठ्या आवडीने आठवण करतो. आम्ही एकत्र मिळून काम करण्याचे शिकलो आणि एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजू लागलो. मागे वळून पाहताना, आम्हाला समाधान वाटतं की आम्ही जे केलं ते श्रेयस्कर तर होतंच पण त्याचवेळेस रंजनात्मकही होतं.”
या ख्रिस्ती तरुणांनी दिलेल्या ग्वाहीतून एक सत्य अगदीच स्पष्ट झाले आहे: तुम्हाला मौजमजा करण्यापासून वंचित राहण्याचे काहीएक कारण नाही. बायबलच्या तत्त्वांचा अवलंब करा. कल्पक मनोवृत्ती बाळगा! श्रेयस्कर बाबतीत पुढाकार घ्या! तुम्हाला दिसून येईल की अपायकारक नव्हे तर उभारणीकारक मार्गांनी तुम्ही आनंद लुटू शकता.
[तळटीपा]
a आमच्या जुलै २२, १९९६ (इंग्रजी) अंकात, “तरुण लोक विचारतात . . . नेहमी इतर युवकांनाच मौज करायला मिळते, असं का?” हा लेख पाहा.
[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]
“चांगल्या सोबत्यांच्या सहवासात मोकळ्या हवेत बाहेर फिरायला जाण्यातही एक आगळाच आनंद आहे!”
[२४ पानांवरील चित्र]
मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करण्यासाठी तुम्हाला खूपसा पैसा खर्च करण्याची जरूर नाही