ऑस्ट्रेलियाचा “गाणारा बुरूज”
ऑस्ट्रेलियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
अनेकवेळा संगीताच्या क्षेत्रात कला, तंत्रज्ञान व विज्ञान यांच्या सहकार्याने उल्लेखनीय प्रतीची विविध वाद्ये निर्माण करण्यात आली आहेत. तथापि, ॲन्टोनियस स्ट्रॅडिवेरीयसच्या व्हायोलिन व टेओबलॉल्ड बोयमच्या बासऱ्या बऱ्याच प्रसिद्ध असल्या तरीसुद्धा, विशाल कॅरिलॉनविषयी कोणालाही फारशी माहिती नाही.
परंतु, कॅरिलॉन आहे तरी काय व ते कसे वाजवतात? जगातील महत्त्वाच्या कॅरिलॉनपैकी एकास भेट दिल्याने आपल्याला पुष्कळशी माहिती मिळेल, शिवाय आपल्या मनात त्याच्या अभिनव संगीताबद्दल गोडी देखील वाढेल.
भव्य वाद्य
कॅरिलॉन जगातील सर्वात मोठे संगीत वाद्य असून ते मुळात फार प्राचीन आहे. सहसा ते एका घंटेच्या बुरूजात असते व म्हणूनच त्यास “गाणारा बुरूज” असे योग्यपणे म्हणण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी, कॅनबेरा येथील कॅरिलॉन व घंटेचा बुरूज म्हणजे, ५० वर्षांपूर्वी झालेल्या या शहराच्या स्थापनेच्या व नामकरणाच्या स्मृतिप्रित्यर्थ, १९६३ साली ग्रेट ब्रिटनच्या सरकाराकडून देण्यात आलेली वार्षिकोत्सवाची भेट होय. हे कॅरिलॉन, रमणीय बर्ली ग्रिफ्फिन सरोवराच्या मधोमध असलेल्या ॲस्पेन बेटावर आहे.
या ५०-मीटर उंच असलेल्या घंटेच्या बुरूजामध्ये तीन त्रिकोणी खांब आहेत, ज्यांतील प्रत्येक खांब केंद्रभागी असलेल्या समभुज त्रिकोणाच्या एका बाजूला जोडलेला आहे. पुष्कळ उंचावर व या तीन खांबांच्या मधोमध असलेल्या मजल्यांवर प्रत्यक्ष कॅरिलॉन आहे.
बुरूजातील लिफ्टने आपण पहिल्या मजल्यावर जातो; येथे आपल्याला ऑर्गन या वाद्यात असतात तशा स्वरांच्या पट्ट्या, अर्थात दोन मोठे क्लेवियर पाहायला मिळतात. यांतील पहिले फक्त कॅरिलॉनवादकाच्या सरावासाठी असते. या स्वरांच्या पट्टीला जोडलेले हातोडे केवळ स्वरमिलित तारांवर आघात करतात.
या सराव स्वरपट्टीच्या अगदी मागे खरा कॅरिलॉन क्लेवियर असतो. पण ही काही सर्वसामान्य स्वरपट्टी नव्हे, कारण तिच्यात ओक लाकडापासून तयार केलेल्या मोठ्या गोलाकार हातपट्ट्या असतात ज्यांचा व्यास जवळजवळ दोन सेंटिमीटर इतका असतो. वरील हातपट्टीत पियानो अथवा ऑर्गनसारख्या काळ्या पट्ट्या असतात. त्या सुमारे नऊ सेंटीमीटर लांब असतात व (पियानोच्या पांढऱ्या पट्ट्यांसारखी) खालील हातपट्टीतील पट्ट्या सुमारे १७ सेंटीमीटर लांब असतात. कॅरिलॉनवादक हा पियानोवादक किंवा ऑर्गनवादकासारखा आपल्या बोटांच्या साहाय्याने नव्हे तर बंद हातांनी वाजवतो. यामुळेच, स्वरपट्टीतील पट्ट्या दूर दूर असतात जेणेकरून वाजवताना वादकाचा हात इतर पट्ट्यांना लागू नये.
खरोखरच एक भव्य यंत्रणा
मुख्य क्लेवियरच्या वरील भागातून, पुढच्या मजल्यावर तारा जोडलेल्या असतात व साडे चार सप्तकांतील प्रत्येक स्वराची पट्टी, विशिष्ट प्रमाणावर ताणलेल्या एका वेगळ्या स्टीलच्या तारेला जोडलेली असते. या सर्व तारा कोठे जातात हे पाहण्यासाठी आपण लिफ्टने पुढच्या मजल्यावर जातो. येथे, प्रत्येकी सहा टन वजनाच्या दोन प्रचंड मोठ्या घंटा टांगलेल्या आहेत. या दोन्ही घंटांच्या मधोमध पाहिल्यास आपल्याला आणखी ५१ घंटा दिसतात. या घंटा वरपर्यंत क्रमवारपणे लावलेल्या आहेत व शेवटची अर्थात सर्वात लहान घंटा केवळ सात किलोग्रॅम वजनाची आहे.
अधिक वजनदार जुळणीच्या स्वरांमुळे येणारे ध्वनिविषयक अडथळे टाळण्याच्या उद्देशाने, सर्व घंटा सोयीस्करपणे लावलेल्या असतात. घंटेच्या आत एक नरम धातूचा टोला असतो व प्रत्येक घंटा, खालच्या मजल्यावरील क्लेवियरच्या प्रत्येक स्वरांच्या पट्टीला स्टीलच्या तारेने जोडलेली असते. प्रत्येक कॅरिलॉनवादकाच्या स्वतंत्र शैलीशी तसेच सर्वसाधारण हवामानाशी जुळण्यासाठी या तारेला अगदी योग्य ताण दिलेला असतो.
काही मनोवेधक बाबी
कॅनबेराच्या कॅरिलॉनमधील घंटा इंग्लंड येथील जॉन टेलर व कंपनी यांच्या ओतकामाच्या कारखान्यात बनवण्यात आल्या होत्या व त्या घंटा प्राचीनकाळच्या एका उत्कृष्ट कलाकुसरीचे २० व्या शतकातील नमुने आहेत. या घंटांचा निनाद सरोवराच्या पलीकडे व जवळच्या बागांमध्ये व उद्यानांमध्येही ऐकू येतो.
हे कॅरिलॉन जगातील सर्वात मोठे नसले तरीही ५३ घंटा असल्यामुळे ते मोठ्या कॅरिलॉनच्या यादीत वरच्या स्थानावर आहे; कारण अधिकांश कॅरिलॉनमध्ये सहसा २३ ते ४८ घंटा असतात. तथापि, सर्वात मोठे कॅरिलॉन न्यूयॉर्क सिटी येथे आहे. त्यात ७४ घंटा आहेत. जगातील सर्वात मोठी स्वरमिलित घंटा देखील येथे आहे. या घंटेचे वजन १८ टनांपेक्षा अधिक असून, कॅनबेरातील कॅरिलॉनच्या लो ‘एफ्’ शार्प या स्वराच्या तुलनेत तिचा लो ‘सी’ हा स्वर आहे.
तर मग चला, आपण कॅरिलॉनवादकाच्या वादनाचा आस्वाद घेऊ या. तेथे खाली बागेत बसायचे का? तेथे आपण ‘गाणाऱ्या बुरूजाचे’ अद्वितीय संगीत तर ऐकू शकतोच, पण त्याच वेळेस आपण आपल्या सभोवतालच्या अद्भुत निसर्गसौंदर्याचा देखील आस्वाद घेऊ शकतो. संध्याकाळचा निश्चल वारा व घंटाची मनोवेधक उंची, या दोहोंच्या सुरेख मीलनाने निर्माण होणाऱ्या मंद व हळुवार संगीतामुळे आपली अंतःकरणे संगीताच्या ईश्वरी वरदानाबद्दल कृतज्ञतेने भरून येतात.
[२५ पानांवरील चित्र]
बुरूजातील घंटा