लाईम रोग तुम्हाला त्याचा धोका आहे का?
एड्स ठळक मथळ्यांमध्ये झळकत आहे, तर लाईम रोगाचा उल्लेख तळटिपांमध्ये देखील क्वचितच होतो. तरीही, लाईम रोग फार वेगाने पसरत आहे. खरे म्हणजे, काही वर्षांआधी, द न्यूयॉर्क टाईम्स मॅग्झीनने त्यास, “एड्स खालोखाल [संयुक्त संस्थानांत] सर्वात वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग” असे संबोधले. इतर देशातील अहवाल दाखवून देतात, की हा रोग आशिया, युरोप व दक्षिण अमेरिकेतही पसरत आहे.
लाईम रोग आहे तरी काय? तो कसा पसरत आहे? तुम्हाला त्याचा धोका आहे का?
गोचीड, हरिण व तुम्ही
साधारण २० वर्षांआधी, संयुक्त संस्थानांच्या ईशान्येकडील भागात वसलेल्या लाईम कनेक्टिकट नगरात व आसपासच्या ठिकाणी सांधेदुखीच्या घटना विलक्षणीयरित्या वाढल्या. बळी पडणाऱ्यांमध्ये बहुतेककरून लहान मुले होती. त्यांची सांधेदुखी त्वचेवरील पुरळ, डोकेदुखी व सांध्यात वेदना यांनी सुरू होत असे. एका स्त्री रहिवाशीने पाहिले की, काही काळातच तिचा “पती, व दोन मुले कुबड्यांच्या आधाराने चालू लागली.” लवकरच, त्या ठिकाणातील ५० पेक्षा अधिक लोकांवर त्याचा परिणाम झाला व काही वर्षांतच हजारो लोकांमध्ये तीच वेदनामय लक्षणे दिसून येऊ लागली.
हा आजार इतर रोगांपेक्षा वेगळा असल्याचे संशोधकांना कळाल्यावर, त्यांनी त्यास लाईम रोग असे नाव दिले. या रोगाचे कारण? बोरेलिया बर्गडोफेरी—गोचीडांमध्ये वास्तव्य करणारा बूच काढण्याच्या स्क्रूच्या आकाराचा जिवाणू. त्याचा प्रसार कसा होतो? रानातून चालताना, एखाद्या व्यक्तीला हा संसर्गित गोचीड चिकटू शकतो. हा गोचीड व्यक्तीच्या त्वचेला टोचून रोग उत्पन्न करणारा जिवाणू त्या दुर्दैवी भटकंत्याच्या शरीरात अंतःक्षेपित करतो. हा संसर्गित गोचीड बहुधा हरिणींवर प्रवास, भक्षण व प्रजोत्पादन करत असल्यामुळे आणि हरिणी जेथे अधिक प्रमाणात आहेत त्या ग्रामीण भागांमध्ये अधिक लोक स्थाईक होत असल्यामुळे, लाईम रोगाचा फैलाव वाढत आहे यात काही आश्चर्य नाही.
लक्षणे व समस्या
लाईम रोगाचे पहिले लक्षण म्हणजे, त्वचेवर पुरळ उठणे (ज्यास एरायथेमा मायग्रेन किंवा इम म्हणतात) ज्याची सुरवात लालसर लहान चट्ट्याने होते. हा सूचक चट्टा काही दिवसांमध्ये किंवा आठवड्यांमध्ये गोलाकार, तिकोनाकार किंवा अंडाकृती पुरळात वाढून तो नाण्याइतक्या आकाराचा होतो अथवा एखाद्याच्या संपूर्ण पाठीवर उठतो. पुरळ तर उठतातच पण त्यासोबत बहुधा डोकेदुखी, मान आखडणे, अंगदुखी व थकवा देखील जाणवतो. तातडीने इलाज न केल्यास, निम्म्यापेक्षा अधिक रुग्णांना वेदनादायक व सुजलेल्या सांधेदुखीचे झटके येतात जे अनेक महिन्यांपर्यंत राहू शकतात. इलाज न केलेल्या २० टक्के लोकांमध्ये जुनाट सांधेदुखी संभवू शकते. सामान्यतः असे होत नसले, तरीही या रोगाचा चेता संस्थेवर परिणाम होऊन हृदय विकाराच्या समस्या देखील उद्भवू शकतात.—सोबतची पेटी पाहा.
अनेक तज्ज्ञांना, लाईम रोगाचे निदान करणे कठीण होते कारण त्याची सुरवातीची फ्लूसारखी लक्षणे इतर संसर्गांप्रमाणेच असतात. त्याखेरीज, प्रत्येक ४ पैकी १ व्यक्तीला पुरळ उठत नाहीत—केवळ लाईम रोगाचे ओळखचिन्ह—तसेच अनेक रुग्णांना गोचीड चावल्याचे आठवत नसते कारण त्याचे चावणे बहुधा वेदनारहित असते.
सध्या उपलब्ध असलेल्या प्रतिद्रव्यांच्या रक्त चाचण्या देखील विश्वसनीय नसल्यामुळे, रोगाचे निदान करण्यात आणखी अटकाव येतो. रुग्णाच्या रक्तातील प्रतिद्रव्ये दाखवतात की शरीराच्या प्रतिबंधक संस्थेने आक्रमकांचा शोध लावला आहे पण ते आक्रमक लाईम रोगाचे जिवाणू आहेत हे काही चाचण्या सांगू शकत नाहीत. यास्तव, एखाद्या रुग्णाला लाईम रोग असल्याचे चाचणीत दिसून येईल पण खरे पाहता, त्याची लक्षणे इतर जिवाणूंच्या संसर्गांमुळे निर्माण होतात. म्हणून, संयुक्त संस्थांनातील राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच), डॉक्टरांना त्यांचे निदान, त्या व्यक्तीला गोचीड चावल्याचे आठवते का यावर व रुग्णाच्या लक्षणांवर आधारावे आणि ती लक्षणे ज्यामुळे निर्माण झाली असतील त्या इतर रोगांना वगळावे असा सल्ला देते.
उपचार व प्रतिबंध
वेळेच्या आत निदान केल्यास, बहुतांश रुग्णांना सूक्ष्मजंतू नाशक औषधे देऊन यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार केला जाऊ शकतो. उपचार जितक्या लवकर सुरू होईल तितक्याच लवकर व पूर्णपणे एखादी व्यक्ती बरी होईल. उपचार झाल्यानंतर, काही महिन्यांपर्यंत थकवा आणि दुखणे जाणवेल पण ही लक्षणे आणखी जंतूनाशक औषधे न घेताच कमी होतील. तथापि, एनआयएच असा इशारा देते की, “लाईम रोगाचा एक झटका येऊन गेल्यावर तो आजार भवितव्यात टाळला जाईल याची हमी मिळत नाही.”
ते अस्वस्थ भवितव्य कधी बदलेल का? संयुक्त संस्थांनांतील येल वैद्यशाळेतील नवीन प्रकाशनाने असे सांगितले की, लाईम रोगाचा प्रतिबंध करणारी प्रयोग लस संशोधकांनी तयार केली आहे. ही “दुहेरी कार्य” करणारी लस मानवी प्रतिबंधक संस्थेला, आक्रमक लाईम जिवाणूंवर हल्ला करून त्यांना नष्ट करणारी प्रतिद्रव्ये उत्पन्न करण्यास उद्दीपित करते. त्याचवेळी, लस टोचलेल्या व्यक्तीला चावणाऱ्या गोचीडांमधील जिवाणूंचाही ती नाश करते.
सन १९७५ मध्ये लाईम रोगाचा शोध लावलेले संशोधक, डॉ. स्टीवन इ. मालेवीस्टे म्हणतात, “या लशीची चाचणी केल्यामुळे, लाईम रोगाच्या संभाव्य गंभीर परिणामांपासून लोकांचे संरक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नात एक मोठी प्रगती झाली आहे.” द न्यूयॉर्क टाईम्स असे परीक्षण करते, की रोगाच्या भीतीमुळे ज्या भागात लोक घराच्या आतच राहतात तेथे, “या लशीमुळे लोक पुन्हा रानातून ये-जा करू शकतात.”
तथापि, या दरम्यान, तुम्ही स्वतःहून काही प्रतिबंधक पावले उचलू शकता. एनआयएच अशी शिफारस करते: गोचीड असणाऱ्या भागातून चालत असताना, वाटेच्या मधोमध चाला. लांब विजारी, लांब बाह्यांचा शर्ट आणि टोपी घाला. विजारीची टोके मोज्यांमध्ये घाला व असे बूट घाला ज्यामुळे तुमचे पाय मुळीच उघडे राहणार नाहीत. फिकट रंगाचे कपडे घातल्यावर गोचीडे लगेच दिसून येतात. कपड्याला व त्वचेला कीटक प्रतिसारके लावणे प्रभावकारी आहे पण त्यांच्यामुळे विशेषतः मुलांवर गंभीर दुष्परिणाम होण्याचा संभव असतो. “लाईम रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रात गर्भवती स्त्रियांनी विशेषतः काळजी घेतली पाहिजे” असा इशारा एनआयएच देते, “कारण त्याचा संसर्ग, न जन्मलेल्या बाळालाही होऊ शकतो” व त्यामुळे गर्भपात किंवा मृतप्रसव होण्याची शक्यता वाढू शकते.
एकदा घरात आल्यावर, स्वतःवर व तुमच्या मुलांवर, विशेषतः शरीराच्या केसाळ भागात गोचीडे आहेत काय ते तपासा. हे काळजीपूर्वकतेने करा कारण अपुरी वाढ झालेले गोचीडे या वाक्याच्या शेवटी दिसणाऱ्या पूर्ण विरामाएवढे असतात व तुम्ही त्यास सहजपणे धुळीचा कण समजू शकाल. तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास, ते घरात येण्याआधी त्यांच्या अंगावर पहा—त्यांना देखील लाईम रोग होऊ शकतो.
तुम्ही गोचीड कसा काढाल? बोटांनी नव्हे तर लहान बोथट चिमट्याने काढा. गोचीड्याच्या डोक्याजवळ त्याने आपली पकड सोडेपर्यंत अलगद तरीही घट्टपणे धरा, पण त्याचे शरीर चिरडू नका. मग जंतूनाशक औषधाने ती जागा चांगली पुसून काढा. डॉ. गॅरी वर्मझर, हे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकन तज्ज्ञ म्हणतात की, २४ तासांच्या आत गोचीड काढल्याने तुम्हाला लाईम रोगाचा संसर्ग होणार नाही.
हे खरे की, अतिशय प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्येही, अधू करणारा लाईम रोग होण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीही, हे साधे प्रतिबंधक उपाय पाळल्याने ही थोडीफार शक्यता अधिकच कमी होईल. या खबरदारींसाठी घेतलेल्या त्रासाने त्याचे चीज होते का? कोणत्याही लाईम रोगाच्या रुग्णाला जाऊन याबद्दल विचारा.
[२१ पानांवरील चौकट]
लाईम रोगाची लक्षणे
सुरवातीचा संसर्ग:
○ पुरळ उठणे
○ स्नायू व सांधे दुखी
○ डोकेदुखी
○ मान आखडणे
○ विलक्षण थकवा
○ ताप
○ चेहऱ्याचा पक्षघात
○ मेंदूज्वर
○ सांधेदुखी व सूज येण्याच्या अल्प घटना
असामान्य:
○ डोळ्यांची आग
○ चक्कर येणे
○ दम लागणे
नंतरचा संसर्ग
○ सांधेदुखी, अंतरित किंवा जुनाट
असामान्य:
○ स्मरणशक्ती गमावणे
○ मन एकाग्र करण्यात अडचण
○ मनःस्थितीत किंवा झोपण्याच्या सवयींमध्ये बदल
संसर्गाच्या वेळी यातील एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणे विविध समयी दिसून येतील.—लाईम रोग—वस्तुस्थिती, आव्हान (इंग्रजी), आरोग्याच्या राष्ट्रीय संस्थेद्वारे प्रकाशित.
[२२ पानांवरील चित्र]
रानामध्ये फेरफटका मारल्याने तुम्हाला धोका संभवू शकतो
[२३ पानांवरील चित्र]
गोचीड (अतिशय मोठा करून दाखवलेला)
[चित्राचे श्रेय]
Yale School of Medicine
[२३ पानांवरील चित्र]
गोचीड (सामान्य आकाराचा)