वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. २६-२८
  • मी का शिकू शकत नाही?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी का शिकू शकत नाही?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तोंड देण्याचे आव्हान
  • लक्ष एकाग्र करण्यास शिका
  • चुळबुळ कमी करणे
  • तुमचा आत्मसन्मान कायम राखा
  • अचूक माहितीचा शोध
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?
    सावध राहा!—२००५
  • अध्ययन असमर्थतेशी झुंजणे
    सावध राहा!—१९९७
  • आपल्या विश्‍वासाविषयी निःसंकोचपणे बोलणारे तरुण
    सावध राहा!—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. २६-२८

तरुण लोक विचारतात . . .

मी का शिकू शकत नाही?

जेस्सिका म्हणते, “घरी जाऊन आईबाबांना तोंड देण्यास माझे मन धजत नव्हते. मी पुन्हा एकदा अनेक विषयांत नापास झाले होते.”a जेस्सिका १५ वर्षांची हुशार व सुंदर मुलगी आहे. परंतु, इतर अनेक युवकांसारखेच तिलादेखील चांगले गुण मिळवणे ही एक कठीण समस्या वाटते.

अनेकवेळा शिक्षणाबद्दल किंवा आपल्या शिक्षकांबद्दल असलेली बेपर्वा मनोवृत्ती, शाळेतील असमाधानकारक कामगिरीला कारणीभूत ठरते. परंतु जेस्सिकाच्या बाबतीत हे खरे नाही. तिची समस्या केवळ अशी आहे की तिला अमूर्त कल्पना ग्रहण करणे फारच कठीण जाते. यामुळे साहजिकच तिला गणितात यश प्राप्त करणे कठीण झाले. शिवाय नीट वाचता येत नसल्यामुळे ती इतर विषयांतही चांगली कामगिरी करू शकली नाही.

दुसरीकडे पाहता मारिया, हिला शब्दांचे स्पेलिंग नीट लिहिता येत नाही. ती ख्रिस्ती सभांमध्ये घेतलेल्या नोंदी नेहमी लपवते कारण अनेक शब्दांचे स्पेलिंग चुकीचे लिहिलेले असल्यामुळे तिला लाज वाटते. तथापि, जेस्सिका किंवा मारिया या दोघीही मुळात निर्बुद्ध नाहीत. जेस्सिका तर लोकांसोबत दळणवळण करण्यात इतकी तरबेज आहे, की तिच्या शाळकरी सोबत्यांमध्ये वाद निर्माण होतात तेव्हा मध्यस्थी करण्यास किंवा समस्या सोडवण्यास तिला शाळेद्वारे नियुक्‍त करण्यात येते. मारियाबद्दल बोलायचे झाल्यास, ती आपल्या वर्गातील १० टक्के उत्कृष्ट विद्यार्थ्यांपैकी एक आहे.

समस्या: जेस्सिका व मारिया यांना शिकण्यासंबंधी विकार आहेत. तज्ज्ञांच्या मते एकूण लहान मुलांपैकी ३ ते १० टक्के मुलांना अशाप्रकारच्या शिकण्यासंबंधी समस्या असू शकतात. नुकतीच विशीत पदार्पण केलेली तानिया, (एडीएचडी)b (अटेंशन डेफिसिट हायपरॅक्टिविटी डिसॉर्डर) म्हणजेच कमी एकाग्रता व अतिक्रियाशीलता विकार असे म्हणण्यात आलेल्या विकाराने ग्रस्त आहे. ती म्हणते: “लक्ष एकाग्र करणे व स्वस्थ बसणेही कठीण असल्यामुळे मला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे, वैयक्‍तिक अभ्यास करणे व प्रार्थना करणे या साऱ्‍या गोष्टी एक समस्या बनतात. माझ्या सेवेवरही याचा परिणाम होतो कारण मी नकळत एका विषयावरून दुसऱ्‍या विषयावर जाते आणि या विषयांतराच्या वेगासोबत राहणे कोणालाही जमत नाही.”

या विकारासोबत अतिक्रियाशीलता आढळत नाही अशा वेळेस त्यास एडीडी (अटेंशन डेफिसिट डिसॉर्डर) म्हणजेच कमी एकाग्रता विकार असे म्हणतात. हा विकार असलेल्या लोकांना सहसा दिवास्वप्न पाहणारे म्हणतात. एडीडी असणाऱ्‍यांविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रूस रोझमन म्हणाले: “ते ४५ मिनिटे एखादे पुस्तक समोर घेऊन बसतात, पण व्यर्थ.” काही कारणास्तव त्याना लक्ष एकाग्र करणे फार कठीण जाते.

वैद्यकीय संशोधकांना, अलीकडेच या समस्येचे कारण समजू लागले आहे अशी खात्री वाटते. तथापि, अद्याप पुष्कळ काही अज्ञात आहे. तसेच, शिकण्यात अडथळा आणणारे वेगवेगळे विकार व अक्षमता यांमधील फरक दाखविणाऱ्‍या रेषा नेहमीच स्पष्ट नसतात. समस्या ही वाचन, स्मरण, एकाग्रता, किंवा अतिक्रियाशीलता यांपैकी कशासोबतही संबंधित असू शकते. या आधारावर तिचे नेमके कारण व तिला दिलेले नाव काहीही असले तरीसुद्धा—हा विकार एखाद्याच्या शिक्षणात अडथळा आणू शकतो व अतिशय यातनामय असू शकतो. तुम्ही शिकण्याच्या अक्षमतेने ग्रस्त असल्यास, तुम्हाला या समस्येस कसे तोंड देता येईल?

तोंड देण्याचे आव्हान

सुरवातीला उल्लेखिलेल्या जेस्सिकाचे उदाहरण घ्या. आपल्या वाचनाच्या अक्षमतेवर मात करण्यास दृढसंकल्पी असलेली जेस्सिका निरनिराळी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करीत राहिली. कलाटणी देणारा क्षण तेव्हा आला जेव्हा तिला तिचे लक्ष एकाग्र करणारे एक कवितेचे पुस्तक सापडले. तिने तशाचप्रकारचे आणखीन एक पुस्तक मिळविले आणि ते देखील तिने आवडीने वाचले. नंतर तिला अनेक गोष्टींची पुस्तके वाचण्याचा छंद लागला व कालांतराने वाचनाची समस्या पूर्वीसारखी कठीण राहिली नाही. यातून शिकण्यासारखा धडा असा की चिकाटीचे फळ समाधानकारक असते. अथक प्रयत्न केल्यास तुम्ही देखील शिकण्याच्या अक्षमतेवर मात करू शकता किंवा त्या दिशेने लक्षणीय पावले उचलू शकता.—पडताळा गलतीकर ६:९.

अल्प कालीन स्मरणाच्या समस्येला तोंड देण्याविषयी काय? ही समस्या सोडविण्यासाठी एक महत्त्वाची गुरुकिल्ली एका म्हणीत आढळते, ती म्हण अशी आहे: “पुनरुच्चार हा धारणाशक्‍तीचा जनक आहे.” ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टींचा तोंडी पुनरुच्चार केल्यामुळे त्या गोष्टी आठवणीत ठेवण्यास मदत झाल्याचे निक्कीला कळून आले. तेव्हा, असे करून पाहा. यामुळे कदाचित तुम्हालाही मदत होईल. विशेष म्हणजे बायबल काळातील लोक, एकट्यानेच वाचत असताना देखील मौखिकरित्या उच्चार करून वाचन करीत असत. या कारणामुळेच, यहोवाने बायबल लेखक यहोशवा यास आज्ञा दिली: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे.” (यहोशवा १:८; स्तोत्र १:२) मौखिकरित्या उच्चार करून वाचणे एवढे महत्त्वपूर्ण का होते बरे? कारण असे करताना, श्रवण व दृष्टी ही दोन्ही इंद्रिये अंतर्भूत होत असत—यामुळे वाचलेला मजकूर वाचकाच्या मनात अधिक खोलवर रुजे.

जेस्सिकासाठी गणित शिकणे देखील एक कठीण समस्या होती. तथापि, तिने गणिताचे सूत्र पुन्हा पुन्हा पाठ करण्याचा प्रयत्न केला—कधी कधी तर एकाच सूत्रासाठी ती अर्धा तास घालवत असे. तिच्या प्रयत्नांना यश आले. यास्तव आठवणीत ठेवावयाच्या गोष्टी पुन्हा, पुन्हा, पुन्हा म्हणा! वर्गात ऐकताना किंवा वाचताना स्पष्टीकरणाच्या नोंदी घेण्यासाठी कागद व पेन्सिल जवळच ठेवण्याची सवय चांगली आहे.

शिकण्यासाठी स्वतःस वाहून घेणे अत्यावश्‍यक आहे. शाळेनंतर काही वेळ थांबून आपल्या शिक्षकांशी बोलण्याची सवय ठेवा. त्यांच्याशी परिचय वाढवा. तुम्हाला शिकण्याची समस्या आहे पण तिच्यावर मात करण्याचा तुमचा निर्धार आहे हे त्यांना सांगा. अधिकांश शिक्षक तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. यास्तव, त्यांच्या मदतीचा फायदा करून घ्या. जेस्सिकाने असे केले व एका सहानुभूतीशील शिक्षकाकडून हवा असलेला आधार मिळवला.

लक्ष एकाग्र करण्यास शिका

स्वतःसाठी एक उद्दिष्ट व बक्षिसाची पद्धत निश्‍चित केल्यामुळेही मदत होते. टी. व्ही. किंवा तुमचे आवडते संगीत सुरू करण्याआधी एखादे विशिष्ट उद्दिष्ट, उदाहरणार्थ एखादा गृहपाठ उरकण्याचे निश्‍चित केल्याने तुम्हाला लक्ष एकाग्र करण्याचे स्फुरण मिळू शकते. तुम्ही निश्‍चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्याजोगे आहे याची मात्र खात्री करा.—पडताळा फिलिप्पैकर ४:५.

कधी कधी तुमच्या परिस्थितींत उभारणीकारक परिवर्तन घडवून आणल्यास ते फायदेकारक ठरू शकते. अधिक लक्ष एकाग्र करता यावे म्हणून निक्कीने, वर्गात पहिल्या ओळींत शिक्षकांजवळ बसण्याचे ठरवले. जेस्सिकाला एका हुशार मैत्रिणीसोबत बसून अभ्यास केल्याने फायदा झाला. तुम्ही केवळ तुमची खोली आरामदायक व सुव्यवस्थित केली तरीही ते तुम्हाला उपयोगी पडेल.

चुळबुळ कमी करणे

तुम्ही अतिक्रियाशील असल्यास, तुम्हाला शिकणे एक कष्टमय अनुभव असल्याचे जाणवेल. तथापि, काही तज्ज्ञाच्या मते शारीरिक व्यायामाद्वारे अतिक्रियाशीलतेला वाट करून देता येऊ शकते. यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट नुसार, “अधिकाधिक पुरावे खात्री पटवून देतात की, व्यायामशास्त्राच्या अनुकूलनाद्वारे घडून येणाऱ्‍या जीवशास्त्रीय परिवर्तनांमुळे, नवीन माहिती आत्मसात करण्याची व जुनी माहिती स्मरणात ठेवण्याची प्रत्येक व्यक्‍तीची क्षमता सुधारते.” यास्तव, संतुलित प्रमाणात केलेले व्यायाम—पोहणे, धावणे, चेंडू खेळणे, सायकल चालवणे, स्केटिंग करणे इ.—शरिरासाठी तसेच मनासाठी देखील लाभदायक ठरू शकतात.—१ तीमथ्य ४:८.

शिकण्याच्या विकारांवर सर्वसाधारणपणे औषधोपचार सुचविला जातो. असा दावा केला जातो की एडीएचडी ने ग्रस्त असलेल्यांना उत्तेजक औषधे देण्यात आली तेव्हा त्यांतील सुमारे ७० टक्के मुलांनी या औषधांना प्रतिसाद दिला आहे. तुमच्या समस्येची तीव्रता, संभाव्य दुष्परिणाम व इतर बाबी लक्षात घेतल्यावर औषधोपचार घ्यावा अथवा घेऊ नये हे ठरवणे तुमच्यावर व तुमच्या पालकांवर अवलंबून आहे.

तुमचा आत्मसन्मान कायम राखा

शिकण्यात अडचण असणे यास एक भावनात्मक समस्या तर म्हणता येणार नाही, तथापि, यामुळे भावनात्मक परिणाम घडू शकतात. पालक व शिक्षकांकडून निरंतर नापसंती व टीका, शाळेत असमाधानकारक अथवा मध्यम प्रतीचे निकाल तसेच घनिष्ट मित्रमैत्रिणींचा अभाव, या सर्व बाबी एकत्र आल्यास क्षतिग्रस्त आत्मसन्मान निर्माण होऊ शकतो. काही युवक, ही भावना लपवण्यासाठी चिडखोर व भीती दाखवण्याचा पवित्रा घेतात.

परंतु, शिकण्याच्या अडचणींमुळे तुम्ही आपला स्वाभिमान गमावण्याचे काही कारण नाही.c शिकण्यासंबंधी अडचणी असलेल्या युवकांसोबत कार्य करणारे एक व्यवसायिक म्हणतात, “‘मी मठ्ठ आहे व मी काहीही नीट करू शकत नाही’ . . . या मनोभावाच्या ठिकाणी ‘मी एका अडचणीवर मात करीत आहे व माझ्या कल्पनेपेक्षा मी कितीतरी अधिक करू शकतो’ हा मनोभाव आणण्याचे माझे ध्येय आहे.”

तुम्ही इतरांच्या मनोवृत्ती बदलू शकत नसलात तरीसुद्धा, तुम्ही स्वतःच्या मनोवृत्तीवर निश्‍चितच प्रभाव पाडू शकता. जेस्सिकाने असेच केले. ती म्हणते: “शाळेतील मुले काय म्हणतात व ते मला जी नावे ठेवतात, यावरून मी स्वतःचे मूल्यमापन करीत होते तेव्हा मला शाळेतून पळून जावेसे वाटत असे. पण आता मात्र मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्यापरीने उत्तम करीत राहण्याचा प्रयत्न करते. हे कठीण आहे व याची मला स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागते, पण हे परिणामकारक आहे.”

जेस्सिकाला आणखी एका सत्याला सामोरे जावे लागले. तिचा थोरला भाऊ अत्यंत हुशार होता. जेस्सिका म्हणते, “मी जोपर्यंत त्याच्यासोबत आपली तुलना करण्याचे थांबवले नाही तोपर्यंत या गोष्टीमुळे माझा स्वाभिमान नष्ट होत राहिला.” यास्तव, तुमच्या भावंडांसोबत स्वतःची तुलना करू नका.—पडताळा गलतीकर ६:४.

तसेच एखाद्या विश्‍वासार्ह मित्र किंवा मैत्रिणीजवळ मन मोकळे केल्यास, सर्व गोष्टींना योग्य दृष्टिकोनातून पाहण्यास तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असताना एक खरा मित्र किंवा मैत्रिण निष्ठावानपणे सदैव तुमच्या पाठीशी राहील. (नीतिसूत्रे १७:१७) उलटपक्षी, नावापुरता मित्र किंवा मैत्रिण तुमचा अपमान करील किंवा तुम्हाला स्वतःबद्दल एक अयोग्य व फाजीलपणे उंचावलेला दृष्टिकोन बाळगण्यास प्रवृत्त करील. यास्तव, आपले मित्रमैत्रिणी निवडताना चोखंदळ असा.

तुम्हाला शिकण्याची अडचण असल्यास, कदाचित इतर युवकांच्या तुलनेत तुमची अधिक वेळा कान उघाडणी करण्यात येत असेल. परंतु, यामुळे तुम्ही स्वतःबद्दल एक नकारात्मक दृष्टिकोन बाळगता कामा नये. शिस्तीकडे, जणू ती अमूल्य आहे याप्रकारे एका ईश्‍वरी दृष्टीने पाहा. लक्षात असू द्या, तुमच्या पालकांनी लावलेली शिस्त शाबीत करते की ते तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्यासाठी उत्कृष्ट तेच इच्छितात.—नीतिसूत्रे १:८, ९; ३:११, १२; इब्री लोकांस १२:५-९.

नाही, तुमच्या शिकण्याच्या अडचणींमुळे निरुत्साहित होण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही त्यांच्यावर उपाय करून एक सफल जीवन जगू शकता. परंतु, आशा बाळगण्याचे आणखी एक कारण आहे. देवाने धार्मिकतेचे एक नवीन जग आणण्याचे अभिवचन दिले आहे जे ज्ञानाने भरपूर असेल व ज्यात शरीर व मनाचे सर्व विकार बरे करण्यात येतील. (यशया ११:९; प्रकटीकरण २१:१-४) यास्तव, यहोवा देव व त्याच्या उद्देशांबद्दल अधिक ज्ञान घेण्याचा व त्या ज्ञानानुरूप वागण्याचा पक्का निर्धार करा.—योहान १७:३.

[तळटीपा]

a काही नावे बदलण्यात आली आहेत.

b सावध राहा! नियतकालिकातील, नोव्हेंबर २२, १९९४ या अंकात, “कठीण मुलांना समजून घेणे” ही लेखांची श्रृंखला तसेच मे ८, १९८३ या अंकातील, “तुमच्या मुलास शिकण्याच्या समस्या आहेत का?” हा लेख देखील पाहा.

c सावध राहा! नियतकालिकाच्या एप्रिल ८, १९८३ (इंग्रजी) अंकातील, “तरुण लोक विचारतात . . . मी आपला आत्मसन्मान कसा वाढवू शकतो?” हा लेख पाहा.

[२८ पानांवरील चित्रं]

शिकण्यासाठी स्वतःस वाहून घ्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा