वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ७/८ पृ. १५-२०
  • मला तडीपार करण्यात आले होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला तडीपार करण्यात आले होते
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मी तडीपार व्यक्‍ती का झालो
  • तडीपार कार्यहालचाल
  • तुरुंगवास व शिक्षा
  • बायबल सत्य शिकणे
  • धर्मोपदेशकाकडून विरोध
  • तुरुंगात राज्य सभागृह
  • तुरुंगात बाप्तिस्मा
  • तुरुंगात शिष्य बनवणे
  • अत्यानंदाचे क्षण
  • न्यायाची एकमेव आशा
  • प्रतिफळदायी जीवन
  • “यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • प्रत्येक प्रसंगी राज्याचे बीज पेरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
सावध राहा!—१९९६
g96 ७/८ पृ. १५-२०

मला तडीपार करण्यात आले होते

सिसिलीमधील, तो मे १, १९४७ चा दिवस होता. सुमारे ३,००० लोक, ज्यामध्ये लेकुरवाळ्या स्त्रिया देखील होत्या, वार्षिक कामगार दिनाच्या समारंभासाठी एका पर्वताच्या खिंडीजवळ एकत्रित झाले होते. जवळपासच्या टेकड्यांमध्ये लपलेल्या धोक्यासंबंधी ते अजाण होते. त्यानंतर, जी दुर्घटना घडली त्याविषयी तुम्ही कदाचित वाचले असेल किंवा त्यावर आधारित चित्रपटही पाहिले असतील. त्या कत्तलीला पॉर्टेलॉ डेलॉ झीनेस्ट्रॉचे हत्याकांड असे संबोधण्यात आले आहे ज्यामध्ये ११ लोक ठार व ५६ जण जखमी झाले.

त्या दुर्घटनेत माझा काहीच भाग नव्हता, तरी त्यासाठी जबाबदार असलेल्या विभक्‍ततावादींच्या गटातील मी जरूर होतो. त्याचा नेता सॉलवाटोरे ज्यूलीऑनो होता ज्याच्यासोबत मी मॉन्टेलॅप्रेच्या खेड्यात लहानाचा मोठा झालो होतो. तो माझ्यापेक्षा केवळ एका वर्षानेच मोठा होता. सन १९४२ मध्ये, मी १९ वर्षांचा असताना, मला दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान लष्करात सेवा करण्यास बोलावण्यात आले. त्या वर्षाच्या सुरवातीला मी वीटॉ मोटीझी हिच्या प्रेमात पडलो आणि तिच्याशी विवाह केला होता. कालांतराने आम्हाला तीन मुलगे झाले; पहिल्याचा जन्म १९४३ साली झाला.

मी तडीपार व्यक्‍ती का झालो

सन १९४५ मध्ये, दुसरे महायुद्ध संपल्यावर, माझी सिसिलियन स्वतंत्रतेच्या स्वयंसेवक लष्कराच्या (इवीआयएस) पश्‍चिम तुकडीत भरती झाली. हा विभक्‍ततावादी राजकीय पक्षाचा मदतनीस सैन्य दल होता जो सिसिलीच्या स्वातंत्र्याची चळवळ (एमआयएस) या नावाने प्रसिद्ध होता. फरारी असणाऱ्‍या सॉलवाटोरे ज्यूलीऑनो यास इवीस व मीसच्या उच्च पुढाऱ्‍यांनी आमच्या तुकडीवर नेमले होते.

आमच्या सिसिली बेटाबद्दल व लोकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे आमच्यात ऐक्य होते. तसेच, आमच्यावर होणाऱ्‍या अत्याचारांबद्दल आम्ही क्रोधिष्ट होतो. यास्तव, आम्ही ज्यूलिऑनो गटाच्या चळवळीत सामील झालो ज्याचा सिसिलीला अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानांतील ४९ वे राज्य म्हणून समाविष्ट करण्याचा हेतू होता. हे शक्य होते असा विश्‍वास बाळगण्याचे काही कारण होते का? अर्थातच, कारण मीसच्या अधिकाऱ्‍यांनी आम्हाला हमी दिली होती की, वॉशिंग्टन डी.सी. सोबत त्यांची घनिष्ट मैत्री होती व संयुक्‍त संस्थानांचे राष्ट्रपती हॅरी एस. ट्रुमन असे सामिलीकरण होण्याच्या बाजूने होते.

तडीपार कार्यहालचाल

माझ्या गटाचे मुख्य काम प्रमुख व्यक्‍तींचे अपहरण करून त्यांना खंडणीसाठी ताब्यात ठेवणे हे होते. अशा तऱ्‍हेने आम्ही आवश्‍यक साठ्याची खरेदी करण्यासाठी निधी गोळा करत होतो. अपहरण केलेल्या कोणत्याही व्यक्‍तीला, ज्यांना आम्ही “पाहुणे” म्हणत होतो, हानी पोहंचवण्यात आली नव्हती. त्यांची सुटका केल्यावर, आम्हाला प्राप्त झालेल्या खंडणीच्या पैशाची भरपाई मिळवण्याकरता आम्ही त्यांना एक पावती देत असू. आम्हाला विजय मिळाल्यावर, त्या पावतीद्वारे ते त्यांचा पैसा पुन्हा मिळवू शकतात असे त्यांना सांगितले जात होते.

मी सुमारे २० अपहरणे करण्यामध्ये तसेच राष्ट्रीय लष्करी पोलीस दल असलेल्या कॉरॉबिनयेरीच्या बराकींवर सशस्त्र हल्ले करण्यात देखील सामील झालो होतो. तथापि, मला हे सांगण्यास आनंद वाटतो की मी कोणालाही ठार मारले नाही. आमच्या विभक्‍ततावादी हल्ल्यांमुळे पॉर्टेलॉ डेलॉ झीनेस्ट्रॉच्या खेड्यात ते अविचारीपणाचे कारस्थान घडले. ते ज्यूलिऑनो गटाच्या जवळजवळ पुष्कळ लोकांनी योजले होते व ते कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात केले होते.

सर्वसामान्य लोकांची हत्या—ज्यामध्ये शेजारचे व पाठिंबा देणारे लोक देखील होते—हेतूपूर्वक नव्हती, तरी ज्या लोकांनी आम्हाला पाठबळ दिले होते व आमच्यामुळे ज्यांना सुरक्षित वाटत होते त्यांना आम्ही त्यांचा घात केल्याचे वाटू लागले. तेव्हापासून ज्यूलिऑनो गटातील तडीपार व्यक्‍तींचा अथक शोध जारी राहिला. पोलिसांना काही माहिती दिल्यावर, माझ्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली. मार्च १९, १९५० साली, मी एका सापळ्यात अडकलो व मला अटक करण्यात आली. त्याच उन्हाळ्यात खुद्द ज्यूलिऑनोची हत्या करण्यात आली.

तुरुंगवास व शिक्षा

पालेर्मो तुरुंगात, मला अनिर्णीत चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आले होते तेव्हा माझी तरुण पत्नी व तीन मुले यांपासून विलग झाल्यामुळे मी दुःखी होतो. तरीही, मला उचित वाटणाऱ्‍या गोष्टीसाठी लढण्याच्या इच्छेमुळे मी पूर्णपणे निराश झालो नाही. वेळ घालवण्यासाठी मी वाचन करू लागलो. एका पुस्तकाने बायबलचे वाचन करण्याची माझी इच्छा जागृत केली. ते सिल्वीयो पेलिको या इटालियन व्यक्‍तीचे आत्मचरित्र होते ज्याला राजकीय कारणांमुळे १९ व्या शतकात तुरुंगात टाकले होते.

पेलिकोने लिहिले होते की, तुरुंगात त्याच्याजवळ एक शब्दकोश व बायबल नेहमी असायचे. माझे कुटुंब व मी रोमन कॅथलिक असूनही मी बायबलबद्दल खरे पाहता काहीच ऐकले नव्हते. म्हणून मला एक प्रत मिळावी अशी विनंती मी अधिकाऱ्‍यांजवळ केली. ते निषिद्ध असल्याचे मला सांगण्यात आले, पण मला मत्तय, मार्क, लूक व योहान यांच्या शुभवर्तमानांची एक प्रत देण्यात आली. नंतर, मला बायबलची एक पूर्ण प्रत मिळाली, जी मी अजूनही एक जपलेली आठवण म्हणून ठेवली आहे.

शेवटी, १९५१ मध्ये, रोमजवळ विटरबो येथे माझी चौकशी सुरू झाली. ती १३ महिने चालली. मला दोन वेळा जन्मठेप शिवाय ३०२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली! याचा अर्थ, जिवंत असताना मी तुरुंगातून कधीच बाहेर पडू शकणार नव्हतो.

बायबल सत्य शिकणे

पालेर्मो तुरुंगात परतल्यावर, मला अशा विभागात टाकण्यात आले जेथे आमच्या गटाचा आणखी एक सदस्य जो ज्यूलिऑनोचा चुलत भाऊ होता त्याला देखील कैद करण्यात आले होते. मला अटक करण्याच्या तीन वर्षांआधी त्याला अटक करण्यात आले होते. आधी, तुरुंगात स्वित्झर्लंडमधील एका यहोवाच्या साक्षीदाराशी त्याची भेट झाली होती ज्याने त्याला बायबलमधील अद्‌भुत अभिवचनांविषयी सांगितले होते. देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना, त्या मनुष्याला पालेर्मोमधील आणखी एका साक्षीदारासोबत अटक करण्यात आले होते. (मत्तय २४:१४) पाळकवर्गाच्या सदस्यांनी त्याला अटक करवून घेतली होती असे मला नंतर कळाले.

बेकायदेशीर कार्यहालचाली करूनही, माझा देवावर व चर्चमधील शिकवणींवर विश्‍वास होता. यास्तव, तथाकथित संतांबद्दल श्रद्धा बाळगणे अशास्त्रवचनीय होते व दहा आज्ञांमधील एक आज्ञा उपासनेत प्रतिमांचा उपयोग करण्यास मनाई करते हे कळल्यावर मला धक्काच बसला. (निर्गम २०:३, ४) मी टेहळणी बुरूज व सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकांची वर्गणी केली व ती नियतकालिके माझ्याकरता अतिशय मौल्यवान होती. मी वाचत असलेले सर्वकाही मला कळत नव्हते पण जितके अधिक वाचन मी केले, तितकीच तुरुंगातून नव्हे तर धार्मिक खोटेपणा व आध्यात्मिक अंधत्व याच्या कैदेतून सुटका करून घेण्याची गरज मला भासली.

कालांतराने, देवाला संतुष्ट करण्यासाठी जुने व्यक्‍तिमत्त्व काढून नवे—नम्र आणि ख्रिस्त येशूसारखे व्यक्‍तिमत्त्व परिधान करण्याची गरज आहे याची मला जाणीव झाली. (इफिसकर ४:२०-२४) माझ्यामध्ये हळूहळू बदल होत होता. तरीही, अगदी लगेचच मी माझ्या सह-तुरुंगवासीयांकरता काही कामे करू लागलो, व शिकत असलेल्या भव्य गोष्टींबद्दल त्यांना सांगण्याचा प्रयत्नही मी केला. अशाप्रकारे, १९५३ मध्ये माझ्याकरता एका आनंदमय समयाची सुरवात झाली. परंतु अडथळे होतेच.

धर्मोपदेशकाकडून विरोध

मी टेहळणी बुरूज व सावध राहा! यांची वर्गणी केल्याच्या सहा महिन्यांनंतर, ती येण्याची बंद झाली. मी कैद्याच्या पत्रव्यवहार नियंत्याकडे गेलो व त्यांच्या ध्यानात ही गोष्ट आणून दिली. तुरुंगाच्या धर्मोपदेशकाने ही पोचवणी थांबवण्यास सांगितले असे मला कळले.

मी धर्मोपदेशकाला भेटण्याची विनंती केली. आमच्या चर्चेत, मला बायबलची जितकी थोडीफार माहिती होती ती सर्व मी दिली, तसेच उपासनेत प्रतिमांचा उपयोग करण्याविषयी निर्गम २०:३, ४ व यशया ४४:१४-१७ सारखी शास्त्रवचने देखील दाखवली. मत्तय २३:८, ९ येथे नमूद केलेले “पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका” हे येशूचे शब्द देखील मी त्यांना वाचून दाखवले. त्यांना त्याची चीड आली, व मी अज्ञानी असल्यामुळे मला बायबलचा अर्थ समजत नाही असे त्यांनी उत्तर दिले.

मी आधीच माझे व्यक्‍तिमत्त्व बदलण्यास सुरवात केली होती हे बरे झाले—नाहीतर, मी काय केले असते हे मला ठाऊक नाही. शांत राहून, मी उत्तर दिले: “होय, हे खरे आहे; मी अज्ञानी आहे. पण निदान तुम्ही तरी शिकलेले आहात व मला बायबलचे सत्य शिकवण्यात तुम्ही काहीच केले नाही.” धर्मोपदेशकाने म्हटले, की यहोवाच्या साक्षीदारांचे साहित्य मिळवण्याकरता मला न्याय मंत्रालयाकडे कॅथलिक धर्माचा त्याग करण्यासाठी विनंती करावी लागेल. मी तत्काळ तसे केले पण माझी विनंती मान्य करण्यात आली नाही. परंतु, नंतर मी स्वतःची यहोवाचा साक्षीदार म्हणून नोंद करू शकलो व पुन्हा एकदा नियतकालिके मिळवू शकलो. पण त्याकरता मला फारच आग्रह करावा लागला.

तुरुंगात राज्य सभागृह

काही काळ, मी तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याकडे एका नोकरीसाठी विचारणा केली जेणेकरून माझ्या कुटुंबाला मी पैसे कमवून पाठवू शकत होतो. त्याने मला नोकरी दिली म्हणजे इतरांनाही त्याला नोकरी द्यावी लागेल जे की शक्य नव्हते असे तो नेहमी म्हणत असे. पण ऑगस्ट ५, १९५५ रोजी, मुख्य अधिकाऱ्‍याने मला एक आनंदाची बातमी दिली—तुरुंगात मला कारकुनाचे काम करावयाचे होते.

माझ्या कामामुळे मी तुरुंगातील मुख्य अधिकाऱ्‍याकडून सन्मान प्राप्त करू शकलो, व त्यांनी मला प्रेमळपणे एका कोठारात बायबल अभ्यासाच्या सभा भरवण्याकरता परवानगी दिली. अशाप्रकारे, १९५६ मध्ये, फेकून दिलेल्या कपाटांच्या फळ्या वापरून मी राज्य सभागृहाकरता बाक तयार केले; यहोवाचे साक्षीदार जेथे एकत्र होतात त्या ठिकाणांना तसे म्हटले जात असे. मी दर रविवारी तेथे इतर सोबत्यांबरोबर एकत्र भेटत होतो व अशाप्रकारे आमच्या बायबल चर्चांकरता आम्ही २५ जणांच्या उपस्थितीचा उच्चांक गाठला.

काही काळानंतर, धर्मोपदेशकाला मी भरवत असलेल्या सभांबद्दल कळाले, व तो फार क्रोधिष्ट झाला. परिणामस्वरूप, १९५७ च्या उन्हाळ्यात, माझे स्थानांतर पालेर्मो येथून एल्बा या लहान बेटावर, पोर्टो ऑट्‌स्युरोच्या सुधारणागृहात करण्यात आले. हे ठिकाण अतिशय कुप्रसिद्ध होते.

तुरुंगात बाप्तिस्मा

मी तेथे पोहंचल्यावर, मला १८ दिवसांकरता अंधार कोठडीत टाकण्यात आले. तेथे मला बायबल देखील सोबत ठेवण्यास अनुमती दिली नव्हती. नंतर, मी पुन्हा एकदा न्याय मंत्रालयाकडे मला कॅथलिक धर्माचा त्याग करण्यासाठी अनुमती देण्यात यावी अशी लेखी विनंती केली. परंतु, या वेळी मी रोममधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराची मदत मागितली. दहा महिन्यांनंतर, दीर्घ काळापासून वाट पाहत असलेले उत्तर मिळाले. मंत्रालयाने मला धर्म परिवर्तनाची मान्यता दिली! याचा अर्थ, मला केवळ बायबल, नियतकालिके व इतर बायबल साहित्यच मिळणार नव्हते तर मला यहोवाचा साक्षीदार असलेल्या सेवकाकडून नियमितरित्या भेटी देखील दिल्या जाणार होत्या.

त्या काळी, इटलीमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराचे पर्यवेक्षक ज्यूझप्पे रोमानो यांनी मला प्रथम भेट दिली तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तुरुंग अधिकाऱ्‍यांच्या अनुमतीने, अखेरीस यहोवाला केलेले माझे समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याने चिन्हांकित करण्यासाठी योजना करण्यात आल्या. ऑक्टोबर ४, १९५८ साली, तुरुंगाचे मुख्य अधिकारी, शिस्त लावणारे मुख्य कमांडर व इतर अधिकाऱ्‍यांच्या उपस्थितीत, बंधू रोमानो यांनी तुरुंगातील बागेत पाणी घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या मोठ्या टाकीचा उपयोग करून आणखी एका सोबत्यासोबत मलाही बाप्तिस्मा दिला.

इतर सोबत्यांबरोबर मी नेहमीच टेहळणी बुरूज अभ्यास करू शकत असलो तरी ख्रिस्ताच्या मृत्यूचा वार्षिक स्मारक विधी मला एकट्यालाच पाळावा लागत असे कारण तो सूर्यास्तानंतर साजरा केला जातो. मी डोळे बंद करून प्रार्थना करीत होतो व मी सह-साक्षीदारांसमवेत एकत्रित झालो आहे अशी कल्पना करीत असे.

तुरुंगात शिष्य बनवणे

सन १९६८ मध्ये, पेसारोच्या राज्यातील फोसोम्ब्रोने तुरुंगात माझे स्थानांतर करण्यात आले. तेथे बायबल सत्याविषयी इतरांशी बोलल्याने मला चांगले प्रतिफळ लाभले. मी तेथील रुग्णालयात काम करत असल्यामुळे, मला साक्ष देण्याची संधी मिळवणे सोपे होते. विशेषतः, इम्मानुएल ऑल्टॉविलॉ नामक सोबत्याची प्रगती पाहणे माझ्याकरता अतिशय आनंददायक होते. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर, प्रेषितांची कृत्ये १९:१९ मधील सल्ला लागू करण्याची आणि जादूटोनाच्या कलेशी संबंधित असलेले पुस्तक नष्ट करण्याची गरज त्याने ओळखली. नंतर, इम्मानुएल यहोवाचा एक साक्षीदार बनला.

पुढील वर्षी, नेपल्सजवळच्या उपसागराच्या पलीकडे असलेल्या प्रोसिडॉच्या बेटावरील तुरुंगात माझे स्थानांतर करण्यात आले. चांगल्या वर्तनामुळे मला पुन्हा एकदा रुग्णालयात नेमण्यात आले. तेथे मला मॉर्यो मोरेनो भेटला, तो तुरुंगवासी असून एक कट्टर कॅथलिक होता. तो देखील जबाबदारीच्या हुद्द्‌यावर असून तो जमाखर्चाच्या विभागात काम करत होता.

एके सायंकाळी मॉर्योने वाचनाकरता काही मागितले व मी त्याला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक दिले.a तो काय वाचत होता त्याचे महत्त्व त्याला तत्काळ समजले व आम्ही बायबल अभ्यास सुरू केला. दररोज सिगारेटीची तीन पाकीटे ओढण्याचे मॉर्योने थांबवले. त्याशिवाय, तुरुंगात होणाऱ्‍या जमाखर्चाच्या कार्यातही प्रामाणिकपणे काम करावे हे त्याने ओळखले. त्याने आपल्या वचनबद्ध वधूला साक्ष देण्यास सुरवात केली व तिनेही बायबलच्या शिकवणींचा स्वीकार केला. त्यानंतर, लवकरच त्यांचा तुरुंगातच विवाह झाला. सन १९७५ मध्ये नेपल्स येथील एका अधिवेशनात मॉर्योच्या बायकोचा बाप्तिस्मा झाला. तिच्या पतीचा त्याच दिवशी तुरुंगात बाप्तिस्मा झाल्याचे ऐकल्यावर तिला अतिशय आनंद झाला!

प्रोसिडॉला येऊन भेट देणाऱ्‍या साक्षीदारांशी साप्ताहिक चर्चा करण्यास मला अनुमती देण्यात आली होती. पाहुण्यांकरता असलेल्या खोलीत त्यांच्यासोबत मिळून भोजन करण्यासाठी मला स्वयंपाक करण्यासही परवानगी दिली होती. एके वेळी दहा जण येऊ शकत होते. यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवासी पर्यवेक्षक येत तेव्हा मी त्यांच्या स्लाईड सादरता दाखवण्याकरता परवानगी काढत असे. एकदा १४ साक्षीदार भेटायला आलेले असताना मला टेहळणी बुरूज अभ्यास घेण्याची सुसंधी प्राप्त झाली होती. अधिकारी माझ्यावर पूर्ण भरवसा ठेवत असल्याचे दिसत होते. नेमलेल्या दिवशी सायंकाळच्या वेळी मी प्रत्येक कोठडीत जाऊन प्रचार करीत असे.

सन १९७४ मध्ये, विविध तुरुंगांमध्ये २४ वर्षे घालवल्यावर, माझी भेट एका न्यायाधीशासोबत झाली ज्यांनी मला माफीसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले. तसे करणे उचित नसल्याचे मला वाटले कारण त्यामुळे पॉर्टेलॉ डेलॉ झीनेस्ट्रॉच्या हत्याकांडात सामील असल्याचे मला कबूल करावे लागले असते व माझा त्यात कोणताच भाग नव्हता.

अत्यानंदाचे क्षण

सन १९७५ मध्ये, नवीन कायद्यानुसार तुरुंगातून काही वेळ बाहेर जाण्याची परवानगी मिळू लागली. अशाप्रकारे, नेपल्सच्या शहरात, यहोवाच्या साक्षीदारांच्या पहिल्या अधिवेशनास उपस्थित राहण्यास मला संधी मिळाली. त्या पाच अविस्मरणीय दिवसांचा मी पुरेपूर आनंद लुटला ज्यादरम्यान, आधी कधीही पाहिले नव्हते अशा पुष्कळ ख्रिस्ती बंधू व बहिणींना मी भेटू शकलो.

इतक्या वर्षांनी माझ्या कुटुंबाला भेटल्यावर मला सर्वात जास्त आनंद झाला. माझी पत्नी वीटॉ माझ्याशी विश्‍वासू राहिली होती व माझे मुलगे आता त्यांच्या २० शीत व ३० शीत असलेले तरुण पुरूष होते.

पुढील वर्षी—ज्या दरम्यान मला अनेकदा तुरुंगातून बाहेर जाता आले—त्या वर्षी मी तुरुंगातून सुटका मिळवण्यासाठी अर्ज करावा असा मला सल्ला देण्यात आला. माझ्याबद्दल परिवीक्षा दंडाधिकारींच्या अहवालात, माझ्या अर्जाचा स्वीकार करण्यात यावा अशी शिफारस त्यांनी केली होती. त्यांनी लिहिले: “हे ठामपणे म्हणता येऊ शकते की—ज्यूलिऑनोच्या हुकूमांना पाळणाऱ्‍या रक्‍तपिपासू युवकाशी तुलना केल्यास, आज मॉन्‍निनो एक वेगळाच मनुष्य आहे; तो पूर्णतः बदलला आहे.”

कालांतराने, प्रोसिडॉच्या तुरुंग अधिकाऱ्‍यांनी माझ्याकरता माफीची मागणी केली. अखेरीस, ही माफी मान्य करण्यात आली आणि डिसेंबर २८, १९७८ साली माझी तुरुंगातून सुटका झाली. २८ पेक्षा अधिक वर्षांनंतर बंधमुक्‍त असण्याचा किती मोठा आनंद!

न्यायाची एकमेव आशा

सॉलवाटोरे ज्यूलीऑनोच्या आदेशांनुसार अपहरणकर्ता या नात्याने, माझ्या कुटुंबाला व माझ्या देशवासीयांना खरे स्वातंत्र्य ज्यामुळे मिळेल अशी माझी धारणा होती त्याकरता मी लढलो. तथापि, बायबलमधून मला हे शिकण्यास मिळाले की, मानव कितीही प्रामाणिक असले, तरीही तरुण असताना मला जो न्याय इतक्या उत्कंठतेने हवा होता तो या मानवांना कधीच देता येणे शक्य नाही. देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या हातातील देवाचे राज्य हेच केवळ अन्यायापासून अत्यंत गरज असलेली मुक्‍तता देऊ शकते हे पाहण्यास बायबलच्या ज्ञानाने मला मदत केली याबद्दल मी कृतज्ञ आहे.—यशया ९:६, ७; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण २१:३, ४.

माझ्या व्यक्‍तिमत्त्वातील बदल अनेक वृत्तपत्रांमध्ये देण्यात आला, तो बदल बायबल ज्ञानामुळे झाला होता. उदाहरणार्थ, पॉएझ सेरॉ यात प्रोसिडॉच्या तुरुंग अधिकाऱ्‍याला असे म्हणताना उद्धृत केले: “सर्व कैदी फ्रँकसारखे असते तर तुरुंग नाहीसे झाले असते; त्याचे वर्तन निर्दोष होते, त्याने कधीच भांडण केले नाही व त्याला कधीच ताकीद देण्यात आली नाही.” ऑवेनीरे या आणखी एका वृत्तपत्राने म्हटले: “तो असामान्य असून एक आदर्श कैदी आहे. त्याचे पुनर्वसन सर्व अपेक्षांपलीकडील आहे. तो संस्था व तुरुंग अधिकाऱ्‍यांना आदर देतो व त्याच्याजवळ विलक्षण आध्यात्मिकता आहे.”

प्रतिफळदायी जीवन

सन १९८४ पासून, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत वडील व पूर्ण-वेळेच्या सेवकांना संबोधले जाते त्याप्रमाणे पायनियर या नात्याने सेवा करत आलो आहे. सन १९९० मध्ये, मी तुरुंगातील ज्या पहारेकऱ्‍याला १५ वर्षांआधी बायबलचे ज्ञान सांगितले होते तो व त्याचे कुटुंब यहोवाचे साक्षीदार झाल्याचे सांगण्यासाठी त्याने मला फोन केला.

परंतु, जुलै १९९५ मध्ये मला सर्वात आनंददायक अनुभव लाभला. त्या वर्षी, माझी प्रिय पत्नी वीटॉ हिच्या बाप्तिस्म्याला उपस्थित राहिल्याने मला अत्यानंद झाला. इतक्या वर्षांनंतर तिने बायबलच्या शिकवणी स्वीकारल्या होत्या. माझे तीन मुलगे देखील, ज्यांचा सध्या माझ्यासारखा विश्‍वास नाही ते कदाचित एक न एक दिवस, मी जे काही देवाच्या वचनातून शिकलो ते स्वीकारतील.

इतरांना बायबलची सत्ये शिकवण्यात मदत करणाऱ्‍या माझ्या अनुभवांमुळे मला अपरंपार आनंद मिळाला आहे. सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान संपादणे व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना ते देण्यात शक्य होणे किती प्रतिफळदायी ठरले आहे!—योहान १७:३.—फ्रँक मॉन्‍निनो यांच्याद्वारे निवेदित

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

[१५ पानांवरील चित्रं]

हत्याकांड घडले त्या पर्वताची खिंड

[१६ पानांवरील चित्रं]

सन १९४२ मध्ये आमचा विवाह झाला तेव्हा

[१८ पानांवरील चित्रं]

मी बहुतेकवेळा तुरुंगातील पहारेकऱ्‍यांना बायबलच्या सत्यांबद्दल सांगत असे

[२० पानांवरील चित्रं]

माझ्या पत्नीसोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा