वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. २३-२५
  • माझ्या मरणावस्थेतून डॉक्टर शिकले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्या मरणावस्थेतून डॉक्टर शिकले
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रसूतीची वेळ
  • रक्‍त घेण्यास खंबीरपणे नकार
  • जीवन धोक्यात
  • डॉक्टर धडा शिकतात
  • संक्रमणाला उत्तम प्रतीचा पर्याय
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
  • तुमच्या मुलांना रक्‍ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
    आमची राज्य सेवा—१९९२
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. २३-२५

माझ्या मरणावस्थेतून डॉक्टर शिकले

वर्ष १९९१, मे महिन्याच्या मध्यात, आम्हाला आमचे चौथे मूल होणार याची चाहूल लागली. आमचा सर्वात धाकटा मुलगा मीकल, नऊ वर्षांचा होता व आमच्या जुळ्या मुली, मारिया व सारा १३ वर्षांच्या होत्या. आणखी एका मुलाचे येणे अनियोजित असले तरीसुद्धा आम्ही लवकरच या कल्पनेला रुळलो.

गरोदरपणाच्या तिसऱ्‍या महिन्यात एके दिवशी संध्याकाळी, मला फुफ्फुसात अचानक दुखू लागले. दुसऱ्‍या दिवशी तर मला चालणेही कठीण झाले. मला न्युमोनिया झाला आहे असे डॉक्टरने सांगितले व तिने मला पेनिसिलीन दिले. काही दिवसांनी मला थोडे बरे वाटू लागले, पण मी खूप अशक्‍त झाले होते. मग माझ्या दुसऱ्‍या फुफ्फुसात अचानक कळा येऊ लागल्या व पुन्हा तोच उपचार करण्यात आला.

पुढील काही दिवसांत, श्‍वासोच्छ्‌वास करण्यात अडचण होत असल्यामुळे, मी झोपू शकत नव्हते. पहिल्यांदा दुखणे सुरू झाले त्याच्या एक दीड आठवड्यानंतर, माझा एक पाय काळानिळा होऊन सुजला. या वेळेस मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरने मला सांगितले की माझ्या फुफ्फुसातले दुखणे न्युमोनियामुळे नव्हे तर रक्‍ताच्या गाठींमुळे होते. माझ्या मांडीतल्या सांध्यात रक्‍ताची गाठ असल्याचेही तिने सांगितले. रक्‍ताच्या गाठी, स्वीडनमधील गरोदर स्त्रियांच्या मृत्यूच्या सर्वसामान्य कारणांतील एक आहेत अशी माहिती मला मिळाली. काही दिवसांनी, मला कठीण प्रसूतींसाठी असणाऱ्‍या विशेष प्रसूती चिकित्सालय असलेल्या स्टॉकहोममधील कॉरोलिन्सका शूखूसेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टरांनी मला रक्‍त अधिक तरल करणारे औषध, हेपॅरिन देण्याचे ठरविले. फुफ्फुसांत आणखी एक रक्‍ताची गाठ होण्याच्या धोक्याशी तुलना करता हेपॅरिन घेतल्यामुळे रक्‍तस्त्राव होण्याचा धोका कमी आहे, असा दिलासा त्यांनी मला दिला. काही आठवड्यांनंतर मी घरी परतण्याइतकी बरी झाले होते. मी जिवंत असून माझ्या उदरात एक छोटेसे गोंडस बाळ वाढत आहे या गोष्टीने मला विलक्षण आनंद व उत्साहाची अनुभूती झाली.

प्रसूतीची वेळ

कृत्रिमरित्या प्रसूतीवेदना आणण्याचे ठरविण्यात आले, पण ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येण्याआधीच मला माझ्या ओटी पोटात अतिशय दुखू लागले. यामुळे मला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, काही विपरीत घडल्याचे डॉक्टरांना दिसून आले नाही.

त्या संध्याकाळी माझे पोट फार सुजले होते व दुखणे अजून कमी झाले नव्हते. रात्री एका डॉक्टरने मला तपासले व मी प्रसववेदनेत असल्याचे त्यास आढळले. दुसऱ्‍या दिवशी सकाळी माझे पोट आणखीनच सुजले व वेदना असह्‍य होत होत्या. डॉक्टर चिंतेत असल्याचे दिसले व मला बाळाच्या हालचाली शेवटी केव्हा जाणवल्या होत्या असे त्यांनी मला विचारले. मला अचानक लक्षात आले की त्या तर खूप वेळापासून जाणवल्याच नव्हत्या.

मला त्वरित प्रसूती कक्षात नेण्यात आले. काही अंतरावरून मी कर्मचाऱ्‍यांचे बोलणे ऐकू शकत होते. कोणीतरी म्हटले, “ती रक्‍त संक्रमण घेण्यास नकार देते.” मग एक परिचारिका माझ्याजवळ वाकून मोठ्याने म्हणाली: “तुझे बाळ दगावले हे तुला माहीत आहे नं?” मला तर माझ्या हृदयात तरवार खुपसल्यासारखे झाले.—नीतिसूत्रे १२:१८.

रक्‍त घेण्यास खंबीरपणे नकार

तेवढ्यात अचानक माझे डॉक्टर आले व माझी स्थिती फारच गंभीर आहे असे त्यांनी मला सांगितले. रक्‍त न घेण्याच्या माझ्या निर्णयावर मला अजूनही कायम राहायचे आहे का असे त्यांनी विचारले. मी स्पष्टपणे होकारार्थी उत्तर दिले, पण त्यानंतर मला फारसे काही आठवत नाही. परंतु, रक्‍त वर्ज्य करावे अशी ख्रिश्‍चनांना आज्ञा देण्यात आली आहे व मला देवाच्या नियमाला आज्ञाधारक राहायचे आहे असे मी माझ्या डॉक्टरला अगदी स्पष्टपणे सांगितले होते.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; २१:२५.

तोपर्यंत त्यांनी बॉरब्रो लॉरसोन नामक दुसऱ्‍या एका डॉक्टरला बोलावले जी एक कुशल शल्यचिकित्सक होती. ती लागलीच आली व तिने माझ्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केली. माझे पोट उघडल्यावर, त्यांना कळले की आंतरिक रक्‍तस्त्रावामुळे मी तीन लिटर रक्‍त गमावले होते. परंतु, डॉ. लॉरसोनने रक्‍त संक्रमणाविषयी माझ्या निर्धाराचा आदर केला.

नंतर, आणखी एका डॉक्टरने म्हटले की काही क्षणातच माझा मृत्यू होईल. “आताच ती जिवंत आहे किंवा नाही याबद्दल मी साशंक आहे” असे त्याने ठामपणे म्हटल्याचे मला कळले. रक्‍तस्त्राव कोठून होत होता हे डॉक्टरांना न कळल्यामुळे त्यांनी माझ्या पोटात कापडाची घडी ठेवली असे नंतर समजले. डॉक्टर व परिचारिकांनी माझ्या बचावण्याची कोणतीही आशा दिली नाही.

माझी मुलं रुग्णालयात आली व त्यांना माझ्या स्थितीबद्दल कळले तेव्हा त्यांपैकी एकाने म्हटले की हर्मगिदोन लवकरच येईल व त्यानंतर पुनरूत्थानाद्वारे मी त्यांना परत मिळेन. खरोखर पुनरुत्थान केवढी विस्मयकारक व न्याय्य तरतूद आहे!—योहान ५:२८, २९; ११:१७-४४; प्रेषितांची कृत्ये २४:१५; प्रकटीकरण २१:३, ४.

जीवन धोक्यात

दर डेसीलीटरला ४ ग्रॅम, एवढे माझे हिमोग्लोबिन कमी झाले होते, पण रक्‍तस्त्राव जवळजवळ थांबलाच होता. मी माझ्या केस रेकॉर्डमध्ये, सावध राहा! (इंग्रजी) नियतकालिकाचा नोव्हेंबर २२, १९९१, हा अंक आधीच ठेवला होता. डॉ. लॉरसोनला तो अंक सापडला व “रक्‍त संक्रमणाशिवाय रक्‍तस्त्राव टाळणे व नियंत्रित करणे” या शीर्षकाकडे तिचे लक्ष गेले. मला वाचवण्यासाठी काही उपयोग करण्यासारखे आहे का, हे पाहण्यासाठी तिने त्या अंकाचा उत्सुकतेने अभ्यास केला. तिची नजर “एरिथ्रोपोयटिन” या शब्दावर गेली, जे शरीराला रक्‍तातील लोहित पेशींचे उत्पादन करण्यासाठी चालना देणारे औषध आहे. तिने आता या औषधाचा प्रयोग केला. पण या औषधाचा परिणाम घडून येण्यास काही वेळ लागतो. म्हणून, एरिथ्रोपोयटिन योग्य वेळी कार्य करील का असा प्रश्‍न उद्‌भवला.

दुसऱ्‍या दिवशी, माझे हिमोग्लोबिनचे प्रमाण २.९ पर्यंत घसरले होते. झोपेतून उठल्यावर माझ्या पलंगाजवळ माझ्या सर्व कुटुंबियांना पाहून, काय झाले असावे असा मला प्रश्‍न पडला. कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासाच्या यंत्रामुळे मी बोलू शकत नव्हते. दुःखाने मी अगदी फेंपरे आल्यासारखी झाले पण मी रडूही शकत नव्हते. जिवंत राहण्यासाठी मला माझी शक्‍ती राखून ठेवली पाहिजे असे प्रत्येक जण मला सांगत होता.

माझ्या पोटात कापडाची घडी ठेवल्याने सूज आल्यामुळे मला दुसऱ्‍या दिवशी ताप आला होता. माझे हिमोग्लोबिनचे प्रमाण आता २.७ पर्यंत घसरले होते. अशा अवस्थेत कोणा व्यक्‍तीला शस्त्रक्रियेसाठी भूल देणे अत्यंत धोकादायक असले तरीसुद्धा, डॉ. लॉरसोनने सांगितले की जोखीम असतानासुद्धा पोटातील कापडाची घडी काढण्यासाठी त्यांना पुन्हा शस्त्रक्रिया करणे भाग होते.

शस्त्रक्रिया सुरू होण्याआधी मुलांना आत येऊन मला भेटण्याची परवानगी देण्यात आली. सर्वांना ही माझ्यासोबतची शेवटची भेट असल्यासारखे वाटले. रुग्णालयातील कर्मचाऱ्‍यांपैकी पुष्कळ जण रडत होते. मी बचावणार असे त्यांना वाटलेच नाही. आमची मुले फार धैर्यवान होती व यामुळे मी शांत व विश्‍वस्त झाले.

भूल देण्याचे औषध फार कमी प्रमाणात देण्यात आल्यामुळे, डॉक्टर व परिचारिकांचे एकमेकांशी बोलणे मला ऐकू येत होते. काहीजण, मी केव्हाचीच मरण पावल्यासारखे माझ्याबद्दल बोलत होते. शस्त्रक्रिया सुरू असताना मी जे ऐकले त्याचे नंतर कथन केले तेव्हा एका परिचारिकेने क्षमा मागितली. पण, मी मरणार याची तिला खात्री होती व मी कशी वाचले हे तिला अजूनही कळले नव्हते असे तिने म्हटले.

दुसऱ्‍या दिवशी मला थोडे बरे वाटले. माझे हिमोग्लोबिन २.९ व हेमॅटोक्रिटचे प्रमाण ९ होते. माझे ख्रिस्ती बंधू व भगिनी भेट देण्यास येत होते व येताना माझ्या कुटुंबियांसाठी जेवण व कॉफी आणत होते. त्यांचे प्रेम व स्नेह, यांसाठी आम्ही कृतज्ञ होतो. संध्याकाळपर्यंत माझी स्थिती अजूनही गंभीरच पण स्थिर होती व मला दुसऱ्‍या वॉर्डमध्ये हलविण्यात आले.

डॉक्टर धडा शिकतात

वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांतील पुष्कळ जण माझी विचारपूस करीत होते व अधिकांश लोक फार दयाळू होते. एक परिचारिका म्हणाली, “तुझ्या देवानेच तुला वाचवले असेल.” एका दुसऱ्‍या वॉर्डातील डॉक्टर आले व म्हणाले: “हिमोग्लोबिनचे इतके कमी प्रमाण असलेली व्यक्‍ती कशी दिसते एवढेच मला पाहायचे आहे. तू इतकी सतर्क कशी राहू शकते हेच मला उमजत नाही.”

दुसऱ्‍या दिवशी, सुटीवर असूनसुद्धा माझी डॉक्टर मला भेटण्यास आली. तिने मला सांगितले की जे काही घडले त्यामुळे तिला नमविण्यात आल्यासारखे जाणवले. मी पूर्णपणे बरी झाले तर ते रुग्णांवर उपचार करण्यात रक्‍त संक्रमणाच्या पर्यायांवर नवीन संशोधन सुरू करणार होते असे ती म्हणाली.

माझ्या प्रकृतीत नाट्यमय सुधारणा झाली. माझ्या दुर्भाग्यपूर्ण बाळंतपणाच्या अडीच आठवड्यांनंतर, माझे हिमोग्लोबिनचे प्रमाण ८ पेक्षा थोडे अधिक वाढले होते. यामुळे मला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तीन दिवसांनंतर यहोवाच्या साक्षीदारांचे आमचे वार्षिक विभागीय संमेलन होते व मी तेथे उपस्थित होते. आमच्या संकटात आमची खूप मदत केलेल्या आपल्या ख्रिस्ती बंधू व भगिनींना पुन्हा एकदा पाहणे केवढे उत्तेजनात्मक होते!—नीतिसूत्रे १७:१७.

डॉ. लॉरसोनने वचन दिल्याप्रमाणे माझ्या केसबद्दल, लकॉर्टिनिंजन नामक स्विडिश वैद्यकीय नियतकालिकात, “एरिथ्रोपोयटिन रक्‍त संक्रमणाची जागा घेते,” हे शीर्षक असलेला अहवाल नंतर प्रकाशित करण्यात आला. त्यात म्हटले आहे: “यहोवाची साक्षीदार असलेल्या एका ३५-वर्षीय महिलेला प्रसूती दरम्यान तीव्र व फार रक्‍तस्त्राव झाला. तिने रक्‍त संक्रमणास नकार दिला पण एरिथ्रोपोयटिन उपचार पद्धतीचा तिने स्वीकार केला. एरिथ्रोपोयटिनचे अधिक प्रमाण उपयोगात आणून शस्त्रक्रियेच्या उपरांत केलेल्या उपचाराने, कोणतेही दुष्परिणाम न होता हिमोग्लोबिन २.९ पासून ८.२ ग्रॅम इतके वाढले.”

लेखाच्या शेवटी असे म्हटले आहे: “सुरवातीला रुग्ण फार अशक्‍त होता, पण त्याची प्रकृती आश्‍चर्यकारकपणे लवकरच सुधारली. शिवाय शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारात गुंतागुंती मुळीच नव्हत्या. रुग्णाला दोन आठवड्यांनंतर रुग्णालयातून सुटी देणे शक्य झाले.”

हा अनुभव आमच्यासाठी एक जबर तडाखा ठरला असला तरीही, त्याच्या परिणामस्वरूप काही डॉक्टरांना रक्‍त संक्रमणाच्या पर्यायांविषयी अधिक शिकण्यास मिळाले असावे याबद्दल आम्हाला समाधान वाटते. यशस्वी ठरलेल्या उपचार पद्धतींचा प्रयोग करण्यास ते तयार असतील अशी आम्ही आशा बाळगतो.—ॲन इपस्यॉटिस द्वारा कथित.

[२४ पानांवरील चित्रं]

माझ्या साहाय्यकारी डॉक्टरसोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा