वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १/८ पृ. २६-२७
  • खेळांतील स्पर्धा अयोग्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खेळांतील स्पर्धा अयोग्य आहे का?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खेळ व क्रीडेचा इतिहास
  • स्पर्धा टोकास जाते तेव्हा
  • एक संतुलित दृष्टिकोन
  • मी क्रीडा संघात सामील व्हावे का?
    सावध राहा!—१९९६
  • देवाची उपासना की शारीरिक प्रशिक्षण?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
सावध राहा!—१९९६
g96 १/८ पृ. २६-२७

बायबलचा दृष्टिकोन

खेळांतील स्पर्धा अयोग्य आहे का?

प्रसन्‍न वातावरण असलेल्या एके दिवशी दोन वयस्क सज्जन बागेत बुद्धिबळ खेळत बसतात. जवळच गोंगाट करून, हसत बागडत पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्‍या मुलांचा आवाज येत आहे. आणखीन काही अंतरावर, तरुण मुलांचा एक समूह बास्केटबॉलच्या खेळाचा आनंद लुटत आहे. होय, दररोज आमच्या सभोवती लहान-थोर, खेळ व क्रीडा यांचा आनंद घेतात. खेळात भाग घेतल्यावर अधिकांश लोक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित तुम्ही सुद्धा करत असाल.

पण असे मैत्रीपूर्ण स्पर्धेचे प्रकार अयोग्य आहेत असे म्हणता येईल का? अनेक जण गलतीकर ५:२६ येथे नमूद असलेला पौलाचा सल्ला जाणतात, जेथे तो म्हणतो, की ख्रिश्‍चनांनी ‘एकमेकांना चिथावणी देणारे’ असू नये. हे विचारात घेता, मनोरंजनात्मक खेळ व क्रीडेतील स्पर्धांमध्ये भाग घेणे ख्रिश्‍चनांसाठी अयोग्य ठरेल का?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, नाही. का बरे? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यापूर्वी, आपण खेळ व क्रीडेच्या इतिहासावर एक नजर टाकू या.

खेळ व क्रीडेचा इतिहास

खेळ व क्रीडा यातील सहभाग, प्राचीन काळांपासून चालत आला आहे व इतिहासातील स्थायी भाग राहिला आहे—ज्यात देवाच्या लोकांचा इतिहास देखील समाविष्ट आहे. “चेंडू” हा शब्द बायबलमध्ये आढळतो देखील. दुष्ट मनुष्यांविरुद्ध यहोवा देवाच्या दोषारोपांचा उल्लेख करताना यशया २२:१८ म्हणते: “(तुझी) मोट बांधून तुला चेंडूसारखे विस्तृत प्रदेशावर फेकून देणार आहे.” काही आधुनिक चेंडू—उदाहरणार्थ गॉल्फचे व बेसबॉल या खेळात वापरण्यात येतात ते चेंडू—आजदेखील काही वस्तू जखडून बांधण्याद्वारे बनविण्यात येतात. किंग जेम्स बायबल हे वचन अशा प्रकारे भाषांतरीत करते: “तो . . . तुला चेंडूसारखा फेकून देईल.” ही तुलना समर्पक असण्यासाठी, त्या काळातील लोक नक्कीच चेंडू वापरत असावेत.

तसेच बायबलमध्ये, कुलपिता याकोबाने एका देवदूताशी झोंबी केल्याची घटना आहे. हा वृत्तान्त असा अर्थ ध्वनित करतो की याकोब सराईत असावा, कारण तो सामना अनिर्णित होता व अनेक तास चालला. (उत्पत्ति ३२:२४-२६) विशेष म्हणजे, काही विद्वानांच्या मते, हा वृत्तान्त, याकोबास कुस्तीच्या नियमांबद्दल माहिती होती असाही संकेत देत असावा. सराव व कौशल्य आवश्‍यक असलेला आणखी एक खेळ—निशाणबाजी, यात देखील इस्राएली लोक रमत होते असे दिसते. (१ शमुवेल २०:२०; विलापगीत ३:१२) धावणे ही आणखी एक मैदानी-खेळातील स्पर्धा होती ज्यासाठी पुरातन काळातील पुरुष कसरत करत व प्रशिक्षण घेत असत.—२ शमुवेल १८:२३-२७; १ इतिहास १२:८.

बौद्धिक खेळ—जसे कोडे घालणे—लोकप्रिय व फार प्रशंसित होते असे दिसून येते. कदाचित याचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण, शमशोनाचे पलिष्ट्यांना एक कोडे घालणे हे आहे.—शास्ते १४:१२-१८.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, खेळ व क्रीडा यांचा कधीकधी ख्रिस्ती जीवनासाठी रूपक म्हणून वापर करण्यात येत असे. उदाहरणार्थ १ करिंथकर ९:२४, २५ या वचनांत, पौल एका खेळाडूच्या कठीण प्रशिक्षण कार्यक्रमाचा उल्लेख करतो व त्याचा संबंध, ख्रिश्‍चनास असलेला आत्मसंयम व धीर यांच्या गरजेशी जोडतो. तसेच, यहोवाने त्याच्या पुष्कळशा निर्मितीत एक खेळकर अंश घातला आहे, हे स्पष्ट आहे कारण मनुष्य व पशू दोघेही खेळण्यासाठी वेळ काढतात.—ईयोब ४०:२०; जखऱ्‍या ८:५; पडताळा इब्रीयांस १२:१.

स्पर्धा टोकास जाते तेव्हा

तर मग, ‘एकमेकांना चिथावणी देणारे’ असू नये असे पौलाने सह-ख्रिश्‍चनांना सांगितले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? (गलतीकर ५:२६) याचे उत्तर संदर्भात दडलेले आहे. “पोकळ अभिमान बाळगणारे” किंवा इतर बायबल भाषांतरांच्या संबोधनाप्रमाणे, “गर्विष्ठ,” “अहंकारी,” “पोकळ अभिमानाची इच्छा बाळगणारे” असू नये, असे सांगून पौलाने या विधानास प्रस्तावना जोडली. पौलाच्या दिवसांतील खेळाडूंमध्ये मानसन्मान व लोकप्रियतेचा पाठलाग प्रचलित होता.

तशाच प्रकारे, आजच्या बढाईखोर जगात, अधिकाधिक खेळाडू, आपल्याच तोऱ्‍यात चालतात व स्वतःकडे व स्वतःच्या कौशल्यांकडे लोकांचे लक्ष आकर्षित करतात. काहींची तर इतरांना तुच्छ लेखण्यापर्यंत मजल जाते. टोमणे मारणे, दोषारोप करणे व मौखिक मानहानी किंवा काही खेळाडू ज्यास “टीकात्मक बोलणे” म्हणतात, ते आज झपाट्याने प्रघात बनत चालले आहेत. हे सारे, ‘एकमेकास चिथावणी देणे’ असेल व ते गलतीकर ५:२६ या वचनाच्या शेवटच्या भागात पौलाने सांगितलेल्या गोष्टीत—हेव्यात—परिणीत होईल.

अत्यंत वाईट स्थितीत, अनियंत्रित स्पर्धांच्या परिणामस्वरूप झगडे व मृत्यू देखील घडू शकतात. गिबोनात, शौल व दावीद यांच्या उभय सैन्याची गाठ पडली व “तरुण पुरुषांनी [त्यांच्यापुढे] दोन हात खेळावे” यास अबनेर आणि यवाब तयार झाले तेव्हाचा विचार करा. (२ शमुवेल २:१४-३२, तनाख) हे बहुधा एक प्रकारच्या कुस्तीच्या सामन्याबद्दल म्हटलेले असावे असे दिसते. कोणताही सामना का असेना, पण त्याची अवनती त्वरितच एका हिंस्र व रक्‍तलांछित युद्धात झाली.

एक संतुलित दृष्टिकोन

मनोरंजनात्मक खेळ व क्रीडा तजेलादायक असावयास हवेत—खचविणारे नव्हे. बाबींविषयी यथार्थ चित्र समोर ठेवून, देव व आपल्या सहबांधवाच्या नजरेत आपले मोल, खेळ व क्रीडा यांतील आपल्या नैपुण्यावर अवलंबून नाही हे आठवणीत ठेवण्याद्वारे आपण हे साध्य करू शकतो.

शारीरिक अथवा मानसिक क्षमतांमुळे, आपल्या मनात श्रेष्ठत्वाच्या भावना उत्पन्‍न होऊ देणे मूर्खपणाचे ठरेल. तर मग, स्वतःकडे लक्ष वेधण्याची अशोभनीय, जगीक प्रवृत्ती आपण टाळू या नाहीतर आपण इतरांमध्ये हेवा उत्तेजित करू, प्रीती बढाई मारीत नाही. (१ करिंथकर १३:४; १ पेत्र २:१) तसेच, उत्तेजितपणा, उत्साहाचे स्वाभाविक उद्रेक किंवा संघातील सदस्यांचे एकमेकांना अभिनंदन या प्रतिक्रिया अपेक्षित असणे साहजिक असले तरीही, या भावना अनियंत्रित किंवा प्रदर्शित होता कामा नये.

आपण इतरांची योग्यता खेळ व क्रीडा यांतील त्यांच्या क्षमतांवरून ठरविणार नाही. तसेच, आपल्या ठिकाणी कौशल्य नाही म्हणून आपण स्वतःला कमी समजणार नाही. याचा अर्थ खेळातील नोंदी ठेवणे अयोग्य असेल असा होतो का? नेहमीच नाही. पण कोणताही खेळ किती क्षुल्लक असतो हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे—लोकांची खरी योग्यता, ते किती चांगले खेळतात यावर अवलंबून नसते. सांघिक खेळांमध्ये काही संघ नियमितपणे खेळाडू बदलतात ज्यामुळे नेहमी तोच तो संघ जिंकत नाही.

ख्रिश्‍चनांनी हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की खेळ व क्रीडा जरी बायबलमध्ये उल्लेखित आहेत तरी त्यांचा फार क्वचित उल्लेख आहे. पण केवळ उल्लेख असल्यामुळे, बायबल सर्वच खेळांना पूर्ण समर्थन देते असा निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल. (१ करिंथकर ९:२६ याजशी स्तोत्र ११:५ पडताळा.) तसेच, पौलाने निरीक्षिले, “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे; सुभक्‍ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे.”—१ तीमथ्य ४:८.

तर मग, खेळ व क्रीडा त्यांच्या जागी, मनोरंजक व तजेलादायक आहेत. बायबल सर्वच प्रकारच्या स्पर्धेचे नव्हे तर पोकळ गर्व, शत्रुत्व, लोभ, ईर्ष्या किंवा हिंसा चेतविणाऱ्‍या स्पर्धांचे खंडन करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा