समुद्राचे स्फटिकी महाल
कॅनडामधील सावध राहा ! नियत कालि काच्या बातमी दाराकडून
“समोर हिमगिरी!” असे चिंताग्रस्त टेहळ्या ओरडतो. जहाजाच्या कक्षातील सर्व खलाशी तत्काळ कार्य करतात. टक्कर होऊ नये म्हणून, सर्व इंजिनांना विरुद्ध दिशेने फिरवण्यात येते. परंतु खूप उशीर झालेला असतो. जहाजाच्या उजव्या बाजूला घातक क्षती पोहंचते.
अवघ्या तीन तासातच, उत्तर अटलांटिक महासागर, जगातील सुखसोयींनी युक्त असलेल्या सर्वात प्रचंड सागरी जहाजाला गिळंकृत करते. एप्रिल १५, १९१२ रोजी, टायटॅनिक युरोप ते उत्तर अमेरिकेच्या पहिल्या जलपर्यटनाच्या केवळ पाच दिवसांतच, सागराच्या तळाशी, पृष्ठभागापासून चार किलोमीटर खाली जाऊन विसावते. सुमारे १,५०० प्रवासी आणि खलाशी समुद्रात मृत्युमुखी पडतात.
तसेच त्या भल्यामोठया हिमनगाचा केवढा अवशेष उरला? तो प्रत्यक्षात जसाचा तसा राहिला. त्याचे केवळ टोक टायटॅनिकला धडकले होते. दुसऱ्या दिवशी शोधकांना तो उष्ण पाण्यात जणू काहीच न झाल्याप्रमाणे तरंगत असल्याचा आढळला. त्या हिमगिरीचा शेवट, म्हणजेच प्रचंड सागरात त्याचे हळूहळू वितळणे लवकरच विसरले जाईल. तथापि, टायटॅनिक जहाजाचे बुडणे, आजही समुद्रातील क्लेशकारक दुर्घटना म्हणून आठवले जाते.
हिमगिरी! ते इतके आकर्षक आणि भव्य आहेत परंतु तरीही अभेद्य आहेत. तुम्ही त्यांचे जवळून निरीक्षण केले आहे का आणि मानव व प्रकृती यांच्यावर त्यांचा काय परिणाम होतो याची जाणीव करून घेतली आहे का? ते अस्तित्वात का व कसे येतात हे जाणण्यास तुम्हाला आवडेल का? तसेच समुद्रावरील लोकांना हिमगिरींच्या संभवनीय धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी काय केले जाते? (“आंतरराष्ट्रीय बर्फाची टेहळणी” हा चौकोनी रकाना पाहा)
उगम आणि आयुर्मर्यादा
हिमगिरी गोड्या पाण्यातील बर्फाच्या मोठ्या खंडकांसारखे असतात. उत्तर तसेच अन्टार्टिकमधील हिमनद्या व कायम हिमाच्छादनांतून ते निर्माण होतात. अन्टार्टिकचे कायम हिमाच्छादन पृथ्वीच्या सुमारे ९० टक्के हिमगिरींना तयार करते हे तुम्हाला ठाऊक होते का? तसेच ते सर्वात मोठ्या हिमगिरींना देखील निर्माण करते. त्यांची उंची पाण्याच्या पातळीपासून १०० मीटर व त्यांची लांबी ३०० किलोमीटर व रुंदी ९० किलोमीटर इतकी असू शकते. मोठे हिमगिरी २० लाख ते चार कोटी टन वजनाचे असू शकतात. आणि हिमाच्या भुरभुरीत तुकड्यांप्रमाणे दोन हिमगिरी एकसारखे दिसत नाहीत. काही सपाट किंवा समपातळीचे असतात. तर इतर पाचरीसारखे, निमुळता कळस असलेले किंवा घुमटाकाराचे असतात.
सामान्यतः, हिमगिरीचा केवळ एक सप्तमांश किंवा एक दशांश भाग पाण्याबाहेर दिसतो. हे समपातळीच्या हिमगिरींबद्दल विशेषतः खरे आहे. बर्फाचा एक तुकडा पाण्याच्या प्याल्यात जसा तरंगत असल्याचे दिसतो अगदी त्यासारखेच हे आहे. तथापि, पाण्याच्या वर असलेल्या आणि पाण्याखाली असलेल्या बर्फाचे प्रमाण हिमगिरीच्या आकाराप्रमाणे वेगवेगळे असते.
अन्टार्टिक हिमगिरी वरून आणि बाजूनेही सपाट असतात, परंतु आर्क्टिक हिमगिरी ओबडधोबड व मनोऱ्याच्या आकाराचे असतात. ग्रीनलँडवरील प्रचंड हिमाच्छादनातून निर्माण होणारे नंतरचे हिमगिरी मानवाला सर्वात मोठा धोका संभावतात कारण ते अटलांटिक महासागराच्या पलीकडील जहाजांच्या मार्गात हटू शकतात.
हिमगिरी खरे म्हणजे कसे निर्माण होतात? पृथ्वीच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागांमध्ये हिम व गोठवणारा पाऊस साठल्यामुळे बहुतेक वेळा वितळण्याची आणि बाष्पीभवन होण्याची मर्यादा पार होते. यामुळे जमिनीवर निर्माण झालेल्या हिमाच्या थरातून बर्फ तयार होतो. वर्षांनुवर्षे, जसजसा अधिक हिम आणि पाऊस पडतो तसतसा तो सतत घट्ट होत जातो. यामुळे ग्रीनलँडसारखे बर्फाचे विस्तीर्ण प्रदेश तयार होतात. कालांतराने, तो बर्फ इतका रुंद आणि घट्ट होतो, की वजनदार हिमनदी उंचावलेल्या उतारांवरून फार हळूहळू दऱ्यांमध्ये आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. या स्थलांतराचे वर्णन करताना, बर्नार्ड स्टोनहाऊस यांनी उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हटले: “कठीण बर्फ लवचीक असतो परंतु लागलीच त्याचा आकार बदलतो; दबावाखाली त्याचे षट्कोनी स्फटिक सरळ रांगेत येतात आणि मग एकमेकांवर घसरून हिमनद्यांप्रमाणे वाहत आणि घसरत जातात.”
एखादी बर्फाची नदी ओबडधोबड भूप्रदेशावरून थंड काकवीसारखी हळुवारपणे वाहत असल्याची कल्पना करा. त्यात आधीच खोल उभ्या फटी असून बर्फाचा हा प्रचंड प्रदेश पुढे किनारपट्टीला पोहंचल्यानंतर एक नेत्रदीपक प्रक्रिया उत्पन्न करील. भरती व ओहोटी, कमी जास्त होणाऱ्या लाटा व पाण्याखालील झीज यांच्या संमिश्र परिणामांमुळे समुद्राकडे सुमारे ४० किलोमीटर दूरपर्यंत विस्तार असलेला गोड्या पाण्यातील बर्फाचा एक मोठा खंड कडाडून हिमनदीपासून विभाजित होईल. एक नवा हिमगिरी निर्माण झाला! एका निरीक्षकाने त्याचे वर्णन “तरंगता स्फटिकी महाल” असे केले.
आर्क्टिकमध्ये, वर्षाला १०,००० ते १५,००० हिमगिरी निर्माण होतात. तरीही, तुलनात्मकरित्या बोलायचे झाल्यास न्यूफाऊंडलंडच्या किनारपट्टीजवळील दक्षिणेकडील पाण्यापर्यंत फारच अल्प हिमगिरी पोहंचतात. जे पोहंचतात त्यांचे काय होते?
हिमगिरींचे स्थलांतर
हिमगिरींचे तुकडे झाल्यावर, त्यांना पश्चिम किंवा दक्षिणेकडे व कालांतराने हिमगिरी ॲले असे टोपणनाव असणाऱ्या लॉब्रडोर समुद्रात टाकण्याआधी सागरी प्रवाह त्यांच्यापैकी अनेकांना एका दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला नेतो. जे हिमगिरी त्यांच्या जन्मस्थळापासून लॉब्रडोर व न्यूफाऊंडलंडच्या दिशेने अदमासे दोन वर्षांच्या प्रवाहात टिकून राहतात त्यांची कालमर्यादा अगदी कमी असते. उष्ण पाण्यात प्रवाहपतित झाल्यावर वितळणे, झीज व अधिक तुकडे झाल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो.
विशिष्टपणे, दिवसा बर्फ वितळतो आणि पाणी भेगांमध्ये साठते. रात्रीच्या वेळी या भेगांमधील पाणी गोठते आणि प्रसरण पावते व त्यामुळे तुकडे होतात. यामुळे हिमगिरीच्या आकारात अचानक बदल घडतो व त्यामुळे त्याचे गुरुत्वमध्य बदलते. हा बर्फाचा तुकडा पाण्यात उलटा होतो आणि आता बर्फाचा एक नवीनच उंचसखल आकार पाण्याबाहेर येतो.
हे चक्र चालत राहते तसे तुकडे होण्याद्वारे या बर्फाच्या महालांचा आकार आणखी कमी होतो, मग ते स्वतःचे हिमगिरी तयार करतात ज्यांना “हिमगिरींचे तुकडे” म्हटले जाते, ज्यांचा आकार सर्वसामान्य घराएवढा असतो आणि “ग्राऊलर्स” (गुरगुर आवाज करणारे) जे एका लहान खोलीच्या आकाराचे असतात—नंतरच्या हिमगिरींना तसे नाव देण्यात आले आहे कारण लाटांमध्ये वाहताना ते तसा आवाज करतात. काही लहान ग्राऊलर्स तर कदाचित किनारपट्टीवरील उथळ पाण्यात व लहान खाडींमध्ये देखील झोकांड्या खातात.
परिस्थिती कोणत्याही असल्या, तरी दक्षिणेकडील पाण्याच्या वातावरणामुळे गोडया पाण्याच्या लहान तुकड्यांमध्ये हिमगिरीचे वेगाने विभाजन होते आणि नंतर ते त्या प्रचंड सागरात विलीन होतात. तथापि, ते होईपर्यंत हिमगिरींना सावधानतेने वागवावे लागते.
हिमगिरींचा आपल्या जीवनांवर कसा प्रभाव पडतो
जे कोळी त्यांच्या उपजीविकेसाठी सागरावर अवलंबून असतात ते हिमगिरींना उपद्रव व धोका असल्याचे समजतात. एक कोळी असे म्हणाला: “पर्यटकांना हिमगिरी सुंदर वाटत असेल परंतु एखाद्या कोळ्याला तो संभवनीय संकट आहे.” कोळी त्यांच्या माशांची पकड पाहण्यास येतात तर पाण्याच्या ओघामुळे किंवा प्रवाहामुळे एका हिमगिरीने त्यांचे मौल्यवान जाळे व पकड यांचा सत्यानाश केल्याचे त्यांना आढळून येते.
हिमगिरी आदरास पात्र आहेत. “पण त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे,” असे एका बोटीवरील कप्तानने म्हटले. “हिमगिरींचे काही सांगता येत नाही! उंच तुकड्यांमधून मोठमोठाले खंड विभागू शकतात किंवा तळाशी धडक बसल्यावर मोठे तुकडे तुमच्या दिशेने फेकले जाऊ शकतात. तसेच हिमगिरी गोल गोल फिरू शकतो आणि हे सर्व अतिशय जवळ जाण्याचे साहस करणाऱ्यांसाठी अनर्थकारक ठरू शकते!”
हिमगिरींनी सागराचे तळ घासले जाणे हा चिंतेचा दुसरा पैलू आहे. एका निरीक्षकानुसार, “हिमगिरीचा पाण्याखालील भाग सागराच्या तळाशी टेकत असल्यास, तो पुढे सरसावतो तेव्हा त्यामुळे लांब व खोल खंदके खोदली जाऊ शकतात. तेलाचा शोध चालू असणाऱ्या भागांमध्ये अशा क्रियेमुळे तेल-विहिरींसारख्या समुद्राच्या तळाशी असलेल्या बांधकामांवर नाशकारक परिणाम होऊ शकतात.”
हिमगिरी नसले तर बरे होईल असा विचार तुम्ही आतापर्यंत करत असाल. तथापि, हिमगिरीची कहाणी मुळीच नकारात्मक नाही. न्यूफाऊंडलंडच्या एका रहिवाश्याने असे म्हटले: “पुष्कळ वर्षांआधी, रेफ्रिजरेशन सार्वत्रिक होण्याआधी लहान किनारपट्टीवरील गावे विहिरीतील पाणी थंड ठेवण्यासाठी हिमगिरींचे लहान लहान तुकडे घेऊन त्यामध्ये टाकत असत. घरगुती आईस्क्रिम तयार करण्यासाठी हिमगिरीच्या बर्फाचे तुकडे भुश्याच्या डब्यांमध्ये टिकवून ठेवणे ही दुसरी एक रीत होती.”
या तरंगत्या बर्फांच्या प्रचंड पर्वतांकडे पर्यटक विशेषतः आकर्षित होतात. न्यूफाऊंडलंडच्या खडबडीत किनारपट्टीवर अटलांटिकचा विस्तीर्ण देखावा बघण्यासाठी व समुद्राच्या या विशाल गोष्टींकडे पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी ते सोयीस्कर जागा शोधतात. तो क्षण फिल्मवर टिपण्यासाठी कॅमेराने चित्रे घेतली जातात.
हिमगिरी ताज्या पिण्याच्या पाण्याचा जवळजवळ अविरत पुरवठा करण्यासही समर्थ असतात. अभूतपूर्व प्रमाणात पाण्याचे प्रदूषण असणाऱ्या या काळात हिमगिरीचे पाणी ऊर्ध्वपातन करून बाटलीत भरणे कालांतराने सुसाध्य होऊ शकत होते. मोठ्या प्रमाणात, एखादा प्रचंड “बर्फाचा तुकडा” शोधून त्यावर संस्करण करण्यासाठी तो ओढून नेणे एक सहजसोपी गोष्ट आहे असे वाटेल. वास्तविकतेत, ते एक अवाढव्य आव्हान आहे जे आतापर्यंत खूपच कठीण असल्याचे सिद्ध झाले आहे.
यहोवाच्या सृष्टीतील एक अद्भुत गोष्ट
स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता विचारतो: “हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते?” (ईयोब ३८:२९) अलीहूला हे माहीत होते कारण आधी त्याने असे म्हटले होते: “देवाच्या श्वासाच्या फुंकराने हिम होते.”—ईयोब ३७:१०.
यास्तव, आपण ह्या उत्तुंग, चकाकणाऱ्या अद्भुत गोष्टी पाहतो तेव्हा, आपले विचार निर्माणकर्त्याकडे वळतात ज्याने त्यांना तेथे ठेवले आहे. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण म्हणतो: “हे परमेश्वरा [यहोवा, NW], तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” तो पुढे म्हणतो: “तुझी कृत्ये अद्भुत आहेत.”—स्तोत्र १०४:२४; १३९:१४.
खरेच, यहोवा अद्भुत कृत्ये करणारा निर्माणकर्ता आहे. त्याला चांगल्यारितीने जाणून घेण्यास आपली किती उत्कट इच्छा आहे! त्याच्या वचनाकडे लक्ष दिल्याने आपण तसे करू शकतो.—रोमकर ११:३३.
[१८ पानांवरील चौकट]
आंतरराष्ट्रीय बर्फाची टेहळणी
टायटॅनिक या सागरी जहाजाच्या दुर्घटनेनंतर, हिमगिरींचे स्थान शोधून काढण्यास, सागराच्या व हवेच्या प्रवाहावर आधारित त्याच्या हालचालीबद्दल भाकीत करण्यास आणि मग जनतेला बर्फाबद्दल इशारे देण्यासाठी १९१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बर्फाची टेहळणी (आयआयपी) याची स्थापना करण्यात आली. समुद्राच्या या स्फटिकी विशाल गोष्टींपासून संरक्षण पुरवण्याच्या हेतूने बर्फाची गुणलक्षणे आणि गुणधर्माविषयी माहिती जमा करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करण्यात आला आहे. उपयोगात आणल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये, विमानाद्वारे दृश्य आणि रडारने पाळत ठेवणे, व्यापारी जहाजांचे बर्फ दिसण्याविषयीचे वृत्त, उपग्रह छायाचित्रण व समुद्ररचना शास्त्राविषयक सूक्ष्म अभ्यास आणि अंदाज हे समाविष्ट आहे.
[१६, १७ पानांवरील चित्र]
निमुळते कळस असलेले
घुमटाकाराचे
सपाट पृष्ठभाग असलेले