बायबलचा दृष्टिकोन
तुमच्या प्रार्थनांमध्ये तुमची भूमिका
कोंडीत सापडलेला राजा, डोंगराच्या पलीकडे दिसणाऱ्या शहराकडे पाहात, स्वतःचा आलिशान महाल, अस्ताव्यस्त झालेली राजधानी, व त्याच्या घराण्याची झालेली दुःखद स्थिती यांचा अंमळ विचार करतो. एक मोठी सेना दक्षिणेकडे एकत्रित झाली आहे व आता नगराकडे कूच करत आहे. शासनाचे वरिष्ठ अधिकारी राजद्रोही झाले आहेत व लोकमताने बंडखोरांचा पक्ष घेतला आहे. खिन्न होऊन, राजा देवाकडे प्रार्थना करतो. अत्यंत धार्मिक असल्यामुळे, देव आपली याचना ऐकेल व कारस्थानी लोकांचा डाव निष्फळ करेल यावर त्याचा विश्वास बळावतो. मग, त्याच्या वैभवशाली नगराकडे पाठ करून, तो डोंगरावरून खाली उतरतो व उत्तर दिशेने चालतचालत नदी पलीकडल्या वाळवंटाकडे जातो. याशिवाय तो आणखी काय करू शकतो? आता सर्वकाही देवाच्या हातात आहे.
याच प्रकारे, आज नम्र विश्वासी संकटकाळी देवाला, या सांत्वनदायक खात्रीने प्रार्थना करतात, की प्रार्थना कशी करावी याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन देण्यासोबतच, यहोवा देव “प्रार्थना ऐकणारा” आहे असे बायबल दाखवते. (स्तोत्र ६५:२, पंडिता रमाबाई भाषांतर) देवाला शोधणाऱ्या सर्व प्रामाणिक लोकांचे तो ऐकेल याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत.
तरीसुद्धा, विश्वास व प्रार्थना पुरेशा आहेत का? आपल्या प्रार्थनांमधून जे निष्पन्न होते, त्यासंबंधाने आपण कोणती भूमिका बजा वतो?
आपण हातभार कसा लावू शकतो?
सुरवातीला उल्लेखित करण्यात आलेला राजा, प्राचीन इस्राएलाचा राजा दावीद होता. आपला कारस्थानी पुत्र अबशालोम व त्याचा ढोंगी सल्लागार अहीथोफेल यांच्या गुप्त कारस्थानाला तोंड द्यावे लागले असता, त्याने जेरुसलेमातून पळ काढून यार्देन नदीच्या पूर्वेकडे असलेल्या वाळवंटातील तटबंदी शहर महानैम येथे आश्रय घेण्याचे ठरवले. नैराश्य, औदासिन्य व काळजीने कदाचित भाराक्रांत होऊन त्याने प्रार्थनेत अशी विनवणी केली: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] अहीथोफेलाची मसलत फोल कर.”(२ शमुवेल १५:११-१५, ३०, ३१) तथापि, दाविदाने केवळ प्रार्थना करण्यापेक्षा अधिक केले. त्याच्या प्रार्थनेच्या यशस्वी निष्पत्तिसाठी त्याने सकारात्मकरित्या हातभार लावला. ते कसे?
त्याचा हा हातभार, त्याने तोंड दिलेल्या परीक्षांच्या फार पूर्वी सुरू झाला. अनेक वर्षांच्या कालावधीत, म्हणजे तो राजा होता त्याही पूर्वी, त्याने स्वतःस यहोवाचा निष्ठावान उपासक असल्याचे शाबीत केले. (१ शमुवेल १६:१२, १३; प्रेषितांची कृत्ये १३:२२) त्याने देवासोबत जवळीक साधली. याच कारणास्तव, परीक्षेत असताना दाविदाला विश्वास होता की यहोवा त्याची प्रार्थना ऐकेल व योग्य मार्गाने उत्तर देईल.
हेच आजदेखील खरे आहे. पुष्कळदा आमच्या प्रार्थनांच्या निष्पत्तिसाठी हातभार लावण्याचा प्राथमिक मार्ग म्हणजे बायबलच्या सल्ल्याचे जीवनात नेमाने पालन करणे. देव-प्रदत्त तत्त्वांचे एकनिष्ठपणे पालन करण्याद्वारे त्याजसोबत घनिष्ठ नातेसंबंध उत्पन्न होतो. देवासोबत ही जवळीक व हा विश्वासाचा नमुना, परीक्षा येण्याआधीच अस्तित्वात असण्यास हवा. ते जणू, घर ज्यावर बांधायचे आहे त्या मजबूत पायासारखे असले पाहिजे; इमारतीच्या सांगाड्याचा भार त्यावर टाकण्याआधीच तो तेथे असावयास हवा. अशा प्रकारे आपण—अजूनही, परीक्षा येण्याअगोदरच—आपल्या अनेक प्रार्थनांच्या सुखकर निष्पत्तिसाठी हातभार लावू शकतो.
सक्रिय सहभाग घ्या!
दाविदाच्या देवासोबत असलेल्या नातेसंबंधाने मुख्य भूमिका बजावली हे खरे असले तरीही, त्याची प्रार्थना ऐकली जाण्यासंबंधाने त्याने स्वतः केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालण्याजोगे नव्हते हे सुद्धा त्याने ओळखले. त्याउलट, दाविदाने सक्रिय सहभाग घेतला व हे त्याच्या प्रार्थनेनंतर त्याने केलेल्या सुज्ञ कृतीने स्पष्ट होते.
दाविदाच्या निष्ठावान मित्रांपैकी एक, हूशय नामक अर्की होता. हूशय पळ काढणाऱ्या राजाला, जैतून पर्वतावर भेटला. दाविदाच्या वनवासात त्याच्यासोबत राहण्याची इच्छा असूनही, नगरातच राहावे असा दाविदाने आग्रह केला असता हूशय कबूल झाला. त्याला अबशालोमाबद्दल निष्ठावानपणाचे ढोंग, कावेबाज सल्लागार अहीथोफेलाची मसलत फोल करण्याचा प्रयत्न व दाविदाला घटनांची माहिती द्यायची होती. (२ शमुवेल १५:३२-३७) अपेक्षा केल्याप्रमाणे, हूशय अबशालोमाचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाला. आता यहोवा हस्तक्षेप करणार होता.
चतुर, पण कपटी अहीथोफेलाने एक चलाख योजना सुचवली. त्याने दाविदावर त्याच रात्री, तो पळ काढत असताना, गोंधळलेला व बेसावध असताना हल्ला करण्यासाठी १२,००० माणसे देण्यासाठी अबशालोमास आर्जविले—असा प्राणघातक हल्ला जो एका यशस्वी विद्रोहास त्याच्या शेवटास आणणार होता! परंतु, अबशालोमाने याबाबतीत हूशयकडून सल्ला मागितला याचे अनेकांना आश्चर्य वाटले. त्याने अबशालोमास काही वेळ खर्च करून पुरुषांची प्रचंड सेना उभी करावी व त्याचे नेतृत्व दुसऱ्या कोणी नव्हे तर स्वतः अबशालोमाने करावे असा सल्ला दिला. यहोवाच्या निर्देशनाने, हूशयचा सल्ला मान्य करण्यात आला. हूशयचा सल्ला मानण्याने पराजय निश्चित आहे हे स्पष्टपणे कळल्यामुळे, अहीथोफेल आपल्या घरी परतला व त्याने आत्महत्या केली.—२ शमुवेल १७:१-१४, २३.
यहोवाने दाविदाच्या प्रार्थनेचे—अगदी त्याने प्रार्थना केल्याप्रमाणे उत्तर दिले यात कोणतीही शंका नव्हती. प्रार्थनेच्या एकवाक्यतेत कार्य करण्याचे दाविदाचे उदाहरण, देवाकडे प्रार्थनेकरवी मदत मागणाऱ्या सर्वांना एक बहुमोल धडा शिकवते.
यहोवा त्याची भूमिका पार पाडेल
येशूने त्याच्या अनुयायांना त्यांच्या रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करण्यास शिकविले व त्यांनी देवाच्या आस्थांना प्राथमिकता दिल्यास, देव त्यांच्या गरजा पूर्ण करील याची हमीही दिली हे खरे आहे. (मत्तय ६:११, ३३) उदाहरणार्थ, जर कोणी बेरोजगार असेल तर त्याने उदरनिर्वाहासाठी काम शोधण्याचा किंवा काम निर्माण करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करून त्याच्या प्रार्थनेच्या सुसंगतेत कार्य केले पाहिजे.
आमच्या प्रार्थनांचा विषय काहीही असला तरी, तिच्या निष्पत्तिसाठी हातभार लावण्याची सर्वांची क्षमता वेगवेगळी असते. कधी कधी आपण पुष्कळ काही करू शकतो तर कधी कधी फारच थोडे किंवा काहीच करू शकत नाही. आपण काय हातभार लावू शकतो किंवा लावू शकत नाही ही बाब महत्त्वाची नसून, आपण होता होईल तितके करत आहोत किंवा नाही हे महत्त्वाचे आहे.
यहोवा आमच्या विविध परिस्थिती व क्षमता जाणतो याबद्दल आपण खात्री बाळगू शकतो. आम्हाला काय शक्य आहे हे तो चांगले समजू शकतो व आपण साध्य करू शकतो त्यापेक्षा अधिक करण्याची अपेक्षा तो आम्हापासून कधीच करणार नाही. आपण पुष्कळ काही किंवा फार थोडके करू शकलो तरी, यहोवा सगळ्या उणीवा भरून काढेल. तो आमच्या प्रयत्नांची कदर करतो व त्यांना पाठिंबा देतो, तसेच सम्मिलित असलेल्या सर्वांसाठी सर्वोत्तम परिणाम साध्य करण्यासाठी आमच्या प्रयत्नांसोबत तो स्वतः देखील कार्य करील.—स्तोत्र ३:३-७.
कठीण परिस्थितीत असून देखील, दावीद राजा खात्रीने घोषित करू शकला: “तारण परमेश्वराच्या [यहोवाच्या] हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो.” (स्तोत्र ३:८) यहोवाच्या सामर्थ्याबद्दल खात्री असणे व त्यासोबतच आमची मोठी किंवा लहान भूमिका पार पाडणे, आमच्या प्रार्थनांच्या यशस्वी निष्पत्तिला कारणीभूत ठरो.