प्रेमाने एकत्र राहणे
प्रिय आजी व आजोबा,
तुम्ही बरे आहात का? मला वाटतं मला सर्दी होत आहे.
त्या दिवशी माझ्यासोबत खेळलात त्यासाठी आभार मानते. तुम्ही मला बागेत व आंघोळ करण्याच्या सार्वजनिक ठिकाणी नेले. मला खूप मजा वाटली.
पुढच्या वर्षी, फेब्रुवारी ११ तारखेला आमच्या शाळेत संगीत व नाटकाचा कार्यक्रम आहे. तुम्ही पुन्हा येऊ शकत असाल तर कृपया या.
आजी, आजोबा तुम्ही येता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो.
स्वतःची काळजी घ्या, व जपून राहा. आता थंडी सुरू होईल म्हणून तुम्हाला सर्दी होऊ नये म्हणून काळजी घ्या.
तुम्ही माझ्यासोबत येऊन खेळाल त्या वेळेची मी वाट पाहत आहे. कृपया युमी व मॉसॉकीला माझा सलाम सांगा.
मीकॉ (जपानी)
तुमच्या नातवंडाने तुम्हाला कधी असे पत्र लिहिले का? असल्यास, तुम्हाला ते मिळाल्यावर नक्कीच अतिशय आनंद झाला असेल. अशी पत्रे नातवंडे व आजीआजोबांमधील सुंदर व प्रेमळ नातेसंबंधाचा पुरावा असतात. परंतु अशाप्रकारचा नातेसंबंध प्रस्थापित करण्यास, टिकवून ठेवण्यास व बळकट करण्यास कशाची गरज आहे? तसेच, तो तीनही पिढ्यांना फायदेकारक कसा ठरू शकतो?
प्रीती—“पूर्णता करणारे बंधन”
रॉय व जीन हे दोन ब्रिटिश आजीआजोबा म्हणतात: “मस्तकपद ओळखणे व परस्पराशी प्रेमाने व्यवहार करणे ही प्रमुख तत्त्वे आहेत असे आम्हाला वाटते.” या दोन यहोवाच्या साक्षीदारांनी कलस्सैकर ३:१४ या शास्त्रवचनाचा विशेषतः उल्लेख केला, त्यामध्ये ख्रिस्ती प्रीतीचे वर्णन “पूर्णता करणारे बंधन” असे करण्यात आले आहे. प्रीती, आदर, विचारपूर्वकतेने दिलेले लक्ष, प्रेम व कौटुंबिक ऐक्य निर्माण करते. पप्पा कामावरून घरी येतात तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांचे प्रेमाने स्वागत करण्यास जाते. कुटुंबामध्ये प्रेम असेल, तर आजीआजोबा येतात तेव्हा देखील हीच गोष्ट घडते. आनंदाने बागडणारे मूल “आजीआजोबा आले!” असे म्हणते. त्या सायंकाळी, ते संपूर्ण कुटुंब रात्रीच्या जेवणाला बसते व आजोबा स्थानिक परंपरेनुसार त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या मेजाच्या प्रमुख ठिकाणी बसतात. या प्रेममय चित्रामध्ये तुम्ही स्वतःची व तुमच्या कुटुंबाची कल्पना करू शकता का? तुम्ही या आशीर्वादाचा आनंद लुटता का?
“पिकलेले केस शोभेचा मुकुट होत”
अर्थात, आजीआजोबांबद्दल प्रेम व आदर या दोन्ही गोष्टी केवळ विशेष प्रसंगीच नव्हे, तर नेहमी प्रदर्शित केल्या पाहिजेत. या कारणास्तव, मुलांना सतत शिक्षण देण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये मुले त्यांच्या पालकांनी मांडलेल्या उदाहरणाचे अनुकरण करून नातेवाईकांना व इतरांना प्रेम दाखवण्यास शिकतात. या विषयावर मुलाखत घेतलेल्या पुष्कळांनी सांगितल्याप्रमाणे, पालकांचे उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. नायजेरिया येथील बेनिन शहरातील, मकाया नावाचे एक पिता म्हणतात: “माझ्या सासू-सासऱ्यांचा आदर करण्याच्या उदाहरणाने माझ्या मुलांना देखील नम्र व आदरणीय असण्यास मदत दिली आहे असे मला वाटते. मी माझ्या सासू-सासऱ्यांना ‘पप्पा’ व ‘आई’ म्हणतो. माझ्या स्वतःच्या पालकांप्रमाणेच मी त्यांचा आदर करतो हे माझी मुले ऐकतात व पाहतात.”
नातवंडे आजीआजोबांना आदर देत नाहीत तेव्हा, नातवंडांची ती कमजोरी आहे याचा इतका नव्हे तर पालक त्यांना सुधारत नाहीत त्याचा त्यांना अधिक राग येतो. इटली, रोममधील देमेत्रियो नावाचे आजोबा म्हणतात: “माझी मुलगी व जावई ज्या तऱ्हेने आमच्या नातवंडांना आम्हाला सन्मान व आदर देण्यास शिकवतात त्यावरून त्यांचे आमच्यावर किती प्रेम आहे हे मी पाहू शकतो.” काहीवेळेस, नातवंडे आजीआजोबांशी जणू ते त्यांच्याच वयाचे खेळणारे सोबती असल्याप्रमाणे किंवा श्रेष्ठत्वाची मनोवृत्ती बाळगून कदाचित फाजील मोकळेपणाने वागतील. अशा कोणत्याही प्रकारच्या मनोवृत्तीला सुधारण्याची जबाबदारी पालकांची आहे. पॉल हे नायजेरियन साक्षीदार म्हणतात: “सुमारे एक वर्षापूर्वी माझी मुले माझ्या आईला तिरस्काराने वागवत होती. मी हे निरीक्षिल्यावर त्यांना नीतिसूत्रे १६:३१ वाचून दाखवले: ‘पिकलेले केस शोभेचा मुकुट होत,’ व त्यांची आजी ही माझी आई आहे याची देखील मी त्यांना आठवण करून दिली. ते माझा आदर करतात त्याचप्रमाणे तिचाही आदर त्यांनी केला पाहिजे. मी त्यांच्यासोबत तुमचे तारुण्य—त्यातून सर्वोत्तम गोष्टींचा लाभ घेणेa (इंग्रजी) या पुस्तकाच्या १० व्या अध्यायाचा अभ्यास देखील केला. त्याचे शीर्षक ‘तुम्ही तुमच्या पालकांबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगता?’ हे होते. आता त्यांना त्यांच्या आजीला आदर देण्यात काहीच अडचण वाटत नाही.”
कौटुंबिक नातेसंबंध विकसित करण्याचे लाभ
कौटुंबिक सदस्य एकमेकांपासून दूर राहत असले, तरी परस्परातील प्रेम विकसित केले जाऊ शकते. स्टीफन नावाचे एक नायजेरियन आजोबा म्हणतात: “आम्ही आमच्या प्रत्येक नातवंडाला पत्र लिहितो. हे काम आपल्याकडून खूप मागणी करते परंतु, नातवंडांसोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करून टिकवून ठेवण्यामध्ये मिळणारे प्रतिफळ खूप उत्तम होते.” या बाबतीत पालकांचे प्रयत्न अत्यावश्यक आहेत. इतरजण, त्यांच्या परिस्थितीप्रमाणे फोनद्वारे दळणवळण राखतात.
इटली, बारी येथील ११ नातवंडे असणारे जूझेप्पा नावाचे आजोबा, आपल्या जवळच्या कौटुंबिक सदस्यांसोबत ऊबदार मित्रत्व कसे विकसित करतात याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात: “सध्या, माझ्या ‘घराण्याच्या’ सहा कुटुंबांपैकी तीन दूर ठिकाणी राहतात. परंतु त्यामुळे आमच्यामधील सुखकारक व्यवहार व एकत्रीकरणांमध्ये अडथळा येत नाही. आम्हा सर्व २४ जणांची, वर्षातून एकदा तरी एकत्र येण्याची पद्धत आहे.”
आजीआजोबा एकटे राहत असल्यास, भेटी न देणे, फोन न करणे, किंवा कुटुंबाच्या सदस्यांसोबत नियमित पत्रव्यवहार नसल्यास, नातेसंबंध विशेष सलगीचा राहत नाही. प्रेम सतत प्रदर्शित केले पाहिजे. मध्यमवयस्क असणाऱ्या किंवा चांगले आरोग्य असणाऱ्या आजीआजोबांना, ताकदवान किंवा स्वावलंबी असेपर्यंत एकटे राहावयास आवडते. परंतु, त्यांनी स्वतःला कौटुंबिक सदस्यांपासून पूर्णपणे दूर ठेवले, तर त्यांना प्रेमाची अधिक गरज भासते त्यावेळी ती लागलीच पुरवली जाणार नाही असे त्यांना आढळून येईल.
मायकल हे नायजेरियन आजोबा आणखी एक उपयोगी सूचना देतात: “मी येशूचा सुवर्ण नियम लागू करतो—इतरांनी तुम्हाला जसे वागवावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांना वागवा. या कारणास्तव, माझी मुले माझ्यावर अपार प्रेम करतात. आमच्यामध्ये उत्तम दळणवळण आहे.” ते पुढे म्हणतात: “माझ्या कोणत्याही नातवंडाने मला संताप येण्याजोगे वर्तन केले, तर आवश्यकता भासल्यावर मी त्यांच्याशी बोलतो. परंतु, मी दुर्लक्ष करू शकतो असे काही असल्यास, मी बहुतेकवेळा ती गोष्ट विसरून जातो.”
आजीआजोबांनी छोटे बक्षीस व त्यांच्या भावना व्यक्त करणारे छोटेमोठे कृत्य केले तर एक सकारात्मक प्रतिक्रिया दाखवली जाते. सतत तक्रारी करण्याऐवजी, दयाळु, उत्तेजनदायक शब्द कौटुंबिक जीवनाला सुखी बनवू शकतात. नातवंडांना रमविणारे खेळ व उपयुक्त छोटी कामे शिकवणे, बायबलच्या किंवा कुटुंबाच्या गोष्टी सांगणे असे करण्यात त्यांना वेळ दिल्यास, ऊबदार व कायमच्या आठवणी निर्माण होतात. या लहान परंतु महत्त्वपूर्ण गोष्टी जीवनाला अधिक आनंदी बनवतात.
परस्परातील आदराचे लाभ
डॉक्टर गॉसपॉरे वेल्ला म्हणतात, “मुलांचे संगोपन करण्याच्या पालकांच्या अधिकाराला आजीआजोबांनी विरोध करू नये किंवा त्याच्याशी बरोबरी करू नये म्हणून त्यांनी काळजीपूर्वक असावे.” ते पुढे म्हणतात, “नाहीतर ते आजीआजोबांचे काम सोडून आजीआजोबा-पालक असे बनतात.” हा सल्ला, पालकांना त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देण्याची पहिली जबाबदारी आहे या शास्त्रवचनांच्या गोष्टींच्या सुसंगतीत आहे.—नीतिसूत्रे ६:२०; कलस्सैकर ३:२०.
आपल्या जीवनातील अनुभवामुळे आजीआजोबांना सल्ला देणे सोपे जाते. तथापि, त्यांनी गरज नसलेला किंवा काहीवेळेस नको असलेला सल्ला न देण्याबाबत यात दक्षता बाळगली पाहिजे. रॉय व जीन म्हणतात: “मुलांना प्रशिक्षण देण्याची व शिस्त देण्याची सर्वप्रथम जबाबदारी पालकांची आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. काहीवेळेस, ते थोडेफार कडक आहेत किंवा काही प्रसंगी मुळीच कडक नाहीत असे एखाद्याला वाटू शकेल. यास्तव, मध्ये पडण्याचा खरा मोह टाळण्याची गरज आहे.” दोन ब्रिटिश आजीआजोबा, मायकल व शीना याच मुद्याला पुष्टी देऊन म्हणतात: “मुलांनी आम्हाला सल्ला विचारला तर आम्ही तो देतो, मात्र त्यांनी तो स्वीकारावाच अशी अपेक्षा करत नाही किंवा त्यांनी तो स्वीकारला नाही तर आम्ही चिडतही नाही.” वृद्ध पालकांनी आपली विवाहित मुले व मुलींवर भरवसा करावा हे उत्तम असेल. अशाप्रकारचा भरवसा तीनही पिढ्यांमधील संबंधाला सुधारतो.
इंग्लंडच्या दक्षिण भागात राहणारे विवियन व जेन त्यांचा मुलगा व सून यांच्यासोबत राहतात व त्यांनी त्यांच्या नातवंडांना दिलेली शिस्त नेहमी मान्य करण्याचा प्रयत्न करतात: “कदाचित आमचे वेगळे विचार असतील तेथे आम्ही स्वतःच्या कल्पना दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही त्यांच्या आई वडिलांशी सहमत आहोत हे जाणल्यावर, मुले ‘एकाला दुसऱ्याच्या विरोधात करण्याचा प्रयत्न कधीच करत नाहीत.’” पालकांची उपस्थिती नसताना देखील आजीआजोबांनी नातवंडांना शिस्त लावण्याबद्दल दक्ष असावे. ब्रिटन येथील हेरॉल्ड म्हणतात: “पालकांची उपस्थिती नसताना शिस्त देण्याची गरज आहे असे आजीआजोबांना वाटले, तर त्यांनी याची चर्चा पालकांसोबत आधीच केली पाहिजे.” हेरॉल्ड पुढे म्हणतात, नातवंडाला प्रेमाने परंतु तरीही खंबीरपणे सांगितलेली गोष्ट किंवा “एखादा पालक कशाची अपेक्षा करतो” केवळ याचीच आठवण देणे देखील पुरेसे असते.
ख्रिस्टोफर या नायजेरियन आजोबांना स्वतःच्या मुलामध्ये काही चूक आढळल्यास, ते आपल्या नातवंडांसमोर ती बोलून दाखवत नाहीत: “पालकांसोबत एकटे असताना मी आवश्यक तो सल्ला देतो.” आजीआजोबांच्या भूमिकेला आदर दिला जातो याची खात्री करण्यासाठी पालकांनी देखील त्यांची भूमिका पार पाडली पाहिजे. इटली, रोम येथे राहणारे कार्लो नावाचे पिता म्हणतात, “मुलांसमोर आजीआजोबांच्या किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांच्या कमतरतेविषयी तक्रार करू नये हे महत्त्वाचे आहे.” हिरोको ही जपानी माता म्हणते: “सासू-सासऱ्यांशी माझी कोणतीही समस्या उद्भवली तर मी प्रथम माझ्या पतीसोबत त्याची चर्चा करते.”
आजीआजोबांची शैक्षणिक भूमिका
प्रत्येक कुटुंबाचा इतिहास, पद्धती किंवा अनुभव वेगवेगळे असतात व त्यामुळे प्रत्येक कुटुंब इतरांपासून भिन्न असते. सामान्यतः, आजीआजोबा कुटुंबाचा मागील इतिहास सांगतात. एका आफ्रिकी म्हणीनुसार, “प्रत्येक मरण पावणारा वृद्ध मनुष्य नाश पावणाऱ्या एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे आहे.” आजीआजोबा नातेवाईकांच्या व महत्त्वपूर्ण कौटुंबिक घटनांबद्दलच्या आठवणी तसेच कुटुंबाचा पाया मजबूत करून कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या मूल्यांविषयी सांगतात. एक तज्ज्ञ म्हणतात, बायबलच्या नैतिक मार्गदर्शनाचा समावेश न करता, “तरुण लोकांना कुटुंबाविषयी कोणतीच आठवण नसेल, तर त्यांच्याआधी झालेल्या अनुभवाच्या पायाविना, मूल्यांविना, अनिश्चित व असुरक्षितेत त्यांचे संगोपन होते.”—गॉएटॉनो बॉर्लेटॉ, नोनी ए नेपोटे (आजीआजोबा व नातवंडे).
आईवडील आणि इतर नातेवाईक तरुण असतानाच्या गोष्टी ऐकावयास नातवंडांना आवडतात. फोटोंचा अल्बम पाहणे अतिशय बोधपर व मनोरंजक असू शकते. फोटोंमध्ये दाखवल्याप्रमाणे आजीआजोबा गतकाळातील घटनांविषयी काही गोष्टी सांगतात तसे, किती प्रेम व ऊबदारपणा निर्माण होऊ शकतो.
यहोवाचे साक्षीदार असलेले दोन ब्रिटिश आजीआजोबा, रेज व मॉली म्हणतात: “नातवंडांसोबत राहून काही कार्यहालचाली करण्यामध्ये व त्यांच्या आईवडिलांसोबतच्या जवळच्या बंधनाआड न येता पुष्कळ प्रश्नांची उत्तरे देणे, सोबत खेळणे, वाचणे, कसे लिहायचे ते शिकवणे, ते वाचत असताना त्यांचे ऐकणे, त्यांच्या शाळेच्या बाबींकडे प्रेमळ आस्थेने लक्ष देणे याद्वारे आम्हाला आनंद मिळाला आहे.”
मुले व नातवंडांच्या केवळ शारीरिक हिताबद्दल चिंता करणे ही घोडचूक पुष्कळ आजीआजोबा व पालक करू शकतात. वर उल्लेखिलेले रेज व मॉली म्हणतात: “देव वचनाच्या खऱ्या ज्ञानामध्ये आपल्या मुलांचे व नातवंडांचे संगोपन होत असलेले पाहणे हाच आपण त्यांना देऊ शकणारा सर्वात मोठा वारसा आहे.”—अनुवाद ४:९; ३२:७; स्तोत्र ४८:१३; ७८:३, ४, ६.
ईश्वरी शिक्षणाच्या एकवाक्यतेत वागणे
पवित्र बायबल, देवाचे वचन, लोकांवर “सक्रिय” ठरते. त्यांच्यावर नियंत्रण करण्याचे किंवा स्वार्थ व गर्वासारख्या विभाजक गुणलक्षणांना काढून टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. (इब्रीयांस ४:१२) यास्तव, जे त्याच्या शिकवणी अनुसरतात ते कुटुंबात शांती व ऐक्याचा आनंद लुटतात. आपसात असणारी तफावत काढून टाकण्यास तीनही पिढ्यांना मदत करणाऱ्या अनेक शास्त्रवचनांपैकी एक शास्त्रवचन फिलिप्पैकर २:२-४ हे आहे. ते सर्वांना, प्रीती व लीनता प्रदर्शित करण्यास, ‘कोणीहि आपलेच हित न पाहता दुसऱ्यांचेहि पाहून’ ऐक्य राखण्यास, उत्तेजन देते.
ईश्वरी शिक्षणाच्या एकवाक्यतेत कार्य करून, पालक व नातवंडे दोघेही, भौतिकरित्या, भावनिकरित्या व आध्यात्मिकरित्या ‘आपले पालक व आजीआजोबांचे उपकार फेडावयास शिकावे’ ह्या आर्जवण्यास गंभीरतेने घेतात. (१ तीमथ्य ५:४) यहोवाचे हितकर भय बाळगून, ते आजीआजोबांबद्दल सखोल आदर प्रदर्शित करतात व देवाचे हे शब्द लक्षात ठेवतात: “पिकल्या केसासमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग.” (लेवीय १९:३२) आजीआजोबा आपल्या वंशजांच्या कल्याणासाठी प्रयत्न करून चांगुलपणा प्रदर्शित करतात: “चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांस वतन ठेवितो.”—नीतिसूत्रे १३:२२.
“पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत,” असे नीतिसूत्रे १७:६ म्हणते त्याप्रमाणे, आजीआजोबा, पालक व नातवंडे एकत्र राहत असले किंवा नसले तरी प्रीती व आदर यावर आधारित असलेल्या प्रेमळ नातेसंबंधांद्वारे ते परस्परांसाठी लाभ मिळवू शकतात. ( g95 7/8)
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. द्वारे प्रकाशित
[८ पानांवरील चित्र]
कुटुंबाचे पुनर्मिलन कौटुंबिक ऐक्याला हातभार लावू शकते
[९ पानांवरील चित्र]
तुम्ही तुमच्या आजीआजोबांना पत्र लिहिता तेव्हा त्यांना उत्तेजन मिळते
[१० पानांवरील चित्र]
तुमच्या नातवंडांबरोबर कौटुंबिक फोटोचा अल्बम पाहणे हा माहिती समृद्ध करणारा अनुभव आहे