वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. १२-१५
  • तुम्ही श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय करू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय करू शकता?
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय सर्वज्ञात आहे?
  • “शुभ सकाळ! तुमचा श्‍वास काय म्हणतो?”
  • श्‍वासाची दुर्गंधी कशी टाळावी
  • दंतवैद्याकडे कागेलेपाहिजे?
    सावध राहा!—२००७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२००६
  • कोवळ्या दातांची काळजी
    सावध राहा!—२००१
  • तुम्हाला दातांच्या कवळीची आवश्‍यकता आहे का?
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. १२-१५

तुम्ही श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय करू शकता?

जगातील सर्वात सामान्य असणाऱ्‍या तक्रारींपैकी एक, कधी ना कधी ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला पीडित करणारी तक्रार आहे असे म्हटले जाते. त्यामुळे शरम, निराशा व दुःख वाटू शकते.

धंद्याच्या क्षेत्रात, ते हॅलीटॉसीस या नावाने जाणले जाते. ते लॅटिन शब्द हॅलिटस म्हणजे “श्‍वास” व विकृती असणाऱ्‍या परिस्थितीला सूचित होणाऱ्‍या -ओसीस या प्रत्ययातून आले आहे. काहीजण त्यास तोंडाला येणारा घाण वास देखील म्हणतात. परंतु, बहुतेक लोक त्यास श्‍वासाची दुर्गंधी या नावाने ओळखतात.

तुमच्या श्‍वासाची दुर्गंधी येते का? इतरांच्या श्‍वासाची दुर्गंधी ओळखण्यास तुम्हाला जड जात नसले तरी स्वतःच्या श्‍वासाची दुर्गंधी तुम्हाला ओळखू येत नसेल. अमेरिकी दंत संघटना याचे नियतकालिक जाडा स्पष्ट करते, आपल्याला स्वतःच्या श्‍वासाच्या दुर्गंधीची सवय होते, “श्‍वासाची अतिशय दुर्गंधी येणाऱ्‍या लोकांनाही या समस्येची जाणीव नसेल.” यास्तव, इतर कोणा व्यक्‍तीने आपल्या लक्षात आणून दिल्यावरच आपल्याला स्वतःच्या श्‍वासाच्या दुर्गंधीची जाणीव होते. किती लाजिरवाणी गोष्ट!

ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे या वास्तविकतेमुळे कोणतेही समाधान मिळत नाही. श्‍वासाची दुर्गंधी सामान्यपणे अपमानकारक व अस्वीकारयोग्य समजली जाते. काही घटनांमध्ये, त्यामुळे गंभीर भावनात्मक दुरवस्था देखील संभावू शकते. इस्राएलमध्ये तेल अवीव विद्यापीठातील मुख सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. मेल रोसनबर्ग स्पष्ट करतात: “खऱ्‍या किंवा ओळखण्यात आलेल्या तोंडाच्या घाण वासामुळे सामाजिक एकाकीपणा, घटस्फोटाच्या कारवाया तसेच आत्महत्येचा देखील विचार केला जाऊ शकतो.”

श्‍वासाच्या दुर्गंधीबद्दल काय सर्वज्ञात आहे?

श्‍वासाची दुर्गंधी चांगले आरोग्य नसल्याचे सूचक आहे असे आरोग्य तज्ज्ञांनी फार पूर्वी ओळखले होते. त्या कारणास्तव, प्राचीन काळापासून डॉक्टरांनी मानवी मुखाच्या वासाचे परीक्षण केले आहे.

सुमारे दोनशे वर्षांआधी, प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ ऑन्ट्‌वन-लोरॉन लावॉईसीयर यांनी मानवी श्‍वासाच्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी एका श्‍वास परीक्षकाचा शोध लावला. तेव्हापासून शास्त्रज्ञांनी सुधारित नमुने तयार केले आहेत. आज, कॅनडा, इस्राएल, जपान व नेदरलंडमध्ये हॅलीमीटर वापरले जाते व ते तोंडातील घाण वासाच्या प्रमाणाची मोजणी करते. न्यूझीलंडमध्ये, शास्त्रज्ञांनी प्लाक-संवर्धन केंद्रे निर्माण केली आहेत, त्यांना कृत्रिम मुख देखील म्हटले जाते. थुंकी, प्लाक, सूक्ष्मजंतू व श्‍वासाची दुर्गंधी यांसोबत ते विशिष्ट मानवी मुखासारखेच वातावरण निर्माण करते.a

आधुनिक तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञ आपल्या श्‍वासाविषयी पुष्कळ काही शिकले आहेत. उदाहरणार्थ, वैज्ञानिक अमेरिकी (इंग्रजी) या नियतकालिकानुसार, “संशोधकांनी आता मानवाच्या श्‍वासामध्ये सुमारे ४०० वायुरूपी कार्बनी पदार्थ दाखवले आहेत.” तथापि, हे सर्वच पदार्थ घाण वास उत्पन्‍न करत नाहीत. श्‍वासाची दुर्गंधी हायड्रोजन सल्फाईट व मेथील मरकॅप्टन या दोन मुख्य गोष्टींमुळे निर्माण होते. या वायुंमुळे आपल्या श्‍वासाला स्कंक नावाच्या प्राण्याला येतो तसा दुर्गंध येतो असे म्हटले गेले आहे.

मानवाच्या मुखात ३०० पेक्षा अधिक सूक्ष्मजंतू घर करून राहू शकतात. टफ्ट्‌स विद्यापीठ आहार व पोषण पत्र असे म्हणते: “मुख हे प्रकाशरहित, उष्ण व ओलसर असून दुर्गंधी निर्माण करणाऱ्‍या सूक्ष्मजंतूंची भरभराट होण्यासाठी योग्य वातावरण आहे.” परंतु, केवळ चार जाती श्‍वासाच्या दुर्गंधीसाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. ते तुमच्या तोंडात राहतात परंतु, संभवतः तुम्हाला त्यांची नावे माहीत नाहीत. ते विलोनेला अल्कालेसेन्स, फ्यूसोबॅक्टेरियम न्यूडेटम, बॅक्टेराईड्‌स मेलानीनोजेनीकस व क्लेबसीला न्यूमोनाये हे आहेत. ते तोंडातील अन्‍नाचे कण, मृत पेशी व इतर पदार्थ खातात. सूक्ष्मजंतूंच्या या कार्यामुळे दुर्गंधी वायू उत्पन्‍न होतात. कचरा कुजतो त्यावेळी जे घडते त्याच प्रकारची ही प्रक्रिया आहे. उचितपणे, जे पिरीओडेन्टल हे दंतविषयक नियतकालिक स्पष्ट करते: “बहुतेक घटनांमध्ये, सूक्ष्मजीव कुजत असल्यामुळे [कार्बनी पदार्थांचे कुजणे] हॅलीटोसिस तोंडातच सुरू होते.” त्याकडे दुर्लक्ष केल्यास, या प्रक्रियेमुळे दात किडू शकतात व हिरड्यांचा रोग होऊ शकतो.

“शुभ सकाळ! तुमचा श्‍वास काय म्हणतो?”

तोंडामध्ये कुजण्याची ही प्रक्रिया झोपेच्या वेळी अधिकच वाढते. का बरे? दिवसा, ऑक्सीजनयुक्‍त व काहीसे आम्लयुक्‍त थुंकीने तोंड वारंवार साफ केले जाते व त्यामुळे सूक्ष्मजंतू धुतले जातात. तथापि, झोपेच्या वेळी प्रत्येक तासाला थुंकी निर्माण होण्याचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा १/५० पटीने कमी होते. एक नियतकालिक त्याबद्दल असे म्हणते, कोरडे तोंड “१.६ खरब पेक्षा अधिक सूक्ष्मजंतूंचा साठलेल्या पाण्याचा तलाव होतो” व त्याने हा प्रसिद्ध “सकाळचा दुर्गंध” व त्यासोबत त्याची घाणेरडी चव निर्माण होते.

तुम्ही जागे असताना तणावामुळे देखील थुंकीचे प्रमाण कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, अस्वस्थ झालेल्या जाहीर वक्‍त्‌याचे तोंड बोलत असताना कोरडे पडते व त्यामुळे अतिशय वाईट प्रकारचा हॅलीटोसिस होतो. अनेक रोगांचा दुष्परिणाम किंवा लक्षण म्हणून देखील तोंड कोरडे पडते.

परंतु श्‍वासाची दुर्गंधी नेहमीच मुखातील सूक्ष्मजंतूंच्या कार्यामुळे निर्माण होत नसते. खरे म्हणजे, तोंडाचा घाण वास बहुतेक वेळा विविध परिस्थितींचे व आजारांचे चिन्ह असते. (पृष्ठ २२ वरील पेटी पाहा.) या कारणास्तव, सतत उद्‌भवणाऱ्‍या अनिश्‍चित श्‍वासाच्या दुर्गंधीबाबतीत, वैद्यकीय मदत घेणे सर्वात उत्तम आहे.

श्‍वासाची दुर्गंधी पोटात देखील होऊ शकते. तथापि, सामान्यपणे समजले जाते त्याच्या अगदी विरूद्ध हे क्वचितच घडते. बहुतेक वेळा, फुफ्फुसांमधून दुर्गंध तुमच्या तोंडामध्ये येतो. कसा? काही अन्‍न पदार्थ जसे की, लसूण किंवा कांदे यांचे पचन झाल्यावर ते रक्‍तातून फुफ्फुसांमध्ये पाठवले जातात. त्यांचा वास तुमच्या श्‍वसन मार्गातून तुमच्या तोंडातून व नाकातून जाऊन बाहेर पडतो. आरोग्य (इंग्रजी) या नियतकालिकानुसार, “लोकांनी आपल्या पायांच्या तळव्यांवर लसणाच्या पाकळ्या रगडल्याने किंवा न चावता त्या गिळल्याने देखील तोंडातून लसणाचा वास येतो” हे अभ्यासांद्वारे सिद्ध झाले आहे.

मद्याचे सेवन केल्याने देखील तुमच्या रक्‍ताला व फुफ्फुसांना मद्याचा वास येईल. असे घडते तेव्हा, ही स्थिती सुधारण्यासाठी थांबून राहण्याशिवाय तुम्ही प्रत्यक्षात काही करू शकत नाही. काही अन्‍नपदार्थांचे वास तुमच्या शरीरात ७२ तासांपर्यंत राहू शकतात.

श्‍वासाची दुर्गंधी कशी टाळावी

श्‍वास ताजा करणारा गोड पदार्थ चघळत राहिल्याने श्‍वासाची दुर्गंधी सुधारली जाऊ शकत नाही. श्‍वासाची दुर्गंधी बहुधा तोंडामध्ये सूक्ष्मजंतूंच्या कार्यामुळे होते हे लक्षात ठेवा. तोंडामध्ये राहणारे अन्‍नाचे कण करोडो सूक्ष्मजंतूंकरता मेजवानी बनते हे नेहमी लक्षात ठेवावे. यास्तव, तोंड स्वच्छ ठेवणे व अशा प्रकारे सूक्ष्मजंतूंची संख्या कमी करणे हा श्‍वासाची दुर्गंधी काढून टाकण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. नियमितपणे दातातून अन्‍नाचे कण व प्लाक काढल्याने हे केले जाते. कसे? जेवणानंतर व झोपण्याआधी दात घासणे महत्त्वपूर्ण आहे. परंतु, दात घासणे हा त्यापैकीचा केवळ एक मार्ग आहे.

दाताच्या काही भागांवर ब्रश पोहंचू शकत नाही. यास्तव, दिवसातून एकदा तरी फ्लॉसिंग करणे अत्यावश्‍यक आहे. जिभेवरून हळू ब्रश फिरवण्याची शिफारस देखील तज्ज्ञ करतात. ती सूक्ष्मजंतूंची आवडती लपण्याची व उत्पत्तीची जागा आहे. नियमितपणे दंतवैद्याकडून व दंत आरोग्य तज्ज्ञाकडून परीक्षण करणे व दातांवरील कीट काढणे देखील आवश्‍यक आहे. यापैकी कोणतीही पावले चुकवल्याने श्‍वासाची दुर्गंधी व कालांतराने गंभीर दाताचे व हिरड्यांचे रोग होऊ शकतात.

तुमचा श्‍वास ताजा ठेवण्यासाठी काही तात्पुरते उपाय देखील केले जाऊ शकतात. पाणी प्या, साखर नसलेला चुईंग गम चघळणे—तुमच्या थुंकीचे प्रमाण वाढवील असे काहीतरी करा. थुंकी नैसर्गिक माऊथवॉशचे कार्य करून सूक्ष्मजंतू धुऊन टाकते व त्यांच्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते.

बाजारात उपलब्ध असणारे माऊथवॉश मदतदायी ठरू शकतात, परंतु श्‍वासाची दुर्गंधी काढून टाकण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये असे अलीकडील अभ्यास दाखवून देतात. खरे म्हणजे, मद्यार्कयुक्‍त माऊथवॉशेसने वारंवार गुळण्या केल्यामुळे तोंड कोरडे पडू शकते. ग्राहकाला उपलब्ध असलेले तोंड स्वच्छ करणारे सर्वात परिणामकारी उत्पादने केवळ २८ टक्क्याने प्लाक काढून टाकू शकतात. यास्तव, तुमच्या आवडत्या माऊथवॉशने तोंड स्वच्छ केल्यावरही तुमच्या तोंडात मूळचे ७० टक्के सूक्ष्मजंतू अजूनही असतील. ग्राहकांचे अहवाल (इंग्रजी) हे नियतकालिक स्पष्ट करते, अनेक प्रयोग करत असताना माऊथवॉशने “तोंड धुतल्यावर १० मिनिटे व एका तासात तशीच श्‍वासाची दुर्गंधी पुन्हा येत होती.” पुष्कळ राष्ट्रांमध्ये, केवळ औषधयोजनेद्वारे उपलब्ध केले जाणारे सर्वात शक्‍तिशाली माऊथवॉश देखील फक्‍त ५५ टक्क्यांनी प्लाक कमी करतात. काही तासातच, सूक्ष्मजंतू पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या प्रमाणाइतकेच वाढतात.

स्पष्टतः, श्‍वासाची दुर्गंधी टाळताना, निष्काळजी मनोवृत्ती टाळली पाहिजे. त्याउलट, तुमचे तोंड व दात ही मौल्यवान साधने आहेत व त्यांची नित्य काळजी घ्यावी लागते हे तुम्ही समजले पाहिजे. जबाबदार सुतार व मेकॅनिक प्रत्येक काम झाल्यावर आपल्या साधनांना गंज, झिजणे किंवा इतर कोणत्याही नुकसानापासून जपून ठेवण्यास काही विशिष्ट काळजी घेण्याच्या पद्धती अनुसरतात. कोणत्याही मानव-निर्मित साधनांपेक्षा तुमचे दात व तोंड अधिक मौल्यवान आहेत. म्हणून आवश्‍यक असणारी काळजी व निगा राखा. असे केल्याने, तुम्ही श्‍वासाची दुर्गंधी व त्यासोबत निराशा व लाजिरवाण्या भावनेचा पिच्छा सोडवू शकता. त्याहून महत्त्वपूर्ण म्हणजे, तुमचे तोंड स्वच्छ व आरोग्यदायक असेल.

[तळटीपा]

a प्लाक दातांवर निर्माण होणारा चिकट पदार्थ आहे. त्यामध्ये मुख्यतः सूक्ष्मजंतू असतात जे तुमच्या दातांकरता व हिरड्यांकरता हानीकारक असतात.

[१३ पानांवरील चौकट]

श्‍वासाला दुर्गंधी कशामुळे येते?

श्‍वासाची दुर्गंधी खालील परिस्थितींमुळे, आजारांमुळे व सवयींमुळे होऊ शकते:

इरक्टेशन्स (बेल्चेस)

एंम्पायमा

ओव्यूलेशन

काही प्रकारची औषधे

चिरकालिन गॅस्ट्रायटिस

तोंड स्वच्छ नसणे

तोंड येणे

तोंडाची कोरड

तंबाखूचे धुम्रपान

दातांचे किडणे

दातांची शस्त्रक्रिया केल्यामुळे झालेल्या जखमा

ब्राँकायटिस

मधुमेह

मद्यपान

मासिकधर्म

मूत्रपिंड निकामी होणे

यकृताचा विकार

विशिष्ट प्रकारचे कर्करोग

सायनसिटिस

हायटल हर्नियास

हिरड्यांचा रोग

क्षयरोग

[१५ पानांवरील चौकट]

तुमच्या जिभेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे

जवळच्या आरशाकडे जा व तुमच्या जिभेला जवळून न्याहाळा. तिजवर अगणित लहान चीरा आहेत का? ती सामान्य गोष्ट आहे. परंतु, तुमच्या जिभेवरील त्या चीरा करोडो सूक्ष्मजंतूंचे आश्रयस्थान असू शकतात. काहीच त्रास न दिल्यास, सूक्ष्मजंतू सतत श्‍वासाची दुर्गंधी व इतर बाधक परिस्थिती निर्माण करू शकतात. तथापि, तोंडाची स्वच्छता राखताना लोक बहुधा जिभेकडे दुर्लक्ष करतात.

हॅलिटोसिसवर उपाय म्हणून जिभेची वरील बाजू सॉफ्ट-ब्रिस्लच्या टूथब्रशने नियमितपणे घासावी अशी शिफारस दंतवैद्य करतात. काही तज्ज्ञ जीभ घासणी उपयोगात आणावी अशी शिफारस करतात. भारतामध्ये, श्‍वासाची दुर्गंधी घालवून देण्यासाठी लोकांनी पिढ्यांपिढ्यापासून जीभ घासणी वापरली आहे. अनेक वर्षांआधी, ती धातुंनी बनवली जात होती, परंतु आज प्लास्टिकच्या जीभ घासण्या अधिक सामान्य आहेत. काही ठिकाणांमध्ये, जीभ घासणी घेण्याकरता तुम्हाला तुमच्या दंतवैद्याचा सल्ला घ्यावा लागेल.

[१४ पानांवरील चित्रं]

तोंडाची स्वच्छता राखण्यामध्ये दातांना व जिभेला फ्लॉसिंग व घासणे समाविष्ट आहे

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Life

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा