वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ४/८ पृ. १९-२२
  • संभाषण ही कला आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संभाषण ही कला आहे
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्याला बोलण्याची आवश्‍यकता आहे!
  • संभाषणाला अडथळे
  • ‘मी काय म्हणू शकतो?’
  • चांगले ऐकणारे व्हा
  • प्रामाणिक आस्थेला प्रतिसाद मिळतो
  • समभावना—संभाषणाचा पाया
  • तुम्ही ते करू शकता!
  • बोलणं तिथेच थांबवायचं का?
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या
    आमची राज्य सेवा—२०१४
  • मला मनमिळाऊ होता येईल का?
    सावध राहा!—१९९९
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९५
g95 ४/८ पृ. १९-२२

संभाषण ही कला आहे

खाणे, झोपणे, काम करणे या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. तरीसुद्धा, आणखी एक गरज पूर्ण होण्याची अतिशय आवश्‍यकता आहे. ती कोणती आहे?

पाच वर्षे तुरुंगात घालवून जीवनातील सर्वात मौल्यवान गरजेपासून वंचित असणाऱ्‍या एका मनुष्याच्या शब्दांकडे लक्ष द्या. “मला कोणाचा तरी सहवास, कोणाशी बोलावे, संभाषण करावे असे खूप वाटत होते,” असे तो कबूल करतो. “हा एकाकीपणा काढून टाकण्यासाठी मी काहीतरी केलेच पाहिजे हे मला जाणवले. एकांतवासात आणि शांत असताना, माझ्या मनावर परिणाम होत असे.”

होय, दळणवळण करण्याची आपली साहजिक गरज आहे. संभाषण त्या गरजेला पूर्ण करण्यात मदत करते. डेनीस आर. स्मिथ व एल. केथ विल्यमसन हे संशोधक विवेचन मांडतात: “मनापासून ज्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो, ज्यांच्यासोबत सर्वात मोठा आनंद व सर्वात त्रासदायक भय यांची सहभागिता करू शकतो, ज्यांच्याशी आपण बोलू शकतो अशा लोकांची आपल्याला गरज आहे.”

आपल्याला बोलण्याची आवश्‍यकता आहे!

मानवांना बोलण्याचे अद्‌भुत दान देण्यात आले आहे. होय, आपल्याला संभाषण करता येईल असेच रचले आहे. एका मनुष्याने असे निरिक्षण केले: “समाजशील असावे अशी देवाने आपली निर्मिती केली आहे. तुम्हाला बोलण्याची संधी नसेल किंवा दळणवळण करण्याची तुमची क्षमता काढून घेतल्यास, ते एखाद्या शिक्षेप्रमाणे असेल. तुम्ही संभाषण करता तेव्हा एक मौल्यवान गोष्ट घडते. तुम्हाला स्वतःविषयी बरे वाटते आणि इतर तुमच्याविषयी काय विचार करतात व तुमच्याविषयी त्यांना कसे वाटते हे जाणल्याने तुम्हाला लाभ प्राप्त होतो.”

एका प्रवासी सेवकाची पत्नी, इलेन म्हणते: “शब्दांद्वारे भावना व्यक्‍त होतात. आपल्या वैवाहिक सोबतीला, तो किंवा ती आपल्याकरता किती बहुमूल्य आहे हे ठाऊक आहे असे आपण गृहीत धरू शकत नाही. ते बोलून दाखवण्याची गरज आहे; शब्द कानी पडले पाहिजेत. आपल्याला संभाषण करण्याची आवश्‍यकता आहे.”

एका ख्रिस्ती वडिलांचा मुलगा, डेवीड, स्वतःला अशाप्रकारे व्यक्‍त करतो: “काहीवेळा मी निराश होतो आणि मला कसे वाटते ते माझे मलाच कळत नाही. मी सर्वात प्रथम शांत राहतो, मग आत तणाव अजून वाढतो. मी कोणाशी बोललो, तर हा तणाव घालवण्याला मार्ग मिळतो असे मला वाटते. मी बोलतो तेव्हा, मला स्वतःविषयी काय वाटते हे जाणून घेण्याची संधी मला मिळते आणि मला त्यावर उपाय शोधता येतो.”

संभाषणाला अडथळे

हे खरे आहे की, संभाषण एक गरज भागवते. तथापि, संभाषणाला अडथळे आहेत. काहींसाठी, संभाषण वास्तविकतेत एक संघर्ष आहे म्हणजे, टाळावयाची गोष्ट आहे.

गॅरी म्हणतो, “माझ्या जीवनात पुष्कळ वेळा इतरांशी संभाषण करण्याचे टाळणे सोपे असल्याचे मला वाटले.” तो म्हणतो: “त्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्यातील आत्मविश्‍वासाचा अभाव होय. मी लोकांशी संभाषण करतो तेव्हा, माझ्या गोष्टी मूर्खपणाच्या वाटतात किंवा मी जे काही बोलतो त्याबद्दल कोणी मला कमी लेखिल, असे भय मला अजूनही वाटते.”

इलेनची समस्या बुजरा स्वभाव असल्याचे ती सांगते. ती समजावते: “एकमेकांशी अर्थपूर्ण संभाषण केले जात नव्हते अशा कुटुंबात मी वाढले. माझ्या वडिलांचा अतिशय दरारा होता. यास्तव मी मोठी होत गेले तसे, माझ्याजवळ बोलण्यालायक कोणतीही गोष्ट नव्हती असे मला वाटायला लागले.” होय, संभाषणाचा लाभ घेण्यामध्ये बुजरेपणा भीतीजनक अडथळे निर्माण करू शकतो. नाही तर शांततेच्या भितींमध्ये ते तुमची कोंडी करू शकते!

स्वतःविषयीचे चांगले मत नसल्यामुळे झटावे लागल्याचे कबूल करणारे ख्रिस्ती वडील, जॉन म्हणतात, “ती एक पीडा आहे.” “तुम्ही बुजरे बनल्यास, स्वतःला दूर करता. एका खोलीत शंभर लोक असले, तरी तुम्ही संभाषण करणार नाही. आणि अशाप्रकारे तुम्हालाच सर्व सहन करावे लागते!”

दुसऱ्‍या बाजूला पाहता, डॅनिएल नामक वडील असे म्हणतात: “मला बोलण्याच्या बाबतीत काहीच अवघड वाटत नाही. परंतु, त्याची जाणीव होण्याआधीच मी कोणाला तरी मध्येच तोडून संभाषणाचा पूर्ण मक्‍ता मिळवलेला असतो. माझ्या बायकोचा चेहरा पाहिल्यावर मला ते कळते आणि मी स्वतःला म्हणतो, ‘अरे, मी पुन्हा तेच केले.’ उर्वरित संभाषणातील तिचा आनंद नाहीसा झाल्याचे मला कळते.”

या तसेच संभाषणाच्या इतर अडथळ्यांवर मात कशी केली जाऊ शकते? या कलेसाठी कोणते गुण अत्यावश्‍यक आहेत? त्यांचा अवलंब कसा करता येईल?

‘मी काय म्हणू शकतो?’

‘मी कशाविषयी बोलू शकतो?’ ‘मला काहीच ठाऊक नाही.’ ‘मला जे सांगावयाचे आहे ते कोणालाही ऐकावेसे वाटत नाही.’ तुमचे असे विचार असले, तरी ते बहुतेककरून खरे नाहीत. तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती असते, त्यातील काही माहिती बहुधा इतरांच्या आस्थेची असते. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित अलीकडेच कोठेतरी प्रवास केला असेल. स्वतः राहत असलेल्या भागाशी त्याची तुलना कशी होते ते जाणून घेण्याची इच्छा लोकांना असेल.

त्याशिवाय, वाचनाद्वारे तुम्ही विविध विषयांवरील आपले ज्ञान वाढवू शकता आणि ते वाढवलेच पाहिजे. दररोज काहीतरी वाचण्यासाठी वेळ काढणे ही चांगली सवय आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या साहित्यामध्ये बायबलबद्दल तसेच सर्वसामान्य आस्थेच्या विषयांबद्दल माहिती असते. जितके अधिक ज्ञान तुम्ही मिळवता तितका अधिक सहभाग तुम्ही घेऊ शकता. याचे सुंदर उदाहरण, यहोवाचे साक्षीदार वापरत असलेल्या शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे या पुस्तिकेतील दररोजच्या वचनाचे आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करू शकता आणि संभाषणात वापरू शकता असे काही ते प्रदान करते.

संभाषणात गोवणे म्हणजे एखाद्या व्यक्‍तीनेच सर्व बोलावे असा त्याचा अर्थ होत नाही. दोन्ही गटांनी स्वतःला व्यक्‍त केले पाहिजे. दुसऱ्‍या व्यक्‍तीला बोलण्याची संधी द्या. तो शांत असेल, तर तुम्ही चतुराईने प्रश्‍न विचारून त्याला उत्तेजन देऊ शकता. समजा, तुम्ही एका वृद्ध व्यक्‍तीशी बोलत आहात. गतकाळातील घटनांबद्दल आणि लहानपणापासून आतापर्यंतच्या काळात जग किंवा कौटुंबिक जीवन कसे बदलले आहे त्याविषयी तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांच्या गोष्टी ऐकावयास तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्यातून शिकाल.

चांगले ऐकणारे व्हा

काळजीपूर्वक ऐकणे हा संभाषणातील बहुमूल्य ठेवा आहे. आपण ज्याप्रकारे इतरांचे ऐकतो त्यामुळे जे लोक त्यांच्या ओझ्यासंबंधी मदत मिळवू इच्छितात त्यांना आधार मिळू शकतो. एक मनुष्य जो स्वतःला निरुपयोगी असे समजत होता त्याला अतिशय दुःखी असल्याचे वाटू लागले आणि त्याने मदतीसाठी आपल्या मित्राला टेलिफोन केला. ती खूपच असोयीस्कर वेळ होती, तरी देखील त्या मित्राने शांतपणे ऐकले—दोन तासांपर्यंत! तो मनुष्य ते संभाषण त्याच्या जीवनातील नवे वळण होते असे आता समजतो. हे यश कशामुळे मिळाले? “केवळ चांगला ऐकणारा असल्यामुळे,” तो लक्ष देणारा मित्र कबूल करतो. “मी काही सुज्ञतेचे शब्द बोलल्याचे मला आठवत नाही. मी केवळ योग्य प्रश्‍न विचारले, ‘तुला तसे का वाटते?’ ‘त्याचा तुला त्रास का होतो?’ ‘कोणती गोष्ट मदत करू शकते?’ माझ्या प्रश्‍नांची उत्तरे देताना त्याने आपल्याच प्रश्‍नांना उत्तरे दिली!”

मुलांसोबत संभाषण करण्यासाठी वेळ काढणाऱ्‍या पालकांना ती मुले खूप बहुमोलाचे समजतात. स्कॉट नावाचा एक तरुण मुलगा म्हणतो: “तुमचे पालक तुमच्याकडे येऊन तुम्हाला कोणत्या गोष्टींची चिंता वाटते याबद्दल विचारतात तेव्हा ते चांगले असते. अलीकडेच वडील तसे करू लागले आहेत कारण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःहून हाताळू शकत नाही.”

“तुमची मुले तुमच्याशी बोलतील असे वातावरण तुम्ही निर्माण केले पाहिजे,” असा सल्ला एक मनुष्य देतो. तो एकटा आपल्या चार मुलांपैकी प्रत्येकासह नियमितरित्या वेळ घालवतो कारण युवकांना सुव्यवस्थित व्यक्‍तिमत्व विकसित करावयाचे असल्यास, पालकांनी काळजीपूर्वक, सहानुभूतीपूर्वक ऐकणे आवश्‍यक आहे असे त्याला वाटते. त्याची शिफारस? संधी निर्माण होतात आणि मुलाला बोलावयाचे असल्यास, ऐकण्यास तयार असा. “तुम्ही कितीही थकलेले किंवा ओझ्याने लादलेले असला, तरी त्यांना कधीही शांत करू नका! ऐका,” असे तो म्हणतो.

प्रामाणिक आस्थेला प्रतिसाद मिळतो

पुष्कळ लोकांना बोलण्यासाठी किंवा स्वतःला संभाषणात व्यक्‍त करण्यासाठी भावनात्मक आधार हवा असतो. एका तरुण पुरुषाने दुःखाने म्हटले: ‘मला कोणाशी तरी बोलायचे आहे, परंतु मी कोणाकडे जाऊ? बोलणे माझ्याकरता सोपे नाही. माझ्यामध्ये आस्था घेईल असा कोणी मला हवा आहे!’ खरी, प्रामाणिक आस्था एक भरवसादायक व सुरक्षित वातावरण निर्माण करते ज्यामध्ये एखाद्या व्यक्‍तीला बोलण्यास किंवा दुसऱ्‍याला आपल्या अंतःकरणातील गोष्ट सांगण्यास सोपे होते.

एक मनुष्य सांगतो: “पुष्कळ वर्षांआधी, कौटुंबिक परिस्थितींना हाताळण्यात मला काही समस्या होत्या तेव्हा, मी एका मित्रासोबत त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तो केवळ असे म्हणाला, ‘प्रतिकूल परिस्थितीचा सामना कर व मजबूत हो आणि सर्वकाही सुरळीत होईल.’ कोणत्याही प्रकारचे बोलणे, संभाषण नव्हते आणि ते मदतदायी नव्हते. खरे म्हणजे, त्यामुळे मी पुन्हा माझ्या बुजऱ्‍या स्थितीत गेलो. त्याउलट, मी नंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पर्यवेक्षकांशी बोललो. त्यांची नजर, त्यांच्या चेहऱ्‍यावरील हावभाव आणि नम्र वागणूकीद्वारे ते सहानुभूतीपूर्वक असल्याचे मला ठाऊक होते. परिणामस्वरूप, मी बोलू लागलो आणि अधिक संभाषण करू लागलो कारण ते प्रामाणिकपणे माझ्यामध्ये आस्था राखून होते. ते म्हणाले: ‘तुमच्या परिस्थितीत तुम्हाला आधार देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू.’ अशाप्रकारे लोकांना प्रतिसाद दिला जातो!”

आपल्यापैकी अधिकजण त्यांची अंतःकरणे खुली करू शकतात का आणि इतरांना अर्थपूर्ण संभाषणात गोवण्यास प्रवृत्त करू शकतात का? एखादा कोणी एका गटाच्या संभाषणात भाग घेत नसल्यास, किंवा संभाषण करण्यास फारच लाजत असल्यास, त्या व्यक्‍तीला आपल्या संभाषणात गोवण्याचा प्रयत्न आपण करतो का? आधी उल्लेखिलेला जॉन म्हणतो: “मी ती भावना जाणू शकतो कारण मला त्याच्यासाठी समभावना वाटते आणि त्याच्यासोबत मला देखील दुःख वाटते!” तो पुढे म्हणतो: “त्याच्याकडे जाऊन त्याला संभाषणात गोवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त होणे किती महत्त्वाचे आहे. आपण त्याबाबतीत मनात एखादी प्रार्थना देखील करू शकतो.”

डॅन आपल्या एका मित्राबद्दल म्हणतो: “संभाषण करण्याच्या क्षमतेबद्दल रॉयचा आत्मविश्‍वास इतका कमी होता की, एखादा गट बोलत असताना, तो नेहमी काही पावले मागे थांबत असे. म्हणून मी त्याला प्रश्‍न विचारत असे, ‘रॉय तू याबद्दल किंवा त्याबद्दल काय सांगत होतास?’ मग तो बोलू लागे. परिणामस्वरूप, इतरांना त्याच्या व्यक्‍तिमत्वाची एक बाजू पाहावयास मिळाली जी त्याच्यामध्ये नव्हती असे त्यांना वाटले होते.” डॅन म्हणतो: “एखाद्या व्यक्‍तीसोबत संभाषण करणे आणि त्याला मोकळेपणाने स्वतःला व्यक्‍त करण्यास लावणे कठीण असेल, तर हार मानू नका. स्वतःशी विचार करा की, एक चांगली आंतरिक व्यक्‍ती आहे जी बोलू इच्छिते. तिला मोकळेपणाने व्यक्‍त करण्यास प्रवृत्त करीत राहा आणि यासाठी प्रयत्न चालूच ठेवा.”

तुम्हाला बुजरेपणाची समस्या असली तरीसुद्धा इतरांबद्दल प्रेमळ, प्रामाणिक आस्था निर्माण केल्याने, तुम्हाला लाभ प्राप्त होतो. यामुळे जॉनला स्वतःला दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीवर मात करण्यास मदत मिळाली हे त्यास आढळून आले. “प्रीती स्वार्थ पाहत नाही,” असे तो समजावतो. (१ करिंथकर १३:५) “प्रेमळपणाची गोष्ट करणे म्हणजे, तुम्ही इतरांसोबत बोलले पाहिजे आणि इतरांची विचारपूस केली पाहिजे. तुमच्या अपुरेपणाला शरण गेल्यामुळे जे अपेक्षिले जाते त्यानुसार तुम्ही बनू शकत नाही. तुम्ही प्रार्थनापूर्वकतेने स्वतःच्या प्रवृत्तींवर मात करू शकता.” तो पुढे म्हणतो: “असे केल्यामुळे खूप मोठा मोबदला मिळतो. इतर प्रतिसाद देत असलेले आणि त्यांना उत्तेजन कसे मिळाले ते पाहून तुम्हाला देखील उत्तेजन मिळते. आणि यामुळे पुढे होऊन वारंवार त्या व्यक्‍तीकडे जाण्याचे धैर्य मिळाले पाहिजे.”

समभावना—संभाषणाचा पाया

मानवी स्वभावातील सर्वात बहुमूल्य गुण समभावना आहे. संक्षिप्त रुपात समभावना काय आहे? पेन्सिल्व्हेनिया स्टेट विद्यापीठेचे डॉ. बर्नाड गर्नी सांगतात, ‘तुम्ही एखाद्याशी सहमत असला किंवा नसला, तरी त्या व्यक्‍तीच्या भावना आणि दृष्टिकोन समजण्याच्या क्षमतेला’ समभावना म्हणतात. संभाषणात समभावना दाखवणे किती महत्त्वाचे आहे? “तो तर पाया आहे! तो, ज्यावर सर्वकाही बांधण्यात येते तोच खडक आहे.”

डॉ. गर्नी समजावतात की, संभाषण सर्व चांगल्या नातेसंबंधांची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. अर्थात, मतभेद असणे सामान्य गोष्ट आहे. त्यांना यशस्वीपणे सोडवण्याकरता आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्याकरता आपण समस्येबद्दल बोलण्याची इच्छा दाखवली पाहिजे. पुष्कळ तसे करत नाहीत कारण दुसऱ्‍या व्यक्‍तीला तिच्या दुर्बलतेबद्दल सफाई देण्यास प्रवृत्त न करता व राग न आणता कसे बोलावे हे त्यांना ठाऊक नसते. डॉ. गर्नी यांच्या मते, “दुसऱ्‍या व्यक्‍तीची भूमिका समजून घेणे आणि त्याबद्दल आदर बाळगणे याचा गोंधळ पुष्कळ लोक, त्या भूमिकेला सहमत होण्याशी करतात. परिणामतः, मतभेद होतात तेव्हा, ते त्याविषयी जाणीव आणि आदर दाखवत नाहीत. समभावनेमुळे सहमत आणि समजून घेणे यातील फरक ओळखण्यास वाव मिळतो.”

स्वतःला दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या जागी ठेवून कल्पना केल्याने, तुम्हाला त्याच्याप्रमाणे वाटते आणि तुम्ही त्याच्यासारखाच विचार करता. अशा परिस्थितींमध्ये, तुम्ही असहमत झाला तरी, समजूतदारपणा, कदर आणि आदर वाढू शकतो असे तुम्हास आढळून येईल.

चार मुलांची लेकुरवाळी आई, जॅनेट हिचे उदाहरण घ्या. एके काळी तिला निराश आणि निरुपयोगी असल्याचे वाटत होते. एखाद्याला साहाय्य करण्यात समभावना किती आवश्‍यक आहे हे तिला आता कळते. ती म्हणते: “माझे पती माझ्याशी बोलल्याचे व मी ज्या विविध प्रकारे मदतदायी होते त्याविषयी समजावत असल्याचे मला आठवते, परंतु मला वाटत होते की, माझ्या सर्व कृती व्यर्थच होत्या. त्यांनी मी रडत असतानाही माझ्या सर्व गोष्टी प्रेमळपणे ऐकल्या आणि त्यानंतर त्यांनी माझी उन्‍नती केली. परंतु, त्यांनी मला कमी लेखले असते आणि ‘तो सर्व मूर्खपणा आहे,’ किंवा असेच काही म्हटले असते तर मी खूपच शांत झाले असते आणि मी स्वतःहून निघून गेले असते. त्याउलट, त्या सायंकाळी, आम्ही खूप मोठे व अर्थपूर्ण संभाषण केले.”

‘तुम्ही काळजी करता हे समभावनेवरून दिसून येते. ते दळणवळणाला, म्हणजेच पुष्कळ लोकांना हव्या असणाऱ्‍या व आवश्‍यकता असणाऱ्‍या देवाणघेवाणीचा विस्तारित प्रकार यास वाढवते,’ असा निष्कर्ष डॉ. गर्नी काढतात.

तुम्ही ते करू शकता!

तुम्ही एक चांगले संभाषणकर्ते असू शकता. संभाषणाच्या कलेत हातखंडा मिळवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आपण केला आहे, परंतु आणखी पुष्कळ अशा गोष्टी आहेत. काही सांगावयाच्या तर, त्यामध्ये मैत्रीभाव, विनोदबुद्धी आणि चातुर्य यांचा समावेश होतो. एखादा कलाकार प्रशिक्षण आणि सरावाद्वारे एखादा उत्कृष्ट नमुना बनवण्यासाठी आपला ब्रश कॅन्व्हासवरून जसा कुशलतेने फिरवतो त्याचप्रमाणे, आपल्याला हे आवश्‍यक गुण विकसित करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत.

उदाहरणार्थ, डॅनिएल एक उत्तम संभाषणकर्ता झाला आहे. कसा? मध्येच तोडून बोलण्याच्या व संभाषणाचा मक्‍ता मिळवण्याच्या वृत्तीवर नियंत्रण घालण्याचे शिकण्याद्वारे. तो कबूल करतो: “संभाषणाचा मक्‍ता न मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मला करावयाचा आहे. माझ्यासाठी याचा अर्थ, माझ्या जिभेला नियंत्रणात ठेवणे असा होतो. मलाही थोडे काही सांगावेसे वाटल्यास, मी मानसिकरित्या स्वतःला नियंत्रणात ठेवतो! एखाद्या विवेचनामुळे संभाषणाचा विषय बदलेल किंवा संभाषण करण्याची कोणाची क्षमता काढून घेतली जाईल असे मला वाटले, तर मी ती गोष्ट सांगतच नाही!”

इलेनला कशाने मदत मिळाली? तिने बायबलचे अचूक ज्ञान घेतल्यावर, तिच्याजवळ सांगण्याजोगे काही मौल्यवान व सार्थक ठरण्यासारखे आहे हे तिला जाणवले. ती म्हणते: “मी स्वतःबद्दल विचार न करता इतरांसोबत आध्यात्मिक गोष्टी बोलले, तर संभाषण करताना मला अधिक बरे वाटते. ते आपल्याला नियमितरित्या मिळणारे बायबल आधारित साहित्य वाचण्यास देखील मदत करते. मी त्याच्याशी अद्ययावत राहते तेव्हा, इतरांसोबत सहभाग करण्याजोगी नवीन आणि ताजी माहिती माझ्याजवळ असते आणि मी अधिक सोप्यारीतीने संभाषण करू शकते.”

तुमच्या संभाषणात हे अत्यावश्‍यक गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही देखील इतरांना तजेला देऊ शकता आणि संतुष्ट करू शकता आणि खरोखरच एखादी मानवी गरज भागवणाऱ्‍या कलेमध्ये हातखंडा मिळवण्याचे समाधान मिळवू शकता. (g95 4/8)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा