मगरीवर एक जवळून दृष्टिक्षेप
केनियातील सावध राहा! बातमीदाराकडून
एक अमेरिकी पर्यटकाचा मॉरा नदीच्या जवळ मोठ्या उत्सुकतेने पाणघोड्याचे छायाचित्र घेताना पाय खडकावरून घसरला आणि तो पाण्यात पडला. या घटनेमुळे, त्यावेळेस ऊन खात असलेल्या एका चर्म पशूचे, मगरीचे लक्ष त्याच्याकडे आकर्षिले गेले. हा सरपटणारा प्राणी सामान्यपणे मासे खातो; परंतु ह्या सरपटणाऱ्या प्राण्याने हा चवदार पदार्थ पाहिल्यावर त्याचा मोह तो टाळू शकला नाही. शोध घेण्यासाठी तो लागलीच पाण्याच्या आत गेला. सुदैवाने, त्या पर्यटकाने मगरीला त्याच्याकडे येताना पाहिले आणि तो मोठ्या चपळाईने पाण्याच्या बाहेर आला—तेव्हा असे वाटत होते की तो जणू काय पाण्यावर चालतच आहे!
आफ्रिकेतील नद्या, तळे आणि दलदल पाहण्यासाठी येणाऱ्यांना अनेकदा मगरी पहावयास मिळतात; तथापि, वर उल्लेख केलेल्या पर्यटकाची मगरी बरोबर झालेली ही भेट फारच जवळची होती. केनिया नाईल मगरीचे घर आहे. स्थानिक स्वाहिलीमध्ये तिला माम्बा म्हणतात. या मगरीची लांबी ७ मीटर असते; मगर सरपटणारा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणीही चपळ असतो. त्यांच्या शेपटींचा आकार चपटा आणि वल्ह्याप्रमाणे असल्याने त्या पाण्यामध्ये मोठा वेग प्राप्त करु शकतात. त्या प्रती तास ४० किलोमीटर या वेगाने पाण्यामध्ये पोहू शकतात! त्यामुळे दोन किंवा तीन तास सुद्धा पाण्याच्या खाली राहणे त्यांच्यासाठी असामान्य गोष्ट नाही. जमिनीवर मगरी थोड्या अंतरापर्यंत वेगाने धावू शकतात.
तर मग, बायबल लिव्याथान नावाच्या देवाच्या भय-प्रेरित सृष्टीच्या उदाहरणासाठी स्पष्टपणे मगरीचा उल्लेख करते, यात कोणतेही आश्चर्य नाही. ईयोब ४१:८, १० म्हणते: “तू त्याला [लिव्याथानास] हात लावून तर पाहा, ह्या झटापटीची आठवण तुला पक्की राहिल; आणि पुनः तू तसे करावयाचा नाहीस. . . . त्याला चिडविण्याचे धाडस कोणी करणार नाही.” फारच बुद्धिमत्तेचा इशारा! सरपटणाऱ्या प्राण्यांचे आकर्षण (इंग्रजी), या मॉरीस रिचर्डसन यांच्या पुस्तकाने मोटार बोटच्या बाहेरील भागावर हल्ला करण्याऱ्या मगरीचा देखील उल्लेख केला! इयोब ४१:२५ अगदी उचितपणे म्हणते: “त्याने डोके वर केले की वीरहि घाबरतात; भीतीने त्यांची गाळण उडते.”
या खवले असलेल्या पशुला पाहताच लोक भयाने दूर का पळतात? वचन १४ याचे एक कारण स्पष्ट करते: “त्याच्या तोंडाची कवाडे कोणी उघडली? त्याचे दांत चोहोकडून विक्राळ आहेत.” मगरीच्या वरच्या आणि खालच्या जबड्यांमध्ये विभिन्न आकाराचे २४ दात असतात आणि हे दात तिच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये निरंतर येत असतात. मनोरंजक गोष्ट म्हणजे, मगरीचा खालच्या जबड्यातील चौथा दात तिच्या वरील जबड्यातील बाहेरच्या खाचेमध्ये अगदी बरोबर बसतो आणि जबडे जेव्हा बंद असतात तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येते. यामुळे तिच्यातील आणि तिची बहीण सुसर हिच्यातील भेद समजण्यास मदत होते. परंतु समस्या ही आहे की, तिच्या दातांचे सूक्ष्म परीक्षण करत तुम्ही अगदी तिच्या जवळ गेला तर कदाचित तुम्हाला तिच्या सर्व दातांचे परीक्षण जबड्याच्या आतूनच करावे लागेल!
यामुळे कदाचित तुम्ही एका सुरक्षित अनुकूल ठिकाणावरुन मगरीचे जवळून परीक्षण करू शकता. केनियामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जेथून तुम्ही असे करु शकता. उदाहरणार्थ, मोमबासामध्ये माम्बा गाव हे असे ठिकाण आहे जेथे मगरी बंदिस्त स्थितीमध्ये पाळल्या जातात.
तुम्ही विचाराल, ‘परंतु मगरी पाळण्यास कोणाला आवडेल?’ लुप्त होत असणाऱ्या मगरींना वाचवणे हे त्याचे एक कारण होय. जंगलामध्ये, जीवनाच्या पहिल्याच वर्षांमध्ये मगरींच्या मृत्यूचे प्रमाण ९९ टक्के असते. घोरपड, आफ्रिकी करकोचा, इतकेच नव्हे तर काही लोकांना देखील मगरीची अंडी आणि पिल्ले खाण्यास आवडतात, असे दिसून येते. परंतु मगरीसाठी असणाऱ्या फार्ममध्ये देखभाल केलेल्या मगरींच्या मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. एका वर्षाच्या आत छोट्या मगरी १.५ मीटर लांब वाढतात—निश्चितच सामान्य धोक्यांना टाळण्याइतपत त्या मोठ्या होतात. जंगलामध्ये छोट्या मगरींना ही लांबी प्राप्त करण्यासाठी सुमारे तीन वर्ष लागू शकतात.
मगरीसाठी असणाऱ्या फार्ममध्ये व्यापारी उद्देशास्तव मगरींना पाळले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मगरीच्या पोटाच्या मऊ चामड्यांपासून तयार केलेले बुट, बेल्ट, हॅन्ड बॅग आणि फॅशनच्या इतर वस्तू तुम्हाला मिळू शकतात. माम्बा गावातून प्रत्येक वर्षी साधारणतः २००० मगरींचे चामडे अन्य देशात जसे की इटली आणि फ्रान्समध्ये चर्म-उद्योगासाठी पाठविले जाते. उर्वरित प्राण्याचे काय केले जाते? केनियामध्ये मगरीचे मांस पर्यटन उद्योगामध्ये परदेशी मेजवानी म्हणून वापरले जाते.
मगरींचा प्रजनन काळ हा ऑक्टोबर ते एप्रिल असतो. जंगली मादी सुमारे २० ते ८० अंडी देईल. त्याच वेळेस विविध तलावांच्या प्रजनन क्षेत्रामध्ये बंदिस्त असणाऱ्या माद्या सुमारे प्रत्येकी ३६ अंडी देतील. त्यानंतर अंड्यांना एकत्र केले जाते आणि अंडी ऊबवणी केंद्रात पाठवण्यात येते. यासाठी सुमारे तीन महीन्यांचा कालावधी लागतो.
माम्बा गाव या आकर्षक प्राण्यांना सुरक्षितरित्या पाहण्यासाठी एक उत्तम संधी पुरवते. ह्या गावाचे क्षेत्र २० एकर आहे आणि मगरींसाठी फार्म, वनस्पतीशास्त्राचे उद्यान, समुद्री जीवनाचे मत्सालय तसेच मनोरंजनाचे ठिकाण या उद्देशास्तव या क्षेत्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. या ठिकाणी १०,००० पेक्षा अधिक सरपटणारे प्राणी राहतात. अर्थातच तुम्ही त्या सर्वांना पाहू शकणार नाही. परंतु दोन प्रजनन ठिकाणांमध्ये शंभरापेक्षा अधिक प्रौढ मगरींना तुम्ही पाहू शकता आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये विविध वयोमानाच्या शेकडो तरुण मगरी आहेत.
भोजनाच्या वेळी मगरी प्रभावी प्रदर्शन करतात. काही मगरी पाण्याच्या वर लोंबत ठेवलेले मांस खाण्यासाठी पाण्याच्या वर देखील झेपावतात. या ठिकाणी तुम्ही बिग डॅडी नामक कुप्रसिद्ध मगरीला पाहू शकता; जिने टाना नदीच्या क्षेत्रातील लोकांमध्ये हैदोस घातला होता, पकडून फार्ममध्ये आणतेवेळी तिने पाच लोकांना ठार देखील मारले होते. मगरींना समोरासमोर पाहण्यास तुम्ही घाबरत असल्यास व्हिडियो थेटरमध्ये तुम्ही त्यांना चांगल्या तऱ्हेने पाहू शकता.
मगरीला जवळून पाहणे तुम्हाला मोहविल किंवा तुम्हाला धडकी भरविल. परंतु “तो सर्व उन्मत पशुंचा राजा आहे,” या इयोब ४१:३४ मधील गोष्टीला तुम्ही उत्तमपणे समजू शकाल.
[१७ पानांवरील चित्र]
उजव्या बाजूला: माम्बा गावाचे दृश्य
[१७ पानांवरील चित्र]
उजव्या बाजूला दूरवर: भोजनाच्या वेळी मांस मिळविण्यासाठी पाण्याच्या बाहेर झेपावणारी एक मगर