टान्झानियातील रात्रीची भेट
केनियामधील यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनानंतर, आम्ही मोठ्या उत्सुकतेने टान्झानियामध्ये आमचा व्यक्तिशः प्रवास सुरू केला.
आमचा पहिला पडाव लेक म्यानयारा नॅशनल पार्क येथे होता. आम्ही विविध वन्य–जीवन—निळ्या रंगाची माकडे, काळवीटे, जंगली म्हैस, झेब्रा वगैरे पाहून चकित झालो. पाणघोडे तलावात टिंबांप्रमाणे पसरल्याची कल्पना करा. दुसऱ्या बाजूस, जिराफ झाडांची पाने खात आहे, दूरवर असणाऱ्या गवतातील सिंह आणि त्यापलीकडे आफ्रिकी काळवीटांचा कळप हे सर्व दृश्य डोळ्यासमोर आणा.
एनगोरोंगोरो या ज्वालामुखीच्या ठिकाणी पोहंचल्यानंतर, आम्ही ज्वालामुखी कटाहात (ज्वालामुखीने निर्मित खडकाळ प्रदेशात) एका दिवसाचा प्रवास करण्यासाठी एक मार्गदर्शक आणि एक चार चाकी वाहन भाड्याने घेतले. या ओबड-धोबड प्रदेशातून आम्ही ज्वालामुखीच्या किनाऱ्यापासून त्याच्या तळापर्यंत सुमारे ६०० मीटर खाली आलो. किती मनोरम दृश्य होते! या वन्य जीवनाने हा भूप्रदेश पूर्णपणे व्यापून टाकला होता. स्थानांतर करत असल्याप्रमाणे आफ्रिकी काळवीटांचा कळप फिरत होता. झेब्रा, लहान आफ्रिकी हरिणे आणि काळवीटे यांची संख्या मोठी होती. एके ठिकाणी पडाव घातला असताना आयाळ असलेला एक सिंह आमच्या गाडीच्या सावलीमध्ये आराम करत होता; आम्ही त्याच गाडीवर असून बाहेर पाहत आहोत याची त्याला मुळीच पर्वा नव्हती. त्यानंतर आम्ही काही अंतरावर काळ्या रंगाचे गेंडे आणि झाडाच्या फांद्या खात असणाऱ्या जंगली हत्तींना पाहण्यासाठी काहीवेळ थांबलो. किनाऱ्यावर परतल्यानंतर आम्ही कितीतरी प्रभावशाली प्राण्यांबद्दल आठवण केली. एखादा प्राणी पाहण्याचे आमच्याकडून राहून गेले होते का?
होय, आफ्रिकी चित्ता. परंतु जंगलामध्ये त्याला पाहण्याची आशा बाळगणे जवळ–जवळ दिवास्वप्नच आहे. छायाचित्रकार एरविन बाऊरने म्हटले: “पर्यटक मोठ्या उत्साहाने आणि परिश्रमाने चित्त्याच्या शोधात असतात. काही अंशी याचे कारण म्हणजे या प्राण्याला पाहणे फारच कठीण आहे, छायाचित्र घेणे तर दूरच राहिले. धोकादायक प्रवास करूनही काही पर्यटकांना चित्ता ओझरता देखील दिसत नाही. माझ्या एकूण १५ पर्यटनात मी एकूण आठ चित्ते पाहिले आणि त्यापैकी छायाचित्र घेण्यास शक्य होईल असा केवळ एकच चित्ता होता.”—आंतरराष्ट्रीय वन्य–जीवन, (इंग्रजी.)
रात्र होत असताना आम्हाला आणखी एका गोष्टीची चिंता वाटत होती. लॉजमधील आमचे आरक्षण रद्द करण्यात आले होते, त्यामुळे आम्हाला आश्रयाचा शोध करावयाचा होता. आश्रय स्थानाचा शोध घेत असता आम्ही गडद अंधारात एका कच्च्या रस्त्यावर येऊन पोहंचलो. पुढील सीटवर बसलेल्या आम्हा दोघांना अचानक आश्चर्याचा धक्काच बसला. एका अस्पष्ट सावलीने उडी मारुन ती बरोबर गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशझोतात येऊन स्थिरावली होती. लगेचच आम्ही थांबलो आणि आश्चर्याने स्तब्ध झालो!
येथे ठीक आमच्या समोर एक मोठा चित्ता उभा होता! गाडीच्या मागील सीटवर बसलेल्यांना ही एका प्रकारची अस्वस्थता वाटत असल्यास, तत्क्षणी ती अस्वस्थता संपुष्टात आली. तो चित्ता मोठ्या चपळाईने रस्त्याच्या कडेला गेला—आणि थोडा वेळ स्तब्ध उभा राहिला. तो गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशझोतामध्ये अगदी आमच्या सर्वांच्या नजरेच्या समोर विचार करत होता. ‘मला काय करण्यास हवे?’ हल्ला करावा की अपरिचित “शत्रूला” पाठ दाखवून झाडीमध्ये पळ काढावा?’
शक्तीने पुरेपूर भरलेला आणि झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या या प्राण्याच्या अगदी जवळ म्हणजे केवळ एका मीटरच्या अंतरावर ॲड्रीयन, हा आमचा एक साथीदार होता. पुर्णपणे स्वयंचलित असलेला आपला कॅमेरा उचलत असताना त्याने हळुच म्हटले, “मला पटकन कॅमेराचा फ्लॅश द्या.” “आवाज करू नका” मागे बसलेल्यांनी कुजबूजत चेतावणी दिली. कॅमेराला लवकरच सज्ज करुन छायाचित्र घेण्यात आले; परंतु गाडीच्या आतमध्येच कॅमेराचा फ्लॅश पडल्यामुळे आम्हाला हे सर्व प्रयत्न व्यर्थ झाल्याचे वाटले. कॅमेराची बॅटरी पूर्वस्थितीत येत असताना ॲड्रीयनने आपली खिडकी उघडली. चित्ता आता एका हाताच्या अंतरावर होता. तो शेपटीचे टोक झटकत होता आणि त्याचे डोळे चमकत होते.
आम्ही दुसरे छायाचित्र घेता क्षणीच त्याने निर्णय घेतला, चित्ता त्या विशाल झाडीमध्ये झेपावला आणि दृष्टिआड झाला. आमच्या गाडीमध्ये किती उद्क्षोभक वातावरण होते! एक चिरस्मरणीय अनुभव आणि नंतर मार्गदर्शकाने म्हटले की, असा अनुभव फारच विरळ असतो. दुसरे छायाचित्र खूपच चांगले होते. टान्झानियामधील त्या रात्रीच्या रोमांचकारी भेटीची आठवण ताजी करण्यासाठी आमच्याकडे ते छायाचित्र आहे.