परिपूर्ण आरोग्य नुसतेच स्वप्न?
तुम्हाला गंभीररित्या आजारी पडण्याचा किंवा शस्त्रक्रिया होण्याचा अनुभव आला आहे का? असल्यास, जीवन किती मोलवान आहे हे तुम्हाला आता आणखीन प्रकर्षाने जाणवू लागले असेल. तुमची शारीरिक स्थिती कशीही असो, पण परिपूर्ण आरोग्य अनुभवणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? कर्करोग किंवा हृदयरोग यांसारखे भयंकर आजार सर्वत्र पसरलेले असताना परिपूर्ण आरोग्याची कल्पना वस्तुस्थितीला धरून नाही असे कदाचित तुम्हाला वाटेल. आपल्यापैकी बहुतेकजण वेळोवेळी आजारी पडतच असतात. हे खरे असले तरीसुद्धा, पूर्णपणे निरोगी असणे नुसतेच स्वप्न नाही.
मानवाला उत्कृष्ट आरोग्याचा आनंद लुटण्यासाठी निर्माण करण्यात आले होते, आजार आणि मृत्यूशी झुंजत राहण्यासाठी नव्हे. म्हणूनच, आजार आणि मृत्यू यांचे परिणाम काढून टाकण्यासाठी, यहोवाने ख्रिस्त येशूच्या खंडणी बलिदानाच्या रूपात परिपूर्ण आरोग्याचा आणि अनंत जीवनाचा मार्ग खुला केला. “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) देवाने अभिवचन दिलेल्या नव्या जगात सर्वकाल जगणाऱ्यांना आजारपण किंवा म्हातारपण यांच्याशी झुंजत राहावे लागणार नाही. पण मग, अपंगत्वाविषयी काय?
रोगमुक्ती
येशू ख्रिस्ताने ज्याप्रकारे अपंगांना बरे केले त्यावरून कल्पना येते. यासंबंधी अहवाल सांगतो: “आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.” (मत्तय ११:३-५) होय, येशूजवळ आलेले सर्व अपंग लोक “[“पूर्णपणे,” NW] बरे झाले.” (मत्तय १४:३६) परिणाम असा झाला की, “मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.”—मत्तय १५:३१.
अशाप्रकारे आज कोणीही कोणाला रोगमुक्त करू शकत नसले तरीसुद्धा, देवाच्या राज्यात मानवजात परिपूर्णतेपर्यंत उन्नत होईल, सर्व मानसिक आणि शारीरिक व्यंगांपासून मुक्त होईल, याची आपण खात्री बाळगू शकतो. देवाचे अभिवचन प्रकटीकरण २१:३, ४ येथे नमूद आहे: “‘पाहा,’ देवाचा ‘मंडप’ मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील.’ तो त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”
अशा जगाची कल्पना करून पाहा, ज्यात फार्मस्युटिकल कंपन्यांची, किंवा रुग्णालयांची, शस्त्रक्रियांची, चिकित्सापद्धतींची गरजच राहणार नाही! इतकेच काय, पुनर्स्थापित परादीसमध्ये खिन्नता आणि मानसिक विकार देखील इतिहासजमा होतील. जीवन जणू एक आनंदाचा कधी न संपणारा सोहळा बनेल. देवाच्या अनंत सामर्थ्याने आपल्या शरीराच्या पुनर्निर्माण प्रक्रिया कार्यरत केल्या जातील आणि ख्रिस्ताच्या खंडणीच्या योगे पापाचा प्रभाव नाहीसा केला जाईल. “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.
देवाच्या राज्यात परिपूर्ण शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य लाभण्याची आशा किती अद्भुत आहे! आज एक सुसंतुलित आणि आरोग्यवर्धक जीवनशैली पाळताना, तुम्ही देवाच्या नव्या जगातील भावी आशीर्वादांची आतुरतेने वाट पाहू शकता. यहोवा ‘तुमचे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करो आणि तुमचे तारुण्य गरुडासारखे नवे होवो.’—स्तोत्र १०३:५.