जगावरील दृष्टिक्षेप
फुटबॉल खेळाचे वेड
इंग्लंडमधील फुटबॉल खेळाच्या चाहतांनी आपले वेड एका असामान्य मार्गाने दाखवले: त्यांची विनंती आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देहाची राख त्यांचा आवडता संघ ज्या मैदानावर खेळतो तेथे पसरावी. एका प्रसिद्ध संघाला दरवर्षी अशा २५ विनंत्या प्राप्त झाल्या. ही प्रथा इतकी प्रचलित बनली आहे की, इंग्लिश फुटबॉल संघटनेला, मानवी अवशेषांना कसे पसरावे याबद्दल संघांना ताकीद द्यावी लागली. द मेडिकल पोस्ट नुसार त्यांनी दिलेल्या सल्ल्यात या गोष्टींचा समावेश आहे: “सर्व राख पसरण्याची गरज नाही. छोटासा नमुना पसरून टाकू शकता. खूप राख गवताचा नाश करू शकते. . . . एका झाडणीने ही राख अशी पसरवा की त्याचा सगळीकडे पातळ थर राहील.” (g94 9/22)
एक “दियाबल” कमी
टोकियोतील एका विवाहीत दांपत्याने आपल्या नवजात अर्भकाचे नाव अकूमा म्हणजे “दियाबल” असे ठेवले. “या नावात अशी काही छाप आहे की, ते एकदा ऐकल्यावर त्याचा विसर पडणार नाही. हे असे नाव आहे ज्यामुळे माझ्या मुलाला, मोठा झाल्यावर अनेकांच्या भेटीगाठी पडतील,” असे पित्याने म्हटले. स्थानिक नोंदणी अधिकाऱ्यांनी ते नाव प्रथमतः नोंदवून घेतले, पण नंतर ते स्वीकाहार्य वाटत नसल्यामुळे व शिवाय त्यामुळे उपहास व योग्यायोग्य भेद करण्याचा अभाव सूचित झाल्यामुळे पालकीय हक्कांची पायमल्ली होते या कारणावरून रद्द केले. या प्रकरणाचा वाद कित्येक महिने कोर्टात चालल्यावर शेवटी पालकांनी हार मानली व म्हटले, की ते मुलाचे दुसरे नाव नोंदणीसाठी देतील. यामुळे त्याचे जीवन सुरळीत चालू राहू शकेल आणि तो शासकीयरित्या नामरहित राहू शकणार नाही. पण यामुळे घरातील वातावरणात फरक घडला नाही. पित्याने म्हटले, “आम्ही त्याला रोज घरी अकूमा अशीच हाक मारू.” या हाकेला मूल चांगला प्रतिसाद देते. (g94 9/22)
राग व हृदयाचे झटके
“हृदरोग असणारे लोक रागीष्ट होतात तेव्हा त्यांना हृदयाचे झटके येण्याची संभावना दुप्पट असते, आणि हा धोका साधारणपणे दोन तास राहू शकतो,” असे द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्र कळवते. राग व हृदयाचे वाढते आजार, वाढता रक्तदाब आणि रक्तवाहिनी बंद पडणे याबद्दल पूर्वीच्या अभ्यासाने कळवले असले तरी, या नव्या अभ्यासाने प्रथमतःच राग त्वरित हृदयाचे झटके आणू शकतो याबद्दलचा वैज्ञानिक पुरावा सादर केला. ही जोखीम, भावनिक संघर्षात स्वतःला शांत राखण्याचा प्रयत्न करण्यामुळे कमी करता येते असे या अभ्यासाचे प्रमुख डॉ. मरे मिट्टलमन म्हणतात. “संशोधकांना हेही आढळले की, जे लोक हृदयाच्या झटक्यांची जोखीम कमी करणारे ॲस्प्रीन घेतात अशांना रागीष्ट उद्रेकाच्या परिणामांपासून काही प्रमाणात राखले जाते,” असे लेखाने म्हटले. हे बहुधा ॲस्प्रीनमुळे रक्तबिंबिकेच्या क्षमतेला रक्तवाहिनीत गाठ निर्माण होऊन ती बंद पडण्यापासून मज्जाव केला जातो त्यामुळे असावे. अशाप्रकारे राग रक्तबिंबिकेवर परिणाम करू शकतो, असे डॉ मिट्टलमन यांनी म्हटले. (g94 9/22)
झोप व बुबुळावरील प्लास्टिक काच हे सुसंगत होऊ शकत नाहीत
झोपताना देखील ज्यांच्या बुबुळावर प्लास्टिक काच (काँटॅक्ट लेन्स) असते अशांना, ती न घालणाऱ्यांपेक्षा आठ पटीने अधिक डोळ्यांचा संसर्ग जडू शकतो, असे एका अलिकडच्या अभ्यासात दिसले. या प्लास्टिक काचेची आरोग्याच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली तरी ती रात्री धारण करणाऱ्याला संभाव्य धोक्यापासून वाचवू शकत नाही, असे संशोधकांना आढळल्याचे इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून वृत्तपत्र कळवते. या काचेचा कोणताही प्रकार असला तरी ती रात्री परिधान करणाऱ्याच्या बुबुळाला व बाहेरील पडद्याला जंतु व अतिसूक्ष्म जंतूनी संसर्गित करतात. झोपण्याआधी ही प्लास्टिक काच काढून ठेवल्यास बुबुळावरील पारदर्शक पडद्याचे ७४ टक्क्यांपर्यंतचे ज्वलन रोखता येते. (g94 9/22)
खेळ की आरोग्य?
“व्यावसायिक खेळांचा संबंध खेळाडूचे नैपुण्य वाढवण्यासोबत असतो; त्याचा आरोग्य वाढवण्याशी क्वचितच संबंध असतो,” असे अस्थिरोग तज्ज्ञ विक्टर मात्सुडो यांनी म्हटल्याचे वेझा या वृत्तपत्राने उद्धृत केले. “आपले आरोग्य सुधारण्यासाठी क्रिडापटू होण्याची काहीही गरज नाही.” खरे म्हणजे, मात्सुडो म्हणतात की, “जो अतिरेकीपणाने व्यायाम करतो तो बैठे काम करणाऱ्या माणसापेक्षा लवकर मरण्याची शक्यता आहे.” ते पुढे म्हणतात: “पुष्कळ लोकांना अजूनही असे वाटते की, योग्य व्यायाम म्हटला की, त्यात परिश्रम, घाम व त्रास असतो. हे खरे नव्हे. उलटपक्षी, योग्य व्यायाम, प्रखरतेबद्दल संयमी असून त्यामुळे वेदना, बेचैनी किंवा ताण वगैरे नसतो. . . . बैठे काम करणाऱ्या आणि चांगल्या आरोग्याची इच्छा बाळगणाऱ्यांना चालणे ही पहिली गोष्ट सुचविली जाते.” आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अर्धा तास पायी चालणाऱ्याला बैठ्या माणसापेक्षा १५ टक्क्यांनी मरण्याची शक्यता कमी असते. डॉ. मात्सुडो सुचवतात की, हे चालणे सपाट जमिनीवरून करावे व अंतर असे कापावे की, त्याचा श्वासोच्छ्वास सहज राहून त्याला दुसऱ्या कोणाशी बोलता येईल. (g94 9/22)