वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ४/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल वाचन लाभाचे ठरते
  • कंठ निगा
  • “बैठे काम व्याधी”
  • तिबेटच्या हवामानाचा वेध
  • औषधी मुंग्या
  • पंजाबी लोक आणि मूतखडा
  • जीव धोक्यात घालणारे आप्रवासी
  • सहस्त्रक केव्हाच सरून गेले?
  • भरकटलेली भक्‍ती?
  • ड्रग विक्रीपासून नफा
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९४
सावध राहा!—१९९८
g98 ४/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

बायबल वाचन लाभाचे ठरते

असोसिएटेड प्रेसने अहवाल दिलेल्या एका अभ्यासानुसार, क्वचितच बायबल वाचणाऱ्‍यांच्या तुलनेत, आठवड्यातून कमीत कमी एकदा बायबलचे वाचन करणाऱ्‍या अमेरिकन लोकांना अधिक आनंदी व समाधानी वाटते; तसेच, त्यांना जीवनही अधिक उद्देशपूर्ण वाटते. इलिनॉइसच्या मार्केट फॅक्ट्‌स संस्थेने ढोबळ मानाने केलेल्या अमेरिकन प्रौढांच्या एका सर्वेक्षणात, महिन्यातून एकदाही बायबल न वाचणाऱ्‍या ५८ टक्के लोकांच्या तुलनेत, नेहमी बायबल वाचणाऱ्‍यांपैकी जवळजवळ ९० टक्के लोकांनी आपले मन सतत किंवा सहसा शांत असल्याचे सांगितले. शिवाय, बायबलच्या २८ टक्के अनियमित वाचकांच्या तुलनेत १५ टक्के नियमित वाचकांनी आपल्याला इतर जण स्वीकारतील की नाही, याची काळजी वाटत असल्याचे सांगितले. क्वचितच बायबल वाचणाऱ्‍या २२ टक्के लोकांच्या तुलनेत नित्याने बायबल वाचणाऱ्‍या केवळ १२ टक्के लोकांनी असे म्हटले, की त्यांना कधीकधी किंवा वारंवार मृत्यूच्या विचाराने भीती वाटते.

कंठ निगा

द टोरोन्टो स्टार वृत्तपत्राच्या अहवालानुसार, जो कोणी आपल्या आवाजाचा अधिक प्रयोग करतो जसे की एखादा शिक्षक—त्याला ताण येऊन आपला आवाज गमावण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे, गोंगाटाच्या वातावरणात इतरांना आपले ऐकले जावे म्हणून गळा फाडून सतत ओरडत राहिल्याने स्वरतंतूंचे नुकसान होऊ शकते. हळू आवाजात बोलणे किंवा नित्य घसा खाकरणे हे देखील तुमच्या आवाजाला हानिकारक असू शकते, असे वाणी आणि भाषा रोगचिकित्सक बॉनी मॅन म्हणतात. त्यांचा असा सल्ला आहे, की ही समस्या एक गंभीर स्वरूप घेईपर्यंत हातावर हात ठेवून बसू नका; तसेच, मानेवर आणि खांद्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी उत्तम शरीरस्थिती राखण्याचेही त्या उत्तेजन देतात. त्या पुढे म्हणतात: “तुमचा घसा ओलसर ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.” तुम्हाला तुमच्या आवाजाचा अधिक उपयोग करायचा असल्यास दिवसभर घोट घोट पाणी पीत राहण्याचा सल्ला मॅन देतात.

“बैठे काम व्याधी”

सिईना शरीरस्थिती केंद्राच्या विद्यापीठाचे संचालक, प्राध्यापक मॅयूरीट्‌स्यो रीचारडी यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार ८० टक्क्यांहून अधिक इटालियन लोक, शरीरस्थितीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. ‘बैठे काम व्याधीचे’ निम्मेअधिक पीडित पाठदुखी, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे तसेच शरीर संतुलनाच्या समस्या, रक्‍तदाबातील चढउतार, अतिसार, बद्धकोष्ठता, आंतड्यांतील दाह आणि जठर दाह यांची तक्रार करतात, असा ईल मेसाजेरो वृत्तपत्राचा अहवाल आहे. रीचारडी म्हणतात, की वरील समस्यांवर मात करण्यासाठी “जपानी आणि चिनी लोक कामाच्या वेळात दरएक तासानंतर काही साधेसोपे व्यायाम करतात; आम्हा इटालियन लोकांना मात्र कॉफी ब्रेकशिवाय दुसरा कोणताच ब्रेक मिळत नाही.”

तिबेटच्या हवामानाचा वेध

नव वैज्ञानिक (इंग्रजी) नियतकालिकाचा असा अहवाल आहे, की आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दहा देशांनी मान्सून वाऱ्‍यांचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग आयोजित केले आहेत. आशियाच्या अधिकतर क्षेत्रांतील कृषीकर्म मान्सून वाऱ्‍यांमुळे येणाऱ्‍या पावसावर विसंबून असते; पण दर वर्षी यांच्यात लक्षणीय फरक होण्याची शक्यता असते. हवामानशास्त्रज्ञांचा असा विश्‍वास आहे, की तिबेटचे पठार हे मान्सून पावसाचे एक प्रमुख कारण होय; पण विश्‍लेषण करण्यासाठी तिबेटकडून कोणतीही माहिती उपलब्ध नाही. चीनसोबत झालेल्या वाटाघाटीनंतर तापमान, आर्द्रता, वारा आणि इतर हिमालयीन हवामान घटकांवर नजर ठेवण्याकरता सध्या तिबेटमध्ये मनुष्यबळरहित यंत्रणा उभारण्यात आली आहे. यापासून प्राप्त होणारी माहिती आशियाच्या मान्सून वाऱ्‍यांविषयी पूर्वीपेक्षा चांगली समज देईल अशी संशोधकांना आशा आहे.

औषधी मुंग्या

सन १९४७ च्या एका युद्धादरम्यान, चिनी लष्करी डॉक्टर वू जीचन यांना, जखमी सैनिकांना होणाऱ्‍या संसर्गावर आळा घालायचा होता, परंतु त्यांच्याकडील औषधांचा साठाच संपला. अगदी मेटाकुटीस येऊन त्यांनी एका स्थानिक डॉक्टरांची कास धरली; या डॉक्टरांनी त्यांना एक पारंपरिक चिनी औषध—जखमा स्वच्छ करण्यासाठी मुंग्या घालून उकळलेले पाणी आणि विशिष्ट प्रकारच्या मुंग्यांपासून तयार केलेले औषध दिले. चायना टुडे यानुसार हे औषध इतके गुणकारी होते, की डॉ. वू यांनी मुंग्यांच्या औषधी गुणधर्मांचे संशोधन करण्यासाठी दीर्घ पल्ल्याचे संशोधन हाती घेतले. त्यांचा विश्‍वास आहे, की मुंग्यांपासून तयार केलेली औषधे आपल्या रोगप्रतिकारक संस्थेचे संतुलन राखण्यास मदत करतात आणि ते म्हणतात: “मुंगी एक इवलेसे पोषण भांडार आहे. तिच्यामध्ये, मानवी शरीरास आवश्‍यक असणारी ५० पोषक द्रव्ये, २८ आमिनो आम्ल, विविध खनिज पदार्थ व रासायनिक संयुगे असतात.”

पंजाबी लोक आणि मूतखडा

इंडिया टुडे इंटरनॅशनलच्या अहवालानुसार जगाच्या पाठीवरील कोणत्याही समाजापेक्षा पंजाब राज्य तसेच त्याच्या आसपासच्या क्षेत्रांतील लोकांना मूतखडे होण्याची शक्यता अधिक आहे. ढोरमेहनत आणि यथेच्छ पोटपूजा यांसाठी पंजाबी लोक सर्वदूर प्रसिद्ध आहेत; पण अंगाची लाही लाही करणाऱ्‍या उन्हाळ्याच्या महिन्यांत हे लोक बहुधा पुरेसे पाणी पीत नाहीत, असे सदर अहवाल म्हणतो. याकारणास्तव, एका अलीकडील आंतरराष्ट्रीय मूत्ररोग परिषदेत त्यांच्या प्रदेशाचे वर्णन विश्‍वातील, “मूतखड्याचा प्रदेश” असे करण्यात आले होते. येथे मूतखडा, सरासरी दोन ते तीन सेंटीमीटर [सुमारे एक इंच] इतका मोठा असतो; युरोप आणि संयुक्‍त संस्थानांत तो एक सेंटीमीटर [अर्ध्या इंचापेक्षा कमी] इतका आहे. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करण्याची किंवा औषधोपचाराची टाळाटाळ करण्याची अनेक भारतीयांची प्रवृत्तीच यामागील कारण असल्याचे अहवाल म्हणतो. मूत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की निरोगी लोकांनी दररोज कमीतकमी दोन लिटर शुद्ध पाणी पिण्यास हवे.

जीव धोक्यात घालणारे आप्रवासी

दक्षिण आफ्रिकेत दर वर्षी, नोकरीधंद्याच्या आणि एका उत्तम राहणीमानाच्या शोधात हजारो बेकायदेशीर आप्रवासी आपले जीवन जोखिमेत घालतात. लिंपोपो नदीतून पोहून जाताना शेकडो आप्रवासी मगरींची शिकार बनले असल्याचे सांगितले जाते. क्रूगर राष्ट्रीय उद्यानांतून पायी जात असताना इतर जण हत्तींकडून तुडवले जातात किंवा मग सिंहांच्या तावडीत सापडतात. अलीकडेच, उद्यान अधिकाऱ्‍यांनी पाच नरभक्षक सिंहांची हत्या केली. द स्टार या जोहान्सबर्ग वृत्तपत्राने असा अहवाल दिला: “पाच सिंहांच्या शवपरीक्षेत, या प्राण्यांच्या पचन संस्थेत मानवावशेष असल्याचे उघडकीस आले.” एकूण किती बेकायदेशीर आप्रवासी वन्य प्राण्यांचे भक्ष्य बनले याची अचूक संख्या ज्ञात नाही. “नियमितपणे गस्त घालणाऱ्‍यांना, मानवाच्या पाऊल खुणा आढळल्या आहेत ज्या एकाएकी कोठे गायब होतात कोणास ठाऊक,” असे वृत्तपत्राचे म्हणणे आहे. “एक प्रौढ नर [सिंह] एकाच वेळी ७० किलोग्रॅम मांसाचे भक्षण करू शकतो. विशेषतः, सिंहाने मानवाचा फडशा पाडल्यानंतर तरस आणि लांडगे या मोक्याच्या ठिकाणी पोहंचतात तेव्हा पुरावा म्हणून कोणताही मानवावशेष शिल्लक राहण्याची शक्यता अगदीच दुर्मिळ असते.”

सहस्त्रक केव्हाच सरून गेले?

विद्वानांच्या मते, “खरे तर, कित्येक वर्षांपूर्वीच सहस्त्रक सरून गेले. पण खेदाची बाब अशी, की आपण सर्वांनीच ते चुकवले,” असे न्यूजवीक नियतकालिक म्हणते. याचे कारण? आपली दिनदर्शिका, “समयाच्या स्वैर विभागणीवर आधारित आहे;” असे समजले जाते, की ती ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित आहे. पण सदर लेख अशी नोंद करतो, की आधुनिक विद्वानांच्या विश्‍वासानुसार येशूचा जन्म खरे तर, “ख्रिस्त पूर्व” (B.C.) याच्या कितीतरी आधी झाला होता. न्यूजवीकच्या म्हणण्यानुसार त्याचा “अर्थ आपण केव्हाच तिसऱ्‍या सहस्त्रकात प्रवेश केला आहे.” ही चूक, डायोनिसियस द शॉर्ट यांच्या हातून घडली आहे; पोप जॉन पहिले यांनी सा.यु. ५२५ मध्ये यांना, उपासनाविषयक एक मानक दिनदर्शिका तयार करण्याचा आदेश दिला होता. डायोनिसियस यांनी येशूच्या जन्म तारखेचा एक प्रमुख तारीख म्हणून उपयोग करण्याचे ठरविले, परंतु त्यांची कालगणना चुकली. न्यूजवीकच्या म्हणण्यानुसार: “येशूचा जन्म नेमका केव्हा झाला हे इतिहासकारांना कधीच खात्रीपूर्वक कळणार नाही. नाताळाची, अर्थात ज्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो त्याची कालगणना देखील स्वैर आहे. विद्वान असा विश्‍वास बाळगतात, की दक्षिणायनान्त मूर्तिपूजक उत्सवांशी जुळविण्याकरता—व हे उत्सव धार्मिकरित्या ठप्प पाडण्याकरता—चर्चने डिसें. २५ ही तारीख निवडली.” बायबलची कालगणना सूचित करते, की येशूचा जन्म सा.यु.पू. २ या वर्षी झाला होता.

भरकटलेली भक्‍ती?

जून १, १९९७ रोजी, मेक्सिको सिटी मेट्रो स्टेशनच्या एका भिंतीवर, प्रत्यक्षात आर्द्रतेमुळे तयार झालेली एक आकृती निदर्शनास आली. अनेक श्रद्धाळू कॅथलिकांसाठी ही आकृती ग्वादेलूपची कुमारी—कुमारी मरीयेसाठी मेक्सिकोमध्ये दिलेले नाव—हीचे एक दैवी दर्शन होते. एल युनिव्हर्सल वृत्तपत्राने म्हटले: “कॅथलिक चर्च, मेट्रोमधील कुमारीचे हे दर्शन एक खराखुरा चमत्कार नव्हे, तर पाणी झिरपून स्टेशनच्या भिंतींवर आपोआप तयार झालेली एक आकृती असल्याचे मानते.” तरीही, अनेक लोक तिची उपासना करण्यासाठी क्षणभर तिच्यासमोर थांबतात आणि ‘दरएक तासाला हजाराहून अधिक लोकांनी या प्रतिमेचे दर्शन घेतलेले आहे.’ या प्रतिमेसाठी एक लहानशी देवळी बांधून एका कॅथलिक पाळकांच्या हस्ते तिचे उद्‌घाटन देखील करण्यात आले.

ड्रग विक्रीपासून नफा

संयुक्‍त राष्ट्र संघानुसार, जगभर अंदाजे ३४ कोटी ड्रगचे व्यसनी आहेत. झॉर्नल डॅ टार्ड यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार “पहिल्या क्रमांकावर चिंताहारक आणि झोप आणणाऱ्‍या औषधांवरील अधीनता असून २२.७५ कोटी लोक, म्हणजे जगाची ४ टक्के लोकसंख्या यांचे सेवन करते. त्यानंतर मारीजुआनाचा क्रमांक येतो आणि १४.१ कोटी व्यसनी, म्हणजे विश्‍वाची २.५ टक्के लोकसंख्या ते सेवन करते.” असाही अंदाज बांधला जातो, की सर्व अवैध ड्रग्सपैकी केवळ ५ ते १० टक्के पोलिसांच्या हाती लागतात. ड्रगच्या विक्रीपासून दर वर्षी ४०० अरब डॉलर इतके उत्पन्‍न मिळते. काही प्रकरणांत तर ड्रग व्यापारी, ३०० टक्क्यांपर्यंत—“दुसऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या व्यापारात मिळत नाही इतका नफा मिळवतात,” असे वृत्तपत्र म्हणते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा