बचावाची गुरुकिल्ली
एखादा खूनी तुमच्या भागात भटकत आहे अशी बातमी तुम्हाला कळाली तर, स्वतःचे तसेच तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काही कराल का? निश्चितच, तुमच्या घरात सहजपणे घुसता न येण्यासाठी, तुम्ही दरवाजांना कड्या व कुलपे लावून ठेवाल. तसेच, तुम्ही संशयखोर अनोळखी व्यक्तींवर पहारा ठेवून त्यांच्याबद्दल लगेचच तक्रार कराल.
स्त्रियांनी, स्तनाच्या कर्काच्या घातकी रोगाबद्दल यापेक्षा काही कमी करावे का? स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि बचावण्याची शक्यता वाढवण्यासाठी ते कोणते उपाय करू शकतात?
प्रतिबंध आणि आहार
अमेरिकेमध्ये ३ पैकी १ कर्करोग आहारासंबंधीच्या कारणांमुळे होतो, असा अंदाज केला जातो. तुमच्या शरीराच्या प्रतिबंधक रचनेला टिकवून ठेवण्यात मदत करणारा चांगला आहार, तुमच्या संरक्षणाची सर्वात प्रथम गोष्ट असेल. कोणतेही परिचित अन्न कर्करोगाला बरे करू शकत नाही तरी, काही विशिष्ट अन्न खाल्ल्याने आणि इतर कमी केल्याने, ते प्रतिबंध करणारे उपाय ठरू शकतील. “योग्य आहार घेतल्याने, स्तनाचा कर्क होण्याच्या धोक्याला ते पन्नास टक्क्याने कमी करू शकते,” असे वल्हल, न्यूयॉर्कच्या अमेरिकन हेल्थ फाऊंडेशनच्या डॉ. लेनर्ड कोअनने म्हटले.
तंतुमय पदार्थ असलेल्या द्विदल धान्यांनी बनवलेले पाव व अन्नधान्य, प्रोलॅक्टीन व स्त्रीमदजनाचे प्रमाण कमी करण्यात मदत करू शकतात. ते स्वतःला या प्रवर्तकासोबत बांधतात व त्यांना शरीराबाहेर टाकतात. पोषण व कर्करोग (इंग्रजी) या नियतकालिकाप्रमाणे, “हे प्रभाव कारसिनोजेनेसिसला वाढवणाऱ्या टप्प्यांना दाबून टाकू शकतात.”
संपृक्त स्निग्ध पदार्थ कमी केल्याने धोका कमी होऊ शकतो. प्रतिबंध (इंग्रजी) नियतकालिकाने असा सल्ला दिला की, मलईयुक्त दुधाऐवजी मलई नसलेले दूध घेणे, लोणीचे प्रमाण कमी करणे, चरबी नसलेले मांस खाणे, व चामडी काढलेली कोंबडी खाल्ल्याने संपृक्त स्निग्ध पदार्थांचे प्रमाण सुरक्षित स्थरावर आणले जाऊ शकते.
अ जीवनसत्व अधिक असलेली गाजरे, भोपळे, रताळी आणि पालक, कॉलर्ड व मोहरीच्या भाजीसारख्या हिरव्या पालेभाज्या मदतदायक ठरतील. असा विचार केला जातो की, अ जीवनसत्व कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या बदलांना तयार होण्यापासून टाळते. तसेच ब्रॉक्ली, ब्रस्सेल स्प्राउटस्, फुलगोबी, कोबी आणि कांद्याची पात यासारख्या भाज्यांमध्ये संरक्षक द्रव्य उत्पन्न करणारी रसायने असतात.
स्तनाचा कर्क—प्रत्येक स्त्रीने काय जाणलेच पाहिजे (इंग्रजी), या पुस्तकात डॉ. पॉल रॉड्रीगज असे म्हणतात की, अपसामान्य पेशींना ओळखणाऱ्या आणि नाश करणाऱ्या प्रतिबंधक रचनेला आहाराद्वारे मजबूत केले जाऊ शकते. ते, चरबी नसलेले मांस, हिरव्या पालेभाज्या, शिंपले यासारख्या लोहयुक्त व अधिक क जीवनसत्व असणारी फळे व भाज्यांसारखे अन्न खाण्याचा सल्ला देतात. राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे नियतकालिक (इंग्रजी) असा अहवाल देते की, अधिक क जीवनसत्वयुक्त फळे व भाज्यांनी स्तनाच्या कर्काचा धोका कमी होतो. सोयाबीन व न आंबलेल्या सोयाबीनच्या पदार्थांमध्ये जीनीस्टीन असते. प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये अर्बुदाच्या वाढीला ते दाबून टाकते हे ज्ञात आहे. परंतु, ते मानवांवर प्रभावी ठरेल का हे अजूनही प्रस्थापित व्हावयाचे आहे.
प्राथमिक निदान
“स्तनाच्या कर्काचा मार्ग बदलण्यात, स्तनाच्या कर्काचा लवकर शोध लागणे ही सर्वात महत्त्वपूर्ण पायरी आहे,” असे उत्तर अमेरिकेचे रेडियोलॉजीक चिकित्सालये (इंग्रजी) हे प्रकाशन म्हणते. या बाबतीत, स्तनांची नियमित रुपातील स्व-तपासणी, डॉक्टरांकडून वार्षिक तपासणी आणि मॅमोग्रॅफी या तीन मुख्य गोष्टी आहेत.
नियमितपणे दर महिन्याला स्तनांची स्व-तपासणी केली पाहिजे. स्तन घट्ट होणे किंवा गाठी यासारख्या गोष्टींकडे एखाद्या स्त्रीने तिच्या स्तनांच्या आकाराद्वारे किंवा जाणीवेने काही संशयास्पद आहे का ते पाहण्यास दक्ष असावे. तिला अगदी क्षुल्लक गोष्ट आढळली तरी, तिने तात्काळ डॉक्टरांकडे जावे. जितक्या लवकर गाठीचे निदान करण्यात येईल तितका तिला तिच्या भविष्यावर अधिक ताबा असेल. स्वीडनमधील एक अहवाल दाखवतो की, एखादा कर्कप्रक्षेपित नसलेला स्तनाचा कर्क १५ मिलीमीटरपेक्षा किंचित मोठा किंवा आकाराने थोडा लहान असला व त्यास शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आले तर, १२ वर्षांची आयुर्मर्यादा ९४ टक्क्यांनी शक्य होते.
डॉ. पेट्रीशिया केली म्हणतात: “१२ १/२ वर्षात स्तनाचा कर्क न आढळल्यास, तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाही. . . . तसेच केवळ बोटांनी, स्त्रियांना एका सेंटीमीटर पेक्षा लहान स्तनाच्या कर्कांना शोधून काढण्यास शिकवले जाऊ शकते.”
अशी शिफारस केली जाते की, प्रत्येक वर्षी नित्याने विशेषतज्ज्ञाकडून किंवा डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी केली पाहिजे. एखादी स्त्री ४० वर्षांची झाल्यावर ते विशेषकरून केले पाहिजे. एखादी गाठ आढळल्यास, कोणा स्तनांच्या विशेषतज्ज्ञाकडून किंवा शल्यचिकित्सकाकडून दुसरे मत घेणे चांगले ठरेल.
अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणते की, स्तनाच्या कर्काविरुद्ध एक चांगले हत्यार म्हणजे नियमित मॅमोग्रम करणे होय. अशाप्रकारच्या क्ष-किरणांनी एखादा अर्बुद, तो जाणवायच्या दोन वर्षांआधीच शोधता येतो. या पद्धतीची शिफारस ४० पेक्षा अधिक वय असलेल्या स्त्रियांसाठी केली जाते. तथापि, डॉ. डॅनिएल कोपेन्ज आपल्याला माहिती देतात की: “ते परिपूर्ण नाही.” त्यामुळे सर्व स्तनाचे कर्क शोधले जाऊ शकत नाहीत.
न्यूयॉर्कमधील स्तन चिकित्सालयाच्या डॉ. वेंडी लोगन-यंगने अवेकला! असे सांगितले की, एका स्त्रीला किंवा तिच्या डॉक्टरांना काही चुकीचे आढळले परंतु, मॅमोग्रॅम तसा काही संकेत देत नसेल तर शारीरिक निदानाकडे दुर्लक्ष करून क्ष-किरणांवर अवलंबून राहण्याकडे कल असेल. त्या म्हणतात की, “आजकाल पाहण्यात येणारी ही सर्वात मोठी चूक आहे.” त्या स्त्रियांना असा सल्ला देतात की, त्यांनी कर्करोग शोधण्याच्या मॅमोग्रॅफीच्या चाचणीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये पण, सोबतच स्तनाच्या तपासणीवर अधिक अवलंबून राहावे.
मॅमोग्रॅफीने अर्बुद शोधले जाऊ शकतात तरी, ते सौम्य (कर्कजन नसलेले) आहेत का दुर्दम (कर्कजन) आहेत याचे निदान ते खरोखर देऊ शकत नाही. ते केवळ बायॉप्सीने केले जाऊ शकते. मॅमोग्रॅमसाठी गेलेल्या आयरीनची घटना पाहा. तिच्या डॉक्टरांनी क्ष-किरणांच्या फिल्मवर आधारून तिच्या गाठीचे निदान ठरवून सांगितले की, तो सौम्य स्तनाचा रोग होता आणि म्हटले: “मी निश्चितपणे सांगतो की तुम्हाला कर्करोग नाही.” ज्या परिचारिकेने तो मॅमोग्रॅम केला ती चिंता करीत होती. परंतु आयरीन म्हणाली: “मला वाटले की जर डॉक्टरांचीच खात्री आहे तर मग कदाचित मलाच भलतीच भीती असेल.” लवकरच ती गाठ मोठी झाली म्हणून आयरीन दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली. बायॉप्सी घेतल्यावर हे दिसून आले की, तिला सूज वाढवणारा कारसिनोमा झाला होता. तो जलद रितीने वाढणारा कर्करोग आहे. एखादा अर्बुद सौम्य आहे (जसे १० पैकी ८ असतात) किंवा दुर्दम आहे हे ओळखण्यासाठी बायॉप्सी केली पाहिजे. ती गाठ संशयास्पद दिसू लागते किंवा वैद्यकीयरित्या तशी वाटू लागते किंवा ती वाढत असेल तर, बायॉप्सी केली पाहिजे.
उपचार
सध्या शस्त्रक्रिया, उत्सर्जन आणि ड्रग थेरपी हे स्तनाच्या कर्काचे सर्वसामान्य उपचार आहेत. अर्बुदाचा प्रकार, त्याचा आकार, त्याची पसरण्याची वृत्ती, तो लसिका पर्णबंधापर्यंत पसरेल का आणि तुमच्या रजोनिवृत्तिकालाची स्थिती याबद्दलच्या माहितीमुळे ते, तुम्हाला व तुमच्या डॉक्टरांना उपचाराची पद्धत ठरवण्यास मदत करील.
शस्त्रक्रिया. पुष्कळ दशकांपासून रेडियल मॅसेक्टॉमी म्हणजेच, स्तनासहित त्याच्या खालचे स्नायू आणि लसिका पर्णबंध काढणे ही पद्धत सर्वत्र वापरण्यात आली आहे. परंतु अलिकडील वर्षात, स्तन-संरक्षण उपचार वापरण्यात आला आहे. यामध्ये अर्बुद आणि लसिका पर्णबंधाचे काढणे, शिवाय उत्सर्जन समाविष्ट आहे. त्याच्या बचावाचे प्रमाण मॅसेक्टॉमीच्या बरोबरीचे आहे. लहानसा अर्बुद काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्त्रियांना अधिक मनःशांती प्राप्त झाली आहे. त्यामुळे थोडीशीच विरूपता होते. परंतु, शस्त्रक्रियेचे ब्रिटीश नियतकालिक (इंग्रजी) असे म्हणते की, एकाच स्तनात विविध भागांमध्ये कर्करोग असणाऱ्या किंवा तीन सेंटीमीटरपेक्षा मोठे अर्बुद असणाऱ्या तरुण स्त्रियांना संरक्षण उपचाराने तो पुन्हा उद्भवण्याचा मोठा धोका आहे.
औषधाचे क्लीवलँड चिकित्सालय नियतकालिक (इंग्रजी) यामध्ये कर्करोग पुन्हा न उद्भवता बचाव होण्यात एक महत्त्वपूर्ण कारण दिले आहे: “रेडिएल मॅसेक्टॉमीमध्ये काही बदल केल्यावर . . . बचावाच्या आणि पुन्हा उद्भवण्याच्या प्रमाणावर रक्त संक्रमणाचा प्रतिकूल प्रभाव होतो.” अहवालाने दाखवले की, रक्त संक्रमण घेतलेल्या एका गटाच्या पाच वर्षांच्या बचावाचे प्रमाण ५३ टक्के होते. परंतु त्याउलट, रक्त न घेतलेल्यांच्या गटाचे प्रमाण ९३ टक्के होते.
शल्याकृती (इंग्रजी) या मध्ये आणखी एक बचावाचे साधन दिले आहे. तेथे डॉ. आर. ए. बॅडवे यांनी असे म्हटले: “रजोनिवृत्तिकालाच्या आधीच्या स्तनाच्या कर्क रुग्णांच्या दीर्घकालीन परिणामावर, मासिकपाळीच्या संबंधात शस्त्रक्रियेच्या वेळेचा मोठा प्रभाव पडतो.” त्या अहवालाने असे सांगितले की, स्त्रीमदजन उत्तेजित होण्याच्या अवस्थेत ज्या स्त्रियांनी अर्बुद काढून टाकले त्यांना, मासिकपाळीच्या इतर अवस्थेत शस्त्रक्रिया केलेल्यांपेक्षा त्याचा अधिकच वाईट परिणाम झाला. त्यांच्यापैकी ५४ टक्के दहा वर्षांसाठी जगल्या तर, त्याउलट नंतरच्या गटातील ८५ टक्के जगल्या. स्तनाचा कर्क असणाऱ्या रजोनिवृत्तिकालाच्या आधीच्या स्त्रियांसाठी, मासिकपाळी नंतर १२ दिवसांनी शस्त्रक्रियेची उचित वेळ आहे असे म्हटले जाते.
रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपी कर्करोगाच्या पेशींचा नाश करते. स्तन संरक्षण उपचारामध्ये, एखाद्या चिकित्सकाच्या स्तन वाचवण्याच्या प्रयत्नात सूक्ष्म कर्कबीज त्याच्या शल्याकृतीचा डोळा चुकवू शकतात. रेडिएशन थेरपी, राहिलेल्या पेशींचा नाश करू शकते. परंतु किरणोत्सर्गामुळे विरुद्ध स्तनात, दुसऱ्या वेळी कर्क निर्माण होण्याचा किंचित धोका असतो. विरुद्ध बाजूच्या स्तनाशी किरणोत्सर्गाचा संबंध कमीतकमी व्हावा अशी शिफारस डॉ. बेनेडीक फ्रॉस करतात. ते म्हणतात: “काही सोप्या प्रयत्नांनी प्रथम स्तनाच्या किरणोत्सर्गाच्या वेळी विरुद्ध स्तनावरील त्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.” विरुद्ध स्तनावर अडीज सेंटीमीटर जाडीचे शिशाचे आवरण घालण्याचा ते सल्ला देतात.
ड्रग थेरपी. शस्त्रक्रियेद्वारे स्तनाचे कर्क काढून टाकण्याचे प्रयत्न करूनही, नव्यानेच स्तनाचे कर्क असल्याचे निदान झालेल्या २५ ते ३० टक्के स्त्रियांमध्ये लपलेले कर्कप्रक्षेप असतील. ती इतकी लहान असू शकतात की, सुरवातीला त्याची काहीच लक्षणे दिसून येणार नाहीत. केमोथेरपी हा रासायनिक घटकांचा उपयोग करणारा उपचार आहे. हे रासायनिक घटक, शरीराच्या इतर भागांवर हल्ला करणाऱ्या पेशींचा नाश करतात.
केमोथेरपीचा प्रभाव मर्यादित आहे कारण, कर्कजन अर्बुदे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. प्रत्येक पेशीला औषधांबद्दल स्वतःची संवेदनक्षमता असते. उपचारातून वाचलेल्या पेशी, औषधांना प्रतिकारक असलेल्या अर्बुदांच्या नवीन पिढीला जन्म देऊ शकतील. परंतु, जानेवारी १९९२ च्या शल्याकृतीच्या (इंग्रजी) अंकाने हा पुरावा दिला की, केमोथेरपीमुळे एका स्त्रीची आणखी एक दशक जगण्याची शक्यता ५ ते १० टक्क्यांनी वाढते. ते तिच्या वयोमानावर अवलंबून आहे.
केमोथेरपीने मळमळ, उलट्या होणे, केस गळणे, रक्तस्त्राव, हृदयाचा अपाय, प्रतिबंध करणाऱ्या प्रतिसादांना दाबणे, अफलत्व आणि ल्यूकेमिया सारखे अवांतर परिणाम होऊ शकतात. वैज्ञानिक अमेरिकन (इंग्रजी) यात लिहिताना जॉन केंर्ज्ने असे विवेचन मांडले: “प्रगत अवस्थेत आणि जलद रितीने वाढणारा कर्क असणाऱ्या रुग्णाला या गोष्टी तुलनात्मकरित्या कमी धोक्याच्या असल्याचे जाणवतील. परंतु, एक सेंटीमीटर एवढा लहान कर्क असणाऱ्या आणि स्तनाचा कर्क असल्याचे दिसून आलेल्या स्त्रियांसाठी ती लक्ष देण्याजोगी गंभीर बाब असेल. तिला शस्त्रक्रियेनंतर काही अधिक उपचार मिळाला नाही तरी, पाच वर्षात कर्करोगामुळे मरण्याची तिची शक्यता केवळ १० टक्के आहे.”
प्रवर्तक थेरपी. प्रतिस्त्रीमदजन थेरपीमुळे स्त्रीमदजनाच्या वाढ-प्रेरक प्रभावांचा नाश केला जातो. रजोनिवृत्तिकालाच्या आधीच्या स्त्रियांमधील स्त्रीमदजनाचे प्रमाण कमी करून ते साध्य करता येते. ते शस्त्रक्रियेद्वारे अंडाशये काढून किंवा औषधांनी केले जाऊ शकते. शल्याकृती (इंग्रजी) याने अहवाल दिला की, कोणत्याही एका उपायाद्वारे, १०० उपचार केलेल्यांपैकी ८ ते १२ स्त्रियांच्या बचावाचे प्रमाण दहा वर्षे होते.
स्तनाचा कर्क असणाऱ्या स्त्रीला त्यानंतरची काळजी घेण्यासाठी संपूर्ण जीवनभर प्रयत्न करावा लागेल. सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागेल, कारण एक आहाराची पद्धत अयशस्वी ठरली आणि रोग पुन्हा उलटला तर, उपचाराचे इतर प्रकार आवश्यक ते हत्यार पुरवतील.
आणखी एक प्रकारचा कर्क उपचार वेगळेच वळण घेतो. तो ककेकसिआ नावाच्या विकृतीच्या बाबतीत आहे. कर्करोग संशोधन (इंग्रजी) हे नियतकालिक असे स्पष्टीकरण देते की, कर्करोगाच्या मृत्युंपैकी दोन तृतीयांश मृत्यू ककेकसिआमुळे होतात. ती संज्ञा स्नायू व इतर ऊतींच्या वाया घालवण्याचे वर्णन करण्यासाठी उपयोगात आणली जाते. अमेरिकेतील सिरेक्यूस कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. जोसेफ गोल्ड यांनी अवेकला! सांगितले: “आम्हाला असे वाटते की, ककेकसिआसाठी जीवरासायनिक मार्ग उघडे नाहीत तोपर्यंत, अर्बुदाची वाढ शरीरात पसरू शकत नाही.” हायड्राजीन सल्फेट सारख्या अविषारी औषधाचा उपयोग करणाऱ्या चिकित्सालयाच्या एका अभ्यासाने दाखवले की, यातील काही मार्गांना बंद केले जाऊ शकते. त्यात गोवलेल्या, प्रगत अवस्थेतील स्तनाच्या कर्काच्या ५० टक्के रुग्णांमध्ये स्थिरता साध्य झाली.
स्तनाच्या कर्कासाठी शस्त्रक्रिया नसलेला किंवा अविषारी उपचार पुरवण्यासाठी काही स्त्रियांनी वैकल्पिक औषधांसारख्या विकल्पांचा उपयोग केला आहे. उपचार पद्धती या वेगवेगळ्या असतात. काही पद्धती, हॉक्सी थेरपीमध्ये वापरण्यात येते त्याप्रमाणे आहार आणि वनस्पतींचा उपयोग करतात. परंतु, या उपचारांच्या गुणाची किंमत ठरवणारे प्रकाशित केलेले अभ्यास फारच कमी आहेत.
हा लेख बचावाचे मार्ग दाखवण्यासाठी लिहिण्यात आलेला असला तरी, कोणत्याही उपचाराला मान्यता देण्याचे अवेकचे! धोरण नाही. आम्ही सर्वांना, या रोगाच्या उपचाराच्या विविध पैलूंकडे सावधगिरीने पाहण्यासाठी उत्तेजन देतो.—नीतीसूत्रे १४:१५.
दबाव आणि स्तनाचा कर्क
ॲक्टा न्यूरोलॉजिका या नियतकालिकेत डॉ. एच. बॉलट्रुश यांनी असे स्पष्टीकरण दिले की, अधिक किंवा दीर्घकालीन दबावामुळे प्रतिबंधक रचनेतील शरीराचे प्रतिअर्बुदक बळ कमी होऊ शकते. थकवा, औदासिन्य किंवा भावनिक आधाराचा अभाव जाणवणाऱ्या स्त्रियांची प्रतिबंधक रचना ५० टक्क्यांनी धोक्यात असू शकते.
यास्तव, मन व कर्करोगाचे पूर्वनिदान (इंग्रजी) यात लिखाण केलेल्या डॉ. बॉजील स्टॉल यांनी यावर जोर दिला: “रोगाच्या उपचारादरम्यान तसेच नंतर कर्करोगी सहन करत असलेला अनिवार्य शारीरिक आणि मानसिक आघात कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत.” परंतु कशा प्रकारच्या आधाराची गरज आहे? (g94 4/8)
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
कोणतेही परिचित अन्न कर्करोगाला बरे करू शकत नाही तरी, काही विशिष्ट अन्न खाल्ल्याने आणि इतर कमी केल्याने, ते प्रतिबंध करणारे उपाय ठरू शकतील. “योग्य आहार घेतल्याने, स्तनाचा कर्क होण्याच्या धोक्याला ते पन्नास टक्क्याने कमी करू शकते,” असे डॉ. लेनर्ड कोअनने म्हटले
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
“स्तनाच्या कर्काचा मार्ग बदलण्यात, स्तनाच्या कर्काचा लवकर शोध लागणे हे सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे उत्तर अमेरिकेचे “रेडियोलॉजीक चिकित्सालये” (इंग्रजी) हे प्रकाशन म्हणते. या बाबतीत, तीन मुख्य गोष्टी आहेत: नियमित स्तनाची स्व-तपासणी, डॉक्टरांकडून वार्षिक तपासणी आणि मॅमोग्रॅफी
[१० पानांवरील संक्षिप्त आशय]
औदासिन्य किंवा भावनिक आधाराचा अभाव जाणवणाऱ्या स्त्रियांची प्रतिबंधक रचना धोक्यात असू शकते
[९ पानांवरील चौकट]
स्व-तपासणी—एक मासिक तपासणी
मासिकपाळी संपल्यावर चार ते सात दिवसांनंतर स्तनांची स्व-तपासणी केली पाहिजे. रजोनिवृत्तिकाल उलटून गेलेल्या स्त्रियांनी देखील प्रत्येक महिन्याला त्याच दिवशी तपासणी करण्याची गरज आहे.
प्रत्येक महिन्याला त्याच दिवशी पाहण्याची चिन्हे
• कोणत्याही आकाराची गाठ (लहान किंवा मोठी) किंवा स्तन घट्ट होणे.
• स्तनांच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे, खळगे पडणे किंवा डाग पडणे.
• स्तनाग्र आत ओढली जाणे किंवा आत वळणे.
• स्तनाग्रांवर पुरळ येणे किंवा खपल्या पडणे किंवा द्रव निघणे.
• काखेत मोठ्या गाठी निर्माण होणे.
• स्तनावरील चामखलीत किंवा जखमेच्या खुणामध्ये काही बदल होणे.
• सर्वसामान्यापेक्षा स्तनाची वेगळीच असमिती.
स्व-तपासणी
उभे राहून, डावा हात उचला. उजव्या हाताच्या उपयोगाने, बोटांनी लहान गोलाकारात स्तनांच्या बाहेरील बाजूने हळूहळू दाबत स्तनाग्रांपर्यंत तसेच करत या. तसेच काखेतील व स्तनांमधील भागाकडेही लक्ष द्या.
सपाट झोपून, डाव्या खाद्यांखाली उशी ठेवा. डावा हात डोक्यावर किंवा डोक्याखाली ठेवा. वर सांगितल्याप्रमाणे तीच गोलाकार कृती करा. उजव्या बाजूसाठी त्याउलट करा.
कोणता स्त्राव येतो का ते पाहण्यासाठी हळुवारपणे स्तनाग्र दाबा. उजव्या बाजूच्या स्तनासाठी तसेच करा.