स्त्रियांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल काय जाणले पाहिजे
स्तनाच्या कर्काच्या केसेसची संख्या प्रत्येक खंडात वाढत आहे. काही अंदाजांप्रमाणे, २००० या वर्षापर्यंत, सर्व जगभरातून दर वर्षी स्तनाच्या कर्काच्या दहा लाख नवीन केसेसचे निदान ठरवले जाईल.
या रोगापासून कोणी स्त्री सुरक्षित आहे का? तो टाळण्यासाठी काही केले जाऊ शकते का? तसेच, या शत्रूविरुद्ध लढा देणाऱ्यांना कोणत्या सांत्वनाची व आधाराची गरज आहे?
बहुतेक कातडीचे कर्करोग सूर्याच्या जंबुलातीत किरणांमुळे होतात. फुफ्फुसाचे बहुतेक कर्करोग धुम्रपानामुळे होतात. परंतु स्तनाच्या कर्कासाठी कोणते एक कारण असल्याचे ठरवण्यात आलेले नाही.
तथापि, अलिकडील संशोधनाप्रमाणे, स्तनाच्या कर्कामध्ये आनुवंशिकता, वातावरण आणि प्रवर्तक (hormone) संबंधीच्या गोष्टींचा बराच वाटा आहे. या गोष्टींच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रिया अधिक धोक्यात असू शकतात.
कौटुंबिक इतिहास
एखाद्या स्त्रीच्या कौटुंबिक सदस्याला म्हणजे, आई, बहीण किंवा मावशी किंवा आजीला सुद्धा, स्तनाचा कर्क झाला असेल तर, तिला देखील तो होण्याची शक्यता आहे. त्यांच्यापैकी पुष्कळांना तो रोग झाला असेल तर, तिला अधिक धोका आहे.
अमेरिकेतील आनुवंशिकताशास्त्रज्ज्ञ, डॉ. पेट्रीशिया केली, अवेकला! असे सांगतात की, आनुवंशिक कारणे असली तरी ती स्तनाच्या कर्काच्या केवळ ५ ते १० टक्क्यांसाठी कारणीभूत असतील. त्या म्हणतात की, “आम्ही विचार करतो की बाकीचे सर्व, वातावरणाशी जुळून कार्य करणाऱ्या आनुवंशिक घटकांमुळे आहेत जे इतके मजबूत नाहीत.” त्याचप्रमाणे, एकाच प्रकारचे आनुवंशिकतावाहक असणाऱ्या कौटुंबिक सदस्यांच्या बाबतीत तीच परिस्थिती असण्याची शक्यता असते.
वातावरणातील कारणीभूत गोष्टी
विज्ञान (इंग्रजी) या नियतकालिकेत विवेचन देणारी विद्वान, डेवरा डेवीसने म्हटले की, रोगाला कारणीभूत असणाऱ्या “वातावरणातील कारणीभूत गोष्टी त्यात समाविष्ट असल्याबद्दल बऱ्याच प्रमाणात कल्पना केली जाते हे स्पष्टच आहे.” स्त्रीचे स्तन, किरणांना सर्वात जास्त संवेदनाक्षम असल्यामुळे, विद्युतजागृत कण निर्माण करणाऱ्या उत्सर्जनाच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रियांना स्तनाचा कर्क होण्याचा अधिक धोका असतो. तेच विषजन्य रसायनांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या बाबतीत देखील खरे आहे.
वातावरणातील दुसरी कारणीभूत गोष्ट म्हणजे, आहार. काहीजण असा सल्ला देतात की, स्तनाचा कर्क जीवनसत्वांच्या उणीवेमुळे होतो व ड जीवनसत्वाची उणीव असण्याकडे ते बोट दाखवतात. हे जीवनसत्व शरीराला कॅल्शिअम शोषून घेण्यास मदत करते, व ते अनियंत्रित पेशींची वाढ टाळण्यास मदत करते.
आहारातील स्निग्ध पदार्थ, स्तनाच्या कर्कासाठी कारणीभूत नसून ते त्यास हातभार लावणारे आहेत असे इतर संशोधन सांगतात. एफडीए ग्राहक (इंग्रजी) या नियतकालिकेने असे सांगितले की, जेथे स्निग्ध पदार्थ व मांसाहारी पदार्थांची प्रथिने अधिक घेतली जातात त्या अमेरिकेसारख्या देशांमध्ये, स्तनाच्या कर्कापासून मृत्यू संभवण्याचे प्रमाण सर्वात जास्त होते. त्याने असे विवेचन मांडले: “ऐतिहासिकरित्या, जपानी स्त्रियांना स्तनाचा कर्क होण्याचा कमी धोका आहे, परंतु तो धोका आता नाट्यमय पद्धतीने वाढत आहे. खाण्याच्या बाबतीत ‘पाश्चिमात्य’ पद्धतींशी म्हणजेच, कमी चरबीयुक्त आहारापासून ते अधिक चरबीयुक्त आहाराशी मिळते जुळते होत असल्यामुळे तसे होत आहे.”
एका अलिकडील संशोधनाने सांगितले की, अधिक चरबीयुक्त आहारात जास्त कॅलरी घेतल्यामुळे खरा धोका होऊ शकतो. विज्ञान वृत्त (इंग्रजी) याने असे म्हटले: “प्रत्येक अधिक कॅलरीमुळे, स्तनाच्या कर्काचा धोका वाढतो. इतर गोष्टींपासून मिळणाऱ्या कॅलरींपेक्षा प्रत्येक अधिक स्निग्ध पदार्थांमधून मिळालेल्या कॅलरीमुळे ६७ टक्के जास्त धोका संभवतो.” अधिक कॅलरीमुळे अधिक पौंड वाढतात. खूपच बोजड, विशेषकरून रजोनिवृत्तिकाल उलटून गेलेल्या स्त्रियांना स्तनाचा कर्क होण्याचा धोका तीन पटीने अधिक असतो. शरीरातील चरबी, स्त्रीमदजन नावाचा स्त्रियांचा प्रवर्तक उत्पन्न करते. ते स्तनांच्या ऊतीवर प्रतिकूल रितीने कार्य करू शकते. तेच कर्करोगाकडे निरवते.
वैयक्तिक इतिहास व प्रवर्तक
स्त्रीच्या स्तनात, एक चांगले प्रवर्तकाचे वातावरण असते, ज्यामुळे तिच्या संपूर्ण जीवनात स्तनांमध्ये बदल होतात. शस्त्रक्रियेचे ऑनकॉलॉजीस्ट, डॉ. पॉल क्री, ऑस्ट्रेलियन डॉ. साप्ताहिक (इंग्रजी) यात लिहितात: “तथापि, काही स्त्रियांमध्ये, दीर्घ काळासाठी स्तनाची ऊती प्रवर्तकांद्वारे उत्तेजित होत राहिली तर, त्यामुळे पेशींमध्ये बदल होत जातात. शेवटी ते दुर्दम [कर्कजन] स्थितीमध्ये बदलते.” या कारणास्तव असा विचार केला जातो की, ज्या स्त्रिया लवकरच वयात आल्या, म्हणजे १२ वर्षातच, किंवा ज्यांचा रजोनिवृत्तिकाल उशीरा सुरू झाला, म्हणजेच ५० शी मध्ये, त्यांना अधिक धोका आहे.
इआरटीद्वारे (एस्ट्रोजन रिप्लेस्मेंट थेरेपी) मिळालेल्या जादा स्त्रीमदजनाचा, स्तनाच्या कर्काशी संबंध असल्याची शक्यता आहे, या गोष्टीवर बराच वादविवाद होत आला आहे. इआरटीद्वारे कोणताच धोका नाही, असे काही संशोधनांद्वारे दाखवले जात असताना, इतर अभ्यास दाखवतात की, दीर्घ काळापर्यंत त्याचे ग्राही राहिल्याने निश्चितच धोका आहे. उजळणी केलेल्या अभ्यासांवर पुन्हा विचार करत असताना, १९९२ च्या ब्रिटीश वैद्यकीय वृत्तपत्राने (इंग्रजी) असे म्हटले की, “गर्भधारणेच्या स्त्रीमदजनाचा” दीर्घ काळासाठी उपयोग केल्याने “स्तनाचा कर्क होण्याचा धोका ३०-५० टक्क्यांनी वाढतो.”
गर्भनिरोधक गोळ्या आणि स्तनाच्या कर्कामधील संबंधावरील अहवाल दाखवतात की, त्यांच्या वापरामुळे कमी धोका आहे. तथापि, स्त्रियांचा एक उपगट उद्भवतो जो अधिक धोक्यात आहे. तरुण स्त्रिया, वांझ स्त्रिया आणि दीर्घ काळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केलेल्या स्त्रियांना स्तनाच्या कर्काचा २० टक्के तरी अधिक धोका आहे.
तरीपण, स्तनाचा कर्क असणाऱ्या ४ पैकी ३ स्त्रियांना तो रोग कशामुळे झाला हे विशिष्ट गोष्टीकडे उद्देशून सांगता येणार नाही. यास्तव, कोणत्याही स्त्रीने स्वतःबद्दल ती, स्तनाच्या कर्कापासून सुरक्षित असल्याचा विचार करावा का, हा प्रश्न उद्भवतो. एफडीए ग्राहक (इंग्रजी) असा अहवाल देतो: “चिकित्सकाच्या दृष्टीने, सर्वच स्त्रियांना स्तनाच्या कर्काचा बराचसा धोका असल्यासारखे वागवण्यात यावे.”
यास्तव, विशेषकरून वृद्ध स्त्रिया या रोगाला भेद्य आहेत. डॉ. केली असे विवेचन मांडतात की, स्तनाच्या कर्काची अनेक कारणे असू शकतात तरी, ‘मला असा संशय आहे की, केवळ वृद्ध झाल्यामुळे आणि पेशींचे चुकीच्या प्रकारे विभाजन झाल्यामुळे त्यापैकीचे काही कर्करोग होतात.’
भेद्य का
स्त्री स्तनाच्या घडणाचे परीक्षण केल्यावर, ते कर्करोगाला एवढे भेद्य का आहे याचे स्पष्टीकरण मिळते. त्यामध्ये काही नलिका म्हणजेच लहान मार्ग असतात. त्याद्वारे दूध, दूध-उत्पादक कोषापासून स्तनाग्रांपर्यंत पोंहचते. त्या नलिकांच्या आतील बाजूने पेशी असतात. त्या, स्त्रीच्या मासिक पाळीनुसार सतत विभाजित होतात आणि बदलतात. याद्वारे गरोदरपण, दूध सुटणे आणि बाळाची काळजी घेण्यासाठी तिला तयार केले जाते. याच नलिकांमध्ये बहुतेक स्तनाचे कर्क होतात.
विकल्प: स्तनाच्या कर्काच्या युद्धात नवे विकास (इंग्रजी), या पुस्तकात संशोधक रोझ कुशनर यांनी असे म्हटले: “कोणत्याही नित्यक्रमात—तो पूर्णपणे स्वाभाविक असला तरी . . . —एका पाठोपाठ एक अडथळे येत असले तर, जास्त चुका होण्याचा धोका आहे.” ती पुढे म्हणते: “प्रमाणापेक्षा जास्त कार्य केलेली स्तनाची पेशी नेहमी कोणत्या तरी प्रवर्तकामध्ये बुडवून काढली जात असते. तो अशी आज्ञा देतो, ‘ते काम बंद कर. हे कर.’ यात काही संशय नाही की त्यामुळेच, कितीतरी कन्यापेशी अनियंत्रितपणे वाढतात.”
पेशी विभाजित होते, तिची अनियंत्रित वाढ होते आणि पेशींच्या वृद्धीमुळे ती वाढू लागते तेव्हा, स्तनाचा कर्क सुरु होतो. या पेशी पुनरुत्पादन करण्याचे थांबवत नाहीत. कालांतराने, ते बाजूच्या निरोगी ऊतीला पूर्णपणे झाकून टाकतात. अशाप्रकारे ते, निरोगी अवयवाला रोगी अवयव बनवून टाकतात.
कर्कप्रक्षेप
कर्करोग स्तनापुरताच मर्यादित असेल तर, दुर्दमपणा काढून टाकला जाऊ शकतो. स्तनाचा कर्क दूरपर्यंतच्या भागात पसरला असेल तर, त्याला कर्कप्रक्षेपित स्तनाचा कर्क असे म्हणतात. स्तनाचा कर्क असणाऱ्या रुग्णांमध्ये हे मृत्यूचे सर्वात संभवनीय कारण आहे. स्तनात कर्करोगाच्या पेशी वाढतात आणि अर्बुदाचा आकार वाढतो तसा, कर्करोगाच्या पेशी नकळत व गुप्तपणे प्रथम गाठीची जागा सोडून, रक्त पेशींच्या भिंतींमध्ये आणि लसिका पर्णबंधात शिरतात.
या अवस्थेत, अर्बुदाच्या पेशी शरीराच्या अन्य भागात पसरू शकतात. शरीराचे प्रतिबंधक सैनिक व त्यासोबतच रक्त आणि रसद्रव्यात वावरणाऱ्या स्वाभाविक नाशकारक पेशींना त्यांनी चुकवले तर, या दुर्दम पेशी, यकृत, फुफ्फुस आणि मेंदूसारख्या महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये वसाहत करू शकतात. तेथे पेशींच्या वृद्धीमुळे वाढून व त्या अवयवांना कर्कजन्य करून त्या पुन्हा पसरू शकतात. कर्कप्रक्षेप एकदा सुरु झाला की, स्त्रीचे जीवन धोक्यात येते.
यास्तव, बचावाचा एक मार्ग म्हणजे, स्तनाच्या कर्काचे प्रथमावस्थेत, म्हणजेच त्याला पसरण्याचा वाव मिळण्याआधीच निदान होणे, होय. प्रथमावस्थेतच निदान होण्याच्या शक्यतेला सुधारण्यासाठी प्रत्येक स्त्री काय करू शकते? अशी कोणती गोष्ट आहे की जेणेकरून, सुरवातीलाच स्तनाचा कर्क टाळण्यास मदत होईल? (g94 4/8)
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
स्तनाचा कर्क असणाऱ्या ४ पैकी ३ स्त्रियांना तो रोग कशामुळे झाला हे विशिष्ट गोष्टीकडे उद्देशून सांगता येणार नाही.