मी एका चांगल्या सेवेसाठी पाळकत्व सोडून देण्याचे कारण काय
जुलै ३१, १९५५ रोजी, वयाच्या २४ व्या वर्षी, कॅथोलिक पाळक म्हणून माझी विधीपूर्वक नेमणूक झाली. भारतातील, रकोल, गोवा या ठिकाणी बिशप होण्याच्या विद्यालयात घालविलेल्या १२ वर्षांचा तो कळस होता. पण, माझ्यामध्ये पाळक होण्याची इच्छा कशामुळे उत्पन्न झाली होती?
माझा जन्म भारतातील, मुंबई येथे ३ सप्टेंबर १९३०, रोजी झाला. त्याच्या पुढील वर्षी, माझे वडील सेवानिवृत्त झाले, आणि संपूर्ण कुटुंब, भारताच्या गोवा येथील आग्नेयेकडील बारडेज किनारपट्टीवर, सल्वडोर डो मुंडो येथे स्थाईक झाले. चार मुलांमधील मी सर्वात धाकटा होतो. पोर्तुगालच्या लोकांनी त्यांची वसाहत केली होती तेव्हा, म्हणजे १५१० पासून गोवा येथे अस्तित्वात असणाऱ्या पोर्तुगीज कॅथोलिक संस्कृती आणि परंपरेत, माझी बालपणापासून वाढ झाली होती.
माझे पालक, त्यांच्या श्रद्धेशी विश्वासू, आवेशी कॅथोलिक होते जे प्रत्येक वर्षी नाताळ, लेन्त उपवासाचा सण, ईस्टर, आणि कुमारी मरियेच्या व अनेक “संतां”च्या आदरार्थ सण साजरा करीत होते. ह्या सणात जे पाळक भाग घेत, त्यांची नेहमी आमच्या घरी राहण्याची व्यवस्था असे, काही वेळा तर ते दहा दिवस राहात असत. अशाप्रकारे, त्यांच्यासोबत आमचा निरंतर जवळचा नातेसंबंध होता, आणि धाकटा असल्यामुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव झाला.
गोवा, सलामंका, व रोम येथील माझी सेवा
मी माझ्या धर्मोपदेशकाच्या सेवेची सुरवात मोठ्या आवेशाने चालू केली, आणि कॅथोलिक चर्चच्या चालीरीती व तत्त्वांच्या सत्यतेविषयी माझी अजिबात द्विधा भावना नव्हती. गोवा येथील माझ्या सेवेच्या सात वर्षांच्या दरम्यान, मी गोव्याची राजधानी पणजी येथील, सेंट थॉमस चॅपल येथे सामाजिक आणि धर्मोपदेशकाची कामे केली. एकाच वेळेला, त्या काळच्या पोर्तुगाल सरकाराच्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये मी एक मुलकी नेमणूक पार पाडू लागलो ज्याच्या दोन भूमिका होत्या—प्राध्यापक तसेच इन्स्टिट्यूटच्या आवाराचा अधिकारी.
मला १९६२ मध्ये, स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सलामंका, येथे पाठविण्यात आले, जेथे मी कायदेविषयक तत्त्वज्ञान व चर्चविषयक कायदा याविषयांमध्ये पीएचडी ही पदवी मिळवली. कायद्यासंबंधी प्रशिक्षण घेत असताना, मी अभ्यासिलेल्या काही विषयांमधील, विशेषकरून रोमी कायदा व चर्चविषयांचा इतिहास, यांनी कॅथोलिक चर्चची राज्यघटना कशी विकसित झाली व वर आली याची तसेच पोप हा पेत्राचा वारस आहे व ‘चर्चवर प्रामुख्याने त्याचाच अधिकार आहे’ याची ओळख होईपर्यंत बारकाईने चौकशी करण्यास मला चेतवले.
रोम, इटली येथे माझ्या वेदांतीय पदवीचा अभ्यास व्हावा यासाठी योजना आखल्या जात होत्या त्याबद्दल मी फार आनंदीत होतो. येथे मला चर्चच्या अधिकार परंपरेविषयी अधिक शिकण्याची संधी प्राप्त होणार होती. मी १९६५ च्या उन्हाळ्यात रोम येथे गेलो.
ह्या वेळेला व्हॅटिकनची दुसरी चर्च परिषद रंगात आली होती. माझ्या वेदांतीय अभ्यासाच्या मागावर असताना, अनेक वेदांत ज्ञानी व “परिषदेचे पाळक” यांच्याबरोबर माझी मनोरंजक चर्चा झाली ज्यांनी परिषदेमधील कर्मठ पुराणमतवाद्यांचा विरोध केला. तेव्हा, सत्तेवर पोप पॉल पाचवे होते, ज्यांच्याबरोबर, रोममधील इंडियन प्रिस्टस् असोसिएशनच्या उपाध्यक्षाच्या क्षमतेमुळे माझे व्यक्तिगत संबंध होते.
आधीचे मतभेद आणि संशय
ह्या जवळीकीच्या, अभ्यासाच्या व डॉक्टरेटची पदवी मिळणाऱ्या प्रबंधाच्या संशोधनाच्या दरम्यान, मला कॅथोलिक चर्चच्या मूळ रचनेचा इतिहास व वाढ याविषयी आणखी सूक्ष्मदृष्टी मिळविण्याची संधी प्राप्त झाली.a पायस बारावे (१९३९-५८) यांच्या पूर्ण राज्यसत्ताक पद्धतीचा ज्यांना सराव होता अशा मंडळामधील पुराणमतवाद्यांच्या दृष्टिकोनाच्या उलट, उदारमतवाद्यांनी परिषदेचा कौल चर्चच्या स्वमताग्रही घटनेकडे वळवण्यात सरतेशेवटी यश मिळवले. (लॅटिन मध्ये शीर्षक, लुमेन जेनटियम, लाईट ऑफ द नेशन्स). इतर विषयांमध्ये, चर्चमधील पोपच्या संपूर्ण आणि सर्वश्रेष्ठ अधिकारामध्ये सहभाग घेण्यासाठी बिशपांचा हक्क याविषयावर ३ ऱ्या प्रकरणात हाताळणी केली गेली. हे तत्त्व सांप्रदायिकरित्या खोलवर रूजलेले असले तरी पुराणमतवादी त्याला पाखंडी आणि क्रांतिकारी असे समजत होते.
दोन्ही दृष्टिकोन अस्वीकारणीय आहेत असे मला कळले, कारण त्यांच्यामध्ये शुभवर्तमानातील सत्याची उणीव होती. ते मत्तय १६:१८, १९ चा विपर्यास करणारे व चर्चच्या भूतकाळातील आणि भविष्यकाळातील सर्व अशास्त्रीय तत्त्व आणि शिकवणींना परवाना देणारे आहेत.b मी याची नोंद घेतली की या वचनात वापरेलेले ग्रीक शब्द, पेʹत्रा (स्त्रीलिंगी), ज्याचा अर्थ “खडक” असा होतो, व पेʹत्रोस (पुर्ल्लिगी), ज्याचा अर्थ “खडकाचा तुकडा” असो होतो, यांचा उपयोग येशूने समानार्थी आहेत म्हणून केला नाही. पुढे, जर पेत्राला खडक, कोनशिलाप्रमाणे प्रामुख्य दिले असते तर नंतर, प्रेषितांमध्ये कोण श्रेष्ठ आहे यासंबंधी वादविवाद झालाच नसता. (पडताळा मार्क ९:३३-३५; लूक २२:२४-२६.) तसेच, पेत्र “सुवार्तेच्या सत्याप्रमाणे नीट” न चालल्याबद्दल त्याला जाहीरपणे दोष देण्याचे धैर्य पौलाला झाले नसते. (गलतीकरास २:११-१४) मी ह्या समाप्तीस आलो की सर्व आत्म्याने अभिषिक्त असलेले येशूचे शिष्य, समभावाने खडकासमान आहेत व येशू त्यांचा पायासमान कोनशिला आहे.—१ करिंथकर १०:४; इफिसकर २:१९-२२; प्रकटीकरण २१:२, ९-१४.
प्रशिक्षण आणि धर्मोपदेशकाची जितकी मी उच्च पातळी गाठली व माझ्या कल्पनांचा जितका विनिमय झाला, तितकेच, कॅथोलिक चर्चच्या विविध तत्त्वांमुळे विशेषकरून “पवित्र बलिदानाचा विधी” आणि “अतिपवित्र ख्रिस्ताच्या भोजनोत्सवाचा विधी” म्हणजेच भाकरी आणि द्राक्षारस यांचे ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यात होणारे रुपांतर, यामुळे माझे मन आणि अंतःकरणात तफावत होत गेली.
कॅथोलिक परिभाषेत, “पवित्र बलिदानाचा विधी” याचा अर्थ “क्रुसा”वरील येशूच्या बलिदानाचे चिरस्थायी स्मरण आणि रक्तहीन नूतनीकरण हा आहे. परंतु येशूचे बलिदान एक परिपूर्ण बलिदान होते, असा स्पष्टपणे तर्क करण्यासाठी सामान्यपणे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने व विशेषकरून पौलाने इब्रीयांस लिहिलेले पत्र हे माझ्यासाठी पुरेसे होते. त्याचे काम संपूर्ण होते. त्याला आणखी कशाचीही गरज भासली नाही किंवा ते कोणत्याही वाढीला, पुनरुक्तीला किंवा सुधारणूकीला संवेदनाक्षम नव्हते. हे बलिदान “एकदाच करून ठेवले आहे.”—इब्रीयांस ७:२७, २८.
सत्यासाठी माझा शोध चालू राहतो
माझ्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी, पश्चिम युरोपमधील बिशप आणि आर्चबिशपच्या अधिकाराखाली असलेल्या पुष्कळ प्रांतांमध्ये आणि प्रदेशांमध्ये मी काम केले, न्यूयॉर्क आर्चबिशपच्या अधिकाराखालील प्रांतासाठी, तसेच फेरबँक्स, अलास्का मधील बिशपच्या अधिकाराखालच्या प्रदेशासाठी मी काम केले. सत्य शोधण्यासाठी घालवलेली नऊ वर्षे माझ्यासाठी एक दुःखदायक परीक्षा होती. मी, प्रामुख्याने कारभारविषयी बाबींमध्ये, चर्चविषयी न्यायतत्त्वशास्त्र, व न्यायालयविषयक गोष्टींमध्ये गोवलेलो होतो. सार्वजनिक प्रार्थनेच्या विधी आणि समारंभापासून मी होता होईल तितक्या दूर राहिलो. सर्वात मोठे आव्हान दैनिक मास म्हणण्याचे होते. त्यामुळे विचार आणि भावनांमध्ये गंभीर तफावत होत असे, कारण मी, येशूच्या रक्तहीन बलिदानाच्या पुनरूक्तीवर किंवा भाकरी आणि द्राक्षारस यांचे ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यात होणाऱ्या रुपांतरावर, किंवा पवित्र पार्थिव पाळकांना भाकरी आणि द्राक्षारस यांचे ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यात होणाऱ्या रुपांतराची सबळ आणि कायदेशीररीत्या “जादू” करून दाखवण्याची गरज आहे यावर विश्वास करत नव्हतो.
दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या दरम्यान, ह्या “जादू” विषयी गोंगाट माजला होता. डच कॅथोलिक अधिकार परंपरेच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या उदारमतवाद्यांनी केवळ “ट्रान्ससिग्नीफिकेशन,” म्हणजे भाकर आणि द्राक्षारसाचा अर्थ किंवा ते केवळ येशूच्या शरीर आणि रक्ताला चित्रित करते याचेच समर्थन केले. दुसऱ्या बाजूला, इटालियन कॅथोलिक अधिकार परंपरेच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या कर्मठ पुराणमतवाद्यांनी “ट्रान्सबस्टॅनटीएशन,” म्हणजेच धार्मिक विधीच्या दरम्यान बोलल्या जाणाऱ्या “पवित्र संस्कारांचे शब्द” यांच्याद्वारे भाकरी आणि द्राक्षारसाच्या पदार्थाचा ख्रिस्ताचे खरे शरीर आणि रक्ताच्या पदार्थामध्ये होणाऱ्या रूपांतराचे अगदी कट्टरपणे समर्थन केले. यास्तव अशी म्हण पडली: ‘हॉलंड मध्ये भाकर आणि द्राक्षारसाऐवजी सगळ्या गोष्टी बदलतात, व इटलीत भाकरी आणि द्राक्षारसाला सोडून बाकी काहीच बदलत नाही.’
मी चर्चमधून विभक्त होतो
ख्रिस्त आणि त्याच्या शुभवर्तमानाच्या अशा विर्पयासामुळे, देवाचे गौरव करण्याचे व अनेकांचा जीव वाचवण्याचे माझे ध्येय खोट्या शिकवणींमुळे दबून गेले म्हणून मला अतिशय निराशजनक व निष्फळ असे वाटू लागले. यास्तव, शेवटी जुलै १९७४ मध्ये, मी दीर्घकालिन रजेची विनंती करून कार्यवाही सेवेला राजीनामा दिला. ज्या पाळकत्वाला कोणताही पवित्र शास्त्र आधार नव्हता त्यातून मुक्त होण्याची अनुमती विचारणे मला अयुक्त व अस्वीकारणीय वाटले. परिणामी, जुलै १९७४ पासून डिसेंबर १९८४ पर्यंत, मी कोणत्याही धर्मापासून पूर्णपणे वेगळा राहिलो. ख्रिस्ती धर्मराज्याच्या इतर कोणत्याही धर्मासोबत मी संगती ठेवली नाही कारण त्यातील एकानेही त्रैक्य, आत्म्याचे अमरत्त्व, सर्व धार्मिक लोकांना स्वर्गामध्ये अनंतकाळचे जीवन आणि कधीही समाप्त न होणाऱ्या नरक यातनेच्या शिकवणींविरूद्ध असलेल्या माझ्या मतांमध्ये भाग घेतला नाही. ह्या शिकवणींकडे मी मूर्तीपूजकांची फळे या दृष्टिने पाहिले.
आंतरिक शांती व आनंद
माझी धार्मिक वियोगावस्था डिसेंबर १९८४ मध्ये समाप्त झाली. अलास्का, अँकरेज येथील क्रेडिट ॲन्ड अकाउन्टस रिसीवेब्लस डिपार्टमेन्टच्या व्यवस्थापकाचा मी अधिकारी असल्यामुळे एक गिऱ्हाईक, बार्बरा लरमा हिच्यासोबत मला अनेक वेळा मालाची यादी करण्यासाठी चर्चा करावी लागत असे. एकदा ती फार घाईत होती, व म्हणाली की तिला एका “पवित्र शास्त्र अभ्यासा”ला उपस्थित राहायचे होते. तिने जेव्हा “पवित्र शास्त्र अभ्यास” म्हटले तेव्हा माझे लक्ष आकर्षित झाले, व तिला मी काही पवित्र शास्त्रीय प्रश्न विचारले. तिने मला लगेच व कार्यक्षमतेने शास्त्रीय उत्तरे दिली जी माझ्या तत्त्वप्रणालीशी सुसंगत होती. माझ्याकडे आणखी प्रश्न आहेत ते पाहून, बार्बराने जेरॅल्ड रॉन्को, जे यहोवाच्या साक्षीदारांच्या, अलास्का येथील शाखा दप्तरात होते त्यांच्यासोबत माझी भेट घालून दिली.
जी उभारणीकारक पवित्र शास्त्राबद्दलची चर्चा होत गेली, त्यामुळे मला आंतरिक शांती व आनंद मिळाला. ह्याच प्रकारच्या लोकांना, देवाच्या लोकांना मी शोधत होतो. मी देवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि योग्य वेळी यहोवाच्या साक्षीदारांसोबत, राज्याच्या सुवार्तेचा बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक म्हणून काम करू लागलो. ह्या संस्थेचे मुख्यालय, ब्रुकलिन, न्यूयॉर्क हे मॅनहॅटन, येथील द होली फॅमिली चर्च जेथे मी (१९६९, १९७१ व १९७४ मध्ये) पॅरिश चर्च ऑफ द युनायटेड नेशन्सचा सहकारी पाळक म्हणून काम केले होते त्याच्या पासून काही मैलांवर होते हे कळल्यावर मला आश्चर्य वाटले.
सत्य पाहण्यासाठी माझ्या कुटुंबाला मदत करणे
अँकरेज येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या सहा महिन्याच्या सहवासानंतर, जुलै ३१, १९८५ रोजी, मी पेन्सिलवेनिया येथे आलो. तेथे माझी भाची, मायलिन मेनडेन्हा, युनिव्हर्सिटी ऑफ स्क्रॅन्टन येथे सजीव सृष्टीच्या रसायन शास्त्राची पदवी मिळविण्यासाठी अभ्यास करत होती, तिच्यासोबत यहोवाच्या राज्याच्या सुवार्तेचा सहभाग घेण्याचा सुहक्क मला प्राप्त झाला. जेव्हा मायलिनला कळाले की मी यहोवाच्या साक्षीदारांचा शोध घेत आहे, तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण तिला अशी चुकीची माहिती देण्यात आली होती की यहोवाच्या साक्षीदारांचा गट, परंपरेला सोडून चालणारा, खोटा गट आहे. पहिल्यांदा तिने मला काहीच सांगितले नाही कारण ती मला तिचा मामा व पाळक या नात्याने आदर देत होती व माझ्या प्रशिक्षण व धर्मोपदेशाकाच्या साध्यतेबद्दल तिचे चांगले मत होते.
पुढील रविवारी, मायलिन कॅथोलिक चर्चमध्ये धार्मिक विधीसाठी गेली, आणि मी पवित्र शास्त्रीय भाषण व वॉचटावर मासिकाच्या अभ्यासासाठी राज्य सभागृहात गेलो. त्याच दिवशी संध्याकाळी तिने तिचे कॅथोलिक जेरूसलेम बायबल घेतले व मी माझे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स घेतले व दोघे एकत्र बसलो. मी तिला तिच्या पवित्र शास्त्रातून याव्हे हे नाव दाखवले व तेच यहोवा हे समान नाव न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मधून दाखवले. देवाला नाव आहे व आपण त्याला त्याच्या नावाने हाक मारावी अशी त्याची इच्छा आहे हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. त्रैक्याची शिकवण, अतिपवित्र ख्रिस्ताच्या भोजनोत्सवाचा विधी, आत्म्याचे अमरत्व ह्या सर्व शिकवणी किती अशास्त्रीय आहेत व त्याबद्दल योग्य शास्त्रवचने मी तिला दाखवली. तिला अक्षरशः आश्चर्य वाटले!
पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा मायलिनमध्ये आणखी आस्था निर्माण झाली. त्याआधी, तिच्या मरणानंतर तिचे काय होईल याची तिला खूप चिंता होती. ती असा विचार करत होती की ती थेट स्वर्गात जाण्याइतकी पवित्र नाही, परंतु नरकाची सार्वकालिक शिक्षा फर्मावण्याइतकीही वाईट नाही. यास्तव, तिच्या मनात मरणोत्तर प्रायश्चित भूमी हाच केवळ वैकल्प होता, जेथे तिला स्वर्गात जाण्यासाठी लोकांच्या प्रार्थना व धार्मिक विधींसाठी सबुरीने थांबावे लागेल. तथापि, पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाच्या आशेसंबंधाने मी तिला पुष्कळ शास्त्रवचने दाखवल्यानंतर, ह्या आश्चर्यकारक सुवार्तेविषयी आणखी शिकण्यास ती उत्सुक होती. मायलिन माझ्यासोबत राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहू लागली. स्थानिक साक्षीदारांबरोबर आम्ही एक औपचारीक पवित्र शास्त्र अभ्यास चालू केला. त्यानंतर, थोड्याच दिवसात, यहोवा देवाला आम्ही आमचे समर्पण केले व मे ३१, १९८६ रोजी आमचा बाप्तिस्मा झाला.
मी पाळकत्व सोडल्याची बातमी ऐकताच, विशेषकरून माझा मोठा भाऊ, ऑरलंडो, व माझे कुटुंब, खूप अस्वस्थ झाले. त्याने माझी मोठी बहीण, मायरा लोबो मेनडेन्हा हिच्याशी संपर्क साधला, परंतु तिने त्याला असे म्हणून शांत केले की, “आपण सर्वांनी याची चिंता करण्याची काही गरज नाही, कारण अलिनोने त्याची ४३ वर्षांची सेवा चांगल्या कारणाशिवाय सोडली नसेल.” सप्टेंबर १९८७ मध्ये, मायरा आणि तिचे कुटुंब विस्कॉनसीन, अमेरिका येथे येऊन माझ्यासोबत सामील झाले. अनेक कॅथोलिक शिकवणींचे आणि चालीरीतींचे अशास्त्रीय गुण त्यांना दाखवण्यास मला कसलाही त्रास झाला नाही. पवित्र शास्त्राचे सत्य शिकण्यास ते फार उत्सुक होते. लागलीच, मी व मायलिनने त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास चालू केला. ऑरलंडो, फ्लोरिडा, येथे रहावयास गेल्यानंतर, त्यांनी त्यांचा अभ्यास चालू ठेवला.
जी शांती आणि आनंद आम्ही उपभोगत होतो त्याने आम्हाला यहोवाच्या राज्याच्या सुवार्तेचा सहभाग, टोरंटो, कॅनडा येथे राहणारी माझी थोरली बहीण, जेसी लोबो हिच्यासोबत करण्यास भाग पाडले. तिला १९८३ मध्ये साक्ष देण्यात आली होती. तथापि, तिचा असा विश्वास होता की तिचा भाऊ पाळक असल्यामुळे कोणतीही गोष्ट तिचा विश्वास बदलू शकत नाही. यहोवाच्या साक्षीदारांसोबतच्या पहिल्याच भेटीच्या चार वर्षांनंतर, तिला जेव्हा असे कळले की मी यहोवाचा एक साक्षीदार झालो, व मायरा आणि तिचे कुटुंब राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक आहेत, तेव्हा तिने एका साक्षीदारासोबत संपर्क साधला ज्याने तात्काळ एका पवित्र शास्त्र अभ्यासाची व्यवस्था केली. जेसीचा बाप्तिस्मा एप्रिल १४, १९९० रोजी झाला; मायरा, माझा मेहुणा ऑस्वॅल्ड आणि माझी भाची ग्लिनीस ह्यांचा बाप्तिस्मा फेब्रुवारी २, १९९१ रोजी झाला. सर्वोच्च परमेश्वर, यहोवाची सेवा करण्यास त्यांना आनंद होत आहे.
पुराणमतवादी परंपराभिमानी आणि कॅथोलिक चर्च मधील उदारमतवादी सुधारीत लोक निश्चितच ज्ञानी लोक आहेत. देवाची इच्छा पूर्ण करत असल्याचा त्यांचा विश्वास आहे. तरीही, आम्ही ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये की “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने अंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” (२ करिंथकर ४:४) मग हे अगदी स्पष्ट आहे की ह्या व्यवस्थीकरणाचे ज्ञान देवाच्या दृष्टिने मूर्खपण आहे. (१ करिंथकर ३:१८, १९) खरेच, यहोवा त्याच्या वचनाच्या अचूक ज्ञानाद्वारे “भोळ्यास समजंस करतो” याबद्दल मी किती ऋणी व धन्य आहे.—स्तोत्रसंहिता १९:७.
कॅथोलिक पाळक म्हणून माझी १९ वर्षांची सेवा केवळ इतिहास जमा गोष्ट आहे. आता मी यहोवाचा एक साक्षीदार आहे. यहोवाच्या मार्गांनी चालावे आणि त्याचा पुत्र येशू, आमचा राजा आणि तारणारा, याचे अनुकरण करावे हीच माझी इच्छा आहे. यहोवाला ओळखण्यास मला इतरांना मदत करण्यास आवडेल, जेणेकरून ते देखील सत्य परमेश्वराचे गौरव करण्यास, पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळच्या जीवनाचे बक्षीस मिळवण्याच्या पात्रतेचे बनतील.—अलिनो डी सांता रिटा लोबो यांजकडून. (g93 9⁄8)
[तळटीपा]
a चर्चविषयक कायद्यांच्या प्रबंधावर संशोधन करत असतानाच मी सलामंका सोडले, हा प्रबंध मी १९६८ मध्ये पूर्ण केला.
b कॅथोलिक न्यू अमेरिकन बायबलनुसार हे वचन काही भागात असे म्हणते: “आणि मी तुला असेही सांगतो, की तू ‘खडक’ आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन . . . पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”—पृ. २१ वरील पेटी पहा.
[१८ पानांवरील चौकट]
राज्याच्या किल्ल्या
“तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला; तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध केला” या येशूने धार्मिक नेत्यांना दिलेल्या ताकीदचा विचार केल्यास “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यांचा” अर्थ स्पष्ट होतो. (लूक ११:५२) ‘आत जाऊ देणे’ म्हणजे “स्वर्गाच्या राज्यात” प्रवेश असे स्पष्टीकरण मत्तय २३:१३ पुढे दर्शविते.
येशूने पेत्राला ज्या किल्ल्यांचे अभिवचन दिले त्यामध्ये अतुलनीय शैक्षणिक भूमिकेचा समावेश आहे, ज्यांनी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवणाऱ्या वैयक्तिकांसाठी खास संधींना खुले केले. पेत्राने ह्या सुहक्काचा वापर यहूद्यांना, शोमरोन्यांना, आणि विदेश्यांना मदत करण्यासाठी तीन प्रसंगी केला.—प्रे. कृत्ये २:१-४१; ८:१४-१७; १०:१-४८; १५:७-९.
स्वर्गाने काय बांधावे किंवा काय मोकळे करावे असा हुकूम पेत्राने द्यावा असा त्या अभिवचनाचा हेतू नव्हता, परंतु त्या तीन विशिष्ट नेमणूकींसाठी स्वर्गीय साधन म्हणून पेत्राचा उपयोग करणे हा होता. ही तशीच वस्तुस्थिती होती कारण येशू मंडळीचा खरा मस्तक म्हणून आहे.—पडताळा १ करिंथकर ११:३; इफिसकर ४:१५, १६; ५:२३; कलस्सैकरास २:८-१०; इब्रीकयांस ८:६-१३.
[१९ पानांवरील चित्र]
अलिनो डी सांता रिटा लोबो हे आता साक्षीदार आहेत