नियॉललँड—मनुष्याला विद्रुप करता न आलेले नंदनवन
आम्हा आठ शहरवासीयांसाठी किती तो तेजला आणणारा बदल!
आम्ही, दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कच्या पूर्वेकडील एका विस्तारीत क्षेत्रात जेथे अनुभवी वनसंरक्षकाच्या देखरेखीखाली रपेट करावी लागते त्या नियॉललँड, येथे आहोत. ह्या पानावर ज्याचे चित्र दिले आहे त्या देखण्या काळवीटावरून हे नाव आले आहे. हा नर नियॉल आहे.
आता रात्र आहे, व आम्ही मंदाग्नीवर शिजवलेले गव्याचे मांस खात शेकोटीच्या भोवती बसलेलो आहोत. आजूबाजूच्या खडकाळ गवताळ प्रदेशात हत्ती, सिंह, बिबट्या, गवे, आणि इतर दिमाखदार श्वापदे आहेत. परंतु दोन वनसंरक्षकांच्या देखरेखीखाली आम्ही अगदी निर्धास्त आहोत. वास्तविक पाहता, गुन्ह्याने भरलेल्या शहरात राहणे किंवा गर्दीच्या महामार्गावरून प्रवास करण्यापेक्षा येथे सुरक्षितता आहे याची आम्हाला जाणीव घडते.
“स्कूप्स् घुबडाचा आवाज तुम्ही ऐकला का?” असे तेथे असलेला वनसंरक्षक कोबस वेंटसल विचारतो. अगदी कुशलतेने तो परररप असा आवाज पुन्हा काढतो. पुढे तो म्हणतो की, “ह्या भागात विशिष्टपणे ऐकू येणारा हा आवाज आहे. आमच्या उद्याच्या रपेटीच्या वेळी, मी काही पक्षी दाखवणार आहे, म्हणून पक्ष्यांचे पुस्तक सोबत घ्या.”
नियॉललँड हे वनस्पतीशास्त्राचे देखील नंदनवन आहे. येथील विविध वनस्पती पृथ्वीवर इतरत्र थोड्याच प्रमाणात आढळून येते. रिडर्स् डायजेस्टच्या इलस्ट्रेटड गाईड टू द गेम पार्कस् ॲन्ड नेचर रिजर्वर्स् ऑफ सदर्न आफ्रिकानुसार याचे कारण असे की, “आफ्रिकेच्या नऊ प्रचंड परिसंस्था, पूर्वेकडे क्रुगर पार्कच्या जवळ जवळ येत आहेत.” ते पुस्तक पुढे असे म्हणते, “येथे दलदल आणि ओसाड प्रदेश एकत्र येतात, जंगल आणि माळरान एकत्र येते, खडक आणि वाळवंट एकत्र येतात.” ह्या अतुलनीय क्षेत्राचा जवळ जवळ ४०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ नियॉललँड रपेटीचे क्षेत्र म्हणून बाजूला सारला आहे. येथील छोट्याशा कॅम्प कर्मचाऱ्यांशिवाय, कोणीही मनुष्य येथे राहत नाही, व येथे पर्यटनाचे रस्ते देखील नाहीत.
आमच्या अनेक प्रश्नावळीला उत्तर देता देता कोबस त्याचे जेवण खाण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेटोरीया येथील विद्यापीठातील मास्टर ऑफ सायन्स ही पदवी त्याच्याकडे आहे, जेथे त्याने वनजीवन व्यवस्था, प्राणीशास्त्र, आणि वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला. त्याचे ज्ञान तात्विक नाही हे आम्हाला लगेच कळले.
“रानटी पशुंसोबत तुम्हाला कधी धोकादायक सामना करावा लागला का?”
“काही वेळा माझ्यावर खोटा हल्ला झालेला आहे, परंतु मला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही प्राण्याकडून हा हल्ला झाला नाही,” कोबसने उत्तर दिले.
“जेव्हा सिंह हल्ला करतो, तेव्हा तो केवळ एक खोटा हल्ला आहे हे तुम्हाला कसे कळते?”
“जेव्हा तो तुमच्या पासून चार ते पाच मीटर दूरवर त्याचे पळणे थांबवतो,” तो उत्तरतो.
कोबससारख्या वनसंरक्षकांना, एखादा प्राणी हल्ला करतो त्यावेळी भीतीपासून परावृत्त होण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. तो स्पष्टीकरण देतो: “ते तुम्हाला आव्हान करतात, व तुम्ही प्राण्याची परीक्षा घेता. एखादा विशिष्ट प्रसंग म्हणजे एक सिंहीण तिच्या छाव्यांसोबत किंवा नर सिंह प्रियाराधना करत असतानाचा असू शकतो. हल्ला करण्याचा प्रयत्न करून तो प्राणी तुम्हाला सांगत आहे की, ‘तू बेकायदेशीर प्रवेश करत आहेस, तू माझ्या खाजगी गोष्टींमध्ये नाक खुपसत आहेस, आणि आता मुकाट्याने चालायला लाग.’ तोपर्यंत, मी माझी रायफल तयार केलेली असते व त्याच्यासाठी सज्ज आहे. मी नेहमी एक काल्पनिक रेषा काढतो. जर त्याने ती रेषा पार केली, तर मला गोळीबार करावा लागतो. परंतु माझ्या अनुभवात ते नेहमी त्याच्या अलिकडेच थांबतात, म्हणून मला आजपर्यंत रपेटीच्या वेळी कोणत्याही प्राण्याला मारावे लागले नाही.”
स्पष्टपणे, कोबस, प्राण्यांना मारून त्यांना विजय चिन्ह म्हणून दाखवण्यास उत्सुक नाही. वनजीवनासाठी असलेल्या त्यांच्या आदराबद्दल आम्ही आवेशी आहोत. परंतु आता उशीर होत आहे, आणि उद्या सकाळी पहाटेच आम्हाला तयार व्हायचे आहे. सर्वांना गुडनाईट म्हटल्यावर, कृत्रिमपणे बनवलेल्या चार ए आकाराच्या छोट्या बंगल्यांमध्ये आम्ही झोपण्यासाठी जातो.
पहाटे ४.४५ वाजता, कॅम्पचा आचारी विल्सन आम्हाला उठवतो. न्याहारीचा आस्वाद घेतल्यानंतर आमच्या रपेटीची सुरवात जेथून होणार आहे त्या पॉईंटपर्यंत आम्ही गाडीने प्रवास करतो. वर आच्छादलेल्या आकाशाकडे आम्ही उपकृत भावनेने पाहतो. स्वच्छ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, ४०° सेल्सियस पर्यंत तापमान वाढू शकते.
आमच्यातील काहींसाठी हा अगदी नाविण्यपूर्ण अनुभव आहे. सर्पावर कदाचित आमचा पाय पडेल किंवा एखाद्या हिंस्त्र पशुचा आमच्यावर हल्ला होईल त्या भीतीपोटी आम्ही पहिल्यांदा जरा नाखूष होतो. परंतु लवकरच डोळे जितक्या दूरपर्यंत पाहू शकतात तितक्या दूरवर, विस्तारीत उघडी जागा हिरव्यागर्द वृक्षराजीने भरलेली पाहून अशा भीती ऐवजी आश्चर्याची भावना येते. पक्ष्यांच्या मधुर संगीतामुळे व किड्यांच्या किरकीरीमुळे झुडपे जिवंत वाटत आहेत. वाह, ताज्या, स्वच्छ हवेचा श्वासोच्व्छास घेणे किती आल्हाददायक आहे!
अधून मधून, कोबस आणि त्याचा सहकारी, इल्यन एंकूना आम्हाला कोणतीतरी विलक्षणीय गोष्ट दाखवण्यासाठी थांबतात, जसे की मुंग्यांची सेना, किंवा एखाद्या प्राण्याच्या पायांचे ठसे. संपूर्ण बुंद्याला मातीच्या ढिगाऱ्याने वाळवींनी झाकून टाकलेल्या एका वृक्षानजीक आम्ही येतो. “हा वृक्ष नियॉल बेरीचा आहे. याला तुम्ही अनेकदा वाळवींच्या ढिगाऱ्यावर वाढताना पाहाल. वाळवींची क्रिया मातीला सधन करते, ज्यामुळे त्या वृक्षाचा फायदा होतो,” अशी माहिती कोबस देतो.
तासाभराच्या चालण्यानंतर हत्तीने पाडलेल्या एका झाडाजवळून आम्ही जातो. कोबस स्पष्टीकरण देतो की “हे झाड चिवट असले तरी हत्तीसाठी ते अडखळण नाही. तो निवांतपणे चालून जातो. ते अनेकवेळा असे करतात. थोडेसे नकारात्मक वाटेल, परंतु त्यामध्ये सकारात्मक पैलू देखील आहेत. काही महिन्यातच हे झाड कदाचित मेलेले असेल. ते जसे सडत जाते, तसे ते लहान सजीवांसाठी अन्न पुरवते व मातीत खनिज मुक्त करते.”
आमच्या टोळीतील एक जण म्हणतो, “मला वाटते की जर हत्तींच्या संख्येवर नियंत्रण ठेवले नाही, तर अशाप्रकारच्या क्षेत्राचा कुरणात बदल होईल.”
“अगदी बरोबर, येथे एकही वृक्ष राहणार नाही. क्रुगर पार्क मध्ये, आम्ही हत्तींच्या ७,५०० संख्येची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आमच्या सध्याच्या माहितीनुसार इतक्यांनाच क्रुगर पार्क सांभाळू शकते,” असे कोबस उत्तरला.
मग कोणीतरी वाळूतील एका प्राण्याचा ठसा पाहतो. भावनावश होऊन मी म्हणतो: “तो कदाचित एखाद्या बिबट्याचा असेल!”
“नाही, तो तरस याचा आहे. तो ठसा प्रमाणबद्ध नाही किंवा ते उमटलेले पाऊल लांब आहे. आणखी, तुम्ही नख्यांचे देखील चिन्ह पाहू शकता कारण तरस हा कुत्र्यासारखा प्राणी आहे. तो त्याचे नख माघारी किंवा आत घेऊ शकत नाही. आता जर तुम्ही याची तुलना मांजर परिवाराच्या प्राण्यांच्या पंजासोबत केली, जसे की बिबट्या, किंवा सिंह, तर त्यातील फरक फार लवकर पाहता येतो. मांजराचा पंजा प्रमाणबद्ध असतो, म्हणजेच, गोल आणि नखांविना असतो कारण मांजरी त्यांचे नख माघारी म्हणजे आत घेऊ शकतात. तसेच, ठशाच्या मागील बाजूला तुम्ही पाहिले तर, तरसाच्या बाबतीत पाहता, पंजाच्या मागील मऊ बाजूला दोन पाळ्या आहेत, परंतु मांजरासारख्या प्राण्यांच्या पंजावर मागील मऊ बाजूला तीन पाळ्या आहेत” असे कोबस म्हणतो.
आतापर्यंत आमच्या पोटात कावळे ओरडू लागले आहेत. यास्तव वाळवींच्या एका मोठ्या ढिगाऱ्यावर बसून आम्ही, पुरुषमंडळी आमच्या पाठीवरच्या बॅगेत आणलेल्या हलक्याशा नाश्त्याचा आनंद घेतो. त्यानंतर कोबस आम्हाला ज्या टेकडीवर चढण्याचे उत्तेजन देतो त्या टेकडीकडे चालू लागतो. वर चढताना अर्ध्यावरच आम्ही काही खडकांवर विश्रांती घेतो व दूरवरच्या क्षितीजाजवळील डोंगरांच्या रांगेपर्यंत विस्तारावर दाट झाडी आणि वृक्षांनी ल्यालेल्या वैभवशाली दृश्याचा आनंद घेतो. कोबस आम्हाला याची आठवण करून देतो की आम्ही जे दृश्य पाहत आहोत ते मुळचे आहे, वास्तविक पाहता, २०व्या शतकातील मनुष्याने याला अद्याप स्पर्श देखील केला नाही. परंतु टेकडीच्या टोकाला पोंहचल्यावर, चालून चालून तयार केलेली मानवी पायवाटेसारखीच पायवाट पाहून आम्हाला आश्चर्य वाटते.
“ही हत्तींची पायवाट आहे,” असे कोबस निरक्षण करतो.
तथापि, ही पायवाट मानवांनी तयार केली नसून प्राण्यांनी केली आहे हे त्याला इतके नक्की कसे माहीत आहे याचे मला आश्चर्य वाटले. हे विचार माझ्या मनाला चाटून जात असताना, तीक्ष्ण नजर असलेल्या इल्यनला याचा पुरावा सापडतो. तो जुना झालेला हत्तीचा एक सुळा उचलतो.
कोबस म्हणतो “हा सुळा कदाचित दशकांपूर्वीचा आहे.”
“होय, कोणीही मनुष्य ह्या ठिकाणी येऊन बराच काळ होऊन गेला आहे त्याचा हा पुरावा आहे कारण जर कोणी मानव येथे आला असता तर त्याने इतकी ही मौल्यवान गोष्ट सोडलीच नसती,” मी कबूल करतो. क्रुगर पार्क अधिकाऱ्यांच्या हाती सुपूर्त करण्यासाठी इल्यन तो सुळा त्याच्या पाठीवरील बॅगेत टाकतो.
वेळ किती लवकर गेला, आणि आम्ही लँडरोवर जीप पाहतो तेव्हा भर दुपार झाली आहे. आम्ही ११ किलो मीटर वर्तुळाकार चाललो. कॅम्पमध्ये आल्यावर, विल्सनने जेवण तयार केले आहे हे कळल्यावर आम्ही त्यावर उपकारस्तुती करत तुटून पडतो. वामकुक्षीनंतर आम्ही लुवुव्हू नदीच्या तीरावर संध्याकाळच्या फिरण्यासाठी निघतो.
हिरव्यागर्द कुंजकमानी व मोठमोठे वृक्ष जसे की, पीळ घातलेल्या आकाराचे सिकमॉ अंजिराच्या वृक्षांचे दृश्य रमणीय आहे. विविध वृक्षांची नावे आणि वैशिष्ट्ये समजल्यावर, काही झुडपांमागून सावधतेने आम्हाला पाहणाऱ्या वानरांच्या टोळीला आम्ही ओलांडून जातो. त्यानंतर आम्ही एका खडकावर बसून, नदीकडे पाहतो.
खळखळणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याचा आवाज ऐकत असतो तितक्यात, आमच्या मागून नदीकडे येणाऱ्या चार नियॉल गाईंकडे इल्यन आमचे लक्ष आकर्षित करतो. सुदैवाने, वारा आमच्या दिशेने वाहत असल्यामुळे, त्यांना आमचा वास येत नाही. त्या सुंदर काळवीटांकडे आम्ही लक्ष देऊन पाहत आहोत जे प्रत्येक वेळा झुडपाचा पाला खाण्यासाठी थांबत आहेत. दहा मिनिटांनंतर, त्यातील एकाचे आमच्याकडे लक्ष जाते व तो भुंकल्यासारखा इशारा देतो. ताबडतोब, सर्वजण लगबगीने पळून जातात.
तोपर्यंत, काही चौकस वानर जवळ आले आहेत, आणि आम्ही एका लहानग्या वानराचा जणू काय अतिशयोक्तिने ओरडण्याचा आवाज ऐकतो. कदाचित आमच्या अधिक जवळ आल्यामुळे त्याची आई त्याला चापट देत असेल. आम्ही अशी कल्पना करतो की ती म्हणत असेल: ‘पुन्हा कधीही ह्या मनुष्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस!’
अंधार होत चालल्यामुळे आम्हाला कॅम्पकडे पुन्हा लवकर जाण्यास हवे. आम्ही परतल्यावर, पाऊस पडू लागतो, व त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूने उघडे असलेल्या सुंदरशा तंबूत आमचे जेवण खातो. तंबूच्या छतावर आलेल्या झुडपांच्या फाद्यांतून पावसाच्या मृदू थेंबाचा आवाज आम्ही अधूनमधून ऐकतो. हिंस्त्र प्राणी जवळपास आहेत, आणि आमचे संभाषण पुन्हा एकदा सिंहाकडे वळते. आम्ही कोबसला विचारतो की रपेट करताना तो सिंहाच्या समोरासमोर कितीदा आला आहे.
तो म्हणतो, “जवळ जवळ ७० वेळा.”
“जेव्हा असे घडते तेव्हा, सामान्यपणे प्रतिक्रिया काय असते?”
कोबस उत्तरतो की, “सामान्यपणे जे घडते ते दोन्ही सिंह आणि मनुष्य, यांच्यासाठी आश्चर्य असते. आज आम्ही केल्यासारखेच, नेहमीप्रमाणेचा खेळ पाहण्यासाठी तुम्ही एखाद्या क्षेत्रात जाता, आणि अचानक, तुमच्या पुढे काही मीटर दूरवर, सावलीत सिंहाचा कळप विश्रांती घेत आहे. ते तुमच्याकडे पाहतात, व जे काय पाहत आहेत यावर जणू काय त्यांचा विश्वासच नसल्यामुळे त्यांचे डोळे मोठे होत असताना तुम्हाला दिसतील. कोबस हसून म्हणाला, आणि माझे डोळे देखील मोठे होत जातात. मग मी रपेट करणाऱ्यांना म्हणतो: ‘लवकर या! पाहून घ्या!’ पुढच्या क्षणी, तुम्हाला दोन किंवा तीन डरकाळ्या ऐकू येतात, व ते सिंह निघून जातात. आम्ही त्यांना जितके घाबरतो, त्याहीपेक्षा जास्त ते आम्हाला घाबरतात.
“इतर वेळेला, छाव्यांसोबत असणाऱ्या सिंहीणींशी तुमची गाठ पडते, आणि तेव्हाची तर परिस्थिती अगदीच वेगळी असते. डरकाळी ऐवजी, तुम्हाला धमकावणारे एक लांबलचक गुरगूरणे ऐकू येते, व ती सिंहीण तिची शेपटी ह्या बाजूने त्या बाजूला हालवताना तुम्ही तिला पाहता. मी माझी रायफल तयार ठेवतो आणि माझ्या सोबत रपेट करणाऱ्यांना स्तब्ध उभे राहण्यास सांगतो. त्यानंतर पाठ न फिरवता, प्राण्यावर आमची नजर रोखून व्यवस्थीत मार्गाने आम्ही माघार घेतो.”
दुसऱ्या दिवशी सकाळी, सुंदर माशिकीरिपुर्ट, प्रत्येक बाजूला उभे खडक असलेल्या अरुंद दरीतून आम्ही चालत जातो. सरतेशेवटी गुहा असलेल्या एका टेकडीवर आम्ही येऊन पोंहचतो. चढण्यापूर्वी इल्यन एक दगड फेकतो, ज्याचा मोठा कडकड असा आवाज होतो. त्याने नंतर त्याचे स्पष्टीकरण दिले की, “मी मुद्दामहून तो दगड फेकला. कारण कदाचित जर सिंह किंवा इतर हिंस्त्र प्राणी असेल तर त्यांना तेथून पळ काढता येईल.”
“नाहीतर, तुम्ही एखाद्या धोकादायक प्राण्याच्या संकटात पडू शकता व तुमच्यापुढे समस्या उभी राहते.” आम्ही त्या गुहेत पोंहचल्यावर, एका बाजूच्या खडकाच्या भिंतींवर, एका अरण्यवासीची चित्रकला होती. कोबस म्हणतो की हे जिराफचे चित्र कमीतकमी दोनशे वर्षांपूर्वी काढलेले असावे.
रपेट करताना आम्ही जिराफ, हिंस्त्र पशु आणि झेब्रा यांचा कळप पाहतो. मोटारगाडीमध्ये बसून, तुम्ही ह्या प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊ शकता, परंतु चालत असताना, जर वारा त्यांच्या बाजूने वाहत आहे, तर ते अचलपणे तुमचा वास घेऊ शकतात आणि तुम्ही समीप जाऊ पर्यंत ते पळून जातात. दूरवर झेब्राचा कळप पळत असतानाचा आवाज आम्ही ऐकतो, आणि मला पवित्र शास्त्राचे सत्यपूर्ण शब्द आठवतात: “पृथ्वीवरील सर्व पशु यांना तुमचे भय राहील आणि तुमचा धाक राहील.”—उत्पत्ती ९:२, [न्यू.व.].
आता पर्यंत, प्राण्यांना शोधून काढणे व त्यांच्या पंजाच्या ठशांना ओळखण्याच्या इल्यनच्या क्षमतेबद्दल आम्हाला त्याचा आदर वाटतो. मागोवा काढण्याच्या कौशल्याबद्दल विख्यात असलेल्या लोकांच्या, त्सोंगा राष्ट्राचा तो होता. आम्ही त्याला त्याच्याबद्दल विचारतो.
“मी लहान होतो तेव्हा गुरांची राखण करत असताना हे शिकू लागलो,” असे तो स्पष्टीकरण देतो.
नंतर, आमच्या दुपारच्या शेवटल्या रपेटीदरम्यान, पाणघोड्यांच्या आवाजाला इल्यनच आम्हाला सावध करतो. लवकरच आम्ही नदीकडे पाहण्यासाठी एके ठिकाणी येतो. त्या तिकडे, पाण्यात नक्कीच पाणघोड्यांचा कळप आहे. अनेकजण पाणघोड्यांना आफ्रिकेतील सर्वात धोकादायक प्राणी समजतात. परंतु आमच्या सावध, उत्तमप्रकारे प्रशिक्षित वनसंरक्षकांवर भरवसा ठेवण्यास आम्ही शिकलो आहोत. नदीच्या काठावर आम्ही नीख शांततेत बसून त्यांना पाहतो. प्रत्येक वेळा, एक पाणघोडा पाण्याच्या खालून लुप्त होतो. एक पाणघोडा गेला, असा विचार करतो न करतो तोच, अचानक फुरफरत व त्याच्या मोठमोठ्या नाकपुड्यातून पाण्याचा फवारा करत तो वर येतो. मग, स्वैरक्यात, ते त्यांचे अविस्मरणीय खणखणीत डुरकणी देतात व त्यांचे राक्षसी तोंड उघडतात.
जवळ जवळ अर्ध्या तासासाठी ह्या माकडचेष्टेचा आनंद घेतल्यावर, हिरमुसून आम्हाला तेथून निघावे लागले, कारण अंधार होत चालला होता. त्या संध्याकाळी, शेकोटीच्या आवतीभोवती बसलेलो असताना, गेल्या दोन दिवसांच्या ज्ञानसंपन्न अनुभवाचे आम्ही पुनरावलोकन करतो. ह्या पृथ्वीवर यासारखे अजूनही विद्रुप न झालेली व रमणीय स्थळे आहेत याची माहिती झाल्याचा आम्हाला अत्यांनद होतो. भवितव्याचा विचार करताना, अधिक उशीर होण्याआधी, नासाडी होण्यापासून देव हस्तक्षेप करून पृथ्वीला वाचवणार आहे या पवित्र शास्त्राच्या अभिवचनातून आम्ही सांत्वन प्राप्त करतो. तेव्हा, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो” या देवाच्या निश्चित अभिवचनाचा फायदा केवळ नियॉललँडच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी घेईल.—प्रकटीकरण ११:१८; २१:३-५; यशया ३५:५-७. (g93 8/22)