वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr13-4 पृ. ९-१३
  • मूतखडे—प्राचीन रोगावर उपचार करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मूतखडे—प्राचीन रोगावर उपचार करणे
  • सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वत्र आढळणारा आणि त्याची कारणे
  • नवे उपचार
  • क्षुल्लक शस्त्रक्रियेचे तंत्र
  • शस्त्रक्रियेविना उपचार
  • प्रतिबंध
  • तुमचे मूत्रपिंड जीवनदायी गाळणी
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
सावध राहा! माहितीपत्रक १३-४ (gbr13-4)
gbr13-4 पृ. ९-१३

मूतखडे—प्राचीन रोगावर उपचार करणे

तुम्ही मूतखड्यांनी पीडित असणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीबद्दल ऐकलेच असेल. अमेरिकेत, प्रत्येक वर्षी काही ३,००,००० मूतखड्याने पीडित असणाऱ्‍यांची दवाखान्यांमध्ये भरती केली जाते. प्रसववेदनांच्या तुलनेत याच्या वेदना अतियातनादायक असू शकतात.

काही असा विचार करतात की, मूतखड्याचा रोग, आधुनिक आहाराशी किंवा जीवन पद्धतीशी संबंधीत असून ती तुलनात्मकरित्या अलिकडील आरोग्याची समस्या आहे. परंतु, प्रत्यक्षात पाहिले तर, पुष्कळ शतकांपासून मूत्रमार्गातील खड्याच्या विकाराने मानवांना पीडित केले आहे. इजिप्त लोकांच्या रसायने घालून ठेवलेल्या प्रेतांमध्ये देखील ते आढळून आले आहेत.

मूत्रातील खनिज पदार्थ पातळ होऊन शरीरातून निघून जाण्याऐवजी गाठीच्या रुपात साठून ते वाढू लागतात तेव्हा मूतखडे निर्माण होतात. ते विविध आकाराचे होतात आणि पुष्कळ पदार्थांनी बनलेले असतात. वैद्यकीय परिसंवाद [इंग्रजी] म्हणते: “अमेरिकेत, सर्व मूतखड्यांपैकी जवळजवळ, ७५% प्रामुख्याने कॅल्शियम ऑक्सलेटने शिवाय, ५% हे केवळ शुद्ध कॅल्शियम फॉस्फेटनेच बनलेले असतात.”

सर्वत्र आढळणारा आणि त्याची कारणे

एका अहवालाप्रमाणे, उत्तर अमेरिकेतील १० टक्के पुरुषांना आणि ५ टक्के स्त्रियांना त्यांच्या जीवनकाळात मूतखडा होईल. त्याच्या पुन्हा उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आहे. मूतखडा असणाऱ्‍या ५ पैकी एका व्यक्‍तीला, पाच वर्षांच्या आत तो पुन्हा उद्‌भवू शकतो.

काही लोकांना मूतखडे का होतात आणि इतरांना ते का होत नाहीत या गोष्टीने डॉक्टरांना पुष्कळ वर्षांपासून गोंधळात टाकले आहे. मूतखडे उद्‌भवण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चयापचय, संसर्ग, आनुवंशिकतेने मिळालेले आजार, निर्जलीकरणाचा जुनाट आजार आणि आहार या गोष्टी समावलेल्या आहेत.

लघवीमधून जवळजवळ ८० टक्के मूतखडे आपोआप काढून टाकले जातात. त्यांना काढून टाकण्यासाठी रुग्णांना भरपूर पाणी प्यावयास सांगितले जाते. हे खडे सापेक्षतः लहान, आणि बहुधा दिसणारे असले तरी, वेदना फार तीव्र असू शकते. मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्यास किंवा खडा लघवीमधून निघून जाण्यासाठी फारच मोठा असेल (ते गॉल्फ चेंडूच्या आकाराएवढे देखील असू शकतात) तर, रुग्णाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वैद्यकीय उपचाराची आवश्‍यकता आहे.

नवे उपचार

जे मूतखडे स्वतःहून निघून जात नव्हते अशांना काढण्यासाठी, १९८० पर्यंत शस्त्रक्रियेची आवश्‍यकता होती. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकलेल्या खड्याला काढण्यासाठी, शरीराच्या एका बाजूच्या मांसल भागात ३० सेंटीमीटर खोल वेदनादायक छेद घेतला जात होता. शस्त्रक्रियेनंतर, बरे होण्यासाठी दवाखान्यात दोन आठवड्यांसाठी राहावे लागत होते आणि प्रकृती सुधारण्यासाठी घरी जवळजवळ दोन महिन्यांचा काळ लागत होता. परंतु, कॉन्स्‌चा आधुनिक उपचार [इंग्रजी] (१९८९) हे वैद्यकीय पुस्तक असे म्हणते, “आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाल्यामुळे, खडा काढण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्‍यकता फारच क्वचित भासत आहे.”

आता, एका तंत्राच्या साहाय्याने क्षुल्लक शस्त्रक्रियेद्वारे कठीण खडे देखील काढले जाऊ शकतात. आज, एक्स्ट्राकॉरपीयल शॉक वेव्ह लीथोट्रिपसी (इएसडब्ल्यूएल) या सामान्यतः वापरण्यात येणाऱ्‍या तंत्रामध्ये शस्त्रक्रियेची मुळीच गरज नाही. या सर्व नवीन वैद्यकीय उपक्रमांचा उल्लेख करून कॉन्स्‌चा आधुनिक उपचार [इंग्रजी] असे म्हणते की “आज, सर्व [मूतखड्यांपैकी] केवळ १ टक्के खडे काढून टाकण्याची जबाबदारी” शस्त्रक्रियेची आहे.

क्षुल्लक शस्त्रक्रियेचे तंत्र

क्षुल्लक शस्त्रक्रिया असणाऱ्‍या तंत्राला कधीकधी परक्यूटेनीयस अल्ट्रासोनिक लीथोट्रिपसी असे म्हटले जाते. “परक्यूटेनीयस” याचा अर्थ “त्वचेमधून,” आणि “लीथोट्रिपसी” याचा अर्थ प्रत्यक्षात “चुरा करणे” असा होतो. यासाठी शरीराच्या बाजूला केवळ एक सेंटीमीटर छेद करण्याची आवश्‍यकता असते. या छेदातून सायटोस्कोप सारखे नेफ्रोस्कोप हे उपकरण घुसविले जाते. या दुर्बीणीद्वारे मूत्रपिंडाचा अंतर्भाग आणि त्रासदायक खडा दिसू शकतो.

हा खडा नेफ्रोस्कोपद्वारे काढण्यासाठी अतिशय मोठा असेल तर दुर्बीणीमधून मूत्रपिंडात अल्ट्रासोनिक उपकरण घातले जाते. मग, या खड्याचे किंवा खड्यांचे तुकडे करण्यासाठी हे पोकळ उपकरण एका अल्ट्रासाऊंड जेनरेटरला जोडले जाते ज्यामुळे हे उपकरण जवळजवळ प्रत्येक सेकंदाला २३,००० ते २५,००० वेळा कंपन करते. या ध्वनिलहरींमुळे त्या उपकरणाला, दगडांना छिद्र पाडण्यासाठी उपयोगात आणणाऱ्‍या साधनाप्रमाणे वापरले जाते. त्यामुळे थेट स्पर्श करणाऱ्‍या सगळ्या परंतु सर्वात कठीण खड्यांचा चुरा केला जातो.

त्या पोकळ पंपाद्वारे सतत शोषण केल्यामुळे, मूत्रपिंडाच्या अंतर्भागातून छोट्या खड्यांच्या तुकड्यांना काढून प्रत्यक्षात तो रिकामा केला जातो. काळजीपूर्वक तपासणीद्वारे खड्यांचा सर्व अवशेष पोकळ पंपाच्या साहाय्याने काढून टाकला आहे हे प्रकट होईपर्यंत तुकडे करण्याची आणि शोषण्याची क्रिया चालूच राहते.

तरीसुद्धा, काहीवेळा खड्यांचे काही तुकडे हलत नाहीत. अशा परिस्थितीत, समोर लहान चिमटे असलेल्या बारीक नळीला डॉक्टर, नेफ्रोस्कोपमधून घुसवू शकतात. मग, डॉक्टर त्या लहान चिमट्यांना उघडून खड्याला धरून, बाहेर ओढून काढू शकतात.

त्वचेतून शस्त्रक्रिया करण्याची प्रगती होत गेली तसे, पुष्कळ पद्धतींचा उपयोग केला गेला. काही वर्षांपूर्वी, युरोलॉजीक क्लिनिक्स्‌ ऑफ नॉर्थ अमेरिका या मासिकाने असे म्हटले: “वैद्यकीय मासिकांच्या नवीन अंकांसोबत, त्वचेतून खडे काढण्याच्या नवीन पद्धती देखील येऊ लागल्या.” त्या मासिकाने निरीक्षिले की, त्या पद्धतीच्या यशस्वीतेची शक्यता, “खड्याच्या आकाराप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे बदलते.” परंतु, ते मासिक स्पष्ट करते की, “चालकाचे कौशल्य आणि अनुभव” हे सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत.

त्या खड्यांचा चुरा करण्यासाठी पुरेशी उर्जा उत्पन्‍न केली जात असली तरी ही पद्धत सापेक्षतः सुरक्षित आहे. वैद्यकीय परिसंवाद [इंग्रजी] म्हणते, “अद्यापपर्यंत, रक्‍तस्त्राव ही मोठी समस्या झालेली नाही.” तरीपण, एका अहवालाप्रमाणे ४ टक्के रुग्णांमध्ये पुष्कळ रक्‍तस्त्राव झाला आहे.

कमीतकमी अस्वस्थता आणि सुधारण्यास लागणारा कमी काळ, हे या पद्धतीचे फायदे आहेत. पुष्कळ प्रकरणांमध्ये, केवळ पाच ते सहा दिवस दवाखान्यात राहावे लागते आणि काही रुग्ण तर केवळ तीन दिवसातच घरी जातात. दवाखान्यातून आल्यावर लागलीच कामावर रूजू होणाऱ्‍या कामगार लोकांसाठी हा फायदा महत्त्वपूर्ण आहे.

शस्त्रक्रियेविना उपचार

जर्मनीतील म्युनिक येथे, १९८० मध्ये एक्स्ट्राकॉरपीयल शॉक वेव्ह लीथोट्रिपसी हा उल्लेखनीय नवीन उपचार सुरू करण्यात आला. यामध्ये कोणत्याही जखमा न करता तीव्र उर्जा असलेल्या लहरींद्वारे खड्याचे तुकडे करण्यात येतात.

रुग्णाला, कोमट पाण्याने अर्ध्या भरलेल्या स्टेनलेस स्टीलच्या टाकीत बसवले जाते. उपचार करण्यात येणाऱ्‍या मूत्रपिंडावर अतितीव्र लहरींना केंद्रित करता येईल अशा स्थितीत त्याला काळजीपूर्वकतेने बसवले जाते. या लहरी पाण्याखालून सोडण्यात येणाऱ्‍या ठिगणीद्वारे निर्माण होतात. त्यांची उर्जा न गमावता, या लहरी मऊ मानवी ऊतींमधून सहजासहजी वाहतात आणि खड्याला गाठतात. खड्याची पूड होईपर्यंत ते त्यावर भडिमार करतात. मग, पुष्कळ रुग्ण या खड्याच्या चुऱ्‍याला सहजपणे घालवून देऊ शकतात.

इएसडब्ल्यूएल याचा, १९९० पर्यंत, जवळजवळ ८० टक्के खडे काढण्याच्या पद्धतींमध्ये उपयोग केला जात होता. ऑस्ट्रेलियाचा कौटुंबिक वैद्य [इंग्रजी] याने मागील वर्षी असा अहवाल दिला की, या तंत्राला सुरू केल्यानंतर, “१,१०० उपकरणांवर, मूतखड्यांची पूड करण्यासाठी उर्जायुक्‍त लहरी निर्माण करणाऱ्‍या विविध जेनरेटर्स्‌चा उपयोग, जगभरातील ३० लाखापेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यासाठी केला गेला.”

इएसडब्ल्यूएल, मूत्रपिंडाच्या भागाला थोडी यातना देत असले तरी, ऑस्ट्रेलियाचा कौटुंबिक वैद्य [इंग्रजी] स्पष्ट करते: “त्यामुळे बाजूच्या प्लीहा, यकृत, स्वादुपिंड आणि आतडी या अवयवांना क्वचितच अपाय होतो. थोड्या काळासाठी असणाऱ्‍या जखमांचा प्रभाव सहजपणे सहन केला जाऊ शकतो आणि त्यात रुग्णाला कमीतकमी इजा होते आणि काही रुग्ण उदराच्या भित्तीत केवळ [स्नायू आणि अस्थी] यामध्ये सौम्य वेदना होत असल्याचे व उपचारानंतर २४ ते ४८ तासांसाठी लघवीतून थोडेसे रक्‍त जात असल्याचे सांगतात.” लहान मुलांवर देखील यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या मासिकाने अशी समाप्ती केली: “१० वर्षांच्या अभ्यासानंतर त्याचे महत्त्व कळल्यावर असे दिसते की इएसडब्ल्यूएल अतिशय सुरक्षित उपचार आहे.”

खरोखरच, हा उपचार एवढा प्रभावकारी होता की मागच्या वर्षी कॉन्स्‌ करंट थेरपीने स्पष्टता दिली: “इएसडब्ल्यूएल या उपचारामुळे दर्शक खड्यांना काढणे अत्यंत सहज झाले आहे आणि त्यामुळे आजारी राहण्याचा काळ देखील अल्प झाल्यामुळे मूतखड्याच्या विकाराबद्दल रुग्ण तसेच चिकित्सक काळजी घेण्याच्या बाबतीत तसेच उपचाराच्या बाबतीत शिथिल झाले आहेत.”

तरीसुद्धा, मूतखडे, अतियातनादायक विकार असल्यामुळे तुम्हाला तो निश्‍चितच नकोसा वाटेल. त्यांना टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

प्रतिबंध

तुम्हाला आधी मूतखडा झाला असल्यास, व तो परत उद्‌भवू शकत असल्यामुळे तुम्ही भरपूर पाणी पिण्याच्या आर्जवण्याकडे सुज्ञतेने लक्ष द्याल. प्रत्येक दिवशी २ लिटर पेक्षा अधिक मूत्र विसर्जन करण्याची शिफारस केली जाते आणि याचाच अर्थ पुष्कळ पाणी पिणे, होय!

त्याशिवाय, तुमच्या आहारात त्याप्रमाणे बदल करणे सुज्ञतेचे ठरेल. डॉक्टर असा सल्ला देतात की खडे ज्यामुळे निर्माण होतात असा विश्‍वास केला जातो त्या आहाराचा म्हणजेच गोमांस, मीठ आणि ऑक्सलेटयुक्‍त अन्‍नाचा उपयोग कमी करावा. या अन्‍नामध्ये कठीण कवचाची फळे, चॉक्लेट, काळी मिरी, आणि पालक सारख्या पालेभाज्यांचा समावेश होतो. चिकित्सकांनी एकेकाळी कॅल्शियम कमी घेण्याचे सांगितले, परंतु आधुनिक संशोधन असे दर्शवते की पचनासंबंधी कॅल्शियम घेतल्यास खडे निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

तरीसुद्धा, तुम्ही सर्व काळजी घेतल्यावरही तुम्हाला मूतखडा निर्माण झाला तर, त्याचा उपचार करण्यास सुधारीत पद्धती उपलब्ध आहेत, हे जाणण्यामुळे तुम्हाला सांत्वन मिळेल. (g93 8/22)

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Leonardo On The Human Body/Dover Publications, Inc.

[१३ पानांवरील चित्र]

लिथोट्रिप्टर या उपकरणाच्या साहाय्याने मूतखड्यांवर शस्त्रक्रियेविना करण्यात येणारे उपचार

[चित्राचे श्रेय]

S.I.U./Science Source/PR

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा