तरुण लोक विचारतात. . . .
एडस्—मला काही धोका आहे का?
न्यूजवीक मासिकाने सांगितले की त्या घोषणेमुळे ‘जगाला धक्का बसला.’ नोव्हेंबर ७, १९९१ रोजी, अर्वन “मॅजीक” जॉनसन, या अमेरिकेच्या प्रसिद्ध खेळाडूने, त्याला एडस् रोग जडल्याचे वृत्तपत्राला कळवले. या धक्कादायक कबुलीच्या मागोमाग, एडस्च्या माहितीप्रसारण टेलिफोनवर एकामागोमाग एक फोन येत होते. एडस्ची चाचणी करण्यासाठी काही दवाखाने गच्च भरून गेले होते. काही लोकांनी, तात्पुरते का होईना परंतु, त्यांची व्यभिचारी वर्तणूक कमी केली.
कदाचित, या घोषणेचा सर्वात मोठा प्रभाव तरुण लोकांवर झाला. एका विद्यापीठातील आरोग्य खात्याच्या मुख्य अधिकाऱ्याने असे म्हटले: “काही काळासाठी, विद्यार्थ्यांनी, ‘ते त्याला झाले, तर ते मलाही होऊ शकते’, हा संदेश अंतःकरणाला लावून घेतला. . . . पुष्कळ युवकांसाठी, मॅजीक जॉनसनला जे झाले, त्यामुळे त्यांच्या वागणूकीत ते बदल घडवून आणतील असा त्याचा अर्थ होत नाही. परिणामामुळे होणारी टीका किंवा शिक्षा ते टाळू शकतील असे त्यांना अजूनही वाटते.’”
पवित्र शास्त्राने भाकीत केले की, “मऱ्या,” म्हणजेच, भराभर फैलावणारे संसर्गजन्य रोग आपल्या काळाची विशेष लक्षणे असतील. (लूक २१:११) एडस्ला निश्चितपणे, मरी असे म्हटले जाऊ शकते. अमेरिकेतील, पहिल्या १,००,००० घटना लक्षात येण्यास, १९८१ ते १९८९ पर्यंत, म्हणजेच आठ वर्षे लागली. परंतु, दुसऱ्या १,००,००० घटना कळण्यास केवळ दोन वर्षे लागली!
यू.एस. सेंट्र्स फॉर डिझीज कंट्रोलप्रमाणे, ही दुःखदायक आकडेवारी “अमेरिकेतील [एडस्] साथीच्या जलदगतीने वाढणाऱ्या प्रमाणावर जोर देते.” तथापि, एडस्, आफ्रिका, आशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेमध्ये मृत्यू आणि दुःख घडवून आणणारी एक जगव्याप्त पीडा आहे. खरेपणाने मग, लॉस ॲन्जेलेसच्या बालकांच्या दवाखान्यातील डॉ. मॉरवन बेल्जेर यांनी एडस्बद्दल “१९९० मधील युवक सामना करीत असलेली सर्वात भीतीदायक समस्या,” असे म्हटले.
नकळत हानी करणारा संसर्ग
हा विचित्र रोग आहे तरी काय, आणि तो एवढा प्राणघातक का आहे? चिकित्सक असा विश्वास करतात की, एचआयव्ही (ह्यूमन इंम्यूनोडेफिशीएन्सी व्हायरस) या सुक्ष्मकणासारख्या विषाणूने रक्त प्रवाहावर हल्ला केला तर एडस् उद्भवतो. एकदा ते तेथे पोंहचले तर, शरीराच्या काही श्वेत रक्तकणिका, म्हणजेच रक्तबिंबिकांना शोधून त्यांचा नाश करण्याच्या कामगिरीस ते आरंभ करतात. या पेशी, शरीराच्या एखाद्या रोगाला चुकवण्यासाठी मदत करण्यात मोठी भूमिका पार पाडतात. परंतु, एडस् विषाणू त्यांना निकामी करून प्रतिबंध करणाऱ्या रचनेचा नाश करतो.
एखाद्याला आजारी वाटण्याआधी पुरेसा वेळ जाऊ शकतो. काहींमध्ये रोगाची लक्षणे जवळजवळ एका दशकापर्यंत आढळत नाहीत. परंतु कालांतराने, वजनात घट, भूक न लागणे, ताप आणि अतिसार सारख्या शीतज्वराची लक्षणे उद्भवतात. अचानक संकटामुळे, प्रतिबंध करणाऱ्या रचनेचा जसा नाश होत जातो तसे बळी पडलेल्या व्यक्तीच्या कमी प्रतिकारकतेमुळे, संधीचा फायदा घेऊन निर्माण झालेल्या संधी साधणाऱ्या अशा न्यूमोनिया, मेनीनजायटीस, क्षयरोग, किंवा कर्करोग सारख्या पुष्कळ आजारांना, ती व्यक्ती सहजासहजी भेद्य बनते.
एडस्ला बळी पडलेली, एक २० वर्षीय व्यक्ती अशी म्हणते, “मी सतत पीडेत असतो.” या रोगामुळे त्याच्या मोठ्या आतड्यात तसेच गुदद्वारामध्ये सुजलेल्या गाठी निर्माण झाल्या आहेत. परंतु, पूर्ण वाढ झालेला एडस् रोग, अस्वस्थता आणि दुःखणे यापेक्षा काही अधिक आहे, कारण प्रत्यक्षात त्याच्या सर्व बळींसाठी त्याचा अर्थ मृत्यू होतो. केवळ अमेरिकेतच, १९८१ पासून या विषाणूचा १० लाख लोकांपर्यंत प्रसार झाला. अद्यापपर्यंत, १,६०,००० पेक्षा अधिक लोक मरण पावलेत. तज्ज्ञ त्याच्याबद्दल आगाऊ सांगतात की, १९९५ या वर्षापर्यंत, एडस्मुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट होईल. अद्याप, एडस् रोगावर कोणताही उपाय नाही.
युवक धोक्यात आहेत
अद्यापपर्यंत, अहवाल दिलेल्या एडस्च्या घटनांपैकी, अमेरिकेत १ टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात युवक गोवलेले आहेत. या कारणास्तव, आजारामुळे मेलेल्या युवकांना तुम्ही वैयक्तिकरित्या जाणत नसाल. परंतु, याचा अर्थ, युवक धोक्यात नाहीत, असा होत नाही! अमेरिकेतील, एडस्च्या बळींमध्ये एक पंचमांश लोक २० वर्षांचे आहेत. या रोगाची लक्षणे दिसून येण्यास बरीच वर्षे लागत असल्यामुळे, पुष्कळ व्यक्तींना हा रोग अधिककरून त्यांच्या यौवनावस्थेतच जडला असावा. सध्याचा हा कल असाच चालू राहिला तर, हजारो युवक एडस्चे रुग्ण होतील.
यू.एस. सेंट्र्स फॉर डिझीस कंट्रोलप्रमाणे, हा प्राणघातक विषाणू, “संसर्गदूषित व्यक्तींच्या रक्तात, वीर्यात, किंवा मलमूत्रात” लपलेला असतो. यास्तव, “संसर्ग असणाऱ्या व्यक्तींसोबत योनीमार्गे, गुदद्वारामार्गे किंवा तोंडातून लैंगिक संबंध” ठेवल्यामुळे एचआयव्हीची लागण होते. अधिकांश लोकांना या मार्गांद्वारे हा रोग जडला आहे. “संसर्गदूषित व्यक्तीने किंवा अशा व्यक्तीसाठी वापरण्यात आलेल्या सुईने किंवा सिरिंजेसने टोचल्यामुळे किंवा ती वापरल्यामुळे देखील,” एडस्ची लागण होऊ शकते. शिवाय, एचआयव्हीने दूषित झालेल्या “रक्त संक्रमणांचा स्वीकार केल्याने काहीजण संसर्गदूषित झाले आहेत.”—वॉलंट्री एचआयव्ही काँसलींग ॲण्ड टेस्टींग: फॅक्टस्, इश्यूज, ॲण्ड आन्सर्स.
परिणामतः, पुष्कळ तरुण लोक धोक्यात आहेत. तरुणांच्या भयंकर संख्येने (अमेरिकेतच जवळजवळ ६० टक्के तरुणांनी) बेकायदेशीर मादक औषधांचा प्रयोग करून पाहिला आहे. यातील काही मादक औषधे टोचली जात असल्यामुळे, दूषित सुईद्वारे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. अमेरिकेच्या एका अभ्यासानुसार, हायस्कूलच्या (माध्यमिक शाळेच्या) ८२ टक्के विद्यार्थ्यांनी मद्यपेयांचा उपयोग केला आहे, आणि सध्या ५० टक्के असे करीत आहेत. बीयरची एक बाटली प्याल्याने तुम्हाला एडस् होणार नाही परंतु, त्यामुळे नंतर तुमची निर्णयशक्ती कमजोर होऊ शकते व विषमलिंगी लैंगिकता, समलिंगी किंवा विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबत लैंगिक कृत्यासारख्या धोकेदायक वागणूकीत, गोवण्याची तुमची अधिक शक्यता असू शकते.
पंधरा वर्षीय मुलींपैकी, पाच पेक्षा कमी टक्क्यांनी १९७० मध्ये लैंगिक संभोग अनुभवला होता. तो आकडा, १९८८ पर्यंत २५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला होता. अभ्यासांद्वारे दाखवल्यानुसार, अमेरिकेत, वयाच्या २०व्या वर्षापर्यंत, ७५ टक्के स्त्रिया आणि ८६ टक्के पुरुष लैंगिक कृत्यात गोवलेले असतात. आणखी एक भयानक आकडेवारी दाखवते: ५ पैकी जवळजवळ १ युवकाने चार पेक्षा अधिक व्यक्तींसोबत संभोग अनुभवला आहे. होय, अधिकाधिक तरुण विवाहा आधीच्या लैंगिक संबंधात गुंतले जात आहेत, आणि यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
इतर देशांतील परिस्थिती त्यापेक्षा काही कमी भयंकर नाही. लॅटिन अमेरिकेसारख्या देशांमध्ये, जवळजवळ युवकांचा तृतीयांश भाग विवाहा आधीच्या लैंगिक संबंधात गोवलेला आहे. अफ्रिकेच्या देशांमध्ये, पुष्कळ पुरुषांनी स्वतःचे एडस् विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी, तरुण मुलींची, लैंगिक सोबती म्हणून निवड केली आहे असा अहवाल दिला जातो. त्याचा परिणाम? तरुण आफ्रिकन मुलींमध्ये, एडस् प्रकरणांचा स्फोट.
एडस्च्या प्रसाराने, या नाशकारक वर्तणूकीला रोखण्यासाठी काहीच केले नाही. लॅटिन-अमेरिकेच्या एका देशाचे उदाहरण घ्या. साठ टक्क्यांपेक्षा अधिक “लैंगिक कृत्यात गोवलेल्या अविवाहित तरुण लोकांना एडस् विषाणू होण्याचा अधिक धोका असतो.” तरीसुद्धा, केवळ १० टक्क्यांपेक्षा कमी लोकांना व्यक्तिगतरित्या त्याचा धोका वाटतो. ते स्वतःला म्हणतात: ‘ते मला होणार नाही.’ परंतु, या देशात, “अमेरिकेमधील सर्वात अधिक एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण आहे.”—यू.एस. सेंट्र्स फॉर डिझीज कंट्रोल.
ते होऊ शकते!
लैंगिक अनैतिकतेचे “अखेर परिणाम” ‘दवण्यासारखे कडू’ असतात, या पवित्र शास्त्राच्या इशाऱ्यांच्या सत्यतेला एडस्ची साथ अधोरेखीत करते. (नीतीसूत्रे ५:३-५, न्यू.व.; ७:२१-२३) अर्थात, पवित्र शास्त्र प्रथमतः, आध्यात्मिक आणि मानसिक हानीला सूचित करते. परंतु लैंगिक अनैतिकतेचे काही अखेरचे परिणाम शारीरिकरित्या देखील हानीकारक आहेत याविषयी आम्हाला आश्चर्य वाटू नये.
यास्तव, तरुण लोक खरोखरीच एडस् रोग आणि इतर लैंगिकरित्या संक्रमित रोग जडण्याच्या धोक्याचा सामना करत आहेत हे चिंताजनक आहे. एडस् ‘मला होऊ शकत नाही’ ही स्व-संतुष्टपणाची प्रवृत्ती प्राणघातक ठरू शकेल. डेवीड नावाच्या एका व्यक्तीने असे म्हटले, “पंधरा, सोळा किंवा सतरा, अठरा, एकोणीस किंवा वीस वर्षांचे असताना, तुम्ही सुरक्षित आहात असा विचार तुम्ही कराल.” परंतु, वास्तविकता काही वेगळेच दर्शवतात. डेवीडला वयाच्या १५व्या वर्षी एडस्चा विषाणू जडला.
मग, स्पष्टपणे सांगायचे तर: तुम्ही बेकायदेशीर मादक औषधांचा उपयोग किंवा विवाहा आधीच्या लैंगिकतेमध्ये गुंतलेले आहात तर, तुम्ही धोक्यात आहात! परंतु, एखादा “सुरक्षित संभोग” यामध्ये भाग घेऊ शकतो अशा दाव्यांबद्दल काय? या साथीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे खरे मार्ग आहेत का? आमच्या या श्रृंखलेतील पुढील लेख या प्रश्नांची चर्चा करील. (g93 8/22)
[२७ पानांवरील चौकट]
लैंगिकरित्या संक्रमित झालेले इतर रोग
एडस्ने बातम्यांच्या मुख्य मथळ्याची जागा घेतली आहे. तथापि, द मेडिकल पोस्ट असा इशारा देते: ‘यौवनावस्थेच्या एसटीडी [लैंगिकरित्या संक्रमणित झालेले रोग] साथीमध्ये कॅनडा मध्यभागी आहे.’ कॅनडा केवळ एकटाच नाही. यू.एस.-बेस्ड सेंटर फॉर पॉप्यूलेशन ऑप्शन्स् म्हणते त्याप्रमाणे, “प्रत्येक वर्षी जवळजवळ २.५ दशलक्ष युवक एसटीडीने संसर्गदूषित होतात.” “हा आकडा, लैंगिक कृत्यांमध्ये गुंतलेल्या प्रत्येकी सहा युवकांपैकी एकाला आणि राष्ट्राच्या एसटीडीच्या एक पंचमांश प्रकरणांना सूचित करतो.”
उदाहरणार्थ, उपदंश हा रोग, लोप पावण्याच्या वाटेवर होता असे समजले जात होते, तो अलिकडील वर्षात परत उद्भवला आहे ज्याने नोंद होण्यासारख्या संख्येत कित्येक युवकांचे बळी घेतले आहेत. त्याचप्रमाणे, गर्मी आणि क्लमिडिया (अमेरिकेत सर्वत्र आढळणारे एसटीडी) रोगांना संपूर्णतः काढून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न विलक्षणरित्या अयशस्वी झाले आहेत याचा पुरावा ते देतात. आणि युवकांमध्ये त्यांच्या संसर्गाचे सर्वात मोठे प्रमाण आहे. तशाचप्रकारे, द न्यू यॉर्क टाईम्स् अहवाल देते की कॉनडायलोमा या रोगाने पछाडलेल्या युवकांच्या संख्येत “तीव्र वाढ” झाली आहे. तसेच हजारो युवकांना हर्प्स व्हायरस देखील आहे. सायन्स न्यूज प्रमाणे, “जेनीटल हर्प्स असणाऱ्या लोकांना एडस् ज्यामुळे होतो त्या [एचआयव्हीची] लागण होण्याची अधिक शक्यता असते.”
सेंटर फॉर पॉप्यूलेशन ऑप्शन्स असे म्हणते: “कोणत्याही दुसऱ्या वयोगटापेक्षा प्रौढ युवकांमध्ये एसटीडीचे अधिक प्रमाण अनुभवले जातात तरी त्यांना वैद्यकीय मदत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. रोगाचे निदान न झाल्यास आणि त्यावर उपचार न केल्यास ओटीपोटात सूज होण्याचा रोग, अफलत्व, गर्भाशयात सोडून इतर ठिकाणी (जसे की, बीजवाहिनीमध्ये) गर्भधारणा होणे आणि मानेचा कर्करोग याच्या रुपात वाईट परिणाम सहन करावे लागतात.”
[२५, २६ पानांवरील चित्रं]
बेकायदेशीर मादक औषधे टोचून घेणाऱ्या किंवा विषमलिंगी संभोगात गोवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, एडस् रोगाची लागण होण्याचा मोठा धोका आहे