बदाम—कवच असणारे फळ
टेकडीवरील मोक्याच्या जागेवरुन खालच्या हिरवट-निळ्या संपूर्ण दरीमधील पांढऱ्या बेटांची शृंखला मला दिसते. जरा निरखून पाहिल्यास लक्षात येते की, दूरुन पॉपकॉर्नच्या शेतांसारखी दिसणारी वास्तविक स्वतंत्र अशी हजारो झाडे असून ती नाजूक गुलाबी गाभा असलेल्या व मादक सुगंधाने आसमंत भरून टाकणाऱ्या पांढऱ्या फुलांनी बहरली आहेत. हे सौंदर्य माझ्या इंद्रियांना आनंद देते. वसंत ऋतुच्या सुरवातीस बहराला आलेल्या बदामाच्या बागेचे वर्णन असेच करता येईल.
कॅलेफोर्नियामधील एका लहान गावातील बदामाच्या बागेवर मी लहानाचा मोठा झालो त्यामुळे लहानपणापासून या उत्तेजक दृष्याचा आस्वाद मी घेतला आहे. या स्वादिष्ट फळांच्या बागायतीवर माझे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवीत असे.
“बदाम हे कठीण कवचाचे फळ नव्हे का?” असे तुम्ही विचाराल. होय आणि नाहीही. सर्वसाधारणपणे बदाम हे कठीण सालीचे फळ समजले जात असले तरी ते तसे नव्हे. ज्यांच्यापासून गुठळी असलेली फळझाडे उगम पावली अशा गुलाब कुटुंबात ते मोडते. गुठळीच्या फळझाडांमध्ये पीच, जर्दाळू व आलूबुखारे यांचा समावेश होतो. पुढच्या वेळी पीचची गुठळी हाती आली की, ती किती बदामासारखी दिसते याकडे लक्ष द्या. दोन्ही फोडून आतील बिया पहा. त्याही सारख्या दिसतात असे तुम्हाला आढळून येईल. परंतु फक्त बदामच खावा कारण पीचसारख्या इतर फळांच्या बियांनी तुम्हाला उलटी होऊ शकते.
ऐतिहासिक काळातील बदाम
बदामाच्या इतिहासाची मुळे गतकाळात आशिया मायनर व भूमध्य समुद्राच्या प्रदेशात पोहोचतात. ख्रिस्ताच्याही बऱ्याच काळापूर्वी बदाम, मध्यपूर्वेतील लोकांच्या दैनंदिन आहाराचा भाग होता, आणि त्याला चांगले कारण देखील होते.
मूठभर बदामामुळे चविष्टच नव्हे तर आरोग्यवर्धक फराळ होतो. बदामांमध्ये महत्त्वाची पौष्टिक तत्त्वे असतात तसेच अतिआवश्यक जीवनसत्त्वे व क्षारही भरपूर प्रमाणात असतात. मध्यपूर्वेतील लोकांच्या दैनंदिन आहारात स्थान मिळण्याइतके बदामांना का महत्त्व दिले गेले असावे, आणि मध्ययुगामध्ये इस्लामचा प्रसार जेथे जेथे वाढत गेला त्या पाठोपाठ बदामाची लागवड का झाली ते यावरून स्पष्ट होते.
मुस्लीम लोकांनी स्पेनमध्ये व कालांतराने कॅलेफोर्नियामधील स्पेनच्या मिशनच्या वसाहतवादी प्रसारामार्फत नवीन जगात (अमेरिका खंड व पॅसिफिक महासागरातील बेटे) केलेली बागायत भरभराटीला आली. आता २०० वर्षांनंतर बदाम हे कॅलेफोर्नियाचे सर्वाधिक मोठे वृक्षांचे पीक असून ते राज्य जगातील अग्रगण्य बदाम उत्पादकांमधील एक आहे.
शेगड्यांचा उपयोग
बहर येण्याच्या मोसमात गोठण्यापेक्षा थंड तपमानात फार वेळ राहिल्यास बदामाच्या कळ्यांना धोका संभवतो. या नाजूक कळ्यांना अपाय होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळी गोठलेल्या दवापासून बचाव करण्यासाठी शेगड्यांचा उपयोग करीत असत. तेल जाळणाऱ्या या शेगड्या झाडांच्या रांगेलगत ठराविक अंतराने ठेवण्यात येत. त्यातून उत्पन्न होणाऱ्या काळ्या चिकट धुराचा मोठा फायदा बदामाच्या कळ्यांना होत असला तरी स्थानिक रहिवाश्यांना मुळीच नव्हता!
कल्पना करा की, स्वच्छतापूर्वक झोपल्यावर सकाळी उठून पाहतो तो चेहऱ्यावर धुरकट थर साठलेला आहे. तो तुमच्या नाकपुड्यात आणि नखाखालीही शिरलेला आहे! गोठलेले दव आणि शेगड्यांच्या या लढाईत बंद दरवाजे व खिडक्या किंवा भरपूर साबण व पाणीही आम्हाला स्वच्छ ठेवू शकत नसत.
परंतु आता परिस्थितीत बदल झाला ही आनंदाची गोष्ट आहे. काही बागांमधून अजूनही शेगड्यांचा उपयोग केला जातो. पण बदामाची लागवड करणाऱ्या समाजातील रहिवाश्यांना आनंद वाटतो की, आता इतरही पद्धती यशस्वीरित्या राबवल्या जात आहेत.
बदामांचा पाऊस
कालांतराने बदाम उतरविण्याची पद्धतही बदलली गेली. रबरी धोटे हाती घेतलेले मजूर त्या झाडांवर सहजगत्या चढत व फांद्या बडवत. त्यामुळे खाली पसरलेल्या कॅनव्हासच्या चादरीवर मोठा आवाज करत बदामांचा पाऊस पडत असे. त्या चादरी घोड्यांनी किंवा ट्रॅक्टरने खेचून पुढल्या झाडापाशी नेल्या जात व कामाची पुनरावृत्ती होत असे. चादर खेचून पुढे नेता न येण्याएवढी जड झाली की, बदाम तागाच्या (गोणपाटाच्या) पिशव्यांमध्ये भरले जात व साल काढणाऱ्या यंत्राकडे नेले जात.
उलटपक्षी, आता झाडे हलवण्यासाठी, बदाम गोळा करण्यासाठी तसेच फळापासून साल व कचरा वेगळा करण्यासाठी यंत्रांचा वापर केला जातो. प्रत्यक्ष बदामाच्या फळापासून बराचसा कचरा वेगळा करण्यासाठी हवेच्या प्रखर झोताचा उपयोग करणारे यंत्र बनवणाऱ्या सुरवातीच्या लोकांमध्ये माझे वडीलही होते.
यानंतर प्रक्रियेच्या यंत्रातून बदाम आपोआप अक्षरशः वाहतात. त्यामध्ये ते फोडले जातात, स्वच्छ केले जातात, आकारानुसार त्यांची प्रत ठरवली जाते, एका विजेवर चालणाऱ्या यंत्राने ते निवडले जातात व त्यांची शेवटली तपासणी होते.
यानंतर काही बदामांवर होणाऱ्या प्रक्रिया आनंददायक आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या होतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, जिभेच्या स्वाद घेणाऱ्या पिंडांना मोह पाडणाऱ्या, बदामाच्या अनेक चविष्ट रुपांतरापैकी म्हणजे कल्पना करा की, एका साध्या बदामाला एकदम हिकरीच्या धुराचा, लसणीच्या वा कांद्याचा स्वाद लागणे, किंवा त्याला साखरेचे आवरण मिळणे, खारवले जाणे, भाजले जाणे वा घोटून बदामी लोणी बनवले जाणे, तर हे कसे वाटेल? तसेच संपूर्ण वा कुटलेल्या बदामांचा स्वाद घातलेल्या स्वादिष्ट मिठाया, बेकरीचे पदार्थ व आईसक्रिम देखील विसरता कामा नये!
बदामांच्या बागांच्या सान्निध्यात लहानचे मोठे होणे माझ्यासाठी अतिशय आनंददायक व आठवणीत ठेवण्यासारखे होते. त्या फळाबद्दल असेल नसेल ती माहिती मला मिळाली असेल असे तुम्हाला वाटेल. पण ते तंतोतंत खरे नव्हे. मी पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर बदामाविषयी माझा आदर आकस्मिकपणे वाढला. तुम्ही विचाराल, “पवित्र शास्त्र?” होय. देवाने आपल्या लोकांशी केलेल्या व्यवहारामध्ये बदामाच्या वृक्षाने एक महत्त्वाची भूमिका केलेली असल्याचे माझ्या अभ्यासातून मला कळून आले.
पवित्र शास्त्रामध्ये बदाम?
बदामाच्या झाडांसाठी इब्री भाषेमध्ये वापरलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “(झोपेतून) जागणारा” अथवा “(झोपेतून) जागवणारा” असल्याचे तुम्हाला ठाऊक होते का? पॅलेस्टाईनच्या प्रदेशात सर्व फळझाडांमध्ये प्रथम फुलणाऱ्या वृक्षात बदाम मोडतो हे ध्यानात घेतल्यास ते नाव उचितच आहे. त्याला लवकरात लवकर जानेवारी वा फेब्रुवारीच्या सुरवातीलाच बहर येतो. तसेच, बदामाच्या झाडाच्या डहाळीचा उल्लेख करताना देवाचा उद्देश काय होता तेही स्पष्ट होते. (यिर्मया १:११, १२) दुसऱ्या शब्दात, आपली वचने पूर्ण करण्यासाठी यहोवा देव “सावध” आहे असे सूचित होते.
पवित्र शास्त्रातील बदामाच्या वृक्षाच्या उल्लेखाचे दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे देवाने अभिषेक केलेला महायाजक म्हणून अहरोनाच्या अधिकाराला इस्राएलांनी दिलेल्या आव्हानाचा मन हलवून सोडणारा वृत्तांत. तो वाद मिटविण्यासाठी देवाने इस्राएलांच्या १२ घराण्यांच्या प्रमुखांना आपापली अधिकाराची काठी आणून साक्षपटाच्या कोशासमोर ठेवण्यास सांगितले. बदामाच्या फांदीपासून बनवलेली अहरोनाची काठी त्या १२ काठ्यांसह ठेवली होती. दुसऱ्या दिवशी निकाल लागला—अहरोनावर देवाच्या पसंतीचा शिक्कामोर्तब होता. त्याच्या काठीला रातोरात पालवी फुटली; तिला “अंकूर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत,” असे झाले. निसर्गक्रमानुसार कळी, फूल व मग फळ असे होण्याऐवजी तीन्ही अवस्था एकाच वेळी झाल्या. मोठेच आश्चर्य!—गणना १७:१-११.
इस्राएल लोकांमध्येही बदाम हे एक किमती मिष्टान्न होते. उदाहरणार्थ, कुलपिता याकोबाला मिसराच्या राज्याची मर्जी संपादन करावयाची होती तेव्हा त्याने भेटी पाठवल्या. त्यामध्ये देशात उत्पन्न होणाऱ्या मोलवान पदार्थांपैकी एक म्हणून बदामांचाही समावेश होता. (उत्पत्ती ४३:११) या शिवाय, पवित्र निवासमंडपातील दीपवृक्षाच्या शाखांवरील वाट्यासाठी बदामाच्या नाजूक फुलांचा नमुना वापरला होता.—निर्गम २५:३३, ३४.
पवित्र शास्त्रातील बदामाच्या या उल्लेखांमुळे, माणसाच्या अनंत सुखासाठी देवाने बनवलेल्या अनेक अद्भुत निर्मितीमधील आणखी एकाची अधिक कदर करण्यास मला मदत झाली यात शंका नाही.
अनेकदा, दरीत पसरलेल्या, पूर्ण बहर आलेल्या बदामांच्या बागांच्या सुंदर दृश्यांकडे मी पाहतो तेव्हा, अनेक शतकांपूर्वी लिहिलेले हे शब्द माझ्या मनात येतातः “पृथ्वीवरून यहोवाला स्तवा; पर्वत व सर्व डोंगर, फळ देणारी झाडे व सर्व गंधसरू.” (स्तोत्रसंहिता १४८:७-९)—दानार्थ.
[पानांवरील चौकट]
बदाम—उर्जेच्या अर्काची छोटी गाठोडी
बदाम म्हणजे एका छोट्याशा, सहज नेता येण्यासारख्या गाठोड्यात बांधलेले खूपसे पौष्टिक अन्न होय. प्राथिने, फळ व भाज्या, दुग्धपदार्थ आणि धान्य, या अन्नाच्या चार मूलभूत वर्गांमध्ये आढळणारी महत्त्वाची पौष्टिक तत्त्वे त्यात असतात. त्यांच्या घटकांकडे आपण जरा बारकाईने पाहू या.a
◻ पिष्टमय पदार्थ: बदामापासून संमिश्र पिष्टमय पदार्थ प्राप्त होतात. तुमच्या शरीराला प्रामुख्याने पिष्टमय पदार्थांपासून उर्जा मिळते. एक औंस बदाम म्हणजे जवळपास २०-२५ बियांपासून १७० कॅलरी मिळतात.b
◻ स्निग्ध पदार्थ: आहार म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये भरपूर स्निग्ध पदार्थ उपलब्ध करणाऱ्यांमध्ये बदाम आहेत. आणि बदामांमध्ये कोलेस्टेरॉल नसते. स्निग्ध पदार्थ उर्जेचे महत्त्वाचे साधन होत. तुमच्या शरीराचा, साठवून ठेवण्याच्या इंधनाचा तो एक उत्तम प्रकार आहे. बदामामध्ये जवळपास अर्धे वजन एका अतिशय वनस्पती तेलाचे असते.
◻ तंतू: एक औंस बदामामुळे तुमच्या शरीराला दर दिवशी लागणाऱ्या तंतूंपैकी १० टक्के तंतू मिळतात. ही मात्रा कणकेच्या ब्रेडच्या दोन फाकांमध्ये असलेल्या तंतूपेक्षा अधिक आहे.
◻ क्षार: फॉस्फरस, तांबे व मॅग्नेशियम या अत्यावश्यक क्षारांची मोठी मात्रा बदाम देतात. तुमच्या शरीराला वाढ व योग्य पोषणासाठी क्षारांची गरज असते. एक औंस बदामामध्ये २.३ औंस दुधात असेल इतके कॅल्शियम व १.३ औंस गोमांसामध्ये वा चरबीरहित डुकराच्या मांसामध्ये असेल इतके लोह असते.
◻ प्राथिने: बदाम हे वनस्पती प्राथिने मिळण्याचे एक चांगले साधन आहे. तुमच्या शरीराच्या वाढीला व योग्य पोषणासाठी प्राथिनांची गरज असते. एक औंस बदामामुळे अमेरिकेतील शिफारशीत प्रतिदिन खुराकाच्या १० टक्के प्राथिने मिळतात.
◻ जीवनसत्त्वे: रिबोफ्लाबिन (जीवनसत्त्व ब२) व जीवनसत्त्व ई मिळण्याचे बदाम हे एक उत्तम साधन आहे. चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वे अत्त्यावश्यक असतात. एक औंस बदामामध्ये (अमेरिकेतील शिफारसित प्रतिदिन खुराकाच्या ३५ टक्के) ७ औंस गव्हाच्या कोंबामध्ये अथवा १८ ते २० औंस यकृतामध्ये सापडण्याएवढे ई जीवनसत्त्व असते.
[तळटीपा]
a आल्मंडस्—ए हेल्थ नट् या आल्मंड बोर्ड ऑफ कॅलेफोर्नियाच्या पुस्तिकेवर ही माहिती आधारलेली आहे.
b १ औंस म्हणजे ३१ ग्राम.