तंबाखूपासून धुम्रपान करणाऱ्यांना व न करणाऱ्यांना असलेला धोका
धुम्रपान करणाऱ्यांना व न करणाऱ्यांना तंबाखूपासून धोका आहे याचा पुरावा वाढतच आहे. खालील गोष्टी ध्यानात घ्याः
▪ अन्नाऐवजी तंबाखू
वर्ल्ड हेल्थ नियतकालिक म्हणते की, अनेक प्रगतिशील देशांमध्ये येत्या दशकात “फुप्फसाच्या कर्करोगाची साथ येण्याचे भविष्य वर्तवता येते.” “तिसऱ्या जगात [तंबाखूच्या वापरामध्ये] वर्षाला २.१ टक्के अशा वेगाने ती वाढ होत आहे.” अशी अधिक माहिती संयुक्त राष्ट्राच्या अन्न व शेती संघटनेने दिली आहे. सध्या (तिसऱ्या जगात) जगातली ६३ टक्के तंबाखू उगवली जाते. २५ वर्षांपूर्वी हे प्रमाण ५० टक्के होते. हा कल या प्रगतिशील देशांना धोक्यात टाकतो. त्याचे स्पष्टीकरण लंडनच्या द टाईम्सने केले आहेः “संपूर्ण तिसऱ्या जगात किफायती पीक म्हणून तंबाखू उत्पादनाचा स्वीकार झाल्याने कर्करोगाचा प्रसार वाढत आहे. तसेच (तंबाखू उत्पादनामुळे) जंगलतोड होत असून देशांतर्गत उपयोगाची अत्यंत जरुरीची अन्न-पिके जेथे लागतील अशी जमीन त्याने बळकावली आहे.”
▪ धूर व कर्करोग
१९८६ मध्ये हंगेरीत झालेल्या १४ व्या आंतरराष्ट्रीय कर्करोग सभेमध्ये तज्ञांच्या अंदाजाप्रमाणे कर्करोगामुळे त्या वर्षी ३५,००,००० लोक मरतील.‘‘ WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या आकडेवारीनुसार त्यातील दहा लाख मृत्यु धूम्रपानामुळे होतील.” असा अहवाल अर्टझ्लिश प्राक्सीस् या जर्मन वैद्यकीय नियतकालिकाने दिला.
ऑक्स्फर्ड विश्वविद्यालयातील एमेरिटस् प्रोफेसर सर रिचर्ड डोल यांनी इशारा दिला की, तंबाखूच्या धुरातील ३,८०० रसायनापैकी ५० मुळे प्राण्यांमध्ये कर्करोग होतो याची खात्री पटली आहे. त्यातील काही रसायने, शरीरात न घेतलेल्या धुरामध्ये अतिशय जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले. अशा रितीने धुम्रपान करणारे लोक, (धुम्रदूषित हवेमध्ये श्वासोच्व्छास करावा लागल्याने) अक्रियाशील—धुम्रपान करणारे बनलेल्या इतरांना, अधिक कर्करोगमूलक अशा रसायनांच्या धोक्यात टाकतात. धुम्रपान करणाऱ्यांबरोबर राहणाऱ्या पण स्वतः धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासात हे दिसून आले की, फुप्फुसाच्या कर्करोगाने मरणाऱ्यातील निम्मे अक्रियाशील-धुम्रपान करणारे असतात.
धुम्रपान न करणाऱ्यांना काम करण्यासाठी धुम्रविरहीत जागा पुरवावी असे अमेरिकेच्या सर्जन जनरलने कंपन्यांना आग्रहाने सांगितले. धुम्रपानामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल आपल्या १९८६च्या अहवालात त्यांनी म्हटलेः “धुम्रपान न करणाऱ्या निरोगी लोकांमध्ये अनैच्छिक धुम्रपान हे कर्करोगासह इतरही रोगांचे कारण बनते.” आणि “एकाच खोलीमध्ये धुम्रपान करणाऱ्या व न करणाऱ्यांना फक्त वेगळे केल्याने धुम्रपान न करणाऱ्यांना, वातावरणातील तंबाखूच्या धुरापासून असलेला धोका कमी होऊ शकेल, पण तो पूर्णपणे टाळता येणार नाही.”
▪ गर्भावर परिणाम
धुम्रपानामुळे गर्भाशयातील बाळाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत असा दावा सिडने विश्वविद्यालयाच्या एका वैद्यकीय संशोधन करणाऱ्या गटाने केला आहे. अजून जन्माला न आलेल्या अर्भकाला नाळेमार्फत अन्न व प्राणवायु पुरवणाऱ्या तसेच निरुपयोगी द्रव्ये वाहून नेणाऱ्या गर्भवेष्टनातील रक्तप्रवाहावर होणाऱ्या धुम्रपानाच्या परिणामाचा अभ्यास हे संशोधक करीत आहेत. या संशोधकांनी नाळेमधील रक्ताच्या प्रवाहावर लक्ष ठेवले तेव्हा, आईने सिगारेट ओढल्यावर लगेच दोन मिनिटात रक्ताचा प्रवाह मंदावतो व हा परिणाम एक तासापर्यंत टिकतो असे त्यांना दिसून आले.
द युनिव्हर्सिटी ऑफ सिडने न्यूज यामध्ये सांगितल्याप्रमाणे सूतिकाशास्त्र व स्त्रीरोगशास्त्राचे वरिष्ठ अध्यापक डॉ. ब्रायन ट्रुडिंगर म्हणालेः “सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या संपूर्ण कालावधीत दिवसाला दहा सिगारेट ओढणाऱ्या मातांची मुले, जन्माच्या वेळी, धुम्रपान न करणाऱ्या मातांच्या मुलांपेक्षा वजनात जवळपास ३०० ग्रॅम (१० औंस) कमी भरतात. पण आतापर्यंत असे म्हणता येत असे की काही कारणामुळे हे धुम्रपानापेक्षा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित असावे—धुम्रपान करणाऱ्या प्रकारच्या स्त्रीला, लहानखोर मुले व्हावी असे इतर विकार होऊन गेले असावेत. परंत धुम्रपानामुळे गर्भाकडून गर्भवेष्टनाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊन त्याचा गर्भावर प्रत्यक्ष परिणाम होतो असे आमच्या संशोधनाने निर्णायकपणे दर्शवले आहे.”
तसेच द लँसेट या ब्रिटीश वैद्यकीय नियतकालिकाने बालवयातील कर्करोगावरील अभ्यासाचा निकाल नुकताच प्रकाशित केला. गर्भवती असताना माता दर दिवशी जितक्या जास्त सिगारेट ओढते त्या प्रमाणात तिच्या अपत्याला कर्करोगाचा धोका असतो, असे अभ्यासात निदर्शनास आले. “गाठ झालेल्या सर्व जागा विचारात घेतल्यावर, गर्भवती असण्याच्या काळात दररोज (मातेने ओढलेल्या) १० वा अधिक सिगरेटींना तोंड द्यावे लागलेल्या मुलांमध्ये कर्करोगाचा एकूण धोका ५० टक्क्यांनी वाढला,” असा अहवाल द लँसेट याने दिला.
जन्माला आल्यावर धुम्रपान करणाऱ्यांच्या मुलांना आरोग्याच्या दृष्टीने अधिकही धोक्यांना तोंड द्यावे लागते. “अक्रियाशील धुम्रपान आणि वयाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षात मुलांना होणारा दमा, सतत घरघर व श्वसन-विकारामध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे,” असे द लँसेटच्या दुसऱ्या एका अंकात नमूद केले होते.
▪ कामाच्या जागी धुम्रपानाने होणारा तोटा
धुम्रपान करणारांमुळे त्यांच्या मालकांना प्रत्येक व्यक्तीमागे दरवर्षी ४,००० डॉलर्स (२,६५० अमेरिकन डॉलर्स) इतका जादा खर्च येतो, असे ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य निरिक्षकांच्या संघटनेने म्हटले आहे. धुम्रपान करणारे, न करणाऱ्यांपेक्षा अधिक आजारामुळे कामावर कमी येतात व त्यांना जवळपास दुप्पट अपघात होतात या पुराव्यावर संघटनेने आपला दावा आधारला आहे. कामगारांच्या डोळ्यात धूर गेल्याने किंवा धुम्रपान करणाऱ्यांच्या एका हातात सिगारेट असताना ते दुसऱ्या एकाच हाताने काम करतात या कारणांमुळे धुम्रपान करणाऱ्यांमध्ये अपघाताची अधिक शक्यता असते असे ती संघटना म्हणते. (g87 6/22)