एवढी धावपळ का?
आमचे हे युग इतक्या घाईगर्दीचे का आहे? औद्यागिक उद्योगसमूह आपल्या सुधारित व्यवस्थेनुरुप पुष्कळसा वेळ आरामासाठी पुरवितील अशी भ्रमनिरास झालेल्या जगाची आधीपासूनच ओरड आहे. “प्रत्येकाला कमीत कमी काम, पण भरपूर आराम” अशी अनेक अर्थतज्ज्ञांनी, समाज सुधारकांनी व भाकिते करणाऱ्यांनी केलेली पूर्वभाकिते निकामी ठरली आहेत.
लेखक ए. केन्ट मॅकडुगल यांनी जे परीक्षिले ते खरे आहे की, “एका पिढीआधी जसे होते तसेच आजही काम हे सर्वसाधारण वेतन मिळविणाऱ्याचा तितकाच वेळ घेते. शिवाय येण्याजाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासात देखील केवढा वेळ जातो.”
जीवनास अधिक साधे करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाने त्याला अधिक धावपळीचे बनविले आहे. हेच मार्केटींग प्रोफेसर हेरॉल्ड एच. केसरजीयान म्हणतातः “मोठ्या प्रमाणातील परस्पर दळणवळण व वाहतूक हे सर्व आम्हावर बरेच काही लादते. आम्ही अधिकाधिक दबावाखाली येत आहोत; कारण घाईत राहण्याच्या अनेक कृत्रिम कारणांचा आम्ही पाठपुरावा करीत आहोत. याचा परिणाम हा होत आहे की, आम्ही अधिक बोजा स्वतःवर वाढवीत राहून हळूवारपणे स्वतःला दफन करू लागलो आहोत.”
मुख्य गोष्टी
आपला कौटुंबिक आर्थिक बोजा कमी करावा यासाठी अनेक कुटुंबप्रमुख, जादा वेळ किंवा दुहेरी कामे करतात. अशा असंख्य स्त्रियाही आहेत, ज्यांना नाईलाजाने नोकरी मिळविण्याची धडपड करावी लागली. डेली टेलेग्राफ यात पॉल जॉनसन यांनी लिहिलेः “हे केवढे उपरोधिक आहे की, इतिहासातील आजच्या काळात स्त्रियांबद्दलचा पारंपारिक मताभिमान व्यापारी तंत्रज्ञानाने धुळीस मिळविला, . . . त्या आज काम करीत आहेत व अधिकाधिक मेहनत घेत आहेत.”
अशाप्रकारे सबंध दिवस नोकरीवर घालविल्यानंतर स्त्रियांची दुसरी नोकरी सुरु होते व ती आहे घरकाम आणि लेकरांचे संगोपन. संशोधनाने हे सूचित केले की, पती क्वचितच आपल्या बायकोच्या वाढलेल्या कामाच्या बोज्यात हातभार लावतात. याचा परिणाम हा होतो की, बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना वेळेची अडचण भासत राहते. वर्किंग कपल्स या पुस्तकाचे संपादक एका नोकरी करणाऱ्या गृहिणीचे हे उद्गार अवतरित करतातः “जे काम मला करावयाचे असते आणि जे काम उरकायचे असते त्यासाठी पुरेसा वेळच नसल्यामुळे मला बरेच उद्विग्न झाल्यासारखे वाटत राहते.”
आज अनेकांच्या बाबतीत बदललेली लैंगिक आचारसंहिता तसेच वाढत चाललेली घटस्फोटाची प्रकरणे यांनी सध्याच्या धावपळीच्या काळात अधिकच भर घातली आहे. ती कशी? फॅमिली रिलेशन्स या लेखात स्पष्ट करण्यात आलेः “आमच्या [अमेरिकन] समाजाने गेल्या नऊ वर्षात एक-पालकीय कुटुंबाची ७९% वाढ झाल्याचे पाहिले आहे. . . . आज ही समस्या पूर्वी कधीही नव्हती एवढी व्याप्त बनत आहे.” ज्या घरात एकच पालक आहे व त्याला स्वतःच्याच जबाबदारीवर लेकरांचे संगोपन, बाजारहाट, स्वयंपाक व घरातील स्वच्छता या सर्व गोष्टी कराव्या लागतात त्याच्यासाठी जीवन हे कधीच न थांबणारी धावपळ असणार!
इतर गोष्टी
आजच्या काळातील धावपळीच्या जीवनास हातभार लावणारी आणखी कारणे आहेत ती अशीः
अपुरे आयुष्य—“स्त्रीपासून जन्मलेला मानव अल्पायु व क्लेशभरीत असतो,” असे पवित्र शास्त्र म्हणते. “तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो. तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहात नाही.” (ईयोब १४:१, २) पवित्र शास्त्रातील या सत्याची जाणीव राखून अनेक लोक जीवनात भराभर उरक करून जेवढे साधता येईल तेवढे साधतात. “तर चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या मरावयाचे आहे,” हे त्यांचे धोरण!—१ करिंथकर १५:३२.
जीवनाची अनिश्चितता—“वेगवानासच शर्यतीत यश” नाही, असे शहाणा राजा शलमोन म्हणाला. का बरे? कारण “सर्वजण कालवश व आगाऊ न दिसणाऱ्या घटनांच्या अधीन आहेत.” (उपदेशक ९:११) यासाठीच, लोक कोणते संकट नेमके केव्हा गाठील याच्या चिंतेत राहात आपापले ध्येय गाठण्याच्या घाईत असल्याचे दिसतात.
काहीतरी गमावण्याचे भय—लहान मुलांप्रमाणे काही प्रौढही अस्वस्थ असतात, व यांच्यापाशीही संकुचित दृष्टीकोण व काही नवे दिसले की त्याच्यामागे धाव घेण्याची वृत्ती असते. त्यांना भविष्याचा अनुभव घेण्याची घाई असल्यामुळे या वर्तमानकाळाचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत.
बेचैन अवस्था व अधीरता—बेचैनपणाला अधीरतेची जोड देऊन पहा व मग तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे कळू शकेल की, तुम्ही तुमच्या मोटारीतील आरशातून मागील मोटारीच्या चालकाकडे पाहिल्यास त्याची ती अवस्था का होते. आपल्यापुढील सर्व वाहने ही समोर असणारी अडखळणे आहेत असे त्याला वाटत असते व यासाठीच तो त्या सर्वांना होता होईल तितक्या लवकर मागे टाकू इच्छित असतो. वस्तुतः त्यामध्ये उचित असे काही कारण नसते. कारण पुढल्या वाहतुक नियंत्रण नाक्यावर तो परत आपल्या दृष्टीस पडतो!
कंटाळवाणेपणा—आपले ऐहिक काम व दररोजचा शिरस्ता खूप कंटाळवाणा व निरस बनतो म्हणून काही लोक आरामशीर कामाला अधिक वेळ मिळावा यासाठी रटाळ वाटणारी कामे होईल तितक्या कमी वेळेत उरकण्याच्या घाईत असतात.
“वेळ म्हणजे पैसा”—काही लोक या तत्त्वाने जगत असतात, ते वक्तशीर राहतात, फुकटचा वेळ किंवा रजा पैशासाठी बुडवतात. ते सतत भौतिकवादी वस्तुंचे संघटन करण्याच्या घाईत असतात, पण त्यांचा उपभोग व त्याकडून आनंद घेण्यास त्यांच्याजवळ वेळ राहात नाही. ते कधीही समाधानी नसतात.
कारण कोणतेही असो, तुमचे जीवन कदाचित या धावपळीत गुंतलेले असेल. तसे आहे तर मग, प्रश्न हा की . . .
हे सर्व तुम्हाला कोठे नेणार?
एक गोष्ट ही की, काळाबरोबर केलेली आधुनिक जीवनाची धावपळ याचे परिणाम अनेक प्रकारातील दबावाच्या आजारपणात दिसून आले. तसेच, “अति घाई संकटात जाई” या म्हणीमागील सत्यस्थिती अनेक उलाढालीतून खरी असल्याची दिसून येते. उदाहरणार्थ, आर्तलिच प्रॅक्झीस् या जर्मन पत्रकात म्हटलेः “वाहतुकीतील अपघातांची संख्या वाढण्यामागील प्राथमिक कारण म्हणजे भरधाव वेगाने वाहन चालविणे.”
शाळेत शिकणारा कोणी युवक, मूळ कौशल्य शिकून घेण्यात घाई करीत असेल तर त्याला काम मिळणे व ते टिकवून ठेवणे हे फार जड जाईल. घाईघाईने जेवणारा कदाचित पोटाच्या तसेच शरीराच्याही अनेक व्याधींना बळी पडण्याचा संभव आहे. मनुष्य जर “बोलण्यात उतावळा” असला तर तो आपल्या वक्तव्याद्वारे कोणाची विचित्र परिस्थिती करील, भावना दुखावील किंवा मित्रत्वही नाहीसे करील. (नीतीसूत्रे २९:२०) तसेच जो विवाहसोबती निवडण्यात घाई करतो तो घटस्फोट मिळविण्यात देखील तितकीच घाई करील.
मग, जे धनसंपत्ती मिळविण्यात, कोणा धंद्यात किंवा उपजिविकेच्या मार्गात, कुटुंब स्थापण्यात, किंवा जीवनात अधिक ते प्राप्त करून घेण्यात इतरांच्या पुढे मजल मारू इच्छितात अशांच्या बाबतीत काय? अशा गोष्टींचा पाठलाग तसे पाहता चुकीचा नसेल. पण हाच पाठलाग जेव्हा वेडेपणात बदलतो तर त्याचा भावी आयुष्यास काय फायदा होणार?
प्राचीन काळचा शलमोन राजा अशाच गोष्टीचा मागे लागला. शेवटी तो कोणत्या निर्णयास पोहंचला? तो म्हणतोः “मग, मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरिक्षण केले; तो पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. भूतलावर हित असे कशातच नाही.”—उपदेशक २:११.
तर मग, सध्याच्या धावपळीच्या जीवनाशी सामना करण्यासाठी काही उपाय आहे का की, ज्यामुळे नंतर शांत जीवन अनुभवण्यास मिळू शकेल? (g87 2/22)
[पानांवरील चौकट]
आजची धावपळ
“आजच्या त्रस्त समाजात घाई करुन दुसऱ्याच्या पुढे जाणाऱ्याची प्रतिमा [सतत] ठळक होत आहे,” असे द न्यू यॉर्क टाइम्सचे मत आहे. “याचे लक्षणीय उदाहरण हे की, एक मनुष्य आपल्याला एका छोट्या रस्त्यावरून पळताना दिसतो आणि काही क्षणातच दुसरा त्याच्या मागोमाग धावत जातो. कोणा अधिकाऱ्याला आपण ठरविलेले ध्येय गाठण्याची घाई असते, एखादा कामगार स्वतःला इतरांच्या पुढे नेहमी असावे या घाईत असतो आणि ते साध्य करण्यासाठी तो हवी तशी जोखीम पत्करण्याचा पवित्रा घेतो.”