शस्त्रास्त्रे—त्यांना काय किंमत पडते?
देशोदेशीच्या आजच्या लष्करी आर्थिक अंदाजपत्रकांकडे पाहिल्यास मती गुंग होते. मानवाच्या निकडीच्या गरजांपेक्षा शस्त्रास्त्रांच्या या खर्चाला प्राधान्य दिलेले पाहिले म्हणजे ते शहाणपणाविरुद्ध असल्याचे जाणवते. या “अंतसमया”विषयी पवित्र शास्त्राने भविष्य वर्तवले होते की, एक विशिष्ट “राजा” (किंवा, अधिपत्य गाजवणारी शक्ती) आपले “सोने” व “मौल्यवान रत्ने” (त्याची साधने व संपत्ती) “दुर्ग देवते”चा (लष्करी बळाचा) महिमा करण्यात खर्च करील. इतर अधिपतीही त्याचीच री ओढतील. शस्त्रास्त्रांविषयी अशा अयोग्य वृत्तीने नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तु हिरावल्या जातात. कमतरता व दुकानापुढील अक्षय रांगा नेहमीच्या होतात.—दानीएल ११:३५-३८.
कॅनडामधील माँट्रीयल येथून प्रकाशित झालेल्या प्लस या फ्रेंच नियतकालिकाच्या मार्च ३०, १९८५ च्या अंकात सांगितलेल्या, शस्त्रास्त्रांच्या या अनाठायी खर्चाच्या किंमती पहाः
▫ जाणाऱ्या प्रत्येक सेकंदाला जगातील देश शस्त्रास्त्रांवर ३७,००० (अमेरिकन) डॉलर्सपेक्षा अधिक खर्च करतात.
▫ शस्त्रांच्या उत्पादनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ५ कोटी लोक काम करतात.
▫ अमेरिकेमध्ये संशोधनासाठी खर्च होणाऱ्या प्रत्येक डॉलरमधील ६२ प्रतिशत लष्करासंबंधी संशोधनात खर्च होतात; सरकारच्या एकूण खर्चापैकी २७ टक्के खर्च संरक्षणासाठी होतो; स्विट्झर्लंडमध्येही एकूण सरकारी खर्चातील २५ टक्क्यांहून अधिक संरक्षणात खर्च होतो.
▫ शस्त्रे निर्यात करणाऱ्या १२ मोठ्या देशांपैकी ७३ टक्के विक्रय रशिया व अमेरिका करतात; फ्रान्स जवळपास ९ टक्के, आणि कॅनडाने १९८४ मध्ये १३० कोटी डॉलर्सची शस्त्रे निर्यात केली.
कर्जात खोल बुडालेली, दुसऱ्या देशांकडून घेतलेली कर्जे परत करणे ज्यांना कठीण जाते अशी राष्ट्रे, शस्त्रास्त्रांवर मोठा खर्च करणाऱ्यांमध्ये आहेत.
▫ लॅटिन अमेरिकेतील देश पाश्चिमात्य बँकांना जे ३५,००० कोटी डॉलर्स देणे लागतात, त्यातील ९,००० कोटी डॉलर्स लष्करी खर्चाला वाहिलेले आहेत.
▫ १,३०० कोटी डॉलर्सचे देणे असलेल्या पेरू देशाने १९८३ मध्ये ४०० कोटी डॉलर्स शस्त्रांवर खर्च केले.
▫ युद्धात गढलेल्या मध्य अमेरिकेतील देशांचा लष्करी खर्च १९७९ ते १९८३ मध्ये ५० टक्क्यांनी वाढला.
▫ काही देशांमध्ये बेफाम वाढणाऱ्या चलन फुगवट्याने झालेली आर्थिक स्थिती पाहता लष्कर बाळगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे पडणारा वार्षिक बोजा हतबल करणारा आहेः अर्जेंटिना, २१० डॉलर्स; चिली, १२० डॉलर्स; व्हेनेझुएला, ६७ डॉलर्स; मेक्सिको, १९ डॉलर्स; ब्राझिल, १७ डॉलर्स.
लष्करी खर्चाचा हा असाह्य बोजा थांबल्यास किती धन्यता व हायसे वाटेल! परंतु राष्ट्रों स्वेच्छेने थांबणार नाहीत. फक्त सर्वसमर्थ यहोवा देवच त्यांना थांबवू शकतो व थांबवील. हे पहा, त्याचे खात्रीचे वचनः “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो.” होय, “तो जगभर लढाया बंद करतो, युद्धाची वाहने आगीने जाळतो.”—स्तोत्रसंहिता ४६:९; द साम्स् फॉर टुडे, लेखक, आर. के. हॅरिसन.
हे शब्द विश्वसनीय व सत्य आहेत, कारण “शांतीचा देव” खोटे बोलू शकत नाही!—रोमकर १६:२०; इब्रीयांस ६:१८; प्रकटीकरण २१:१-५. (g86 7/22)