तुम्हाला कपड्यांविषयी काय वाटते?
“मला तर कपडे म्हटले की, उब, आच्छादन व आराम हाच विचार येतो.” असे एका स्त्रीने उत्तर दिले.
“सुशोभितपणा!” असे दुसरीने म्हटले.
“मला कपडे म्हणजे सर्वकाही वाटते,” असे एका पुरुषाने म्हटले. तो पुढे म्हणाला “अहो, त्यांच्याशिवाय तर मी घराबाहेर पडू शकत नाही व कामही करू शकत नाही.”
होय, कपड्यांविषयी लोकांचे विविध दृष्टीकोण आहेत. कारण दोन व्यक्ती एकसारख्या नसतात. मग, प्रश्न हा आहे की, तुम्हाला कपड्यांविषयी काय वाटते? तुम्ही जे परिधान करता व कसे परिधान करता याविषयी विचार करता का? तुमचे कपडे तुम्हाविषयी काय सांगतात?
आच्छादनापेक्षा अधिक
हे खरे की कपड्यांचा हेतू शरीर आच्छादनासाठी आहे. पण या चाकोरीत विविधतेला मर्यादा नाही. कारण पहा ना, भारतातील साडी, जपानचा किमोनो, हवाईमधील मुम्मु आणि मध्यपूर्वेकडील अबा हे सर्व कपडे शरीर आच्छादनासाठीच वापरले जातात, पण ते एकमेकांपासून कितीतरी वेगळे आहेत. जर्मनीतील होमबर्ग, फ्रान्सचा बेरेट व अरबस्थानातील कफीया या सर्व टोप्या किंवा शिरोभूषणे आहेत, पण ती खूपच वेगवेगळी आहेत. सॅबोट, सँडल व बूट ही सर्व पादत्राणे आहेत तरीपण त्याची रुपे किती वेगळी आहेत. शिवाय स्कॉटलंडमधील झगापरकर बरा की, अमेरिकेतील सैल विजारी बऱ्या हे कोण सांगू शकेल?
आम्हाला कपड्यांविषयी काहीही वाटत असले तरी ते आम्हाविषयी व इतरांविषयी आम्हाला काय वाटत असते हे व्यक्त करीत असतात. आम्ही आमच्या तोंडून पहिला शब्द उच्चारण्याआधीच आमच्या पेहरावाने आम्हाविषयी बरेच काही निवेदन केलेले असते. आम्ही जे घालतो व ज्या पद्धतीने घालतो त्यावरुन लोक आमचे परिक्षण करतात व आम्हाला वेगवेगळ्या वर्गवारीत ठेवतात. उदाहरणार्थ, अंगावर लक्तरे ल्यालेला भिकारी आणि उंची पेहराव घातलेला माणूस या दोघांच्या शरीरावर वस्त्रे आहेत; पण त्या दोघांकडून जी छटा निर्मिली जाते व त्यांना ज्या प्रकाराने वागविण्यात येते त्यात केवढा प्रचंड फरक आहे.
आज जे कपडे वापरण्यात येतात त्यावरुन आपले राहणीमान, राजकीय पदाची छाप किंवा राष्ट्रीयत्व यांची ओळख व्हावी हा हेतू असतो. उदाहरणार्थ, चीनमधील शांघाय येथे अलिकडे स्त्रियांना अधिक सजावट, मांड्यापर्यंतचे तंग परकर तसेच पाश्चात्य देशाचा लग्न सोहळ्याचा पोषाख अधिक पसंत पडत आहे; याचा अर्थ त्यांना गतकाळाचा पेहराव टाकाऊ वाटायला लागला आहे. पण मध्यपूर्व व इतर मुस्लीम राष्ट्रात बायका पुरातन काळातील मुस्लीमांच्या सांस्कृतिक पेहरावाकडे पुन्हा वळू लागल्या आहेत.
याशिवाय, व्यक्तीगत स्तरावर आपण काय घालावे, केव्हा घालावे व ते कोठे घालावे याविषयीचे निर्णय घ्यावे लागतात. जसे की, अर्धी पँट तसेच निळी जीन्स वा पाटलोनी शेताच्या किंवा घरकामासाठी वापरण्यास हरकत नाही, पण तेच कामावर तसेच इतर प्रसंगी सभांना किंवा राज्य सभागृहासारख्या भक्तीस्थानी घालून जाणे बरोबर दिसणार नाही. बाजारात खरेदी करण्यासाठी जाताना जे परिधान करतो ते मित्रपरिवारासोबत सायंकाळी बाहेर पडताना साजेसे नसणार. आज “नवी नीती” हिचा सध्याच्या फॅशनवर प्रभाव पडत असल्यामुळे व त्याकरवी वेगळीच जीवनपद्धत प्रवर्तित होत असल्यामुळे कपड्यांच्या विशिष्ट प्रकारातील निवड करताना काळजी घेतली पाहिजे.
कपड्यातील विविधता व त्यांचा बहुरंगीपणा पुरुष काय किंवा स्त्री काय, तरुण काय किंवा वृद्ध काय, सर्वांपुढे वैयक्तीक दूरदर्शीपणा व निवडीचे आव्हान उभे करतो. आपण कोणते कपडे घालतो व कसे घालतो याविषयी कधी तुम्ही संभावितपणे विचार केला आहे का? आपली निवड तुम्ही कोणत्या आधाराने ठरविता? तसेच तुमचे कपडे तुम्हाबद्दल कसले प्रतिबिंब दाखवितात?
निवडीतील आव्हान
“एकेकाळी कपड्यांचा दर्जा हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जात होता पण आता त्याची जागा कपड्यांवरील उत्पादकांच्या लेबल्सनी घेतली आहे,” असे बारबर्ली डायमोनस्टेन वॉग या मासिकात म्हणतात. हे खरे की आज बहुतेकांसाठी कपड्यांची निवड करताना त्याचा दर्जा, तो कोणत्या प्रसंगाला उठून दिसेल तसेच त्याची गरज यांना काहीच अर्थ राहिला नाही. उलटपक्षी, कपड्यांच्या जाहिरातीत उत्पादकांची लेबले व इतर मशहूर लोकांची स्वाक्षरी असलेली वस्त्रे घातली तर सुंदर, प्रतिष्ठित दिसण्याविषयीची तसेच मशहूर होण्याविषयीची अभिवचने दिली जातात.
या जाहीरातबाजीच्या बनावटीला बळी पडण्यापासून तसेच तेच पाहिजे या इच्छेला आवर घालण्यासाठी आत्मशक्ती तसेच शिस्त ही जरुरीची आहे. जेव्हा असा प्रस्ताव मांडला जातो की, “अरे, काय होते त्यात? ते कपडे घाला की. वा! काय छान दिसता तुम्ही यात,” त्यावेळी ते नाकारणारा कोणीतरी क्वचितच दिसेल. ते शब्द तुमच्या कानाला गोड वाटतील, पण त्यामुळे खिशाला मोठी चाट बसेल. दाखविलेले कपडे घ्यावेच अशी गळ घालणाऱ्या विक्रेत्याच्या लाघवी शब्दांना तुम्ही सहजासहजी बळी पडता का? किंवा तुम्हास तातडीने गरज नाही व परवडणार नाही असा पोषाख सध्याला तरी न घेणे बरे असा आवर तुम्हाला घालता येतो का? तसे असल्यास तुम्ही प्रशंसापात्र आहात.
याचा अर्थ, जे नवे व फॅशनेबल आहे ते कधीच निवडता येणार नाही असा नाही. पण सावधगिरी ही यातील किल्ली आहे. आम्ही आधुनिक फॅशनच्या तसेच मित्राच्या दबावाखाली येऊन विशिष्ठ पेहरावाची निवड करण्यापेक्षा आपल्या वयोमानानुसार, व्यक्तीमत्वाला साजेल आणि राहणीमानास शोभेल असा पोषाख निवडणे योग्य ठरेल. ‘अहो, ही सध्याची स्टाईलच आहे,’ असे कोणी म्हटले तर ती तुम्ही अनुसरलीच पाहिजे असे नाही. काही रॉक संगीताच्या गायकांनी, ॲन्ड्रोजीनियस स्टाईल उचलून तिला मशहूर केली. यात मेकअप्, केशभूषा तसेच शिष्टाचार हा असा अनुसरला जातो की, पुरुष की स्त्री हा भेदच कळू शकत नाही. ही पद्धत त्या गटाने अनुसरली आहे म्हणून आपण ती अनुसरावी हे शहाणपणाचे आहे का? यासाठी कृपया पवित्र शास्त्रात अनुवाद २२:५ मध्ये जे काही म्हटले आहे ते लक्षात घ्या.
स्टाईल किंवा पद्धत याच्या अर्थाविषयी शब्दकोष म्हणतो की, एखादी गोष्ट ज्या प्रकाराने केली जाते तो प्रकार; ती गोष्ट ही वस्तुतः स्टाईल किंवा पद्धत नसते. कपड्यांच्या बाबतीत त्या व्यक्तीच्या सर्वसाधारण व्यक्तीत्वाचे प्रदर्शन ही ती स्टाईल; कपडे ही स्टाईल नव्हे. यासाठी, कपड्यातील नवनवीन प्रकार व कलात्मकता काय आहे त्यांच्या मागे धावत राहण्यापेक्षा आम्ही पोषाखाची अशी स्टाईल किंवा पद्धत राखावी जी आमच्या उत्तम निवडीची असेल व आमची माफक स्वरुपाची प्रतिमा सादर करील.
चाणाक्ष खरेदी
कपड्यांचे कपाट म्हणजे आपणापाशी खूप कपडे असावेत व तेही नवनव्या फॅशन्सनी भरून जावेत ह्यासाठी नव्हे. तर ते उघडले की, कपडे खरेदी करण्याची आमची निवड व चाणाक्षता त्यात दिसली पाहिजे. तेव्हा खरेदीला निघण्याआधी आपणापाशी जे कपडे संग्रही आहेत त्यांची चांगली पाहणी करा. त्यामध्ये असे काही कपडे असतील जे तुम्हाला सैल करून वापरता येतील किंवा निरुपयोगी वाटतात ते काढून टाकता येतील. आपल्याजवळ असणाऱ्या कपड्यांकरवी काय अनुभव मिळाला किंवा जोड बदलून कोणाला काही नवे रूप देता येते का ते पहा. असे केल्यामुळे आपल्याला नक्की कशाची गरज आहे ते ठरविता येऊ शकेल.
खरेदी करताना हा विचार मनात ठेवावा की, जी नवीन वस्त्रे घ्याल ती आपल्याजवळ असणाऱ्या वस्त्रांशी कशी जुळू शकतील. असे वस्त्र घ्या, जे तुमच्या कपड्यांची पद्धत व त्यांचा रंग यामध्ये मिलाफ करु शकेल. नमुनेदार अशी साध्या रेषांची वस्त्रे चांगली व अधिक काळ टिकणारी असतात. यासोबतच, जो सध्या कपड्यांचा संचय तुम्हापाशी आहे त्याचा प्रभावितपणे व प्रसंगानुसार उपयोग करण्यास शिका. यामुळे आपल्याला स्वतःचे कपडे अधिक वेळा घालण्याची सवय होऊन त्यांचा अधिक आनंद लुटता येईल.
योग्य वेळी व योग्य ठिकाणी केलेली खरेदी फार मोठा फायदा देऊ शकते. याकरता थोडीशी अगाऊ योजना आखावी लागते, पण त्यापासून फायदा हा नक्की मिळतो. “जेव्हा सेल असतो त्या काळात कपडे खरेदी करण्याचे मी ठरवते,” असे एक स्त्री म्हणते. तरीपण, कपड्यांचा सेल होत आहे म्हणून ती चांगली खरेदी होऊ शकेलच असे नाही. याकरता, चांगल्या दर्जाचे कपडे कोठे आढळतात याकडे लक्ष ठेवण्याची सवय स्वतःला लावून घ्या. “जेथे सवलतीच्या दरात कपडे विकले जातात त्या दुकानांचा मी शोध घेते किंवा जेथे कपड्यांच्या दरात घट झालेली दिसते ते मी पाहत असते,” असे तीच स्त्री म्हणते. पुढे ती सांगतेः “अशामुळे मला दर्जेदार कपडे मिळतात व माझ्या बजेटमध्ये ती बसतात.”
समतोलपणा राखणे
गबाळा पेहराव, कसलेही व काहीही कपडे घालणे हे बेपर्वाई व स्वतःचा आदर नसल्याचे दाखवून देते. तसेच ते इतरांविषयीचा निष्काळजीपणा दाखविते. पण तेच, आधुनिक स्टाईलचा विचार करून घातलेले कपडे आम्ही आत्मसंतुष्ट, रुपगर्विष्ठ असल्याचे दाखवू शकतील. या कारणास्तव आम्हाठायी असणाऱ्या हेतूंची वेळोवेळी चाचणी केलेली बरी. स्वतःला विचाराः भपकेबाज पोशाखाच्या प्रदर्शनाने मी इतर सर्वांपेक्षा अधिक तेजाने झळकू इच्छित आहे का? मी कपड्यांचा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी तसेच जे जे नवे निघते त्याच्याबरोबर राहण्यासाठी उपयोग करीत आहे का? माझा पोषाख वेळ, स्थान व प्रसंग यांना अनुरुप व साजेसा आहे का?
कपडे आम्हाविषयी बरेच काही सांगतात यात कसलाही संशय नाही. अगदी सहजपणे ते हे सांगतात की आम्ही विनयशील आहोत की अहंकार मिरविणारे आहोत; आदर प्रदर्शित करणारे की दुसऱ्यांकडे तुच्छतेने बघणारे आहोत. ते आमच्या उत्तम निवडीची व स्वाभिमानाची साक्ष देतात किंवा ते हेही नकळतपणे दाखवू शकतात की आम्ही केवढे स्वार्थी व बेपर्वा आहोत. होय ते आम्हाविषयी कुजबुजू, बोलू किंवा ओरडून देखील सांगू शकतात. याचकरिता आमच्या कपड्यांच्या निवडीमध्ये नेहमी समतोलपणा राखणे हे जरूरीचे आहे.
आमच्या अंतर्यामीचे विस्तृत रुप हे आमचे कपडे असतात हे ध्यानी बाळगून आमचा पोषाख आनंदविणारा, आकर्षक असावा; ज्या फॅशन्समुळे आपण असभ्य व आत्यंतिक आहोत असे फसवे पेहराव आपण टाळावेत. आम्ही जे कपडे घालतो व ते कसे घालतो याकडे लक्ष दिल्यास आमचे कपडे आम्हाला आमच्याविषयी प्रशंसापर बोल मिळवून देतील. (g87 2/8)
[पानांवरील चौकट]
दर्जेदार कपड्यांच्या संग्रहासाठी काही सूचना
“कपड्यातील दर्जा हा तो दिसायला चांगला, नेसायला साजेसा व कित्येक वर्षांच्या धुलाईनंतरही आहे तसाच असतो याद्वारे दिसून येतो,” असे हार्ट शॅफनर ॲण्ड मार्क्स क्लोदेज् या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी म्हणतात. दर्जेदार कपड्यांच्या संग्रहासाठी पुढील काही सूचना उपयुक्त ठरतील.
▫ दर्जेदार कपड्यांसाठी तुम्हाला शक्य आहे तेवढा खर्च करा
▫ रंग, वीण व स्टाईल यांच्याबाबतीत वेडेपणा व अतिरेक टाळा
▫ उत्तम विणकाम तसेच कारागिरीच्या कामासाठी आवर्जून सांगा
▫ कपड्यांचे उद्दिष्ट साधेल असे वीण व रंग निवडा
▫ कपडे वर टांगवा, हवेत वाळू द्या आणि दुसऱ्यांदा वापरण्याआधी साधारण २४ तासांचा अवधि जाऊ द्या
▫ आवश्यकतेनुसार कपड्यांची धुलाई करा; धुलाईविषयी देण्यात आलेल्या सूचना काळजीपूर्वक अनुसरा
[पानांवरील चित्रं]
कपड्यांची सूज्ञ व आकर्षक पद्धत देशादेशामध्ये भिन्न असते