जगातील सर्वात छोटे हरिण
ते १९३५ हे साल होते. चिलीमधील एक शेतकरी कुरिको या नयनरम्य पहाडी प्रदेशातील आपल्या जमिनीची मशागत करीत होता. अकस्मात त्याला कुत्री कोणामागे तरी भुंकत असल्याचा आवाज आला. त्याला वाटले की, ती सशामागे लागली असावीत. पण जेव्हा एक लहान शिकारी कुत्र्याच्या आकाराचे व दिसण्यात बकरीसारखे जनावर झुडूपातून निघून त्याच्याकडे धावून आले व त्याने त्याच्या दोन्ही पायांमध्ये आश्रय घेतला तेव्हा त्याला किती आश्चर्य वाटले असावे. त्या कंपित जनावराकडे खाली वाकून पहाताच शेतकऱ्याने ओळखले की, ते पुडू म्हणजे जगातील सर्वात लहान हरिण आहे.
हे निरुपद्रवी छोटेसे हरिण क्वचितच दिसते. ते डोंगराळ भागाच्या एकांतवासाच्या ठिकाणी राहते. ते केवळ फळे, पालवी व इतर वनस्पति खाण्यास बाहेर येण्याचे धाडस करते, पण आपल्या कानांना व हुंगण्यास धोक्याची चाहूल लागताच ते आडोशाकडे धूम ठोकते. पुडूला दाट अरण्यात राहणे आवडते कारण केवळ तीन तास जरी सूर्यकिरणे त्याच्यावर थेट पडली तर ते मरु शकते.
या बुजऱ्या प्राण्याबद्दल एवढी त्रोटक माहिती उपलब्ध आहे की, अगदी अलिकडेच प्राणीसंशोधकांना, ते बकरी किंवा मेंढी नाही इतकेच कळले. त्यांनी याला हरिण असे संबोधले कारण त्यातील नराची २.५ ते ३.६ इंच (६ ते ९ सें.मी.) लांबीची शिंगे वर्षातून एकदा गळतात. पुडूच्या साधारण दोन प्रकारच्या जाती आहेत. चिलीचा दक्षिण भाग व अर्जेंटिना या देशात जी जात होती त्याच्या अंगावर तांबूस रंगाची लव होती. तेच कोलंबियाच्या उत्तरेकडील अभयवनात आणि पेरू व इक्वेडोर या देशातील जातीचा रंग अधिक काळवट आहे. पुडूची पूर्ण वाढ होते तेव्हा ते १६ इंच (४० सें.मी) उंच व २८ ते ३१ इंच (७० ते ८० सें.मी.) लांब असते व त्याचे वजन साधारण २२ पौंड (१० किलो) इतके असते. या प्राण्याचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा आखूड असल्यामुळे त्याची अंगकाठी पाचरीच्या आकारासारखी दिसते.
या लहानशा प्राण्यावर संकटाची आपत्ती
पुडू जरी बुजरे असले तरी असे दिसते की त्याला लोक आवडतात व त्याला लोकांविषयी भरवसा वाटतो. चरुन परतणाऱ्या मेंढरांसोबत व इतर गुरांसोबत कैकवेळा पुडू मागेमागे जातात, पण त्यांना शेतकऱ्यांची कुत्री पळवून लावतात. बहुधा जे संशोधक पुडूचा आत्मविश्वास जिंकतात त्यांना पुडू हाताला व पायाला चाटून आपले मित्रत्व प्रदर्शित करतात. एका प्राण्यांच्या संशोधकाने एका पुडू मादीला असा लळा लावला की, ती त्याच्या मांडीवर उडी मारुन बसली, गालांना चाटले व आपल्या डोक्याने ढकलत ढकलत ती त्याला आपल्या घराकडे घेऊन गेली जेथे तिचे पिलू नव्यानेच जन्मले होते.
पुडूचे जरी कोल्हे, प्युमा, जंगली मांजरी व घुबड हे सर्व नैसर्गिक शत्रू असले तरी मनुष्य हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. गतकाळी हे लहान हरिण अगदी मोकळेपणाने वावरत असे आणि आपल्या शत्रूंना चुकविण्यासाठी आपणाठायी असणारी गति व चपळाई यांचा उपयोग करीत असे. कोल्हे व प्युमा या शत्रूंना फसविण्यासाठी पुडू आपली पाठ फुगवून दुप्पट वेगाने चालते किंवा नदीच्या पात्रात उलट दिशेने पोहत जाते. पण आता माणसाने अरण्ये उद्ध्वस्त केली असल्यामुळे पुडूंची संख्या घटत आहे. यामुळेच पुडूंनी जंगलातील लहान लहान झुडुपांखाली जे बोगदे खणलेले असतात त्यांचा आश्रय घेतला आहे. पुडू हा व्यवस्थित प्राणी असल्यामुळे या बोगद्यात ते आपले खाणेपिणे, झोपणे तसेच उत्सर्जन करण्याच्या जागा वेगळ्या व स्वच्छ ठेवते. त्यात आयुष्यभर ते बदली करीत नाही. बोगद्यातील प्रत्येक ठिकाणाची ओळख ठेवणे हे त्याच्या बचावाचे प्रमुख अंग आहे. पुडू हा जरी वेगवान पळणारा व शीघ्र पोहणारा प्राणी असला तरी तो उघड्या माळरानावर अगदी सहजगत्या शिकार बनतो. पण तेच त्याच्या बोगद्यात घडत नाही कारण एक संशोधक म्हणतो की, तेथून तो “बंदुकीच्या गोळीसारखा उडून जातो” व आपल्या मागे लागलेल्यांना दूरवर ठेवतो.
पुडूची शिकार करण्यावर जरी बंदी असली, तरी काही घातकी लोकांनी या लहान प्राण्यांना धरुन त्यांची शिकार चालविली आहे. या शिकाऱ्यांना प्राण्याच्या अंगावरील मुबलक फर, त्याचे चवदार मांस तसेच परदेशातील पशुसंग्रहालयाकरवी धडधाकट प्राण्यासाठी मिळणारी भरपूर किंमत यांचा मोह जडून ते ही शिकार करतात. या शिकाऱ्यांनी पुडूंना त्यांच्या बोगद्यातून बाहेर उघड्यावर काढून आणावे म्हणून लहान कुत्र्यांना त्यांना हाकलून लावण्याची तालीम दिली. पुडू कुत्र्यांपेक्षा जलदगतीने पोहत असल्यामुळे ते लगेच जवळच्या नदीकडे धाव घेतात. या नदीत माणसे बोटीत बसून त्यांना पकडण्यास जाळी लावून बसतात. यात ही जनावरे जखमी होतात. एका संशोधकाच्या मते जवळजवळ ८० टक्के जनावरे भयाने दगावतात.
होय, बुजरेपणा हा पुडूचा अशक्तपणा आहे. कंपित झाल्यावर त्याचे डोळे अश्रूंनी भरतात, ते थरथर कापू लागते, त्याचे केस उभे राहतात आणि अनेक वेळा ते हृदयक्रिया बंद पडून मरते. या कारणामुळेच पुडूंना जरी अनेक गावकरी कुटुंबांनी व महाविद्यालयांनी माणसाळविण्याचे प्रयत्न केले तरी ते या गुलामीत अधिक काळ जिवंत राहात नाही. ते लवकरच, उघड असे कोणतेही कारण नसता, गुलामीच्या दबावामुळे मरतात. पुडूंना मोकळेपणात वावरण्याची आवड असते.
या शतकात ज्या ६६ सस्तन प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या त्या यादीत पुडूचे देखील नाव समाविष्ट होईल अशी भीती वाटत आहे. तरीपण वर्ल्डवाईड लाईफ फाऊंडेशन मार्फत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, ही पुडूची जात बचावून राहू शकेल. ते कसे काय? त्यांच्यासाठी बोगद्याची सोय करून ठेवली तर ते या नव्या परिस्थितीशी जुळते घेऊ शकतील. पण हे चिलीतील डोंगरात राहणारे सिंह व प्युमा यांच्याबाबतीत होऊ शकत नाही, या जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा, दबाव व बदलत्या परिस्थितीत असताना उग्र व हल्लेखोर बनण्यापेक्षा जुळवून घेणे व मित्रत्व राखणे बहुधा किती बरे ठरते!
आपण आशा करू या की, शांतीमय नवे व्यवस्थीकरण स्थापीत होईपर्यंत पुडू बचावून राहील. त्यावेळी या प्राण्याला आपल्या नैसर्गिक संरक्षक बोगद्यात राहता येईल आणि कोणतेही भय न बाळगता तो मोकळ्या मैदानात आनंदाने बागडू लागेल. त्या काळात, जगाच्या या छोट्या हरणाला भेटण्यासाठी तुम्ही तेथे असाल का? (g87 5/8)
[पानांवरील चित्राचे श्रेय]
New York Zoological Society photos