चांगले स्वास्थ्य व्यवसायाच्या दृष्टीने बरे ठरते
आरोग्य इलाजावर एकट्या अमेरिकेचाच वार्षिक खर्च ४०० कोटी डॉलर्स होत आहे. तो १९७०री मधील खर्चाच्या अनेकपटीने अधिक आहे. वाढता वैद्यकीय खर्च हा केवळ कौटुंबिक खर्चास दहशत बनलेला नसून आज तो व्यावसायिक उद्योगधंद्याच्या किफायतीतून मोठा हिस्सा हिरावीत आहे. कामगाराकरिता असलेल्या आरोग्य विमा योजनांच्या भरणापायी अमेरिकेस प्रतिवर्षी ८० कोटी डॉलर्स भरावे लागतात!
उदाहरणार्थ, फोर्ड मोटार कंपनीने अंदाज काढला की, कामगारांच्या स्वास्थ्याच्या निगराणीची किंमत एवढी वाढली की ती, दर मोटारीच्या किंमतीत २९० डॉलर्सने वाढ करावी लागली. जनरल मोटार कंपनी ही आपल्या एका माल देणाऱ्या कंपनीपैकी यु.एस.एक्स कार्पोरेशन (पूर्वीची यु. एस. स्टील) कडून जे पोलाद घेते त्यापेक्षा आरोग्य विमा व अपंगाच्या उपचारावर अधिक पैसा दरवर्षी खर्च करते.
अमेरिकेतील व्यावसायिक कंपन्यांना उत्पादनाचा खर्च सोसून पाठदुखी आजाराने त्रस्त असणाऱ्यांवर प्रतिवर्षी १ कोटी डॉलर्स खर्च करावा लागतो असा अंदाज काढण्यात आला. या प्रकारच्या दुखण्यामुळे दर दिवशी अमेरिकेतील १० लक्ष कामगार गैरहजर असतात. हृदयविकाराचा आजार खराच विध्वंसक आहे. दरवर्षी सुमारे ७ लक्ष अमेरिकन लोक हृदयाच्या झटक्याने मरतात, यामध्ये पुष्कळ तर भरज्वानीतले असतात; आणि दुसरे ७ लक्ष लोक या झटक्यातून वाचतात पण पुढील काही महिने कामावर येऊ शकत नाहीत. यामुळे व्यावसायिक उद्योगावर केवढा बोजा पडतो.
“साधारण चार वेळेला जो कामगार [हृदय] शस्त्रक्रियेतून पार होतो, तो आपल्या वेतनश्रेणीनुसार मालकाला एक लाख डॉलर्सपेक्षा अधिक खर्च करायला लावणार,” असे डॉ. रिचर्ड एच. स्टेईन म्हणतात. पुढे ते म्हणतातः “यापेक्षा सर्व रोगावर प्रतिबंधक इलाजाचा खर्च करून पाहिला तर तो उद्योगधंदा करणाऱ्या कंपनीचा खर्च कमी करू शकेल. अशाप्रकारे कंपन्यांवरील भार कमी करणे हे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे असेच मला वाटते.”
हा प्रतिबंधक खर्च व्यवहार्य आहे?
४०० कोटी आरोग्य खर्चापैकी बहुतेक खर्च अधिक वजन, धुम्रपान, रक्तातील अतिरेकी दोष व रक्तदाब यापासून उद्भवणाऱ्या आजारावर होत असतो.
तुम्हाला हे माहीत असेलच की, मोठे उद्योगधंदे आपणापाशी असणारी यंत्रे चांगल्या स्थितीत रहावीत व चांगले काम देणारी ठरावीत यासाठी त्यांना हव्या असणाऱ्या देखरेखीच्या खर्चावर गुंतवणूक करतात. यामुळे आर्थिक बचत घडते. तर मग, आपल्या कामगारांचे आरोग्य बिघडू नये यासाठी जर आरोग्य-देखरेखीचा प्रतिबंधक कार्यक्रम योजला तर? त्यामुळे काही फायदा घडेल का?
‘आपले आरोग्य संभाळणे ही प्रत्येकाची वैयक्तीक जबाबदारी आहे,’ असा वाद कदाचित कोणी मालक करील. तरीपण आमच्या या आधुनिक त्रस्त समाजात घृणित प्रकाराने खाणे-पिणे करणे, झोपण्याच्या वाईट सवया, तसेच व्यायामाविना जीवन जगण्याची पद्धत आणि औषधांच्या वापरावर अधिकाधिक जोर या सर्वांमुळे औद्योगिक कंपन्या याविषयी आता पुनर्विचार करीत आहेत.
१९७४ मध्ये असोशिएशन फॉर फिटनेस इन बिझनेस या नावाची संस्था स्थापण्यात आली. तेव्हा तिचे दोन डझन पदाधिकारी होते. आता या संस्थेचे ३,५०० पेक्षाही अधिक सभासद आहेत! यांनी सर्वानुमते हेच ठरविले की, रोग-प्रतिबंधक कार्यक्रम हा आर्थिकदृष्ट्या व मानवी सेवेच्या दृष्टीनेही व्यवहार्य आहे.
शोचनीय परिस्थितीचा सामना करणे
डॉ. जॉन बॅगशॉ यांनी दुःखाने म्हटलेः “तुमच्या दप्तरात तुम्हाला एकजण असा माहीत आहे की जो काही त्रासात पडणार आहे, त्याला चांगली निगा कशी घ्यावी हे सांगितलेले आहे, पण पुढे काही प्रगति दिसत नाही व शेवटी तुम्ही बघता की, तो इस्पितळात हृदयाचा झटका आल्यामुळे इलाज घेत आहे, हे पाहणेच किती त्रस्त करणारे आहे.”
अशा दुःखद परिस्थितीच्या चिंतनामुळे डॉ. बॅगशॉ यांनी आपल्या वैद्यकीय उपचारपद्धतीत बदल केला आणि रोग-प्रतिबंधक कार्यक्रमावर अधिक भर दिला. असा हा बदल करणे किती उपयुक्त आहे हे, एका डॉक्टरने जे स्वप्न पाहिले असल्याचे म्हटले त्यावरुन अधिक स्पष्ट होते.
“मी एका नदीकिनारी उभा होतो.” ते कळवितात. “मी पाहिले की, एक माणूस प्रवाहात वाहून चालला आहे. तो बुडत होता. मी पाण्यात उडी टाकली, त्याच्याकडे पोहत गेलो व त्याला ओढतओढत किनाऱ्यावर आणले. त्याला कृत्रिम श्वासोच्व्छास दिला व त्याला वाचविले. तेवढ्यात दुसऱ्या माणसाची ओरड कानी आली. परत पाण्यात उडी घेतली व त्याला वाचविले. पण तितक्यात आणखी माणसे एकामागोमाग येत बुडत असलेली दिसली. काही काळातच, तो किनारा मी वाचविलेल्या माणसांनी भरून गेला. मला हे स्वप्न चांगले लक्षात राहण्याचे कारण मी, त्यावेळी हा विचार केला की, नदीच्या प्रवाहाकडे जाऊन पहावे व कोण या लोकांना पाण्यात टाकीत आहे ते बघावे.”
खरे म्हणजे, डॉक्टरांनी आपल्या स्वप्नात जी “नदी” पाहिली होती तिजमध्ये लोक स्वतःलाच धुम्रपान, मादक औषधे तसेच अवास्तव खाणेपिणे व व्यायाम न करणे यामुळे लोटत आहेत. या गोष्टीला यु.एस.सेंटर्स फॉर डिसीज् कंट्रोल या संस्थेने दिलेल्या आकडेवारीवरून पुष्टी मिळते. ती हे दाखविते की, वयाची पासष्टी होण्याआधी ज्या लोकांचा मृत्यु होतो त्यामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोक प्रकृतीला न मानवणाऱ्या जीवन-पद्धतींचे आचरण करीत असल्यामुळे मृत्युमुखी पडतात.
तरीपण, अमेरिकेतील बहुतेक औषधे ही प्रामुख्याने रोग प्रतिबंधकापेक्षा रोगाच्या इलाजाच्या अनुषंगाने तयार केली जातात. रोग-प्रतिबंधक कार्यक्रमाच्या बाबतीत इतर देशांच्या मानाने पाहता अमेरिकेने अद्याप पर्यंत खूप कमी लक्ष दिले आहे. आता, माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी इतरांच्या कार्यक्रमाकडून शिकून घेण्याचे प्रोत्साहन दिले आहे.
“जपानी कंपन्या धडधाकट राहण्याचा जो कार्यक्रम राबवीत आहे तो आम्हा सर्वांना माहीत आहे,” असे ते म्हणाले. “जितके आरोग्यशाली काम तितके अधिक उत्पादन. याचा अर्थ, अधिक काळासाठी कामगार आरोग्य फायद्यांवरील खर्चही कमी होतो.”
औद्योगिक संस्था काय करीत आहेत
काही जपानी औद्यागिक संस्थांनी आपल्या कामगारांचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी राबविलेल्या कार्यक्रमात अधिक गुंतवणूक केली; त्यांनी शारीरिक व्यायामावर अधिक जोर दिला. उदाहरणार्थ, निसान मोटार कंपनीने ४ कोटी १० लाख डॉलर्सचे अतिभव्य फिटनेस सेंटर हे आरोग्य केंद्र उभारले आहे. येथे कारखाना व त्याचे मुख्य दप्तर येथून सहजपणे येता येते. टोकिओ गॅस कंपनीने जे नवे कार्यालय बांधले त्याच्या २७ व्या मजल्यावर सबंध माळा फिटनेस सेंटर म्हणून आहे. येथेच धावपट्ट्याही आहेत.
न्युमरा सेक्युरिटीज् या रोख्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या जपानच्या मोठ्या संस्थेने स्वतःचे फिटनेस सेंटर उभारण्याऐवजी ती आपल्या कामगारांना तिकिटे देते, ज्यामुळे त्यांना देशातील सर्वोत्तम आरोग्य केंद्रात जाता येते. यांचा शक्यतो अधिक प्रमाणात लाभ घ्यावा असे त्यांना सांगते. एन.ई.सी ही कॉम्प्युटर व इलेक्ट्रीक संघटना दिवसात दोन वेळा आपली उत्पादक यंत्रे थांबविते व त्या अवधीत आपल्या कर्मचाऱ्यांना आयसोमेत्रिक व्यायामात भाग घेऊ देते.
आता गेल्या काही वर्षात अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी आपले वरिष्ठ दर्जाचे अधिकारी व अंगमेहनतीचे काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच सुविधा सुरु केल्या. द जनरल फुड कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य आहार घेणे, धुम्रपान सोडून देणे याविषयीचे वर्ग चालविण्या व्यतिरिक्त राय ब्रुक येथील कंपनीच्या नव्या दप्तरी एक गोंडस फिटनेस सेंटर आतल्या आत बनवले आहे. यात क्वाश हाऊस, रॅकेटबॉल कोर्ट, वजनावर नियंत्रण ठेवणारी उपकरणे, व्यायाम करण्याच्या सायकली व पायाने चालविण्याची रहाटचाके याही गोष्टी ठेवल्या आहेत. बाहेर सुंदर वातावरणात पळण्याच्या धावपट्ट्या केल्या आहेत. सभासदाच्या प्रगतीची नियमित तपासणी करण्यासाठी देखरेख करणारे व कार्यकारी शरीर शास्त्रज्ञ यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
१९७९ मध्ये पेपसीको कंपनीने सुदृढतेचा कार्यक्रम राबविण्यास त्यांच्या परचेस, न्यूयॉर्क येथील कार्यालयात सुरवात केली. यानंतर हाच कार्यक्रम इतर डझनभर केंद्रात फैलावण्यात आला. याचप्रमाणे द एटी ॲण्ड टी कम्युनिकेशन्स कार्पोरेशन याच प्रकारचा कार्यक्रम “द टोटल लाईफ कन्सेप्ट” या विषयाखाली राबवीत आहे. या कंपनीच्या कार्यक्रमात शारीरिक व्यायाम, आहार-वजन नियंत्रण, पौष्टीकतेच्या सूचना आणि आराम घेण्याचे तंत्रकौशल्य यांचा समावेश आहे.
पेप्सीको कंपनीच्या कार्यक्रमाचे संचालक, डॉ. डेनीस एल. कोलॅसीनो यांनी म्हटले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांपुढे आरोग्यासंबंधीच्या विषयावर भाषणे देण्यासाठी आरोग्याच्या विविध क्षेत्रातील तज्ञांना पाचारण केले जाते. ते आणखी म्हणाले की, कंपनीच्या उपहारगृहात आरोग्यपूरक खाद्ये, अन्न शक्तीची क्षमता कशात किती आहेत याची माहितीपत्रके पुरविली जातात. “आमचा सॅलड बार तसेच फळांचा बार आहे. ज्याला जे पाहिजे त्या पसंतीने तो घेतो.” तरीपण त्यांनी यावर भर दिला की, “आम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे, ज्यामुळे कार्यप्रवर्तक शक्ती मिळू शकेल.”
इतर अनेक कंपन्या देखील हेच करीत आहेत. अमेरिकेच्या टेनिको या मोठ्या तेल व गॅस कंपनीने गेल्या तीन वर्षात आपल्या विभागात १७ ठिकाणी व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. काही लहान कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांकरता अशा सोयी पुरविल्या आहेत.
एका उद्योगधंद्याचे व्यवस्थापक, सीगफ्रीड टंगर, ज्यांच्याकडे पाच कामगार आहेत, त्यांनी आपल्या कारखान्याच्या शेजारीच टेनिस-व्हॉलीबॉलसाठी एक पटांगण बांधले आहे. गेली पाच वर्षे त्यांचे कर्मचारी या पटांगणावर व्हॉलीबॉल खेळत आहेत. टंगर म्हणतातः “आम्ही जे काम करतो ते काही वेळा बरेच कंटाळवाणे असते. यामुळे बाहेर पडणे व एकदोन चकरा टाकणे हे सर्वांनाच बरे वाटते.”
तेच छोट्या उद्योगांना अशी फिटनेस सेंटर चालविणे परवडणारे नसल्यामुळे ते आपल्या कर्मचाऱ्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन व्यायाम घेता यावा यासाठी पूर्ण किंवा अंशतः रक्कम देतात. मोठ्या शहरात जवळपासच्या उद्योगधंद्यांच्या कामगारांच्या गरजा भागवाव्यात म्हणून अनेक आरोग्य केंद्रे अलिकडेच उभारण्यात आली आहेत. या योजनांचे प्रमुख अनुमोदक डॉ. जेरोम झकर्मन म्हणतातः “पुढील दहा ते १५ वर्षात देशातील ५० मोठ्या शहरात अशा आरोग्यकेंद्राचे जाळेच पसरलेले असणार.”
व्यायाम हा इतका मोलाचा आहे का?
तथापि, काहींना, व्यायामामुळे आजारांचे निर्मूलन होते व कामगारांची उत्पादन क्षमता वाढते याविषयी शंका वाटते. तरीपण पुरावा हे सिद्ध करतो की, अगदी तसेच घडत आहे. डॉ. पीटर लिंडनर, जे शरीराच्या स्थूल प्रमाणाविषयीचे तज्ञ आहेत, ते म्हणतातः “व्यायामाने एनडॉरफिन्स म्हणजे मेंदूतील स्वाभाविक रसायने निर्माण होतात, त्यामुळे खिन्नता कमी होते, तजेला येतो व तब्येत हुशार वाटते.”
पण, नुसते बरे वाटण्यापेक्षा व्यायामामुळे प्रत्यक्षात अधिक सुदृढ वाटू लागते, ज्याचा परिणाम अधिक उत्पादनक्षमता वाढते. यामुळे आयुवृद्धीही होते. १९८६ च्या मार्च महिन्यातील न्यू यॉर्क टाइम्समधील “स्टडी इंडीकेट्स् मॉडरेट एक्सरसाईज् कॅन ॲड इयर्स टू अ पर्सन्स् लाइफ” हा अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. त्यात म्हटले आहेः
“जे लोक चालणे, जिने चढणे व खेळ यासारख्या व्यायामात सहभागी होतात की ज्यामुळे दर आठवडी २,००० कॅलरींना उपयोगात आणले जाते, अशांमधील मरणाचे प्रमाण [हावर्डमध्ये शिक्षण घेत असलेल्या १७,००० विद्यार्थ्यांची चाचणी घेतली गेली त्या] कमी क्रियाशील असणाऱ्या लोकांपेक्षा एक चतुर्थांश ते एक तृतीयांशाने कमी असल्याचे आढळले आहे.” याचप्रमाणे रक्तदाबाचे रुग्ण असलेल्या अक्रियाक लोकांपेक्षा ह्या व्यायाम घेणाऱ्या लोकात जरी रक्तदाब असला तरी मरणाचे प्रमाण कमी होते.
अभ्यासाचे संचालक, डॉ. राल्फ एस. पाफेनबारजर, ज्युनिअर म्हणतातः “लोक निरोगी आहेत म्हणून कार्यशील आहेत अशी शंका बाळगणारे पुष्कळजण आहेत.” पण त्यांनी जोर देऊन म्हटले की, “तुम्ही कार्यशील आहात म्हणून निरोगी आहात.”
ज्या कंपन्यात धडधाकटपणा टिकविण्याचे कार्यक्रम राबविले जातात तेथील ही यशस्वी कर्तबगारी आहे. त्यांच्या कार्यक्रमात पॅसिफिक गॅस ॲण्ड इलेक्ट्रीक कंपनीचे व्यवस्थापक, रस कनिंगहॅम यांना दिसून आले आहे की, “कोणाही भावी विनाशाच्या तरतूदीत ही एक उत्तम विमायोजना आहे.” ते पुढे म्हणतातः “आमच्या दृष्टीने पाहिल्यास, तिने अनेक वेळा आपली किंमत परत केली आहे.” पेप्सीकोची एक शाखा, पेप्सीकोला कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन स्कले यांनी असे म्हटलेः “धडधाकटपणा हे असे खाते आहे जे त्यावरील खर्चाचा उत्तम मोबदला परत देते.”
इकसॉन या बलाढ्य तेल कंपनीच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी केलेला अभ्यास देखील धडधाकट कार्यक्रमाबद्दलची प्रचिती देतो. यात सहभाग घेतलेल्यांपैकी तीन चतुर्थांश लोकांना सुदृढता प्राप्त झाल्याचा अनुभव आला; २९ टक्क्यांचे वजन कमी झाले; तर २७ टक्के लोकांनी धुम्रपान सोडले. याचप्रमाणे, कंट्रोल डाटा कार्पोरेशन यानेही लक्षात आणले की, व्यायाम घेणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ लोकांवर जो आरोग्य-विषयक खर्च करण्यात आला तो मुळीच व्यायाम न करणाऱ्या लोकांवर करण्यात आलेल्या खर्चापेक्षा दर वर्षी ११५ डॉलर्सने कमी होता.
कॅनडातील टोरंटो येथील महाविद्यालयाच्या १९८२ च्या अभ्यासाने हे प्रकटविले की, ज्या कंपनीत धडधाकट राहण्याचा कार्यक्रम योजला आहे ती त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे वार्षिकपणे २३३ डॉलर्सची बचत करु शकते. तसेच हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटकरवी १९८३ च्या पाहणीत असे दिसले की, धडधाकट राहण्याचा कार्यक्रम राबविणाऱ्या कंपन्यांनी आरोग्य खर्चासाठी दरवर्षी १,०६१ डॉलर्स भरले तर तो कार्यक्रम न राबवणाऱ्यांना १,४५६ डॉलर्स भरावे लागले; याचा अर्थ ३७ टक्के बचत, किंवा प्रत्येक कर्मचाऱ्या मागे ३९५ डॉलर्स!
सहभागी होण्याचे उत्तेजन देणे
आरोग्य संपदा व धडधाकटपणाचे कार्यक्रम केवढे किफायतशीर ठरतात ही जाणीव घेऊन अनेक व्यावसायिक उद्योगधंदे आपापल्या कामगारांना त्यात गुंतविण्याच्या प्रयत्नात आहेत. तरीपण हे नेहमीच सोपे नसते. कारण लोकांना जरी याची जाणीव असते की, धुम्रपान करणे, अतिरेकी मद्यपान, अधाशीपणाने खात राहणे, मादक औषधांचे सेवन करणे व व्यायाम न करणे यामुळे आपले जीवन ते केवढ्या धोक्यात घालीत आहेत, तरीही त्यात बदल करणे काहींसाठी बरेच कठीण जाते.
तसे पाहता, कंपनीच्या कामगार वर्गापैकी ३० टक्क्यापेक्षा कमी लोक कंपनीने राबविलेल्या धडधाकट कार्यक्रमात सहभागी होतात. तेव्हा अधिक कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घ्यावा यासाठी कंपन्यानी धनलाभ देणाऱ्या वेगवगळ्या इन्सेंटिव्ह योजना काढल्या. उदाहरणार्थ, हॉस्पिटल कार्पोरेशन ऑफ अमेरिका ही संस्था एक मैलभर (१.६ कि. मी.) अंतर चालणे किंवा धावणे आणि दर पाव मैल पोहणारास तसेच चार मैल सायकल चालविणाऱ्यास २४ सेंटस् देते.
धुम्रपान थांबवावे यासाठी स्पीड कॉल कार्पोरेशन आपल्या कर्मचाऱ्यांना, एक आठवडाभर कामावर असताना धुम्रपान न केल्यास प्रत्येकाला दर आठवडी ७ डॉलर्स देते. चार वर्षांच्या या कार्यक्रमाच्या शेवटी धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत ६५ टक्के घट झाली व ज्यांनी धुम्रपान सोडले अशांपैकी ज्यांचा विमा योजनेकडे दावा होता त्यांच्या संख्येत ५० टक्के घट झाली.
कंपनीच्या धडधाकटपणाच्या कार्यक्रमातील यशप्राप्ती ही प्रामुख्यत्वे वरील पातळीवरील व्यवस्थापनाच्या पाठिंब्यावर अवलंबून असते. वरच्या पदावरील अधिकाऱ्यांनी व्यायामात भाग घेतला तर इतर त्यांचे अनुकरण करतात. डॉ. लिंडर म्हणतात की, व्यायामासाठी खर्च केलेल्या वेळेबद्दल लोकांनी कुरकुर करू नये. “खरे म्हणजे तुम्ही त्याला अधिक वेळ दिला पाहिजे,” असे ते म्हणतात. “कारण व्यायाम तुम्हाला असे स्फुरण देतो की, ज्यामुळे थोड्या वेळात तुम्हाला कितीतरी काम उरकता येऊ शकते.”
तुम्हाला काय करता येईल?
जेथे फिटनेस किंवा धडधाकट राहण्याचा कार्यक्रम आहे त्या कंपनीत तुम्ही कामाला असा वा नसा, तुम्हाला कदाचित व्यायामाविषयी व्यक्तीगत गोडी असेल. तरी सावधान! तुम्ही अद्यापपावेतो अजून काहीच केले नसेल तर हळुवार सुरवात करा. एकाच वेळी खूप व्यायाम करणे हे कदाचित तुमच्या आरोग्याला लाभापेक्षा हानिकारक ठरू शकेल.
तसेच तुम्ही असा विचार कराल की मी, आठवडाभरात काही व्यायाम न करता शेवटाला जर कसून केला तर बरे ठरेल. पण तेही हानिकारक होऊ शकेल. डॉ. लॉरेन्स पॉवर यांनी हे परिक्षिलेः “पुष्कळ लोक आठवड्याच्या शेवटी अकस्मात मरतात. एका अभ्यासाने हे दाखविले की, या आकस्मिक मरणापैकी २६ टक्के सोमवारी तर २५ टक्के शनिवारी मरतात. हा तर अर्ध्या सप्ताहातील दोन दिवशी मरणारांचा आकडा आहे.”
आरोग्याविषयीचे खरे फायदे प्राप्त करायचे आहे तर नियमित व्यायाम, आठवड्यातून तीन किंवा अधिक वेळा दर वेळा २० ते ३० मिनिटे इतका केला पाहिजे. नियमित फिरायला जाण्याची सवय लावणे ही चांगली सुरवात करण्यासारखे आहे. एका डॉक्टरांनी म्हटलेः “जोमदारपणे चालण्याची सवय तरुण काळापासून ठेवल्यास त्यामुळे अपंगत्व तसेच कोरोनरी हृदयविकाराच्या अकाली मृत्युपासून कदाचित सुटका होऊ शकते.”
अशाप्रकारे, कामगारांचे स्वास्थ्य हे औद्योगिक धंद्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे उत्तम प्रकृतीस्वास्थ्य कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीकोणाने उपयुक्त ठरू शकते. तेव्हा कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी म्हणजेच तुम्ही स्वतः, तुमची बायको व मुले बराच वेळ दूरदर्शनवरील कार्यक्रम बघण्यात घालवीत बसण्यापेक्षा किंवा इतर शारीरिक हालचाल नसणाऱ्या कामात घालविण्यापेक्षा थोडासा व्यायाम सर्वांना करण्याचे का उत्तेजन देऊ नये? नियमित स्वरुपाचा व्यायाम हा सबंध कुटुंबासाठी हितावह ठरतो. (g87 2/22)
[पानांवरील चित्रं]
जपानी कंपन्या आपल्या कामगारांसाठी या प्रकारच्या व्यवस्था पुरवीत आहेत
[पानांवरील चित्र]
नियमित स्वरुपाचा व्यायाम करणे हे देखील कुटुंबाच्या हितासाठी योग्य आहे