वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr8-1 पृ. २०-२३
  • चौरंगी छपाईवर एक कटाक्ष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चौरंगी छपाईवर एक कटाक्ष
  • सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रंगीत छपाई अधिक कठीण
  • आमचा उत्पादन क्रम
  • पानांची जुळणी केंद्र
  • रंगीत मुद्रिते तयार करणे
  • उत्पादन
  • रंगांची मर्यादा
  • कष्टाचे चीज
  • रंगांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • कागदमुक्‍त कार्यालयाचे स्वप्न
    सावध राहा!—१९९९
  • धन्याची मालमत्ता सांभाळणे
    आमची राज्य सेवा—१९९८
सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
gbr8-1 पृ. २०-२३

चौरंगी छपाईवर एक कटाक्ष

तीन मूलभूत रंग व काळा मिळून नैसर्गिक रंगांच्या प्रतिकृती करण्याची प्रक्रिया म्हणजेच चार रंगाची, चौरंगी छपाई होय. छापील कागदावर चार रंगाची चित्रे कशी बनवली जातात? आता कोणते तंत्र वापरले जाते? वॉचटावर सोसायटीच्या न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनच्या प्रमुख कार्यालयात चार रंगाच्या छपाईत काय गोवलेले आहे याचे अंशतः वर्णन खालील लेखात आहे.

नियतकालिके, वृत्तपत्रे व पुस्तकातील चित्रांची छपाई एक सुंदर आभास निर्माण करते. उदाहरणार्थ, छपाईमध्ये कृष्ण-धवल छायाचित्र किंवा हस्तचित्राची प्रतिकृति कशी केली जाते ते पहा.

काळ्‌या व पांढऱ्‍या छपाईमध्ये एकच म्हणजे काळी शाई वापरली जाते. परंतु तुम्ही कृष्ण-धवल चित्राकडे पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यांना करड्या रंगाच्या छटाही दिसतात. छापील कागदावर करड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा तसेच काळा रंग कसे केले जातात? बिंदूंच्या साहाय्याने.

बिंदूंनी? होय, शाईच्या बिंदूंनी. एखाद्या बहिर्गोल भिंगातून छापील चित्राकडे पाहिल्यास अनेक लहान बिंदूंनी ते चित्र बनलेले आहे असे तुम्हाला दिसेल. चित्रकाराने काढलेल्या मूळ चित्राच्या किंवा छायाचित्राच्या सलग छटा दिसत नाहीत. कागदावर उतरण्यासाठी चित्राचे बिंदूत परिवर्तन करावे लागते.

हे बिंदू कसे बनवतात? स्कॅनर नावाच्या एका मोठ्या पृथक्करण मशीनद्वारे चित्राची किंवा फोटोची लहानशा व सुस्पष्ट बिंदूंमध्ये पुनर्बांधणी केली जाते. स्कॅनरमध्ये एक संगणक असतो. तो रंगाच्या छटा समजून घेतो व वेगवेगळ्या आकाराचे बिंदू बनवतो. त्या बिंदूंच्या प्रतिमा फोटोच्या फिल्मवर उत्पन्‍न करण्यासाठी लेसर किरणांचा उपयोग केला जातो. अशा रितीने बिंदूंचा आकार बदलून करड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा बनवल्या जातात. ते बिंदू शाई पकडतात व मग छपाईच्या प्लेटवरुन कागदावर उतरवले जातात.

पांढऱ्‍या कागदावर छपाई करताना छटा जितकी हलकी तेवढे बिंदू लहान असतात. मोठ्या बिंदूंनी गडद छटा बनतात. अशा रितीने ते बिंदू, मूळ फोटो किंवा चित्रातील काळ्या व करड्या रंगाच्या छटा आहेत असे डोळ्यांना भासवतात.

रंगीत छपाई अधिक कठीण

कृष्ण-धवल छपाईपेक्षा रंगीत छपाई अधिक गुंतागुंतीची असते. त्यात तीन मूळ रंग व काळा रंग वापरले जातातः (१) सायॅन (हिरवट निळा); (२) मॅजेन्टा (लाल); आणि (३) पिवळा; शिवाय (४) काळा. या चार रंगांच्या बिंदूंचे थर एका नंतर एक असे छपाईच्या यंत्राने कागदावर एकत्र केले जातात. त्याने छापील कागदावरील तुमच्या डोळ्याला दिसणारे अनेक रंग बनतात.

परंतु प्रथम मूळ चित्र किंवा छायाचित्रातून त्या तीन तसेच काळा रंगाच्या गडद व फिक्या छटा दाखवणाऱ्‍या बिंदूंचे संच वेगळे करणे हे जरुरीचे असते. पण छापील कागदावर दिसणारे निरनिराळे रंग या चार रंगातून कसे बनतात?

समजा, आपल्या नियतकालिकात आपल्याला हिरव्या गवताचा फोटो उतरवावयाचा आहे. छपाईमध्ये तो कागद यंत्राच्या चार विभागातून जाईल. प्रत्येक विभागात वर सांगितलेल्या रंगातील एक घातला जाईल. छपाईच्या प्लेटच्या एका संचावरील बिंदू सायॅन रंगाची शाई घेऊन कागदावर त्यांचा आकार काढतील. यंत्रातून कागद झपाट्याने पुढे जात असता बिंदू असलेल्या प्लेटचा दुसरा संच पिवळी शाई घेऊन, सायॅन रंगाच्या बिंदूंवर त्यांचा ठसा उमटवितो. सायॅन व पिवळ्या रंगांची शाई व पांढरा कागद यांनी मिळून परिवर्तित केलेला प्रकाश डोळ्याला हिरवा दिसतो. जेव्हा छपाईचे चारही विभाग शाईच्या चार रंगातील आपापल्या बिंदूंचे मिश्रण करतात तेव्हा मेघधनुष्यातील इतर रंग उत्पन्‍न होतात.

आमचा उत्पादन क्रम

छापखान्यातून तयार वस्तु बाहेर पडण्यापूर्वी बरेच काम करावे लागते. ज्या फोटोची अथवा कलेची छपाई करावयाची असेल त्याची फिल्म (निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह) बनवावी लागते. या फिल्मच्या आधारे छपाईच्या प्लेटस्‌ बनवल्या जातात.

छापील नियतकालिकाच्या एका रंगीत पानाकरिता तीन प्रमुख रंगांसाठी प्रत्येकी एक व काळ्या रंगासाठी एक असे एकूण चार फिल्मचे तुकडे लागतात. ही फिल्म आमच्या लेसर किरणांच्या स्कॅनरने बनवली जाते. छापावयाच्या फोटो किंवा कलाकृतीचे विश्‍लेषण करून, स्कॅनर ती प्रतिमा आपल्या मेमरी (आठवणीत) साठवून ठेवतो.

स्कॅनर मशीन दहा फूट (३ मीटर) लांब लेथ यंत्राप्रमाणे दिसते. एका नळकांड्यावर फिरणाऱ्‍या रंगीत चित्रावर फिरून तपासणी करणारा अतिप्रखर प्रकाशझोत त्यात असतो. पहाणी करत असताना तो प्रकाश परावर्तित होतो व यंत्रांच्या साहाय्याने त्याची प्रत्येक मूळ रंगासाठी एक अशा तीन प्रकाश-मार्गात विभागणी होते. प्रत्येक प्रकाशमार्गाला एक पडदा असतो. तो एक मूळ रंग सोडून बाकी सर्व रंग अडवितो. मुळात काळ्‌या दिसणाऱ्‍या भागात तीनही मूळ रंगाच्या खुणा एकत्र करून काळा रंग बनवला जातो.

स्कॅनर संगणकाच्या साहाय्याने प्रत्येक रंगाच्या गडदपणाचे इलेक्ट्रॉनिक चिन्हांमध्ये रुपांतर करतो व इलेक्ट्रॉनिक “निवड” प्रक्रियेने संबंधित बिंदू निर्माण करतो. मग ते बिंदू संगणकाच्या मेमरीत (आठवणीत) साठवले जातात.

आता, फोटो अथवा चित्र, स्कॅनरच्या नळकांड्यावर मावत नसेल अथवा नळकांड्याभोवती वाकत नसेल तर काय? मग त्याचा एक रंगीत फोटो किंवा पारदर्शिका (३५ मि.मि. किंवा मोठी) बनवली जाते व ती त्या नळकांड्यावर चढविण्यात येते. स्कॅनर त्यापासून लहान किंवा मोठी प्रतिमा बनवू शकतो.

पानांची जुळणी केंद्र

यानंतर संगणकामध्ये साठवलेली माहिती पानांची जुळणी केल्या जाणाऱ्‍या केंद्रावर दाखवली जाते. या ठिकाणी कळ-फलक व नियंत्रक असतो जे मोठ्या आकाराच्या दूरदर्शन पडद्यासारखे असते. कळा दाबून चालक पडद्यावर चित्र आणतो. इलेक्ट्रॉनिक उपायांनी, तो रंगांच्या छटामध्ये जरुर ते फेरबदल करतो. बारीक तपशील अधिक स्पष्ट करता येतो किंवा तो गाळता येतो.

याच केंद्रावर वेगवेगळ्या चित्रातील अंश एकत्रित करून एक चित्र तयार करता येते. उदाहरणार्थ, एका चित्रातील सूर्यास्त, दुसऱ्‍यातील एक माणूस व तिसऱ्‍यातील एक घर एकत्र करून सांयकाळी घरासमोर असलेल्या माणसाचे चित्र बनवता येते.

त्याला ठाकठीक केल्यावर मुद्रिते किंवा फिल्म तयार करण्यासाठी चित्राला सूचित करणारी इलेक्ट्रॉनिक चिन्हे संगणकामार्फत इतर यंत्रांद्वारे पाठवली जातात.

रंगीत मुद्रिते तयार करणे

रंगीत मुद्रिते बनवण्यासाठी एका यंत्रात लाल, हिरव्या व निळ्या प्रकाशाच्या झोतांचा उपयोग केला जातो. फोटोच्या दुकानात प्रक्रिया करण्यासाठी दिल्यास तुम्हाला ज्या प्रकारच्या कागदावर फोटो मिळतात तसाच कागद येथे वापरला जातो.

या विभागात काम करणारे अनेक सभासद ही मुद्रिते तपासतात. बहुधा काहींना वाटते की, चित्रातील आकाश पुरेसे निळे नसून वाजवीपेक्षा अधिक हिरवे आहे. “थोडा पिवळा कमी करा,” अशी सूचना इतर करतात. “पण टोपलीतील केळी मात्र इतकीच पिवळी राहिली पाहिजेत,” आणखी एक इशारा करतो. या कारणाने केळांतील पिवळा रंग कमी न करता आकाशातील पिवळा रंग कमी करण्यासाठी रंगांच्या छटामध्ये फेरबदल करणे जरूर असते. ते करण्यासाठी परत पानांची जुळवणी करणाऱ्‍या केंद्राला जावे लागते. तेथे चालक जरुर ते फेरबदल करतो.

आता आपल्याला छापता येईल अशी खरी नक्कल तयार मिळते. या चित्राला मान्यता मिळाली की, फिल्म बनवण्यासाठी पानांची जुळणी करण्याची वेळ झाली असल्याचे संगणकाला सांगितले जाते.

उत्पादन

फिल्म उपकरणाच्या यंत्रात एक लेसर असतो. चिन्हांच्या अनुषंगाने लेसरमध्ये बदल होतो व त्यानुसार फिल्मच्या निगेटिव्हवर इलेक्ट्रॉनिक बिंदू बनवले जातात. प्रत्येक रंगासाठी स्वतंत्र फिल्म बनवली जाते. एका फिल्मवर चित्रातील लाल रंग दाखवणारे बिंदू असतात; दुसऱ्‍यावर सायॅन; तिसऱ्‍यावर पिवळे व चौथ्यावर काळे. नियतकालिकामध्ये ज्या आकारात चित्र येते त्याच आकाराच्या या फिल्म असतात.

चित्रासहित मजकुराची शेवटची जुळणी एका अशा टेबलावर होते ज्याच्या पृष्ठभागावर पांढऱ्‍या रंगाची काच असते व आतून प्रकाशझोत टाकला जातो. आता चित्र दाखवणाऱ्‍या सर्व बिंदूंच्या फिल्मचे तुकडे अनुक्रमानुसार घेतले जातात. फिल्मचे हे संच प्रतिमा-जुळणी करणाऱ्‍या माणसाला दिले जातात. तो फिल्मचा दर्जा बघतो व प्लास्टिकच्या एका वेगळ्या तावावर निगेटिव्हमध्ये शब्द किंवा मजकूराची भर घालतो. हे काम करणारे लोक, प्रत्येक रंग दुसऱ्‍या रंगावर योग्यरित्या बसला असल्याची खात्री करण्यासाठी जाड भिंगाचा उपयोग करतात. तसे नसल्यास चित्र छापल्यावर त्यात विकृती येते.

आता नियतकालिक छापण्यासाठी आपल्यापाशी चित्रे व मजकूर योग्य जागी आहेत. या नियतकालिकाच्या सर्व भागांची मिळून आणखी एक मुद्रिते बनवली जातात. याला मान्यता मिळाल्यावर ते सर्व साहित्य ब्रुकलिन किंवा वॉलकिलमधील कारखान्यात प्लेटरुमकडे पाठविले जाते.

या संचाच्या दुसऱ्‍या प्रती वॉचटावर सोसायटीच्या चौरंगी छपाई करणाऱ्‍या जगातील इतर शाखांकडे पाठवल्या जातात. मग या फिल्मवरुन प्रत्येक शाखेत ऑफसेट प्लेटस्‌ बनवल्या जातात.

प्लेट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जांभळ्या रंगाचा प्रखर प्रकाशझोत फिल्ममधून जाऊन ऑफसेट प्लेटवर चित्र व मजकूर यांचे प्रतिबिंब तयार होते. ही प्लेट ॲल्युमिनियमच्या मिश्रधातूपासून बनवलेली असते व तिच्यावर रासायनिक द्रवाचा थर दिलेला असतो. छपाईच्या नळकांड्यावर बसाव्या म्हणून त्या वाकल्या जातात. पण या किती जाड असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांना वेगवेगळ्या जाडीच्या प्लेटस्‌ लागतात. पण ब्रुकलिनमधील आमच्या कारखान्यात या फक्‍त ८/१,००० इंच इतक्या जाड असतात! न्यूयॉर्क शहराबाहेरील वॉचटावर फार्म येथील कारखान्यात मोठी यंत्रे असल्यामुळे तेथील प्लेटस्‌ जाड असतात.

छपाई यंत्रावर रंगाच्या अनुक्रमाने या प्लेटस्‌ चढवल्या जातात त्यानंतर नियतकालिक छापण्यास आरंभ होतो. छपाई यंत्राची नळकांडी फिरु लागली की, आपापल्या विशेष साठवणीत असलेली एक एक रंगाची शाई प्रत्येक प्लेटला मिळते. धातूच्या प्लेटवरुन शाई, रबर किंवा कापडी आवरण असलेल्या नळकांड्यावर जाते व तेथून कागदावर येते. कागदावर एका नंतर एक असे चारही रंग आले की नैसर्गिक रंगाच्या जवळपासचा रंग मिळतो.

पण अजून काम संपलेले नाही. चार प्रकारच्या रंगांची शाई एकावर एक लावल्याने चिकटपणा येतो. यासाठी तो कागद जलदगतीच्या गरम हवेने वाळवण्याच्या यंत्रातून पुढे सरकतो. गरम तापमानाने शाई चटकन्‌ वाळते. मग, तपमान कमी करून शाई घट्ट करण्यासाठी पाण्याने थंड केलेल्या फिरत्या रुळावरुन तो गरम कागद जातो.

रंगांची मर्यादा

या प्रक्रियेत मूळ फोटो किंवा चित्रातील रंगांची किती चांगली प्रतिकृती बनते? मानवी डोळ्यांना दिसते त्याची प्रतिकृती कोणत्याही यंत्राला करता येत नाही. मानवी डोळ्याला रंगाच्या पन्‍नास लाख ते एक कोटी छटा दिसतात! पण एखादे ऑफसेट यंत्र केवळ पाचशे ते हजार छटा छापू शकते. यामुळे मूळ चित्रातील स्वच्छ पांढरा किंवा गडद रंगाच्या बारकाव्याची नक्कल आपल्याला करता येत नाही.

महत्त्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे छपाईसाठी वापरण्यात येणारा कागद. कागदाचा प्रकार व त्याची घडण तसेच या प्रकारच्या कागदावर शाई किती परिणामकारकरित्या उमटविली गेली आहे यामुळे रंगाच्या तेजावर मर्यादा येते. टेहळणी बुरुज तसेच ही माहितीपत्रके यांना लागणाऱ्‍या कागदाच्या प्रकारावर मर्यादा पडण्याचे कारण म्हणजे जगभर गरीबांसह लाखो लोकांना ही नियतकालिके झटकन्‌ उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांची किंमत कमीत कमी असावी असे आम्हास वाटते.

आमचे काम नफ्याविना असल्यामुळे वाचकांना किंमत कमी पडते. हे नियतकालिक छापणाऱ्‍या जगातील वॉचटावरच्या सर्व शाखांमधील हजारो कामगार पूर्ण वेळेचे स्वयंसेवक आहेत. हे, कमी किंमत असण्यातील आणखी एक कारण होय. यांना फक्‍त अन्‍न, निवारा व महिन्याला खर्चापोटी लहानशी रक्कम मिळते.

कष्टाचे चीज

रंगीत नियतकालिके पाहणाऱ्‍या साधारण व्यक्‍तीला, मजकूर लिहिण्यापासून ते त्याची छपाई होऊन त्याच्या घरापर्यंत पोहचवण्यात गोवलेल्या अपार कष्टांची व तंत्राची सुरवातीस कदाचित जाणीव होणार नाही. वस्तुतः एखादे नियतकालिक छापण्यास लागणारे परिश्रम, इंग्रजीतील अवेक! तसेच वॉचटावर मासिकांच्या लक्षावधी प्रतींचे मुद्रण करण्यास लागतात तितकेच असतात.

पण त्या कष्टांचे चीज होते. नैसर्गिक रंगांमुळे छापील गोष्टी अधिक रसपूर्ण व आकर्षक होतात आणि वाचण्यास उत्तेजन देतात. आपल्या निर्मात्याने आपल्याला रंग बघण्याची क्षमता दिली असल्याने आपण रंगांना अनुकूल प्रतिसाद देतो हे उघड आहे. या कारणासाठी नियतकालिकांची नियमित चौरंगी छपाई इष्ट वाटते. आपली छपाई अधिक चांगली कशी करावी हे शिकत असताना आमचे नियतकालिक अधिक फायदेशीर व आनंददायक करण्यासाठी आम्ही त्याची गुणवत्ता अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करीत राहू. (g87 1/8)

[२१ पानांवरील चित्रं]

चालक स्कॅनर तयार करीत आहे

आतील चित्रः चित्राचा मोठा केलेला भाग

[२२ पानांवरील चित्र]

पानांची जुळणी करणाऱ्‍या केंद्रावर काम करीत असलेला चालक

[२३ पानांवरील चित्र]

रंगीत मुद्रितांची मूळ पारदर्शिकेसोबत तुलना करताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा