तरुण लोक विचारतात . . .
कोण म्हणतो ती नुसती भुरळ आहे?
“तुम्ही नवयौवनात येताना तुम्हावर कोणाची भुरळ पडली होती का?” असे अवेक! च्या वार्ताहराने २१ ते ७० वयाच्या प्रौढांच्या एका गटाला विचारले. तात्काळ काय प्रतिसाद मिळाला? हशा आणि आठवणींची वावटळ!
“चांगलीच पडली की!” जेरी उत्तरला.a “मी नुकताच नवयौवनात प्रवेश केला होता; आणि माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या अशा एका मुलीची मला जबरदस्त भुरळ पडली. ती सुंदर होती—काय ते टप्पोरे डोळे! पण मी माझ्या भावना लपवून ठेवल्या. माझ्या आईला देखील, ती मुलगी मला किती आवडायची हे समजू शकले नाही.”
आता विवाहीत असलेल्या व्हॅलरीने आठवून सांगितलेः “माझ्या कला-शिक्षकांची मला भारीच भुरळ पडली होती. ते इतके छान दिसत.” दोन मुलांची आई, जेन पुढे सरत म्हणालीः “मी नवयौवनात असताना माझ्या आवडत्या पार्श्वगायकाची मला भुरळ पडली. त्याच्या कार्यक्रमांना पुढल्या रांगेत जागा मिळावी म्हणून मी सकाळी लवकर उठत असे. एकदा दोन मुली आणि मी त्याच्या वेशभूषा कक्षाकडे धावत गेलो! पण शेवटी त्याला पाहिल्यावर मी नुसती आ वासून उभी राहिले.” गटातील एका वयस्क सभासदालाहि सिनेतारकाची भुरळ पडल्याची आठवण आहे!
होय, प्रौढांच्या कोणत्याही गटाला विचारा, तुम्हाला दिसेल की, जवळजवळ सर्वांना लहानपणी मोह किंवा भुरळ पडली होती. बहुधा ती शिक्षक, गायक, वयाने मोठे ओळखीचे अशा अवाक्याबाहेरील व्यक्तींवर केंद्रित झाली होती. मानसशास्त्रज्ञ कॅथी मोरिका म्हणतातः “भुरळ ही वाढीचा एक भाग आहे आणि बहुतेक सर्वांनाच ती पडते.” आणि बहुतेकजण आत्मसन्मान व विनोद बुद्धिसह त्यातून सहीसलामत बाहेर पडतात आणि विशेष म्हणजे काही वर्षांनंतर बहुतेक जण त्या अनुभवाबद्दल हसतात सुद्धा.
तथापि, भुरळ पडते तेव्हा हसण्यासारखे काही दिसत नाही. जेरी आठवण करून म्हणालाः “मी नाऊमेद झालो होतो, कारण मला त्या बाबतीत काही करता येत नव्हते. ती माझ्यासाठी फार मोठी होती हे मला कळत होते, पण ती मला आवडली होती. आणि त्या सर्व प्रकारामुळे मी पार खचलो होतो.” व्हॅलरी पुढे म्हणालीः “माझे माझ्या शिक्षकाशी लग्न झाले असल्याची कल्पना मी करत असे. आम्हाला चार मुले असणार व आम्ही एका सुंदर घरात राहणार असे वाटत होते. त्यांना विसरणे फारच कठीण गेले.”
जी व्यक्ती तुम्हाला कधीही मिळणार नाही अशांवर प्रेम जडविण्याने भावना फार दुखावल्या जातात. शिवाय तुम्हाला वाटत असलेली भावना ही बालिश भुरळ आहे असे इतरांनी सांगितल्याने फायदा होत नाही. तुमच्या दृष्टीने तुमच्या भावना खऱ्या असतात! ‘मी प्रेमात पडलो (पडले) आहे, असे सांगितल्यास कोणी माझ्यावर का विश्वास ठेवत नाहीत?’ असा प्रश्न तुम्हाला पडतो.
भुरळीची रचना
“प्रीती देवापासून आहे,” असे प्रेषित योहान म्हणतो. (१ योहान ४:७) त्यामुळे अशी भावना अनैतिक वा अयोग्य नसल्यास (उदाहरणार्थ, कोणा विवाहिताविषयी) कोणाबद्दल जवळीकीची भावना वाटणे हे काही पाप नव्हे. परंतु ख्रिस्ती प्रीती ही तत्त्वावर आधारित असते, मनोविकारावर नाही. (१ करिंथकर १३:४-७ पडताळा.) तसेच, पवित्र शास्त्र अशा प्रीतीचा संबंध तरुणांशी नव्हे तर आध्यात्मिकरित्या दृढ किंवा “प्रौढ” ख्रिस्तीजनांशी जोडते.—इफिसकर ४:१३-१५.
लहान वयात बहुदा तुमच्या विचारांवर व कृतींवर “तरुणपणाच्या वासनां”चा अंमल चालतो. (२ तीमथ्य २:२२) खरे म्हणजे, वयात येताना नवीन व प्रखर भावनांची गर्दी होते. अशा वासनांवर ताबा कसा मिळवावा हे शिकण्यास आपल्यातील बहुतेकांना अनेक वर्षे लागतात. द इंडिव्हिड्युअल, मॅरेज ॲण्ड फॅमिली या पुस्तकात म्हटले आहेः “आपल्या समाजाने प्रणयी प्रेमाच्या महत्त्वावर अतिशय भर दिल्याने (मानसिक) तयारीच्या फारच आधी व प्रणयी प्रेमास योग्य अशा व्यक्तीशी गाठ पडण्यापूर्वीच तरुण व्यक्ती प्रीतीच्या परिपूर्तिची स्वप्ने पाहू लागते.”
प्रणयी प्रेमाच्या भावनांचा पूर येणे व त्यांचा वर्षाव ज्यावर करावा अशी व्यक्तीच नसणे हे किती निराशाजनक आहे! याशिवाय, अनेकदा “मुलांपेक्षा लहान वयात मुली समतोल साधतात व समाजात उठ-बस करण्यास सरावतात,” असे निरिक्षण सेव्हन्टीन या नियतकालिकाने केले. परिणामी, “(मुलींना) त्यांच्या शिक्षकांच्या (वा इतर अशक्यप्राय पुरुषांच्या) तुलनेत आपले पुरुष-सहाध्यायी अपरिपक्व व अनुत्तेजक वाटतात.” अशा रितीने, एखादा आवडता शिक्षक, गायक, किंवा वयाने मोठा असलेला कोणी ओळखीचा पुरुष “योग्य” माणूस आहे अशी एखाद्या मुलीची कल्पना होते. मुलेही अशीच मोहात पडू शकतात.
परंतु, त्या शिक्षकाशी अथवा गायकाशी खरी प्रीती जुळण्याची शक्यता शून्य असते. तेव्हा अशा दूरच्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या प्रेमाचे मूळ वास्तवतेपक्षा कल्पनेतच असते हे उघड आहे. द इंडिव्हिड्युअल, मॅरेज ॲण्ड फॅमिली च्या मते अशा मोहाची प्रवृत्ती “क्षणभंगुर” असते यात आश्चर्य नाही. किंवा टीन नियतकालिकाने म्हटल्याप्रमाणे, “बहुतेक नवयौवनांत भुरळ पडणे हे पडसे होण्याइतके सामान्य आहे.” परंतु, आपल्याला खरे प्रेम जाणवत असल्याचा आग्रह धरून काही तरूण आपली दिवास्वप्ने सोडत नाहीत.
भुरळ—निरुपद्रवी की अपायकारक?
“पण भुरळ पडण्याचा अनुभव जवळजवळ सर्वांनाच येत असल्यास त्यात नुकसान ते काय?” असे तुम्ही विचाराल. तसे म्हटल्यास, ‘जवळजवळ सर्वांनाच’ गोवर झालेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की भुरळ पडणे हे अपायकारक असू शकते.
एक गोष्ट म्हणजे, नवयौवनांना ज्यांच्याविषयी आपुलकी वाटत असते अशा अनेक व्यक्ती ख्रिस्तीजनांच्या आदरास पात्र नसतात. एक बुद्धिमान माणूस म्हणालाः “मूर्खत्व अतिप्रतिष्ठित स्थानी स्थापित होते.” (उपदेशक १०:६) या कारणास्तव त्याचा आवाज अतिशय गोड आहे वा तो दिसावयास फारच सुंदर आहे म्हणून एखाद्या गायकाची भक्ती केली जाते. पण त्याची नीती कशी आहे? अनेक रॉकस्टार्सची राहणी मूर्खपणाची नाही का? पवित्र शास्त्र ख्रिस्तीजनांना असाही इशारा देतेः “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे.” (याकोब ४:४) ज्याची वागणूक देवाला नापसंत आहे, अशा व्यक्तीला आपले हृदय तुम्ही बहाल केल्यास, तुमची देवाशी असलेली मैत्री धोक्यात येणार नाही का? तसेच विवाहीत व्यक्तीविषयी अनुरागाची भावना बाळगणे हे चूक आहे.—नीतीसूत्रे ५:१५-१८.
पवित्र शास्त्र आणखी असे म्हणतेः “तुम्ही स्वतःला मूर्तीपासून दूर राखा.” (१ योहान ५:२१) भक्तीचा केंद्रबिंदू असलेल्या व्यक्तीचे जीवन बरेचसे वाजवी असले तरी हे तत्त्व येथे लागू आहे. एखाद्या तरुणाच्या खोलीच्या सर्व भिंती कोणा आवडत्या गायकाच्या चित्रांनी भरल्या असल्या तर तुम्ही त्याला काय म्हणाल? यात व मूर्तिपूजेत धक्कादायक साम्य नाही का? एक मुलगी, तिच्या आवडत्या गायकाबद्दल म्हणतेः “मी त्याची मुळीच भक्ती करीत नाही.” पण ती हे देखील कबूल करते की, “मी या विशिष्ट व्यक्तीविषयी सतत विचार करत असते. . . . मला, या व्यक्तीला माझ्या मनातून काढून टाकलेच पाहिजे.”
काहींची दिवास्वप्ने खरोखरीच शहाणपणावर मात करतात. एका लोकप्रिय गायकाबद्दल पडलेल्या मोहाविषयी दुसरी एक मुलगी लिहितेः “तो माझा मित्र व्हावा असे मला वाटते, आणि ते खरे व्हावे म्हणून मी प्रार्थना केली आहे! मी त्याच्या गाण्यांच्या संचासोबत झोपत असे कारण मला इतकेच त्याच्याजवळ जाता येत होते. मी अशा स्थितीला पोहंचले आहे की मला तो न मिळाल्यास मी आत्महत्या करीन.” असा अविचारी आवेग, “मर्यादेने आपण त्याची सेवा करावी” अशी आज्ञा देणाऱ्या देवाला पसंत पडेल का?—रोमकर १२:३.
नीतीसूत्रे १३:१२ मध्ये पवित्र शास्त्र म्हणतेः “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” एखाद्या अशक्य नातेसंबंधाविषयी प्रणयी “आशा” जोपासल्याने तुम्ही अक्षरशः कष्टी होऊ शकता. “औदासिन्य, काळजी, दुःखी स्वभाव, झोप न येणे, सुस्ती, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास” यांचे एक कारण म्हणजे प्रतिसाद न मिळालेले प्रेम, असे डॉक्टर म्हणतात.
तसेच विचार करा, आपल्या जीवनावर काल्पनिक गोष्टींची सत्ता चालवू दिल्यास तुम्ही किती अनर्थ करता. “शाळेत लक्ष न घालणे,” हे अनिर्बंध भुरळ पडल्याचा पहिला पुरावा आहे असे डॉ. लॉरेन्स बोमन यांचे निरिक्षण आहे. भुरळ पडण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे मित्र-मैत्रिणीं व परिवारापासून दूर राहणे. (पडताळा नीतीसूत्रे १८:१.) इतर सर्वांकडे दुर्लक्ष करून एका लोकप्रिय गायकावर “प्रेम” करणाऱ्या एका तरुण मुलीने कबूल केले की, “माझा परिवारही माझ्या वागणुकीने अस्वस्थ झाला होता.”
भयानक परिणाम झाले नाहीत तरी स्वतःचेच हसे करून घेण्याची मानखंडणा असतेच. लेखक गिल श्वार्टझ् म्हणतातः “मला कबूल करण्याची लाज वाटते, पण ज्यूडीची भुरळ पडली असताना मी माकडासारखा वागलो.” भुरळ उतरल्यावर बऱ्याच कालानंतर, कोणाच्या पाठीमागे फिरल्याच्या वा लोकांमध्ये शोभा करण्याच्या आठवणी रेंगाळत राहतात.
तथापि, सुरवातीस उल्लेख केलेल्या प्रौढांप्रमाणे बहुतेक तरुण आपोआप भुरळीतून बाहेर पडतात हे चांगले आहे. जे बाहेर पडत नाहीत, त्यांना नंतरचा याविषयीचा लेख मदत करील, पण तोपर्यंत भुरळ म्हणजे तारुण्यातील दिवास्वप्ने होय हे जाणून घ्यावे हा उत्तम सल्ला होय.
‘प्रेम करून हरण्यात’ कदाचित काही तथ्य असेल. परंतु, आशारहित मोहाला तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ देऊ नका वा तुमच्या भावनांना वाया घालवू देऊ नका. हे किती निष्फळ आहे याची आठवण करताना लेखक गिल श्वार्टझ् म्हणतातः “ज्यूडी मिळावी म्हणून मला खूप आवेग होता व मी खूप मनसुभेही केले. तरी मला खात्री आहे की, तिने माझा कधी विचारही केला नसेल.” (g87 1/8)
[तळटीपा]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.
[१५ पानांवरील चित्र]
वयाने मोठ्या—उपलब्ध नसलेल्या—विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीची भुरळ पडणे फारच साधारण आहे