दहशतवाद—याला उपाय काय?
तुम्ही कधी विमानाने प्रवास केला असेल तर दहशतवादाचे परिणाम तुम्ही स्वतः पाहिलेच आहेत. बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी सक्तीची आहे. दहशतवादामुळे कराव्या लागणाऱ्या उपायापोटी सरकारांना व विमान कंपन्यांना अमाप पैसा खर्च करावा लागत आहे. लॉस एंजलिस येथील १९८४ च्या ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी सुरक्षेसाठी अमेरिकन सरकारला ६ कोटी ५० लाख डॉलर्स खर्च आला. हे उपाय किती परिणामकारक असतात?
काही बाबतीत ते किफायतशीर ठरले आहेत. गेल्या २० वर्षांत एकट्या अमेरिकेत जवळपास ३५,००० पिस्तुले व स्फोटक वस्तु सापडल्या आहेत, आणि १३,००० लोकांना पकडण्यात आले. (डिपार्टमेंट ऑफ स्टेट बुलेटिन) एल ॲल या इस्राएलच्या विमान कंपनीने अत्यंत कडक सुरक्षा तपासणीमुळे दहशतवादाला जबरदस्त आळा घातला.
तरीपण, सरकार व सुरक्षा संस्था कारणांपेक्षा लक्षणांवर उपाय करीत आहेत. द्वेष व स्वार्थावर आधारीत असणारा जो रोग आधुनिक समाजात खोलवर गेलेला आहे, त्यावर त्यांच्या उपायांचा परिणाम होत नाही. त्यांची तत्त्वप्रणाली कोणतीही असली तरी अनेक अन्याय व असमानता वाढत आहेत. तेव्हा यावर तोडगा कोठे सापडू शकेल बरे? धर्म द्वेषाला प्रेमात बदलू शकतो का? राजकारण विभक्ततेतून एकता आणू शकते का? संयुक्त राष्ट्र संघ खरोखरच राष्ट्रांची एकता करू शकेल का? किंवा आणखी काही उपाय आहेत?
धर्माकडे उपाय आहे का?
उत्तर आयर्लंडमध्ये १९६९ पासून चालू असलेल्या दहशतवादात एका देशात २,००० पेक्षा अधिक लोक प्राणाला मुकले असून २०,००० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. तेथील दोन्ही प्रतिस्पर्धी “देव प्रीती आहे” या तत्त्वावर आधारीत ख्रिस्ती संस्कृतीचा वारसा दोघांनाही असल्याचे मानतात. (१ योहान ४:८) तरीही, कॅथोलिक व प्रॉटेस्टंट दहशतवाद चालूच आहेत. रिलिजन ॲण्ड द नॉर्दर्न आयर्लंड प्रॉबलेम या पुस्तकात जॉन हिके लिहितातः “फक्त रोमन कॅथोलिक किंवा प्रॉटेस्टंट असल्यामुळे धोका व मृत्यु मान्य करणे, उत्तर आयर्लंडच्या विशिष्ट धाटणीचा “दहशतीचा समतोल” राखण्याचा मार्ग म्हणून निर्दय सूड—सांप्रदायिक खून—मान्य करणे . . . आता शक्य झाले आहे.”
तेच लेखक असेही म्हणतातः “[उत्तर आयर्लंडमधील] राजकारण हे धर्माचा अयोग्य फायदा घेणारे राजकारण नाही. . . . तेथे धर्म राजकारणास प्रोत्साहन देत आहे हे म्हणणे अधिक सुयुक्त आहे.” आणि तसे असल्यास, ते परस्पर खुनाचे व सूडाचे राजकारण आहे.
बहुतेक सर्वच धर्म प्रेम या मूलभूत शिकवणीचा प्रसार करीत असल्याचा दावा करतात. पण तेच बहुतेक दहशतवाद्यांची आधीची पार्श्वभूमीही धार्मिक स्वरुपाची असते—कोणी ख्रिस्ती, यहुदी, मुस्लीम, बौद्ध, हिंदू, शीख किंवा इतर धर्म जोपासत असल्याचा दावा करतात. पण त्यांचा धर्म त्यांच्या कृतीवर केवढा परिणाम करतो? द अल्टिमेट वेपन—टेररिस्टस् ॲण्ड वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकात जेन श्रेबर यांनी आय.आर.ए. पुढारी रुईरी ओ’ब्रॅडाइ यांचे शब्द उद्धृत केले आहेतः “मी एकदा एक निष्ठुर माणसाबरोबर होतो. ब्रिटीश सैनिकांच्या तुकडीखाली फुटावा म्हणून आम्ही सुरुंग पेरीत असू. . . . आणि ते अगदी अचूक निशाणावर आले. तेव्हा या कठीण हृदयाच्या गृहस्थाने काय केले? सुरुंग फोडून त्या सर्वांच्या चिंध्या करण्यासाठी तारा जोडण्याच्या क्षणभर आधी त्याने आपले डोळे मिटून घेतले. मग त्याने आपल्या छातीवर क्रुसाचे चिन्ह केले व श्रद्धेने पुटपुटला: ‘आता त्यांच्या आत्म्यांवर प्रभुची कृपा असो!’”
स्पेनमधील उजव्या पक्षाच्या कॅथोलिकांना गेरिलेरोस डेल क्रिस्टो रे अथवा ख्रिस्त राजाचे गनीम म्हणून ओळखला जाणारा आपला दहशतवादी गट बनवण्यात धर्माची अडचण आली नाही. दे टेरेरिस्टस् या पुस्तकांच्या लेखकांच्या मते, “राजकारणाइतकाच धर्मही गेरिलेरोसच्या अस्तित्वाला कारणीभूत आहे.”
दहशतवादाला थांबवण्यातील धर्माच्या अपयशाने आपल्याला आश्चर्य वाटावे का? कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक सी. इ. झोपो लिहितातः “राजकीय हेतूंसाठी हिंसेच्या वापराला तोंड देण्याची वेळ आल्यावर, पश्चिमेच्या संघटित धर्मांनी, आपल्या अनुयायांमध्ये ज्या नैतिक अधिकारांचा ते पुरस्कार करीत होते तेच आपल्या धार्मिक शत्रूंना नाकारले. . . . व त्या ‘नास्तिकां’विरुद्ध दहशतवादाला परवानगी दिली.” पोप दुसरे उर्बन यांच्या काळातील होली क्रुसेड (पवित्र धर्मयुद्ध) चे उदाहरण देऊन ते पुढे लिहितातः “त्या क्रुसेडने इस्लाम कायमचा नामोहरम होईल अशी अपेक्षा होती व म्हणून ते ‘युद्धे संपवणारे युद्ध’ मानले गेले. इस्लाम हा सर्व अभद्र गोष्टींचा साक्षात पुतळा समजला जात असे. म्हणूनच, शत्रु ख्रिस्ती सैनिकास ठार करण्याबद्दल एखाद्या ख्रिस्ती सैनिकाला चाळीस दिवस पश्चाताप करावा लागे, पण मुस्लीमांना ठार करणे हे ‘सर्व पश्चातापातील उत्तम’ ठरले होते.”—द रेशनलायझेशन ऑफ टेररिझम.
इतर धर्मातही श्रद्धाहीन किंवा ‘नास्तिक’ यांना मारण्यात पुण्य समजतात. त्यांच्या स्वर्गीय नंदनवनाचा तो प्रवेश-परवाना असल्याचा त्यांचा विश्वास आहे. म्हणून एखाद्या दहशतवाद्याचा धार्मिक विश्वास, त्याच्या खून करण्याच्या तसेच आत्मघातक विस्फोट करण्याच्या प्रवृत्तीला बळकटी देऊ शकतो.
एखादा राजकीय उपाय आहे का?
दहशतवादावर पश्चिमेतील राजकीय व लष्करी तज्ञांपाशी त्यांचे उपाय आहेत. परंतु ते लागू करण्यात त्यांच्यामध्ये नेहमीच एकजूट अशी नसते. सध्या आगीने आगीशी मुकाबला करण्याचे (दहशतवादाला) बळी जाणाऱ्या राष्ट्रांचे धोरण आहे. सी.आय.ए. (सेंट्रल इंटेलिजंस एजंसी) चे संचालक विल्यम केसी म्हणतातः “परिस्थितीला अनुलक्षून, दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी, त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, जेथे बळाचा वापर करणे योग्य असेल तेथे जबरीची कार्यवाही करण्यापासून आम्ही थांबवू शकणार नाही व थांबणारही नाही. दहशतवादी गटांविरुद्ध कृती करण्यासाठी जरुर ते विशिष्ट बळ व सामर्थ्य अमेरिकेसह अनेक देशांकडे आहे.”—हायड्रा ऑफ कार्नेज.
बर्लिनमधील एका नाईट क्लबमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटाचे उत्तर म्हणून अमेरिकेने १९८६ च्या एप्रिलमध्ये लिबियावर केलेल्या हल्ल्यात त्यांचे हे तत्त्वज्ञान स्पष्ट होते. याची (तत्त्वज्ञानाची) किंमत तात्काळ मोजावी लागते—अमेरिकन अधिकाऱ्यांच्या दृष्टीने अपरिहार्य असा लिबियातील नागरिकांचा मृत्यु व कर्मचाऱ्यांसह अमेरिकेच्या एका विमानाची हानी. दहशतवाद व प्रतिदहशतवादाला छुपी किंमतही मोजावी लागते—प्रतिष्ठा व विश्वसनीयता.
छुप्या युद्धाच्या या प्रकारात हे साधारण त्याग आहेत असा राजकारणी व लष्करी लोकांचा दृष्टीकोण आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी लिहिल्याप्रमाणे “दहशतवादाने धोक्यात आलेल्या लोकसत्ताक राज्यातील सर्व नागरिकांनी स्वतःला एकापरीने सामाईक लढ्यातील सैनिक मानले पाहिजे. दहशतवादापुढे शरणागती पत्करण्यास त्यांनी आपल्या सरकारवर दबाव आणू नये. . . . दहशतवादाविरुद्ध लढा जिंकण्याची आपली गाढ इच्छा असेल तर त्याग व प्रिय जनांची हत्या झाल्यास, असीम दुःख सोसण्याची लोकांची तयारी असली पाहिजे.”—टेररिझम—हाऊ द वेस्ट कॅन विन.
तर मग, दहशतवादाच्या मुळाशी असलेली कारणे राजकारणाने काढून टाकता येतील का? अन्याय दूर करता येतील का व परिस्थिती आटोक्यात आणता येईल का? राजकीय टिकाकारांच्या मते ते शक्य नाही. का नाही? कारण आपण मागील लेखात पाहिल्याप्रमाणे बराचसा दहशतवाद हा दोन मोठ्या राजकीय व्यवस्थांमधील झगड्यातील अनेक शस्त्रापैकी एक आहे असे ते म्हणतात. यावरुन राजकारणामुळे दहशतवाद होतो.
उदाहरणार्थ, फ्रेंच लेखक व वार्ताहर जीन-फ्राँसुआ रेव्हेल यांनी लिहिलेः “दहशतवादी, त्यांच्या जाहीरनाम्यात व पुस्तकात लोकशाहीवरील त्याच्या हल्ल्यांचा उल्लेख ‘तणावाचा डाव’ असा करतात. लोकशाहीकडून साम्यवादाकडे जाण्यापेक्षा हिटलरशाहीकडून साम्यवादाकडे जाणे अधिक सोपे असावे अशी कल्पना आहे. यासाठी ‘क्रांतीकारकांनी’ प्रथम लोकसत्ताक सरकारांना हिटलरशाही पद्धतीच्या वागणुकीकडे लोटले पाहिजे. म्हणजे दुसऱ्या टप्प्यात हिटलरशाहीच्या राखेवर समाजवाद उभारता येईल.” अशा रितीने, काही देशांमध्ये उजव्या लष्कराचा उठाव घडवून आणण्यासाठी दहशतवादी जाणूनबुजून लष्करी अधिकाऱ्यांची हत्या करतात.
या प्रवाहाला संयुक्त राष्ट्र संघ थोपवू शकेल का?
राज्यशास्त्रज्ञ सी. इ. झोपो यांनी संयुक्त राष्ट्र संघ ज्या पेचात पडला आहे त्याचे विश्लेषण केलेः “आंतरराष्ट्रीय दहशतवाद म्हणजे काय व सभासद राज्यांची त्याला योग्य ती प्रतिक्रिया काय असावी याविषयी संयुक्त राष्ट्र संघात एकता होऊ शकली नाही. . . . हे आश्चर्यजनक नव्हे.” संयुक्त राष्ट्र संघ हा एक आंतरराष्ट्रीय आखाडा असून त्यात झुंजणाऱ्या वळूंप्रमाणे दोन्ही मोठ्या शक्ती आपसात शिंगे अडकवून लढतात व शब्दच्छलात अडकून बसतात.
दुसरे कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघामध्ये दहशतवादाचे बळी झालेले लोकसत्ताक देश संख्येने कमी आहेत. झोपो यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, “आंतरराष्ट्रीय दहशतवादावर संयुक्त राष्ट्र संघाच्या एका आम सभेने केलेल्या ठरावात . . . ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या कृत्यांमुळे (ते) अतिशय अस्वस्थ झालेले’ असले तरी ‘साम्राज्यवादी व जातीय अमलाखालील लोकांच्या स्वयंनिर्णयाच्या व स्वातंत्र्याच्या, न हिरावता येण्याऱ्या, हक्कावर पुन्हा जोर देण्यात आला.’” याच ठरावाने “स्वयंनिर्णयाचा व स्वातंत्र्याचा कायदेशीर हक्क लोकांना नाकारण्यासाठी, साम्राज्यवादी, जातीय व परक्या अमलांनी चालवलेल्या दडपशाहीच्या दहशतवादी कृत्यांचा” धिक्कार केला.
अशा रितीने, झोपोच्या मते, संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरण अवलंबले आहे. ते पुढे म्हणतातः “राष्ट्रीय स्वयंनिर्णयाचे साधन असल्यास दहशतवाद क्षम्य असतो व स्वातंत्र्य रोखण्यासाठी सरकारी दहशतीच्या स्वरुपात तो धिक्कारला जातो असे सूचित होते. मुक्तीसाठी साधन म्हणून दहशतवाद वापरुन नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांना इतरांमध्ये त्याचा धिक्कार करणे अवघड वाटते.” (द रॅशनलायझेशन ऑफ टेररिझम) या कारणास्तव दहशतवादाविरुद्ध परिणामकारक साधन या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघ अगदी कूचकामी आहे. नीतीमत्तचे काही चालत नाही, कारण झोपोंच्या अनुमानाप्रमाणे “मुळात राजकारण नीतीची व्याख्या ठरवते.” आणि एकीकडे दहशतवादाचे निरपराध बळी क्लेश सोसतात व मरतात.
दहशतीविना बंधुत्व
राष्ट्रांपुढील पेचप्रसंग सांगताना जेन श्रेबर म्हणतातः “जगातून दहशतवाद नाहीसा करण्याची इच्छा असलेल्या देशांना—आणि ते बहुसंख्य असल्याचे दिसत नाही—अर्धवट उपायांवर समाधान मानावे लागते ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. एकतर आपल्या विचारसरणीसाठी त्याग करण्यास वाहून घेतलेल्या दहशतवाद्यांवर सामान्य शिक्षांचा काहीही परिणाम होत नाही; किंवा अजून लढू शकणाऱ्यांकडून त्यांचा जबर प्रतिकार होतो.—द अल्टिमेट वेपन—टेररिस्टस् ॲण्ड वर्ल्ड ऑर्डर.
या समस्येच्या विश्लेषणाच्या शेवटी प्राध्यापक झोपो अनुमान काढतातः “दहशतवादविना क्वचितच एखाद्या आधुनिक देशाचा जन्म झाला असेल.” यावरुन असे सूचित होईल की, दहशत हा राजकीय प्रक्रियेचा अटळ घटक आहे. तरी, दहशत किंवा हिंसा—राजकीय मध्यस्थीविना एक “राष्ट्र” बनलेले असल्याचे आम्ही खात्रीने सांगू शकतो. सर्व जगातील, वेगवेगळ्या संस्कृती, भाषा व धर्मातून घेतलेल्या सदतीस लाखाहून अधिक लोकांचे ते राष्ट्र आहे. ते कोण आहेत? हे माहितीपत्रक घेऊन तुमची भेट घेणारे ते लोक, यहोवाचे साक्षीदार, आहेत.
ते आंतरराष्ट्रीय बंधुत्वापेक्षा अधिक आहे. एकच विश्वास व देवप्रवृत्त आशा असलेल्यांचे ते राष्ट्रातीत (राष्ट्रांहून वरच्या प्रतीचे) बंधुत्व आहे. दहशतीने नव्हे तर पवित्र शास्त्रातील शांतीच्या शिक्षणाने ते आपला प्रभाव जगभर पसरवीत आहेत. पृथ्वीवरील बहुतेक सर्व देशांमध्ये, ख्रिस्तामार्फत चालणारे देवाचे राज्य हा मानवजातीच्या समस्यांवरील एकमेव तोडगा असल्याची ते शिफारस करतात.—मत्तय ६:९, १०.
होय, युद्ध व दहशतवादामध्ये परिणत होणाऱ्या विघटनकारक राजकारण व राष्ट्रवादापेक्षा यहोवाच्या साक्षीदारांनी वरची पातळी गाठली आहे. आज, खऱ्या शांतीत राहणारा समाज त्यांनी बनवला आहे व पृथ्वीवर देवाच्या राज्याचा अंमल असेल अशा निकटच्या काळाच्या तयारीत ते आहेत. ही गोष्ट जगाचे मतपरिवर्तन करून नव्हे तर हर्मगिदोनाच्या देवाच्या युद्धामध्ये जगाची स्वच्छता करून होईल.—मत्तय २४:३७-३९; प्रकटीकरण १६:१४, १६.
तेव्हा खरी शांती व अनंतकालिक जीवन, जगातील लीन लोकांच्या वाट्याला येईल. (तीत १:२; प्रकटीकरण २१:३, ४) जेथे दहशतवादाचा मागमूस नसेल अशा या राज्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आपल्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा तुमच्या देशातील या माहितीपत्रकाच्या प्रकाशकांना लिहा. (g87 1/8)
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
गेल्या २० वर्षांत एकट्या अमेरिकेत जवळपास ३५,००० पिस्तुले वा स्फोटक वस्तु सापडल्या आहेत, व १३,००० लोकांना पकडण्यात आले.—डिपार्टमेंट ऑफ स्टेट बुलेटिन
[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“सुरुंग फोडून त्या सर्वांच्या चिंध्या करण्यासाठी तारा जोडण्याच्या क्षणभर आधी त्याने आपले डोळे मिटून घेतले. मग त्याने आपल्या छातीवर क्रुसाचे चिन्ह केले व श्रद्धेने पुटपुटला: ‘आता त्यांच्या आत्म्यांवर प्रभुची कृपा असो!’”
[१४ पानांवरील चौकट]
ख्रिस्ताच्या हातातील देवाचे राज्य दहशतवादाला निपटून टाकील
दहशतवाद म्हणजे, आपले नुकसान होत आहे अशी भावना असलेल्या आशारहित लोकांनी केलेले युद्ध, असे म्हटले जाते. देवाच्या राज्याखाली कोणालाही आपले नुकसान होत असल्याच्या भावनेची गरजच पडणार नाही. हे येशू ख्रिस्ताच्या अंमलाविषयी खालील भविष्यवादावरुन दिसून येईलः
“हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन व राजपुत्राला आपले नीतीमत्व दे. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो. तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करो. तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्यांच्या मुलाबाळांचे तारण करो. तो जुलूम करणाऱ्यांस चिरडून टाको. कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ ह्यांना तो सोडवील. दुबळा दरिद्री यांच्यावर तो दया करील. दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील. आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल.”—स्तोत्रसंहिता ७२:१, २, ४, १२-१४.