वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr8-1 पृ. ६-८
  • दहशतवाद—त्यामागे काय आहे व का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दहशतवाद—त्यामागे काय आहे व का?
  • सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तर आयर्लंडमध्ये दहशत का?
  • दहशतवादामागील हेतू
  • भेद्य समाज
  • दहशतवाद आणि दोन विरुद्ध विचारधारा
  • दहशतवाद आणि पवित्र शास्त्रातील भविष्यवाद
  • दहशतवाद—कोणावर परिणाम होतो?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • दहशतवाद—याला उपाय काय?
    सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • रक्‍ताच्या शाईने लिहिलेला इतिहास
    सावध राहा!—२००६
  • सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!
    सावध राहा!—२००६
अधिक माहिती पाहा
सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
gbr8-1 पृ. ६-८

दहशतवाद—त्यामागे काय आहे व का?

“लंडन, एप्रिल १७—मुअम्मर एल गदाफींच्या सरकारविरुद्ध निषेध करणाऱ्‍या जमावावर लिबियाच्या राजदूतावासातून झालेल्या मशीनगनच्या गोळीबारात एक महिला पोलिस अधिकारी मारली गेली व १० लोक जखमी झाले.”—द न्यु यॉर्क टाईम्स.

“सरळ दृष्टीपथात असलेल्या बंदुकधाऱ्‍यांनी उघड्या खिडकीतून स्वयंचलित बंदुकांनी निदर्शकांवर गोळीबार केला. . . . तेथे असलेल्या निःशस्त्र महिला पोलिसला पाठीत गोळी लागली. या रानटी घटनेनंतर दहा दिवसांनी ब्रिटीश सरकारने या मारेकऱ्‍यांना त्यांच्या शस्त्रांसह देशाबाहेर जाण्यासाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केली.”—टेररिझम—हाऊ द वेस्ट कॅन विन.

राजदूतावासातील कर्मचारी असल्याने बंदुकधाऱ्‍यांना आंतरराष्ट्रीय शिष्टाचारानुसार मोकळीक दिली गेली.

लोक आणि गट दहशतवादाचा अवलंब का करतात? त्याचे प्रमुख लक्ष्य कोण असतात? दहशतवादाने काय साध्य होते?

एक दृष्टीकोण असा आहे की, दहशतवाद हा वांशिक, सामाजिक व राजकीय असे विविध अन्याय होत असल्याचे लक्षण आहे. कॅथोलिक पाळक व धर्मशास्त्रज्ञ जेम्स बर्टचेल यांनी म्हटलेः “स्वराज्याची मागणी करणाऱ्‍या जातीय व/किंवा धार्मिक (किंबहुना आर्थिक देखील) अल्पसंख्यांकाकडून काही दहशतवाद होतो. उदा. स्पेनमधील बास्क, उल्स्टरमधील कॅथोलिक, फिलिपाईन्समधील हक्स. . . . काही दहशतवाद, बहुसंख्यांकांच्या धाकाने सरकारकडून होतो. . . . काही सरकारवर ताबा मिळविण्यासाठी अल्पसंख्यांकांनी केलेल्या साहसाने होतो.”

परंतु, केवळ अल्पसंख्यांकच दहशतवादाचा अवलंब करतात का? बर्टचेल पुढे म्हणतातः “दुसऱ्‍या असहकारी सरकारची अपकिर्ती करण्यास, त्याला अस्थिर करण्यास व त्याला काढून टाकण्यास सरकारने पुरस्कृत केलेला असा काही दहशतवाद असतो.”—फाईटिंग बॅक.

इतर टिकाकारांच्या मते, निरिक्षकांच्या राजकीय मतानुसार दहशतवादाचे वेगवेगळे अर्थ करता येतात. जेव्हा अन्याय केला जातो व लोकांना कायदेशीर दाद मागता येत नाही तेव्हा त्यांच्यापाशी दहशत हेच प्रत्युत्तर उरते. इतरांना, दहशतवादामध्ये, पाश्‍चिमात्य लोकशाहीविरुद्ध, त्यांच्या विचारसरणीच्या विरोधकांनी प्रेरणा दिलेले व कौशल्याने चालवलेले डावपेच दिसतात. या बिकट प्रश्‍नाविषयी वस्तुस्थिती व काही मतांचे आपण परिक्षण करू या.

उत्तर आयर्लंडमध्ये दहशत का?

नॉदर्न आयर्लंड—द डिव्हायडेड प्रॉव्हिंस या पुस्तकात लेखकाच्या मते ३५० वर्षांपूर्वी ब्रिटीश प्रॉटेस्टंट लोकांचे (त्यापैकी जे अनेक स्कॉटलंडमधील होते) आयरिश कॅथोलिक भूमीवर स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे सांस्कृतिक चकमक झाली व पुढे नोकऱ्‍यांसाठी चढाओढ झाली. ते पुस्तक म्हणतेः “१६०७ मध्ये सुरु केलेल्या व अल्स्टरची ‘लागवड’ म्हटल्या जाणाऱ्‍या १७ व्या शतकातील प्रक्रियेत आयर्लंडमधील बहुसंख्य प्रॉटेस्टंट तेथे आले व यामुळे सरतेशेवटी संपूर्ण आयर्लंड बेटावर इंग्लिश सत्ता दृढ झाली.” अनेक शतकांच्या कडवटपणाचे व हिंसेचे मूळ या इंग्लिश सत्तेत आहे.

कॅथोलिक आयरिश स्वतंत्र राज्य (आयर) १९२१ मध्ये बनवले गेले व उत्तर आयर्लंड बनवणारे उत्तर-पूर्वेचे सहा परगणे वेगळे ठेवले गेले. आयर्लंडच्या राष्ट्रवादी दृष्टीकोणातून पाहता या कृतीने आयर्लंडचे तुकडे झाले. तेव्हापासून आयर्लंडला एक संघ करण्यासाठी आय.आर.ए. (आयरिश रिपब्लिक आर्मी) सतत लढत देत आली आहे. आयर्लंडला एक संघ करण्याच्या या कामाला प्रॉटेस्टंट लोकांचा जबरदस्त विरोध आहे. का बरे? कारण त्यांच्या दृष्टीने डब्लिनमधील ‘कॅथोलिक पोपच्या सत्ते’खाली येण्याची त्यांची तयारी नाही.

घटस्फोटावर असलेल्या बंदीविषयी आयर्लंडमध्ये नुकतेच मतदान झाले. त्यात बंदीच्या बाजूने ३:२ अशा मतदानाने निकाल लागला. याविषयी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलेला मजकूर प्रॉटेस्टंट दृष्टीकोणाचा सारांश सांगतोः “आयर्लंडच्या गणराज्याशी कोणतेही संबंध ठेवण्यास विरोध करणारे उत्तर आयर्लंडमधील जे राजकारणी आहेत तेच, आयर्लंडच्या गणराज्यावर रोमन कॅथोलिक चर्चची पकड किती घट्ट आहे हे या मतदानावरुन दिसते असा आरोप करण्यात पुढे आहेत.”

सध्या आय.आर.ए. दोन गटात विभागली गेली आहे—ऑफिशियल्स व प्रोव्हिजनल्स (किंवा प्रोव्हो.) इतिहासाचे प्राध्यापक थॉमस इ. हॅची यांच्या मते “संपूर्ण आयर्लंडच्या, बत्तीस परगण्यांच्या समाजवादी गणराज्याला आय.आर.ए. ऑफिशिअल्स वचनबद्ध आहेत. . . . आयर्लंडसाठी संघटनेचा तोडगा व संघाची घटना असावी असे समर्थन प्रोव्हो करतात.” (द रॅशनलायझेशन ऑफ टेररिझम) १९८४ मध्ये प्रोव्होंनी ब्रायटन हॉटेलमध्ये टाइम बॉम्ब ठेवला होता. ब्रिटनच्या प्रंतप्रधान मार्गारेट थॅचर व त्यांचे मंत्रिमंडळ त्यातून थोडक्यात बचावले, यावरुन प्रोव्होंना त्यांच्या ध्येयांचे गांभीर्य किती वाटते हे स्पष्ट होते.

धार्मिक, राजकीय व जातीय मुद्दे असले तरी हे प्रश्‍न राहतातः दहशतवादामागे काही सखोल हेतू आहेत का? यात मोठ्या शक्‍तींचा हात किती गुंतला आहे?

दहशतवादामागील हेतू

१९४८ मध्ये इस्राएल राष्ट्र स्थापन झाले त्यावेळी आपली मायभूमी, पॅलेस्टाईन, गमावल्यामुळे पॅलेस्टीनी निर्वासितांची किती दैना झाली त्याकडे बोट दाखवून बहुतेक सर्व अरब दहशतवादी गट आपल्या कृत्यांचे समर्थन करतात. गेल्या दशकात भावना इतक्या शिगेला पोहंचल्या आहेत की, अरब दहशतवाद्यांचे ध्येय स्वतंत्र वेगळ्या मातृभूमीपुरते राहिले नसून त्यात यहुद्यांना अधिक घातक असा इस्राएलचा सर्वनाश समाविष्ट झाला आहे. हे कसे कळते?

मध्यपूर्वेत कार्य करणाऱ्‍या हिजबाला (“देवाचा पक्ष”) या शिया गटाच्या “अनावृत्त पत्रा”तून खालील उतारा घेतलेला आहे.

“पुढील ध्येये साध्य होईपर्यंत आमची मुले शत्रूंशी [इस्राएल, अमेरिका, फ्रान्स व (लेबननचे) फॅलेंजेस] मुकाबला करण्याच्या सतत वाढणाऱ्‍या मनःस्थितीत आहेतः

“शेवटी अस्तित्वातून नाहीसे होण्यापूर्वी इस्राएलचे लेबनानमधून शेवटचे प्रयाण व पवित्र जेरुसलेमची (जबरी) कब्जाच्या पंजातून मुक्‍तता.”—हायड्रा ऑफ कार्नेज.

दुसऱ्‍या बाजूला इराणचे अयातोल्ला खोमेनी व त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखालील “हुतात्म्यां”नी दहशतवादाची अनेक कृत्ये केली आहेत. ते तत्त्वज्ञान सेक्रेड रेज या पुस्तकातून घेतलेल्या पुढील उताऱ्‍यात व्यक्‍त झाले आहेः “जगाच्या सरकारांना कळले पाहिजे की इस्लामला हरवणे शक्य नाही. जगातील सर्व राष्ट्रात इस्लामचा विजय होईल व इस्लाम आणि कुराणची शिकवण जगभर पसरेल.”

यावरुन त्यांनी अनुमान काढले की, “तेव्हा, भ्रष्ट सरकारी व्यवस्थांचा नाश करणे, . . . व सर्व विश्‍वासघातकी, भ्रष्ट, जुलमी व गुन्हेगार शासने उलटून टाकणे याशिवाय आम्हाला वस्तुतः दुसरा पर्याय नाही. सर्व मुसलमानांनी पार पाडले पाहिजे असे हे कर्तव्य आहे.”

इतर दहशतवादींना चालना देणारी शक्‍ती आहे क्रांतिकारी समाजवाद व भांडवलशाहीचा पाडाव. द अल्टिमेट वेपन—टेररिस्टस्‌ ॲण्ड द वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकात लेखक जेन श्रेबर म्हणतातः “सर्वसाधारणपणे लुबाडण्याची क्षमता म्हणजे भांडवलशाही असे समीकरण आहे, आणि भांडवलशाही, लोकशाहीने मवाळ झालेली असो वा नसो, म्हणजे हिटलरशाही असे समीकरण आहे.” दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्‍या एका जपानी माणसाने म्हटल्याप्रमाणे “लोकांनी इतर लोकांना लुबाडण्याची, भांडवलशाहीने निर्माण केलेली वस्तुस्थिती आम्ही या जगात कधीही मान्य करणार नाही. आणि या हेतूमुळेच आम्ही लढण्यास तयार आहोत.”

परंतु, इतर लोक दहशतवाद्यांकडे दुसऱ्‍या दृष्टीने पाहतात. इस्राएलचे राजदूत बेंजामिन नेतान्याहू लिहितातः “दहशतवाद आपोआप कशाही कारणाने होत नसतो. तो एक पर्याय, वाईट पर्याय आहे.” ते म्हणतातः “दहशतवादाचे मूळ दुःखात नसून बेलगाम हिंसेच्या मनोवृत्तीत आहे. विशिष्ट विचारसरणी व धार्मिक ध्येयांसाठी सर्व नैतिक बंधने टाकून देणे योग्य आहे किंवा टाकलीच पाहिजेत असे ठासून सांगणाऱ्‍या जागतिक दृष्टीकोणात याचे (हिंसक वृत्ती) मूळ सापडते.”—टेररिझम—हाऊ द वेस्ट कॅन विन.

परंतु, आपला आधुनिक समाज अचानकपणे दहशतवादाला का बळी पडला आहे?

भेद्य समाज

दहशतवादाचे अमेरिकेतील एक तज्ञ नील लिव्हिंगस्टन लिहितातः “जसजसे आपले जग अधिकाधिक शहरी व गुंतागुंतीचे झाले तसतशा प्रमाणात बहुसंख्यांकांचे जीवन उद्‌ध्वस्त करणाऱ्‍या किंवा त्यांच्यावर आपली इच्छा लादणाऱ्‍या लहान गटांच्या किंवा एकट्या व्यक्‍तींच्याही योजनापासून बचाव करण्यास आपण असमर्थ झालो आहोत.” पण आपला समाज दहशतवाद्यांपासून बचाव करण्यास इतका असमर्थ का आहे? “पाणी, उर्जा, दळणवळण, परिवहन व स्वच्छतेसाठी असलेल्या आपल्या नाजूक स्थितीतील व्यवस्थांवर वस्ताद दहशतवादी व घातपाती मनमानेल तेव्हा आघात करू शकतात.”—हायड्रा ऑफ कार्नेज.

आपल्या जीवनाला आधार देणाऱ्‍या व्यवस्थांच्या अतिशय नाजुकपणामुळे एक दहशतवादी पूर्वीच्या एखाद्या सैन्याएवढे बळ वापरु शकतो. लिव्हिंगस्टन पुढे म्हणतातः “तांत्रिक प्रगतिमुळे . . . एका माणसाला कधी नव्हे इतकी मारण्याची क्षमता लाभली आहे. तंत्रयुगातील एका माणसाच्या क्षमतेची बरोबरी तलवार, धनुष्य व भाला ही प्रमुख आयुधे असलेल्या एका सैन्यबळाशी होते. आजच्या जगात दहशतवादी इतके धोकादायक का झाले आहेत याचे हे एक प्रमुख कारण आहे.”

आधुनिक समाजातील आणखी एक भेदनीय केंद्रबिंदू म्हणजे घटनांच्या बातम्यांचा तत्काळ होणारा परिणाम. दूरदर्शन दहशतवादाची शक्‍ती वाढवतो. दहशतवाद्याला त्याच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी हवी असते व प्रसार माध्यमांच्या सौजन्याने त्याला ती मिळते!

फक्‍त एका शतकापूर्वी बातमी जगाच्या दुसऱ्‍या टोकाला पोहंचण्यास अनेक दिवस लागत. आता बातम्या तात्काळ मिळतात. काही वेळा दहशतवादी आपली भूमिका पार पाडताना स्वतःला प्रत्यक्ष दूरदर्शनवर पाहू शकतो. अनेकदा विरुद्ध पक्ष काय करीत आहे हे त्याला ठाऊक असते. पण तो मात्र आपला डाव इतरांना कळू न देता काम करीत असतो. जॅन श्रेबर पुढे असेही म्हणतात की, “लोकांचे लक्ष वेधण्याची खटपट हा दहशतवाद्यांचा सतत सफल होणारा डाव आहे.”

पण, दहशतवाद सतत फोफावत जाण्याची आणखीही काही कारणे आहेत का?

दहशतवाद आणि दोन विरुद्ध विचारधारा

भविष्यासाठी कोणतीही आशा न देता दहशतवादाबद्दलचे दोन सल्लागार लिहितातः “दहशतवाद नाहीसा होणार नाही. लहान व दुर्बळ राज्यांना कळले आहे की दहशतवादामुळे त्यांची राजकीय शक्‍ती वाढू शकते. आणि साधनांच्या कमतरतेने ते बेजार असल्याने राजकीय व लष्करी शस्त्र म्हणून दहशतवादाचा त्यांनी त्याग करणे असंभवनीय नाही.” ते पुढे म्हणतात की, यातच, दहशतवादातून परस्पर दुसऱ्‍याकरवी युद्ध करवून घेण्याचा फायदा काही मोठ्या शक्‍तींना समजला आहे. “युद्धाच्या इतर प्रकारांमध्ये असलेला धोका न पत्करता त्यांची राष्ट्रीय ध्येये साधण्यात त्यांच्याऐवजी दहशतवादींना पाठवण्याने फायदा होतो असे मोठ्या शक्‍तीशाली राज्यांना समजून आले आहे.”—फाइटिंग बॅक.

शक्‍तीशाली राज्यांना, दहशतवादामुळे आपली ध्येये साधण्यात मदत होते असे जर उमगले आहे तर जागतिक दहशतवादाचे हेच काही अंशी किंवा बव्हंशी कारण तर नसेल? जॅन श्रेबर लिहितातः “आपल्या शत्रूंना चकित करण्यास तसेच वर्चस्व स्थापन करण्यास किंवा असलेले वर्चस्व टिकवण्यास जगातील दोन्ही प्रबळ विचारसरणींच्या शक्‍तींनी बरे व वाईट असे सर्व मार्ग अनुसरले होते व तसे ते पुढेही अवलंबतील हे बऱ्‍याच काळापासून कोणत्याही पुराव्याशिवाय निःपक्षपाती निरिक्षकांनी जाणले होते. ७०रीच्या दशकात उघडकीस आलेल्या गोष्टीवरून तेच सिद्ध झाले.”

विचारसरणींमधील ही चकमक, सोविएत नेते गोर्बाचेव यांच्या एका भाषणात सूचित होते. ते म्हणालेः “दोन्ही सामाजिक व्यवस्थांतील ऐतिहासिक वाद लष्करी मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न साम्राज्यवाद्यांनी सोडून दिला तरच आंतरराष्ट्रीय संबंध सामान्य सहकाराकडे वळतील इतके प्रकाशासारखे स्पष्ट आहे.”—ए टाईम फॉर पीस.

दोन मोठ्या शक्‍तींमधील हा “बुद्धिबळाचा डाव” इतरांनाही माहीत आहे. उदाहरणार्थ, सेक्रेड रेज या पुस्तकात लेखिका रॉबिन राईट लिहितेः “डावपेच करणाऱ्‍या स्थानिक प्रबळ शक्‍तींकडे जवळजवळ दुर्लक्ष करून, रशियाशी चढाओढ करण्याचे क्षेत्र या प्रमुख दृष्टीने अमेरिका मध्यपूर्वेकडे पहात आहे असे मुस्लीम झुंजारांना वाटते. द्विगोलार्ध जगातील तिसऱ्‍या जगाकडून होणाऱ्‍या मान्यतेच्या मागणीविषयी अमेरिका संवेदनाशील असल्याचे दिसत नाही.” विचारसरणींच्या या झगड्यात आपल्याला प्याद्यासारखे वापरले जात आहे असे सकृतदर्शनी काही लहान राज्यांना वाटते.

भांडवलशाही व्यवस्थेला अस्थिर करण्यासाठी आणखी एक शस्त्र म्हणून दहशतवादाचा बराच वापर केला जात आहे असा पाश्‍चिमात्य तज्ञांचा दृष्टीकोन आहे. अमेरिकेचे प्रतिदहशतवादाचे एक तज्ञ, राजदूत रॉबर्ट बी. ओकले म्हणालेः “न हटकल्याने दहशतवादात झालेली वाढ, आपले राष्ट्रीय व परस्पर हितसंबंध जपण्यासाठी, वाचवण्यासाठी व वाढविण्यासाठी अमेरिका व तिची दोस्त राष्ट्र ज्या राजनैतिक, आर्थिक व लष्करी संबंधावर विसंबून आहेत, त्यांना सुरुंग लावील. . . . भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादामुळे सतत गंभीर धोक्याला तोंड देण्यास आपण तयार असले पाहिजे . . . त्यातील बऱ्‍याचशा दहशतवादाला मूठभर क्रूर सरकारांचा पाठिंबा व उत्तेजन आहे.”

अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट एम्‌. सायर यांनी आपले मत अधिक स्पष्टपणे मांडलेः “दहशतवाद राजनैतिक हेतूने प्रेरित आहे, तसेच संघटित व योजनाबद्ध आहे. त्यातील बराचसा, मार्क्स-लेनिन प्रणित गट व राज्यांकडून होतो. आणि रशिया व त्याचे पूर्वयुरोपातील दोस्त त्याला मदत व सांत्वना देतात.”—डिपार्टमेंट ऑफ स्टेट बुलेटिन.

दहशतवाद आणि पवित्र शास्त्रातील भविष्यवाद

दहशतवादाचे शस्त्र वापरुन दोन महाशक्‍तींमध्ये चाललेल्या झगड्यात पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांना रस का आहे? पवित्र शास्त्रातील दानीएलाच्या पुस्तकातील ११ व्या अध्यायात असलेल्या एका महत्त्वाच्या भविष्यवाणीमुळे. या भविष्यवादात “उत्तरेचा राजा” व “दक्षिणेचा राजा” अशा दोन प्रबळ शक्‍तींमध्ये चालणाऱ्‍या संघर्षाचे वर्णन केले आहे. “आपल्या पूर्वजांच्या दैवतां”ना नाकारणारा असल्याने “उत्तरेचा राजा” नास्तिक म्हणून ओळखला जातो. (दानीएल ११:३७) तो स्वतःला श्रेष्ठ समजतो व दुर्गदैवतांना किंवा शस्त्रास्त्रांना पूज्य मानतो. मजबूत गडांविरुद्ध तो यशस्वी कार्य करतो व जगात श्रेष्ठपद मिळवतो. (दानीएल ११:३८, ३९) त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा विस्तार होत असताना “दक्षिणेचा राजा” गप्प बसलेला असतो का?

ती अनिष्टसूचक भविष्यवाणी म्हणतेः “अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल. उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याजवर येईल. तो अनेक देशात शिरेल व त्यांस पादांक्रात करुन पार निघून जाईल.” (दानीएल ११:४०) याचा अर्थ, जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी दहशतवादाचा उपयोग वेगवेगळ्या नावाने दोन्ही राजे आपल्या झगड्यात करीत आहेत.a दानीएलचे शब्द सुचवितात की, देव आपल्या हर्मगिद्दोनच्या युद्धात त्यांच्या प्रतिस्पर्धांचा अंत करीपर्यंत जगातल्या प्रमुख शक्‍तींमध्ये चढाओढीचे सहजीवन असेल.—प्रकटीकरण १६:१४-१६.

तथापि, आणखी काही प्रश्‍न आहेतः दहशतवादाची आपत्ती एकट्या मानवाला काढून टाकता येईल का? तसे असल्यास, कशी व कधी? तसे नसल्यास, का नाही? आमचा पुढील लेख या प्रश्‍नांचा परामर्श घेईल. (g87 1/8)

[तळटीपा]

a या राजांविषयी अधिक माहितीसाठी १९५८ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क यांनी प्रकाशित केलेल्या “युवर वील बी डन्‌ ऑन अर्थ्‌” या पुस्तकातील ११ वा अध्याय पहा.

[७ पानांवरील चित्र]

दहशतवादामागील बहुतांशी हेतूंचा संबंध शेवटल्या काळाविषयी दानीएलाने केलेल्या भविष्यवादासोबत आहे

[चित्राचे श्रेय]

Pacemaker Press Int’l, Belfast

[८ पानांवरील चित्र]

आधुनिक दहशतवादाने प्रसार माध्यमांचा परिणामकारक उपयोग केला आहे

[चित्राचे श्रेय]

Reuters/Bettmann Newsphotos

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा