करिंथकर यांना पहिलं पत्र
१ ज्याला देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा एक प्रेषित होण्यासाठी बोलावण्यात आलं,+ तो पौल आणि आपला भाऊ सोस्थनेस यांच्याकडून, २ करिंथमध्ये+ असलेल्या देवाच्या मंडळीला. म्हणजे, पवित्र जन होण्यासाठी ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने ज्यांना पवित्र करण्यात आलं आहे,+ त्या तुम्हाला, तसंच सर्व ठिकाणी, आपल्या सर्वांचा प्रभू असलेल्या येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन जे त्याला हाक मारतात अशा सगळ्यांना:+
३ देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त जो आपला प्रभू यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा आणि शांती मिळो.
४ ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे मी नेहमीच माझ्या देवाचे आभार मानतो. ५ कारण बोलण्याचं पूर्ण सामर्थ्य आणि पूर्ण ज्ञान यांसोबतच इतर सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्हाला त्याच्याद्वारे समृद्ध करण्यात आलं आहे.+ ६ तसंच, ख्रिस्ताबद्दलची साक्ष+ तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे मुळावली आहे. ७ आणि यामुळे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना तुम्ही कोणत्याही दानात कमी पडला नाहीत.+ ८ त्याच प्रकारे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुमच्यावर कोणताही आरोप येऊ नये, म्हणून देव तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर राहायलाही मदत करेल.+ ९ देव विश्वासू आहे+ आणि त्याच्यामुळेच तुम्हाला त्याचा मुलगा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यासोबत भागीदार* होण्यासाठी बोलावण्यात आलं आहे.
१० बांधवांनो, आता मी तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने अशी विनंती करतो, की तुम्हा सर्वांचं बोलणं सारखं असावं. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत,+ तर तुमची मतं आणि विचारसरणी एकसारखीच असावी आणि तुम्ही पूर्णपणे ऐक्यात राहावं.+ ११ कारण माझ्या बांधवांनो, ख्लोवे हिच्या घराण्यातल्या काहींनी मला तुमच्याबद्दल असं सांगितलं आहे, की तुमच्यामध्ये मतभेद आहेत. १२ म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की तुमच्यापैकी प्रत्येक जण, “मी पौलचा,” “मी अपुल्लोचा,”+ “मी तर केफाचा,”* किंवा “मी तर ख्रिस्ताचा” असं म्हणतो. १३ ख्रिस्त असा विभागलेला आहे का? तुमच्यासाठी काय पौलला वधस्तंभावर* खिळण्यात आलं? की तुम्ही पौलच्या नावाने बाप्तिस्मा* घेतला होता? १४ मी देवाचे आभार मानतो, की तुमच्यापैकी क्रिस्प+ आणि गायस+ यांच्याशिवाय मी कोणालाही बाप्तिस्मा दिला नाही. १५ कारण तुम्ही माझ्या नावाने बाप्तिस्मा घेतला, असं आता कोणालाही म्हणता येणार नाही. १६ हो, स्तेफना याच्या घराण्यालाही मी बाप्तिस्मा दिला होता.+ पण, बाकीच्या कोणालाही बाप्तिस्मा दिल्याचं मला आठवत नाही. १७ कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा द्यायला नाही, तर आनंदाचा संदेश घोषित करायला पाठवलं;+ पण बुद्धिमानांच्या भाषेत* नाही. कारण तसं केल्यामुळे, ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरला असता.
१८ कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना वधस्तंभाबद्दलचा संदेश मूर्खपणा वाटतो.+ पण ज्यांना वाचवलं जात आहे,* त्या आपल्यासाठी तो देवाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.+ १९ कारण असं लिहिलं आहे: “मी बुद्धिमान माणसांची बुद्धी नष्ट करीन, आणि ज्ञानी लोकांचं ज्ञान धुडकावून लावीन.”*+ २० कुठे आहेत बुद्धिमान? कुठे आहेत शास्त्री?* कुठे आहेत या जगाच्या व्यवस्थेतले* वादविवाद करणारे? देवाने या जगाची बुद्धी मूर्खपणा आहे हे सिद्ध केलं नाही का? २१ या जगाला स्वतःच्या बुद्धीने+ देवाची ओळख झाली नाही.+ पण देवाची बुद्धी यातूनच दिसून येते, की लोकांना मूर्खपणा वाटणाऱ्या संदेशाद्वारे, विश्वास ठेवणाऱ्यांना वाचवणं* त्याला योग्य वाटलं.+
२२ कारण यहुदी लोक चमत्कार* दाखवण्याची मागणी करतात+ आणि ग्रीक लोक बुद्धीच्या शोधात आहेत. २३ पण आपण तर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताबद्दल घोषणा करतो. तो यहुद्यांसाठी अडखळण्याचं कारण, तर विदेश्यांसाठी मूर्खपणा आहे.+ २४ पण ज्यांना बोलावण्यात आलं आहे, त्या यहुदी आणि ग्रीक लोकांसाठीही ख्रिस्त हा देवाच्या सामर्थ्याचा आणि बुद्धीचा पुरावा आहे.+ २५ कारण देवाच्या ज्या गोष्टी माणसांना मूर्खपणाच्या वाटतात, त्या माणसांच्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि देवाच्या ज्या गोष्टी माणसांना दुर्बल वाटतात, त्या माणसांपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत.+
२६ कारण बांधवांनो, तुम्ही स्वतःच्याच बाबतीत ही गोष्ट पाहू शकता, की जे माणसांच्या दृष्टीने* बुद्धिमान,+ शक्तिशाली आणि उच्च घराण्यातले आहेत,+ अशा पुष्कळांना देवाने बोलावलं नाही. २७ तर बुद्धिमानांना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या मूर्ख गोष्टींना निवडलं. आणि शक्तिशाली गोष्टींना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या दुर्बल गोष्टींना निवडलं.+ २८ जगातल्या कवडीमोल, तुच्छ लेखल्या जाणाऱ्या आणि लोकांच्या नजरेत काहीच नाहीत अशा* गोष्टींना त्याने निवडलं. त्याने हे यासाठी केलं, की त्यांद्वारे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या* गोष्टींना धुळीला मिळवावं,+ २९ म्हणजे कोणालाही देवापुढे बढाई मारता येणार नाही. ३० पण तुम्ही देवामुळेच ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. ख्रिस्ताने देवाची बुद्धी, तसंच त्याचं नीतिमत्त्व+ आपल्याला प्रकट केलं आणि आपल्याला पवित्र करून+ खंडणीद्वारे मुक्त केलं.+ ३१ हे यासाठी, की जे लिहिण्यात आलं होतं ते पूर्ण व्हावं: “जो कोणी बढाई मारतो, त्याने यहोवाबद्दल* बढाई मारावी.”+
२ म्हणूनच बांधवांनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला देवाचं पवित्र रहस्य+ सांगितलं, तेव्हा मी जड भाषेचा वापर केला नाही+ किंवा बुद्धीचा दिखावा केला नाही. २ कारण तुमच्यामध्ये असताना मी येशू ख्रिस्त आणि त्याचं वधस्तंभावर* खिळलं जाणं, यांशिवाय आणखी कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष न वेधण्याचं ठरवलं.+ ३ आणि मी एखाद्या दुर्बल माणसासारखा, भीतभीत आणि थरथर कापत तुमच्याकडे आलो. ४ आणि मी जे काही बोललो आणि जो संदेश घोषित केला, तो बुद्धिमानांच्या प्रभावशाली शब्दांत केला नाही. खरंतर त्यांतून देवाची पवित्र शक्ती* आणि सामर्थ्य दिसून आलं.+ ५ हे यासाठी, की तुम्ही माणसांच्या बुद्धीवर नाही, तर देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा.
६ आता, जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही बुद्धीच्या गोष्टी सांगतो.+ पण ती या जगाच्या व्यवस्थेची* बुद्धी नाही, किंवा या जगाच्या व्यवस्थेच्या शासकांची, ज्यांचा नाश होणार आहे, त्यांची बुद्धी नाही.+ ७ तर, आम्ही एका पवित्र रहस्यात दडलेल्या देवाच्या बुद्धीबद्दल सांगतो.+ देवाने या जगातल्या व्यवस्था सुरू होण्याआधीच या बुद्धीप्रमाणे कार्य करायचा संकल्प केला होता. ८ ही बुद्धी या जगाच्या व्यवस्थेच्या* शासकांपैकी कोणीही समजू शकला नाही.+ कारण जर त्यांना ती समजली असती, तर त्यांनी आपल्या गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळलं नसतं.* ९ पण जसं लिहिलं आहे: “डोळ्यांनी ज्या पाहिल्या नाहीत आणि कानांनी ज्या ऐकल्या नाहीत आणि माणसाने आपल्या मनात ज्यांची कल्पनाही केली नाही, अशा गोष्टी देवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत.”+ १० देवाने त्या गोष्टी त्याच्या पवित्र शक्तीद्वारे+ आपल्याला प्रकट केल्या आहेत.+ कारण पवित्र शक्ती सगळ्या गोष्टींचा, देवाच्या गहन गोष्टींचाही* शोध घेते.+
११ माणसाच्या मनात काय आहे हे त्याच्या स्वतःच्या मनाशिवाय आणखी कोण समजू शकतं? त्याच प्रकारे, देवाच्या गोष्टी त्याच्या पवित्र शक्तीशिवाय आणखी कोणालाही समजलेल्या नाहीत. १२ आता आपल्याला जगाची वृत्ती नाही, तर देवाकडून असलेली पवित्र शक्ती मिळाली आहे.+ हे यासाठी, की देवाने आपल्याला प्रेमळपणे दिलेल्या गोष्टी आपण जाणून घ्याव्यात. १३ या गोष्टींबद्दलही आपण माणसाच्या बुद्धीप्रमाणे शिकवण्यात आलेल्या शब्दांत नाही,+ तर देवाच्या पवित्र शक्तीने शिकवलेल्या शब्दांत बोलतो.+ अशा प्रकारे, आपण देवाबद्दलच्या गोष्टी, देवापासून असलेल्या शब्दांत* समजावून सांगतो.
१४ पण शारीरिक विचारसरणीचा माणूस, देवाच्या पवित्र शक्तीच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या गोष्टी वाटतात. आणि तो त्या जाणून घेऊ शकत नाही, कारण त्या गोष्टींचं परीक्षण पवित्र शक्तीच्या मदतीने केलं जातं. १५ देवासारखी विचारसरणी असलेला* माणूस सगळ्या गोष्टींचं परीक्षण करतो,+ पण त्याचं स्वतःचं परीक्षण कोणत्याही माणसाकडून केलं जात नाही. १६ कारण, “यहोवाचं* मन कोण समजू शकलं आहे, की त्याने त्याला काही शिकवावं?”+ पण आपल्याला ख्रिस्ताचं मन* समजलं आहे.+
३ बांधवांनो, देवासारखी विचारसरणी असलेल्या* माणसांशी+ बोलावं तसं मी तुमच्याशी बोलू शकलो नाही, तर जगाच्या विचारसरणीच्या* माणसांशी, ख्रिस्तामध्ये तान्ह्या मुलांशी+ बोलावं तसं मला तुमच्याशी बोलावं लागलं. २ मी तुम्हाला जड अन्न दिलं नाही, तर दूध पाजलं. कारण जड अन्न पचवण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती नव्हती. खरंतर अजूनही नाही,+ ३ कारण अजूनही तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी आहे.+ तुमच्यामध्ये हेवेदावे आणि भांडणतंटे आहेत, याचाच अर्थ तुमच्यामध्ये जगाची विचारसरणी नाही का?+ आणि तुम्ही माणसांप्रमाणेच चालत नाही का? ४ कारण तुमच्यापैकी एक जण म्हणतो “मी पौलचा,” तर दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोचा.”+ याचा अर्थ तुम्ही सर्वसाधारण माणसांसारखंच वागत आहात की नाही?
५ शेवटी, अपुल्लो कोण आहे? आणि पौल तरी कोण आहे? प्रभूने प्रत्येकाला सोपवलेलं कार्य करणारे हे सेवक+ आहेत. त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला. ६ मी पेरलं,+ अपुल्लोने पाणी घातलं,+ पण देव वाढवत राहिला. ७ म्हणून, पेरणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देवच सर्वकाही आहे.+ ८ आता, पेरणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत,* पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्याप्रमाणे प्रतिफळ मिळेल.+ ९ कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचं असं शेत आहात, ज्याची तो मशागत करत आहे. तुम्ही देवाची अशी इमारत आहात, जिचं तो बांधकाम करत आहे.+
१० माझ्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे, मी बांधकाम करणाऱ्या एका कुशल कारागिराप्रमाणे पाया घातला.+ त्यावर बांधकाम मात्र दुसरा कोणीतरी करत आहे. पण आपण पायावर कसं बांधकाम करत आहोत, याकडे प्रत्येकाने सतत लक्ष दिलं पाहिजे. ११ कारण जो पाया आधीच घालण्यात आला आहे, म्हणजेच येशू ख्रिस्त याच्याशिवाय दुसरा पाया कोणीही घालू शकत नाही.+ १२ यावर कोणी सोनं, चांदी आणि रत्नं वापरून, तर कोणी लाकूड, सुकलेलं गवत किंवा भुसा वापरून बांधकाम करतो. १३ पण प्रत्येकाने कशा प्रकारचं काम केलं आहे हे परीक्षेच्या दिवशी उघड होईल. कारण अग्नीद्वारे हे प्रकट केलं जाईल+ आणि प्रत्येकाचं काम कसं आहे हे सिद्ध होईल. १४ एखाद्याने पायावर केलेलं बांधकाम टिकून राहिलं, तर त्याला प्रतिफळ मिळेल. १५ पण एखाद्याने केलेलं बांधकाम जळून गेलं, तर त्याचं नुकसान होईल. तो स्वतः तर वाचेल, पण ते आगीतून कसंबसं वाचण्यासारखं ठरेल.
१६ तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहात+ आणि देवाची पवित्र शक्ती तुमच्यामध्ये राहते, हे तुम्हाला माहीत नाही का?+ १७ जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश केला, तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे आणि तुम्हीच ते मंदिर आहात.+
१८ तुमच्यापैकी कोणीही स्वतःला फसवू नका. या जगाच्या व्यवस्थेत* आपण बुद्धिमान आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने मूर्ख व्हावं, म्हणजे तो बुद्धिमान होईल. १९ कारण या जगाची बुद्धी ही देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असं लिहिलं आहे: “तो बुद्धिमानांना त्यांच्याच चलाखीत पकडतो.”+ २० आणि असंही लिहिलं आहे: “बुद्धिमानांचे तर्क व्यर्थ आहेत हे यहोवाला* माहीत आहे.”+ २१ म्हणून कोणीही माणसांबद्दल बढाई मारू नये. कारण सर्वकाही तुमचंच आहे, २२ पौल असो, अपुल्लो असो किंवा केफा*+ असो, किंवा हे जग, जीवन किंवा मृत्यू किंवा सध्याच्या गोष्टी किंवा भविष्यातल्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचंच आहे; २३ आणि तुम्ही ख्रिस्ताचे,+ तर ख्रिस्त देवाचा आहे.
४ प्रत्येकाने आम्हाला ख्रिस्ताचे सेवक* आणि देवाच्या पवित्र रहस्यांचे कारभारी समजावं.+ २ आणि कारभाऱ्यांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी विश्वासू असावं. ३ तुम्ही किंवा कोणा मानवी न्यायाधीशाने* माझा न्याय केला, तर या गोष्टीला मी अगदी क्षुल्लक समजतो. खरंतर, मी स्वतःसुद्धा आपला न्याय करत नाही. ४ कारण मी काही वाईट केलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण फक्त या कारणामुळे मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे.+ ५ म्हणून नेमलेली वेळ येईपर्यंत, म्हणजे प्रभू येईपर्यंत कशाचाही न्याय करू नका.+ तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणेल आणि माणसाच्या हृदयातले हेतू प्रकट करेल. आणि मग ज्याला त्याला आपल्या योग्यतेप्रमाणे देवाकडून शाबासकी मिळेल.+
६ आता बांधवांनो, मी तुमच्या भल्यासाठी स्वतःचं आणि अपुल्लोचं+ उदाहरण देऊन या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे आमच्या उदाहरणावरून तुम्ही हा नियम पाळायला शिकाल: “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” हे यासाठी, की तुम्ही गर्वाने फुगू नये+ आणि कोणाचा पक्षपात करू नये. ७ कारण तुमच्यामध्ये विशेष असं काय आहे? खरंतर, तुमच्याजवळ असं काय आहे, जे तुम्हाला देण्यात आलेलं नाही?+ मग, जर तुम्हाला ते देण्यात आलं आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या बळावर मिळवल्यासारखी बढाई का मारता?
८ तुम्ही आधीच तृप्त झाला आहात का? तुम्ही आधीच श्रीमंत झाला आहात का? आमच्याशिवायच तुम्ही राजे म्हणून राज्य करू लागला आहात का?+ मला तर मनापासून वाटतं, की तुम्ही राजे म्हणून राज्य करायला लागला असता तर बरं झालं असतं. कारण मग तुमच्यासोबत आम्हीही राजे म्हणून राज्य केलं असतं.+ ९ मला तर वाटतं, की देवाने आम्हा प्रेषितांना, मृत्युदंडासाठी पात्र ठरवलेली माणसं या नात्याने अगदी शेवटी लोकांसमोर आणलं आहे.+ कारण आम्ही जगासमोर, तसंच स्वर्गदूतांसमोर आणि माणसांसमोर जाहीर प्रदर्शनासारखे झालो आहोत.+ १० आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख,+ तर तुम्ही ख्रिस्तामध्ये बुद्धिमान आहात. आम्ही अशक्त, तर तुम्ही सशक्त आहात. तुमचा आदर, तर आमचा अनादर केला जातो. ११ अगदी या वेळेपर्यंत, आम्ही भुकेले+ आणि तहानलेले आहोत.+ आमच्या अंगावर नीट कपडे नाहीत.* आम्हाला मारहाण होत आहे*+ आणि आम्ही बेघर आहोत. १२ आम्ही मेहनत करतो आणि आमच्या हातांनी कष्ट करतो.+ आमचा अपमान केला जातो तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो.+ आमचा छळ होतो, तेव्हा आम्ही धीराने तो सहन करतो.+ १३ आमच्यावर खोटे आरोप केले जातात, तेव्हा आम्ही सौम्यपणे उत्तर देतो.*+ आजही, आम्हाला जगात केरकचरा* आणि गाळ समजलं जातं.
१४ मी या गोष्टी तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, तर माझी प्रिय मुलं म्हणून तुम्हाला सल्ला देण्यासाठी लिहीत आहे. १५ कारण ख्रिस्तामध्ये तुमचे १०,००० रक्षक* असले, तरी तुमचे पुष्कळ बाप नक्कीच नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये आनंदाच्या संदेशाद्वारे मी तुमचा बाप बनलो आहे.+ १६ म्हणून मी तुम्हाला असा आग्रह करतो की तुम्ही माझं अनुकरण करा.+ १७ यासाठीच मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे. कारण प्रभूमध्ये ते माझं प्रिय आणि विश्वासू लेकरू आहे. ख्रिस्त येशूच्या सेवेत माझ्या काम करायच्या पद्धतींची* तो तुम्हाला आठवण करून देईल.+ याच पद्धतींबद्दल मी सर्व ठिकाणी, प्रत्येक मंडळीत शिकवत आहे.
१८ मी तुमच्याकडे येणारच नाही, असं समजून काही जण गर्वाने फुगले आहेत. १९ पण यहोवाची* इच्छा असेल, तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. तेव्हा मी या गर्वाने फुगलेल्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही, तर त्यांच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे की नाही हे पाहीन. २० कारण देवाचं राज्य हे बोलण्यातून नाही, तर देवाच्या सामर्थ्यातून दिसून येतं. २१ मी तुमच्याकडे छडी घेऊन आलेलं तुम्हाला आवडेल,+ की प्रेमाने आणि सौम्यतेने आलेलं आवडेल?
५ खरंतर, मला असं सांगण्यात आलं आहे की तुमच्यामध्ये एक जण अनैतिक लैंगिक कृत्यांबद्दल*+ दोषी आहे. त्याचे आपल्याच वडिलांच्या बायकोसोबत संबंध आहेत.+ अशी अनैतिकता* तर विदेश्यांमध्येही केली जात नाही. २ आणि तरी तुम्ही याचा गर्व करता? खरंतर तुम्ही याबद्दल शोक करायला नको का?+ आणि ज्या माणसाने हे कृत्य केलं, त्याला तुम्ही आपल्यातून काढून टाकायला नको का?+ ३ मी शरीराने तुमच्यात नसलो, तरी मनाने तुमच्यामध्येच आहे. आणि प्रत्यक्ष तुमच्यासोबत असल्याप्रमाणेच, मी हे कृत्य करणाऱ्या त्या माणसाचा आधीच न्याय केला आहे. ४ आपल्या प्रभू येशूच्या नावाने तुम्ही एकत्र येता, तेव्हा मीसुद्धा प्रभू येशूच्या सामर्थ्यासोबत मनाने तुमच्याबरोबर आहे हे ओळखून, ५ या माणसाला शरीराचा नाश होण्यासाठी सैतानाच्या हवाली करा.+ म्हणजे प्रभूच्या दिवसादरम्यान मंडळीची चांगली मनोवृत्ती टिकून राहील.+
६ तुमचं बढाई मारणं योग्य नाही. तुम्हाला माहीत नाही का, की थोडंसं खमीरसुद्धा* पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवतं?*+ ७ जुनं खमीर टाकून द्या, म्हणजे तुम्ही खमीर नसलेला पिठाचा नवीन गोळा व्हाल. आणि खरंतर तुम्ही तसेच आहात.* कारण आपल्या वल्हांडणाचा कोकरा,+ ख्रिस्त याचं बलिदान देण्यात आलं आहे.+ ८ म्हणून आपण जुन्या खमीराने, किंवा वाईटपणाच्या आणि दुष्टपणाच्या खमीराने नाही, तर प्रामाणिकपणाच्या आणि सत्याच्या बेखमीर भाकरीने हा सण पाळू या.+
९ माझ्या पत्रात मी तुम्हाला अनैतिक लैंगिक कृत्यं* करणाऱ्या लोकांची संगत सोडून द्या असं लिहिलं होतं. १० पण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता, की या जगात जे अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ लोभी, दुसऱ्यांना लुबाडणारे आणि मूर्तिपूजक लोक आहेत, त्यांची अजिबातच संगत धरू नका. कारण तसं केलं, तर तुम्हाला जगातून बाहेर जावं लागेल.+ ११ पण आता मी तुम्हाला असं लिहीत आहे, की जर बंधू म्हणून ओळखला जाणारा एखादा माणूस अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारा, लोभी,+ मूर्तिपूजक, शिव्याशाप देणारा, दारुडा+ किंवा इतरांना लुबाडणारा असेल,+ तर अशा माणसाची संगत सोडून द्या.+ त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका. १२ कारण बाहेरच्या लोकांचा न्याय करणारा मी कोण? पण जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करायला नको का? १३ बाहेरच्यांचा न्याय करणारा देव आहे.+ “त्या दुष्टाला आपल्यामधून काढून टाका.”+
६ तुमच्यापैकी कोणाचा दुसऱ्याशी काही वाद होतो,+ तेव्हा तो सोडवायला पवित्र जनांसमोर न जाता, तुम्ही न्यायालयात अनीतिमान माणसांसमोर जायचं धाडस कसं काय करता? २ पवित्र जन जगाचा न्याय करतील हे तुम्हाला माहीत नाही का?+ आणि जर तुम्ही जगाचा न्याय करणार आहात, तर मग अगदी लहानसहान गोष्टींबद्दल तुम्हाला न्यायनिवाडा करता येत नाही का? ३ आपण स्वर्गदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हाला माहीत नाही का?+ मग सध्याच्या जीवनातल्या सर्वसाधारण समस्या आपण का सोडवू शकत नाही? ४ आणि सध्याच्या जीवनातले प्रश्न सोडवायचे असतात,+ तेव्हा मंडळी ज्यांचा आदर करत नाही, अशांना तुम्ही न्यायाधीश म्हणून का निवडता? ५ तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे. आपल्या बांधवांमध्ये न्याय करू शकेल, असा एकही बुद्धिमान माणूस तुमच्यात नाही का? ६ त्याऐवजी एक भाऊ दुसऱ्याला न्यायालयात ओढतो, आणि तेसुद्धा विश्वास न ठेवणाऱ्यांपुढे!
७ खरंतर, तुम्ही एकमेकांविरुद्ध खटले भरता याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे हरला आहात. त्याऐवजी, तुम्ही स्वतःचं नुकसान का होऊ देत नाही?+ आणि स्वतःची फसवणूक का होऊ देत नाही? ८ उलट, तुम्ही स्वतःच दुसऱ्याचं नुकसान आणि फसवणूक करता, आणि तीसुद्धा आपल्याच भावांची!
९ अनीतिमान माणसं देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत हे तुम्हाला माहीत नाही का?+ फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्यं* करणारे,+ मूर्तिपूजक,+ व्यभिचारी,+ पुरुषवेश्या,*+ समलैंगिक कृत्यं करणारे पुरुष,*+ १० चोर, लोभी,+ दारुडे,+ शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारस होणार नाहीत.+ ११ तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आलं आहे;+ तुम्हाला पवित्र करण्यात आलं आहे.+ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे आणि आपल्या देवाच्या पवित्र शक्तीद्वारे* तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलं आहे.+
१२ माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत,* पण सगळ्याच गोष्टी फायद्याच्या आहेत असं नाही.+ माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.* १३ अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण देव या दोन्ही गोष्टी नाहीशा करेल.+ शरीर हे अनैतिक लैंगिक कृत्यांसाठी* नाही, तर प्रभूसाठी आहे+ आणि प्रभू शरीरासाठी आहे. १४ देवाने प्रभूला उठवलं+ आणि तो त्याच्या सामर्थ्याद्वारे+ आपल्यालाही मेलेल्यांतून उठवेल.+
१५ तुमची शरीरं ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत हे तुम्हाला माहीत नाही का?+ मग मी ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव एका वेश्येच्या शरीराशी जोडावेत का? मुळीच नाही! १६ जो वेश्येशी संबंध ठेवतो तो तिच्यासोबत एकदेह होतो, हे तुम्हाला माहीत नाही का? कारण “ते दोघं एकदेह होतील,” असं देव म्हणतो.+ १७ पण जो प्रभूसोबत ऐक्यात असतो, त्याची मनोवृत्ती प्रभूसारखीच होते.+ १८ अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* दूर पळा!+ माणसाने दुसरं कोणतंही पाप केलं, तर ते तो आपल्या शरीराबाहेर करतो. पण जो अनैतिक लैंगिक कृत्यं करत राहतो, तो स्वतःच्याच शरीराच्या विरोधात पाप करत असतो.+ १९ तुमचं शरीर हे तुमच्यात असलेल्या आणि तुम्हाला देवाकडून मिळालेल्या पवित्र शक्तीचं मंदिर आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?+ तसंच, तुमची स्वतःवर मालकी नाही,+ २० कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आलं आहे.+ म्हणून आपल्या शरीराद्वारे+ सर्व प्रकारे देवाचा गौरव करा.+
७ आता, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही मला लिहिलं होतं, त्यांबद्दल मी असं म्हणीन की पुरुषाने स्त्रीला स्पर्श* न करणंच बरं आहे. २ पण अनैतिक लैंगिक कृत्यं* करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे, प्रत्येक पुरुषाला स्वतःची बायको+ आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा नवरा असावा.+ ३ नवऱ्याने आपल्या बायकोला तिचा हक्क द्यावा आणि त्याचप्रमाणे बायकोनेही आपल्या नवऱ्याला त्याचा हक्क द्यावा.+ ४ बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तिच्या नवऱ्याला आहे. त्याचप्रमाणे नवऱ्यालाही आपल्या शरीरावर अधिकार नाही, तर त्याच्या बायकोला आहे. ५ एकमेकांचा हा हक्क नाकारू नका. पण प्रार्थनेसाठी वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळासाठी असं केलं, तरी पुन्हा एकत्र या. म्हणजे, तुमच्या असंयमामुळे सैतान तुम्हाला सतत मोहात पाडणार नाही. ६ पण मी फक्त ही परवानगी देत आहे, आज्ञा नाही. ७ माझी तर अशी इच्छा आहे की सगळ्यांनी माझ्यासारखं असावं. तरीपण, प्रत्येकाला देवाकडून एक खास देणगी मिळालेली आहे,+ कोणाला या प्रकारची, तर कोणाला दुसऱ्या प्रकारची.
८ आता, विधवांना आणि अविवाहित असलेल्यांना मी असं म्हणतो, की ते माझ्यासारखेच राहिले तर बरं होईल.+ ९ पण जर त्यांना संयम ठेवता येत नसेल तर त्यांनी लग्न करावं. कारण वासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न केलेलं बरं.+
१० जे विवाहित आहेत, त्यांना मी असं सांगतो, खरंतर मी नाही, तर प्रभू असं सांगतो की बायकोने आपल्या नवऱ्यापासून वेगळं होऊ नये.+ ११ पण जर ती वेगळी झालीच तर तिने एकतर अविवाहित राहावं, किंवा मग आपल्या नवऱ्यासोबत समेट करावा; आणि नवऱ्यानेही आपल्या बायकोला सोडू नये.+
१२ पण इतरांना मी म्हणतो, आणि हे प्रभू नाही, तर मी म्हणतो:+ एखाद्या बांधवाची बायको विश्वासात नसेल, पण त्याच्यासोबत राहायला तयार असेल, तर त्याने तिला सोडू नये. १३ आणि जर एखाद्या स्त्रीचा नवरा विश्वासात नसेल, पण तिच्यासोबत राहायला तयार असेल, तर तिने आपल्या नवऱ्याला सोडू नये. १४ कारण विश्वासात नसलेला नवरा, आपल्या बायकोशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरतो आणि विश्वासात नसलेली बायको, आपल्या नवऱ्याशी झालेल्या विवाहामुळे पवित्र ठरते; नाहीतर तुमची मुलं अशुद्ध ठरली असती, पण आता ती पवित्र आहेत. १५ पण विश्वासात नसलेल्या सोबत्याने स्वतःहून सोडून जायचं* ठरवलं, तर त्याला जाऊ द्या; अशा परिस्थितीत, ख्रिस्ती भावावर किंवा बहिणीवर कोणतंही बंधन नाही. देवाने तुम्हाला शांतीसाठी बोलावलं आहे.+ १६ विवाहित स्त्रीला मी विचारतो, तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं तारण होणार नाही हे तुला कसं माहीत?*+ आणि विवाहित पुरुषाला मी विचारतो, तुझ्यामुळे तुझ्या बायकोचं तारण होणार नाही हे तुला कसं माहीत?*
१७ तरीसुद्धा, जसं प्रत्येकाला यहोवाने* वाटून दिलं आहे आणि जसं प्रत्येकाला बोलावलं आहे, तसं त्याने चालावं.+ सगळ्या मंडळ्यांना मी हाच आदेश देतो. १८ एखाद्याची आधीच सुंता* झालेली असताना त्याला बोलावण्यात आलं होतं का?+ त्याने तसंच राहावं. किंवा एखाद्याची सुंता झालेली नसताना त्याला बोलावण्यात आलं होतं का? तर त्याने सुंता करू नये.+ १९ कारण सुंता झालेली असणं महत्त्वाचं नाही आणि सुंता झालेली नसणं हेही महत्त्वाचं नाही;+ जर काही महत्त्वाचं आहे, तर ते म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणं.+ २० प्रत्येकाला ज्या स्थितीत बोलावण्यात आलं होतं, त्याने त्याच स्थितीत राहावं.+ २१ तू दास असताना तुला बोलावण्यात आलं होतं का? त्याची चिंता करू नकोस.+ पण स्वतःची सुटका करून घ्यायची संधी मिळालीच, तर ती सोडू नकोस. २२ कारण ज्याला दास असताना प्रभूमध्ये बोलावण्यात आलं होतं, तो एक स्वतंत्र माणूस आहे आणि तो प्रभूचा आहे;+ त्याच प्रकारे ज्याला स्वतंत्र असताना बोलावण्यात आलं होतं, तो ख्रिस्ताचा दास आहे. २३ तुम्हाला किंमत देऊन विकत घेण्यात आलं आहे.+ म्हणून माणसांचे दास व्हायचं सोडून द्या. २४ बांधवांनो, प्रत्येकाला ज्या स्थितीत बोलावण्यात आलं होतं, त्याने देवासमोर त्याच स्थितीत राहावं.
२५ आता, जे अविवाहित* आहेत त्यांच्याबद्दल माझ्याकडे प्रभूकडून कोणतीही आज्ञा नाही. पण विश्वासू राहण्यासाठी प्रभूने ज्याच्यावर दया दाखवली, तो मी आपलं मत सांगतो.+ २६ मला तरी असं वाटतं, की सध्याची कठीण परिस्थिती लक्षात घेतली, तर एखाद्या माणसाने तो आहे त्या स्थितीतच राहणं सगळ्यात चांगलं ठरेल. २७ तू बायकोशी बांधलेला आहेस का? मग, मुक्त व्हायचा प्रयत्न करू नकोस.+ तू बायकोपासून मुक्त झाला आहेस का? मग लग्न करायचा प्रयत्न करू नकोस. २८ पण तू लग्न केलंस, तरी ते पाप ठरणार नाही. आणि जर कौमार्यात असलेल्या एखाद्याने लग्न केलं, तर अशी व्यक्ती कोणतंही पाप करत नाही. पण जे लग्न करतील त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील आणि मी तुम्हाला त्यांपासून वाचवायचा प्रयत्न करत आहे.
२९ शिवाय बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की उरलेला वेळ कमी करण्यात आला आहे.+ म्हणून यापुढे, ज्याला बायको आहे त्याने बायको नसल्यासारखं असावं, ३० आणि जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखं, जे आनंदात आहेत त्यांनी आनंदात नसल्यासारखं आणि जे विकत घेतात त्यांनी विकत घेतलेल्या गोष्टींवर मालकी नसल्यासारखं असावं. ३१ तसंच, जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा पूर्णपणे उपयोग करत नसल्यासारखं असावं. कारण या जगाचं दृश्य बदलत आहे. ३२ खरंतर, तुम्ही चिंतांपासून मुक्त असावं अशी माझी इच्छा आहे. अविवाहित माणूस प्रभूच्या गोष्टींबद्दल, म्हणजे प्रभूचं मन कसं आनंदित करता येईल याबद्दल चिंता करतो. ३३ पण विवाहित माणूस जगातल्या गोष्टींबद्दल, म्हणजे आपल्या बायकोला कसं खूश करता येईल याबद्दल चिंता करतो.+ ३४ त्याचं मन विभागलेलं आहे. तसंच, अविवाहित स्त्री आणि कुमारीही, शरीराने आणि मनाने शुद्ध राहता यावं म्हणून प्रभूच्या गोष्टींबद्दल चिंता करते.+ पण विवाहित स्त्री ही जगाच्या गोष्टींबद्दल, म्हणजे आपल्या नवऱ्याला कसं खूश करता येईल याबद्दल चिंता करते. ३५ पण मी तुमच्यावर बंधनं घालण्यासाठी* नाही, तर तुमच्याच फायद्यासाठी हे सांगत आहे. यामुळे, तुम्हाला योग्य ते करायचं आणि लक्ष विचलित न होता प्रभूची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळेल.
३६ पण अविवाहित राहिल्यामुळे* आपण चुकीचं वागत आहोत असं जर कोणाला वाटत असेल आणि त्याच्या ऐन तारुण्याचा काळ ओसरला असेल, तर त्याने लग्न केलेलं बरं. तो पाप करत नाही.+ ३७ पण जर एखाद्याचं मन स्थिर असेल आणि त्याला लग्न करायची गरज वाटत नसेल, आणि त्याचं स्वतःवर नियंत्रण असून त्याने अविवाहित राहायचं* मनात ठरवलं असेल, तर तो योग्यच करतो.+ ३८ त्याच प्रकारे, जो लग्न करतो* तो चांगलं करतो, पण जो लग्न करत नाही तो आणखी चांगलं करतो.+
३९ नवरा जिवंत असेपर्यंत बायको त्याच्याशी बांधलेली आहे.+ पण जर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला, तर तिची इच्छा असेल त्या पुरुषाशी लग्न करायला ती मोकळी आहे, पण फक्त प्रभूमध्ये.+ ४० खरंतर, माझ्या मते ती आहे तशीच राहिली, तर जास्त सुखी होईल; आणि नक्कीच माझ्यावरही देवाची पवित्र शक्ती* आहे असं मला वाटतं.
८ आता, मूर्तींना दाखवलेल्या नैवेद्याबद्दल:+ या बाबतीत, खरंतर आपल्या सर्वांनाच ज्ञान आहे.+ ज्ञानामुळे गर्व येतो, पण प्रेम प्रोत्साहन देतं.+ २ आपल्याला ज्ञान आहे असं जर कोणाला वाटत असेल, तर त्याला त्या गोष्टीबद्दल अजूनही म्हणावं तसं ज्ञान नाही. ३ पण जर कोणी देवावर प्रेम करत असेल, तर देव त्याला ओळखतो.
४ आता, मूर्तींना दाखवलेला नैवेद्य खाण्याबद्दल आपल्याला हे माहीत आहे, की या जगात मूर्ती काहीच नाही+ आणि देव फक्त एकच आहे.+ ५ कारण ज्यांना देव समजलं जातं, अशी स्वर्गात आणि पृथ्वीवर दैवतं असली,+ आणि लोकांच्या मते अशी पुष्कळ “दैवतं” आणि असे पुष्कळ “प्रभू” असले, ६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.
७ पण सर्वांनाच हे ज्ञान आहे, असं नाही.+ कारण काही जण पूर्वी मूर्तींशी संबंध असल्यामुळे आजही अन्न खाताना तो मूर्तीला वाहिलेला नैवेद्य आहे, असं मानतात.+ आणि त्यांचा विवेक कमजोर असल्यामुळे तो दूषित होतो.+ ८ पण अन्न आपल्याला देवाच्या जवळ आणू शकत नाही;+ ते खाल्लं नाही तर आपलं काही नुकसान होत नाही, आणि खाल्लं तरी काही फायदा होत नाही.+ ९ पण निवड करायचा तुमचा अधिकार, कमजोर विवेक असलेल्या लोकांसाठी एक अडखळण बनणार नाही याची नेहमी काळजी घ्या.+ १० कारण, ज्ञान असलेल्या तुझ्यासारख्या व्यक्तीला जर एखाद्याने मूर्तीच्या मंदिरात जेवताना पाहिलं, तर कमजोर विवेक असलेल्या त्या व्यक्तीलाही मूर्तींना दाखवलेला नैवेद्य खायचं धाडस होणार नाही का? ११ अशा रितीने, तुझ्या ज्ञानामुळे कमजोर विवेक असलेल्या माणसाचा नाश होईल, म्हणजेच तुझ्या भावाचा, ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला.+ १२ आपल्या भावांविरुद्ध अशा प्रकारे पाप करून तुम्ही त्यांच्या कमजोर विवेकाला दुखावता,+ तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करत असता. १३ म्हणून, मी जे खातो त्यामुळे जर माझ्या भावाला अडखळण होत असेल, तर मी पुन्हा कधीच मांस खाणार नाही. म्हणजे, माझ्यामुळे माझ्या भावाला अडखळण होणार नाही.+
९ मला स्वातंत्र्य नाही का? मी एक प्रेषित नाही का? मी आपल्या प्रभू येशूला पाहिलं नाही का?+ आणि तुम्ही प्रभूमध्ये माझ्या कामाचं फळ नाही का? २ इतरांसाठी मी प्रेषित नसलो, तरी तुमच्यासाठी तर नक्कीच आहे! कारण तुम्ही प्रभूमध्ये माझा प्रेषितपणा सिद्ध करणारा शिक्का आहात.
३ माझी चौकशी करणाऱ्यांना मी आपल्या बचावात हेच म्हणीन: ४ आम्हाला खाण्यापिण्याचा हक्क* नाही का? ५ इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ+ आणि केफा*+ यांच्याप्रमाणेच, आम्हालासुद्धा विश्वासात असलेल्या एखाद्या बहिणीशी लग्न करून,+ तिला आपल्यासोबत नेण्याचा हक्क नाही का? ६ फक्त मी आणि बर्णबाच+ असे आहोत का, की ज्यांनी पोटापाण्यासाठी काम केलं पाहिजे? ७ असा कोणता सैनिक आहे जो स्वतःच्या खर्चाने सैन्यात सेवा करतो? असा कोण आहे जो द्राक्षमळा लावतो, पण त्याचं फळ कधी खात नाही?+ आणि असा कोणता मेंढपाळ आहे जो मेंढरांची राखण करतो, पण त्यांचं दूध पीत नाही?
८ मी या गोष्टी माणसांच्या दृष्टिकोनातून बोलत आहे का? नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का? ९ कारण मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलं आहे: “धान्याची मळणी करणाऱ्या बैलाचं तोंड बांधू नका.”+ देव बैलांचीच काळजी करतो का? १० की मुळात आपल्यासाठी तो असं म्हणतो? हे खरंतर आपल्यासाठीच लिहिण्यात आलं होतं. कारण नांगरणी आणि मळणी करणारा, हे दोघंही आपला वाटा मिळण्याच्या आशेने काम करत असतात.
११ आम्ही तुमच्यामध्ये देवाच्या गोष्टींची पेरणी केली आहे. मग तुमच्याकडून आम्ही आपल्या गरजेच्या वस्तूंची कापणी केली, तर ही फार मोठी गोष्ट आहे का?+ १२ इतर जण जर तुमच्यावर हा हक्क बजावू शकतात, तर आम्हाला नक्कीच हा हक्क आहे. पण तरीही आम्ही या हक्काचा* वापर केला नाही.+ उलट, ख्रिस्ताचा आनंदाचा संदेश घोषित करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आम्ही सगळं सहन करत आहोत.+ १३ तुम्हाला माहीत नाही का, की मंदिरात पवित्र सेवा करणाऱ्यांना मंदिरातून आपलं अन्न मिळतं आणि वेदीसमोर नियमितपणे सेवा करणाऱ्यांना वेदीवरच्या अर्पणातून वाटा मिळतो?+ १४ त्याचप्रमाणे, आनंदाच्या संदेशाची घोषणा करणाऱ्यांनी आनंदाच्या संदेशाद्वारे आपलं पोट भरावं, अशी प्रभूने आज्ञा दिली.+
१५ तरी, यांपैकी एकाही तरतुदीचा मी उपयोग केला नाही.+ पण तुम्ही माझ्यासाठी या गोष्टी कराव्यात, म्हणून मी तुम्हाला यांबद्दल लिहिलं नाही. कारण, कोणी माझं बढाई मारायचं कारण माझ्याकडून हिरावून घ्यावं यापेक्षा मला मरण आलेलं बरं!+ १६ जर मी आनंदाच्या संदेशाची घोषणा करत असलो, तर मला बढाई मारायचं काहीच कारण नाही. कारण ते तर माझं कर्तव्यच आहे. उलट, मी जर आनंदाचा संदेश सांगितला नाही, तर माझा धिक्कार असो!+ १७ मी हे काम स्वेच्छेने केलं, तर मला बक्षीस मिळेल. पण इच्छा नसतानाही मी ते केलं, तरी ती माझी जबाबदारीच आहे. कारण देवाने हे काम माझ्यावर सोपवलं आहे.+ १८ तर मग, मला कोणतं बक्षीस मिळेल? हेच की मी कोणताही मोबदला न घेता आनंदाचा संदेश घोषित करू शकेन. असं केल्यामुळे आनंदाच्या संदेशाच्या बाबतीत असलेल्या माझ्या अधिकाराचा* मला गैरवापर करावा लागणार नाही.
१९ कारण मी कोणत्याही माणसाचा दास नसलो, तरी जास्तीत जास्त लोकांना मिळवता यावं म्हणून मी स्वतःला सर्वांचा दास बनवलं आहे. २० यहुद्यांना मिळवता यावं म्हणून यहुद्यांसाठी मी एका यहुद्यासारखा झालो.+ मी स्वतः नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना मिळवण्यासाठी, मी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांसारखा झालो.+ २१ जे नियमशास्त्राच्या अधीन नाहीत अशांना मिळवण्यासाठी, मी नियमशास्त्राच्या अधीन नसलेल्यांसारखा झालो. असं असलं, तरी मी देवाच्या नियमाबाहेर नाही आणि ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन आहे.+ हे यासाठी की, जे नियमशास्त्राच्या अधीन नाहीत त्यांना मी मिळवावं. २२ दुर्बलांना मिळवावं म्हणून मी दुर्बलांसाठी दुर्बल झालो.+ मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो, म्हणजे कसंही करून मला काहींचं तारण करता यावं.* २३ मी आनंदाच्या संदेशासाठी सर्वकाही करतो. हे यासाठी, की मला तो इतरांना सांगता यावा.+
२४ शर्यतीत सगळेच धावत असले, तरी त्यांपैकी एकालाच बक्षीस मिळतं हे तुम्हाला माहीत नाही का? अशा प्रकारे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल.+ २५ स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण* सर्व गोष्टींच्या बाबतीत आत्मसंयम बाळगतो. अर्थात, ते नाश होणारा मुकुट मिळवण्यासाठी असं करतात;+ पण आपण कधीही नाश न होणारा मुकुट मिळवण्यासाठी करतो.+ २६ म्हणून, मी कोणतंही ध्येय नसल्यासारखं धावत नाही.+ तसंच, वाऱ्याला मारत असल्यासारखं मी ठोसे मारत नाही. २७ तर, मी आपल्या शरीराला बुक्के मारतो*+ आणि त्याला दास करून ठेवतो, म्हणजे इतरांना प्रचार केल्यावर मी स्वतः काही कारणामुळे नाकारला जाणार नाही. *
१० बांधवांनो, तुम्हाला हे माहीत असावं असं मला वाटतं, की आपले सगळे पूर्वज ढगाखाली होते+ आणि ते सगळे समुद्रातून पलीकडे गेले.+ २ ढग आणि समुद्र यांच्याद्वारे त्या सगळ्यांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला. ३ त्या सगळ्यांनी देवाने दिलेलं एकाच प्रकारचं अन्न खाल्लं+ ४ आणि ते सगळे देवाने दिलेलं एकाच प्रकारचं पाणी प्यायले.+ कारण देवाने दिलेल्या खडकातून ते पाणी प्यायचे. त्यांच्यामागे चालणारा तो खडक म्हणजे ख्रिस्त.*+ ५ पण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांबद्दल देव संतुष्ट नव्हता; म्हणून, ओसाड रानात त्यांचा नाश करण्यात आला.+
६ त्यांनी जसा वाईट गोष्टींचा लोभ धरला, तसा आपण धरू नये म्हणून या गोष्टी आपल्यासाठी एक इशारा आहेत.+ ७ त्यांच्यातले काही जण मूर्तिपूजक होते, तसं तुम्ही असू नये. त्यांच्याबद्दल असं लिहिलं आहे: “लोक खायला-प्यायला बसले आणि त्यानंतर उठून मौजमजा करू लागले.”+ ८ तसंच, त्यांच्याप्रमाणे आपण अनैतिक लैंगिक कृत्यं* करू नये. त्यांच्यातल्या काहींनी ती केल्यामुळे, एकाच दिवशी २३,००० लोकांचा मृत्यू झाला.+ ९ आपण यहोवाची* परीक्षाही पाहू नये.+ त्यांच्यापैकी काहींनी त्याची परीक्षा पाहिली आणि सापांच्या दंशामुळे त्यांचा नाश झाला.+ १० तसंच त्यांच्यासारखी आपण कुरकुर करू नये. त्यांच्यापैकी काहींनी कुरकुर केली+ आणि विनाश करणाऱ्याने त्यांचा नाश केला.+ ११ त्यांच्या बाबतीत घडलेल्या या गोष्टी आपल्यासाठी उदाहरण आहेत. आपण जगाच्या व्यवस्थांच्या शेवटी पोहोचलो आहोत आणि आपल्याला इशारा देण्यासाठी या गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.+
१२ म्हणून, आपण उभे आहोत असं ज्याला वाटतं त्याने पडू नये म्हणून सांभाळावं.+ १३ माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.+ पण देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही.+ तर, परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.+
१४ त्यामुळे, माझ्या प्रिय बांधवांनो, मूर्तिपूजेपासून दूर पळा.+ १५ तुम्ही समंजस माणसं आहात असं समजून मी तुमच्याशी बोलतो. मी जे बोलतो ते बरोबर आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. १६ ज्या आशीर्वादाच्या प्याल्यावर आपण आशीर्वाद मागतो, त्यातून प्यायल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या रक्ताचे भागीदार होत नाही का?+ आणि जी भाकर आपण मोडतो, ती खाल्ल्यामुळे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार होत नाही का?+ १७ भाकर एक असल्यामुळे, आपण पुष्कळ असूनही एकच शरीर आहोत,+ कारण आपण सगळे ती एकच भाकर खातो.
१८ शारीरिक रितीने इस्राएली असलेल्या लोकांचा विचार करा: जे अर्पण केलेल्या बलिदानांतून खातात, ते वेदीचे भागीदार नाहीत का?+ १९ तर मग, मूर्तीला किंवा तिला दाखवलेल्या नैवेद्याला काही महत्त्व आहे, असं मला म्हणायचं आहे का? २० नाही. उलट, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की विदेशी लोक जी बलिदानं देतात ती देवाला नाही, तर दुष्ट स्वर्गदूतांना* देतात;+ आणि तुम्ही दुष्ट स्वर्गदूतांसोबत भागीदार व्हावं अशी माझी इच्छा नाही.+ २१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही. २२ ‘आपण यहोवाला* ईर्ष्येला पेटवायचा प्रयत्न करत आहोत का’?+ आपण त्याच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहोत का?
२३ सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या,* तरी सगळ्याच गोष्टी फायद्याच्या असतात असं नाही. सगळ्या गोष्टी कायदेशीर असल्या, तरी सगळ्या गोष्टी प्रोत्साहन देणाऱ्या नाहीत.+ २४ प्रत्येकाने स्वतःचा नाही, तर नेहमी दुसऱ्याचा फायदा पाहावा.+
२५ मांसाच्या बाजारात जे काही विकलं जातं ते खा आणि आपल्या विवेकामुळे कोणतीही चौकशी करू नका. २६ कारण “पृथ्वी आणि तिच्यावर असलेलं सर्वकाही यहोवाचं* आहे.”+ २७ विश्वासात नसलेल्या एखाद्याने तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्हाला जायची इच्छा असेल, तर तुमच्यापुढे जे काही वाढलं जाईल ते खा आणि आपल्या विवेकामुळे कोणतीही चौकशी करू नका. २८ पण, जर कोणी तुम्हाला असं सांगितलं, की “हे बलिदान म्हणून अर्पण केलं होतं,” तर ज्याने हे सांगितलं त्याच्यामुळे आणि विवेकामुळे ते खाऊ नका.+ २९ मी तुमच्या विवेकाबद्दल नाही, तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या विवेकाबद्दल बोलत आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसऱ्याच्या विवेकाने का करावा?+ ३० मी जर उपकार मानून खात असेन, तर ज्यासाठी मी उपकार मानले त्यावरून माझी टीका का केली जावी?+
३१ म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सगळं देवाच्या गौरवासाठी करा.+ ३२ यहुद्यांसाठी, ग्रीक लोकांसाठी आणि देवाच्या मंडळीसाठी अडखळण बनू नका.+ ३३ तर, बऱ्याच जणांचं तारण व्हावं* म्हणून जसा मी स्वतःचा नाही तर बऱ्याच जणांचा फायदा पाहतो+ आणि सगळ्या बाबतींत सर्वांना संतुष्ट करायचा प्रयत्न करतो,+ तसं तुम्हीही करा.
११ जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तसं तुम्हीही माझं अनुकरण करा.+
२ तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या* त्यांचं काटेकोरपणे पालन करता, याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो. ३ पण, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे;+ प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे;+ आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे,+ हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतं. ४ जो पुरुष आपलं डोकं झाकून प्रार्थना किंवा भविष्यवाणी करतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. ५ तसंच, जी स्त्री डोकं न झाकता प्रार्थना किंवा भविष्यवाणी करते,+ ती आपल्या मस्तकाचा अपमान करते. कारण अशी स्त्री मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच आहे. ६ एखादी स्त्री जर डोकं झाकत नसेल, तर तिने आपले केस कापून टाकावे; पण, केस कापून टाकणं किंवा मुंडण करणं हे जर तिच्यासाठी लाजिरवाणं असेल, तर तिने आपलं डोकं झाकावं.
७ पुरुषाने आपलं डोकं झाकू नये, कारण तो देवाचं प्रतिरूप+ आणि गौरव आहे. पण स्त्री ही पुरुषाचा गौरव आहे. ८ कारण पुरुष स्त्रीपासून आला नाही, तर स्त्री पुरुषापासून आली.+ ९ इतकंच काय, पुरुषाला स्त्रीसाठी नाही, तर स्त्रीला पुरुषासाठी निर्माण करण्यात आलं होतं.+ १० म्हणूनच, स्वर्गदूतांमुळे स्त्रीच्या डोक्यावर अधीनतेचं चिन्ह असणं आवश्यक आहे.+
११ असं असलं, तरी ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये, स्त्री ही पुरुषापेक्षा वेगळी नाही आणि पुरुषसुद्धा स्त्रीपेक्षा वेगळा नाही. १२ कारण ज्याप्रमाणे स्त्री ही पुरुषापासून आहे,+ त्याचप्रमाणे पुरुषही स्त्रीपासून आहे. पण सर्वकाही देवापासून आहे.+ १३ तुम्हीच ठरवा, एखाद्या स्त्रीने डोकं न झाकता देवाला प्रार्थना करणं योग्य आहे का? १४ निसर्गच हे शिकवत नाही का, की पुरुषाचे लांब केस असणं ही त्याच्यासाठी अपमानाची गोष्ट आहे; १५ पण, स्त्रीचे लांब केस ही तिची शोभा आहे? कारण केस तिला पदराऐवजी* देण्यात आले आहेत. १६ पण, जर कोणी वाद घालून दुसऱ्या कोणत्या प्रथेचं समर्थन करत असेल, तर त्याने हे लक्षात घ्यावं, की आमच्यामध्ये किंवा देवाच्या मंडळ्यांमध्ये दुसरी कोणतीही प्रथा नाही.
१७ पण, तुम्हाला या सूचना देताना मी तुमची प्रशंसा करत नाही; कारण तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमचं भलं होण्याऐवजी, नुकसानच होतं. १८ पहिली गोष्ट म्हणजे, मंडळीत तुम्ही एकत्र येता तेव्हा तुमच्यामध्ये फुटी असतात, असं माझ्या ऐकण्यात आलं आहे. आणि काही प्रमाणात हे खरं असल्याचं मी मानतो. १९ कारण, तुमच्यामध्ये वेगवेगळे पंथ* नक्कीच असतील.+ पण, यावरून देव कोणाला मान्यता देतो हे स्पष्ट होईल.
२० तुम्ही एका ठिकाणी एकत्र येता, तेव्हा प्रभूचं सांजभोजन+ करणं शक्य नसतं. २१ कारण सांजभोजन करण्याआधीच प्रत्येकाने आपलं संध्याकाळचं जेवण केलेलं असतं. त्यामुळे, एक उपाशी राहतो, तर दुसरा प्यायलेला असतो. २२ तुम्हाला खायला-प्यायला घरं नाहीत का? की तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ लेखता आणि ज्यांच्याजवळ काहीच नाही त्यांना लज्जित करता? आता मी तुम्हाला काय बोलू? तुमची प्रशंसा करू का? या बाबतीत तरी मी तुमची प्रशंसा करणार नाही.
२३ खरंतर, सांजभोजनाबद्दल मी तुम्हाला जे शिकवलं ते मला प्रभूकडूनच मिळालं. कारण, ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिलं जाणार होतं, त्या रात्री+ त्याने भाकर घेतली, २४ आणि देवाला धन्यवाद देऊन ती मोडली. मग तो म्हणाला: “ही भाकर माझ्या शरीराला सूचित करते.+ ते तुमच्यासाठी देण्यात आलं आहे. माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+ २५ मग, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं.+ तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ माझ्या रक्ताने हा करार स्थापित केला जाईल.+ जेव्हाही तुम्ही यातून प्याल, तेव्हा माझी आठवण म्हणून हे करत राहा.”+ २६ कारण प्रभू येईपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही ही भाकर खाल आणि या प्याल्यातून प्याल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्याच्या मृत्यूची घोषणा कराल.
२७ त्यामुळे, योग्यता नसताना जो ही भाकर खातो किंवा प्रभूच्या प्याल्यातून पितो, तो प्रभूच्या शरीराच्या आणि रक्ताच्या बाबतीत दोषी ठरेल. २८ प्रत्येकाने आधी स्वतःचं परीक्षण करून, आपण योग्य आहोत की नाही हे ठरवावं.+ त्यानंतरच त्याने ती भाकर खावी आणि त्या प्याल्यातून प्यावं. २९ कारण प्रभूचं शरीर कशाला सूचित करतं हे समजून न घेता, जो खातो आणि पितो तो स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतो. ३० म्हणूनच, तुमच्यापैकी बरेच जण अशक्त आणि आजारी आहेत आणि बरेच जण मरण पावले आहेत.*+ ३१ खरंतर, आपण योग्य आहोत की नाही याचं आपण स्वतःच परीक्षण केलं, तर आपल्याला दोषी ठरवलं जाणार नाही. ३२ पण, आपल्याला दोषी ठरवलं जातं, तेव्हा आपल्याला यहोवाकडून* ताडन मिळतं.+ आणि यामुळे आपण जगासोबत शिक्षेसाठी पात्र ठरणार नाही.+ ३३ म्हणून बांधवांनो, तुम्ही प्रभूच्या सांजभोजनासाठी एकत्र येता तेव्हा एकमेकांसाठी थांबा. ३४ कोणाला भूक लागली असेल, तर त्याने घरी खावं, म्हणजे तुमचं एकत्र येणं न्यायदंडाचं कारण बनणार नाही.+ बाकीचे प्रश्न मी तिथे आल्यावर सोडवीन.
१२ आता बांधवांनो, देवाकडून मिळालेल्या दानांच्या बाबतीत+ तुम्ही अंधारात असावं, अशी माझी इच्छा नाही. २ कारण तुम्ही विदेशी लोकांपैकी* होता, तेव्हा तुम्हाला बहकवण्यात आलं होतं आणि मुक्या मूर्तींची उपासना करावी म्हणून तुमची दिशाभूल करण्यात आली होती.+ त्या नेतील तिथे तुम्ही त्यांच्या मागेमागे जात होता. ३ आता तुम्ही हे समजून घ्यावं असं मला वाटतं, की कोणीही देवाच्या पवित्र शक्तीच्या* मदतीने बोलत असेल, तर “येशू शापित आहे!” असं म्हणणार नाही; तसंच, पवित्र शक्तीच्या मदतीशिवाय कोणीही, “येशू प्रभू आहे!” असं म्हणू शकत नाही.+
४ आता दानं वेगवेगळी असली, तरी पवित्र शक्ती एकच आहे.+ ५ आणि सेवेचे वेगवेगळे प्रकार असले,+ तरी प्रभू एकच आहे. ६ तसंच वेगवेगळी कार्यं असली, तरी सर्वांना ती कार्यं करायला मदत करणारा देव एकच आहे.+ ७ पण, प्रत्येकामध्ये देवाची पवित्र शक्ती कार्य करताना दिसते आणि हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे.+ ८ कारण कोणाला पवित्र शक्तीद्वारे बुद्धीचं वचन,* तर कोणाला त्याच पवित्र शक्तीद्वारे ज्ञानाचं वचन देण्यात आलं आहे. ९ कोणाला त्याच पवित्र शक्तीद्वारे विश्वास,+ तर कोणाला त्या एकाच पवित्र शक्तीद्वारे बरं करायचं दान देण्यात आलं आहे;+ १० कोणाला महान कार्यं करायचं,+ कोणाला भविष्यवाणी करायचं, कोणाला प्रेरित वचनं समजून घेण्याचं,+ कोणाला वेगवेगळ्या भाषांत बोलण्याचं+ तर आणखी कोणाला भाषांतर करायचं दान देण्यात आलं आहे.+ ११ पण, ही सगळी कार्यं ती एकच पवित्र शक्ती घडवून आणते आणि आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाला देणगी देते.
१२ कारण ज्याप्रमाणे शरीर एक असलं, तरी बरेच अवयव असतात आणि शरीराचे अवयव बरेच असले, तरी शरीर एकच असतं;+ त्याचप्रमाणे ख्रिस्त आहे. १३ कारण आपण यहुदी असलो किंवा ग्रीक, दास असलो किंवा स्वतंत्र, तरी एकच शरीर होण्यासाठी आपल्या सगळ्यांचा एकाच पवित्र शक्तीद्वारे बाप्तिस्मा झाला आहे आणि आपल्या सगळ्यांना एकच पवित्र शक्ती मिळाली आहे.
१४ कारण शरीर मुळात एका अवयवाचं नाही, तर पुष्कळ अवयवांचं मिळून बनलं आहे.+ १५ पायाने जर म्हटलं, की “मी हात नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,” तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही. १६ आणि जर कानाने म्हटलं, “मी डोळा नाही, त्यामुळे मी शरीराचा भाग नाही,” तर यावरून तो शरीराचा भाग नाही असा अर्थ होत नाही. १७ संपूर्ण शरीर डोळा असतं, तर आपण कशाच्या मदतीने ऐकलं असतं? आणि संपूर्ण शरीर कान असतं, तर आपण कशाच्या मदतीने वास घेतला असता? १८ पण, देवाला योग्य वाटलं त्याप्रमाणे त्याने शरीराचा प्रत्येक अवयव आपापल्या जागी ठेवला आहे.
१९ जर सगळे अवयव सारखेच असते, तर त्याला शरीर म्हणता आलं असतं का? २० पण आता पुष्कळ अवयव असले, तरी शरीर एकच आहे. २१ डोळा हाताला म्हणू शकत नाही, की “मला तुझी गरज नाही,” किंवा डोकं पायांना म्हणू शकत नाही, की “मला तुमची गरज नाही.” २२ उलट, शरीराचे जे अवयव कमजोर वाटतात ते खरंतर आवश्यक असतात. २३ आणि शरीराचे जे भाग कमी मानाचे आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांना आपण विशेष मान देतो.+ अशा रितीने, कमी आकर्षक वाटणाऱ्या भागांना आपण जास्त आदराने वागवतो. २४ पण, आपल्या शरीराच्या आकर्षक भागांना याची गरज नसते. असं असलं, तरी देवाने शरीराची रचना अशा प्रकारे केली आहे, की कमी मान असलेल्या भागाला जास्त मान मिळावा. २५ हे यासाठी, की शरीरामध्ये फूट पडू नये, तर त्याच्या अवयवांना एकमेकांची काळजी असावी.+ २६ एक अवयव दुःखी झाला, तर बाकीचे सगळे अवयवसुद्धा दुःखी होतात;+ किंवा एकाचा सन्मान झाला, तर बाकीच्या सगळ्यांनाही आनंद होतो.+
२७ आता तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात+ आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण या शरीराचा अवयव आहे.+ २८ आणि देवाने मंडळीत प्रत्येकाला नेमलं आहे: पहिले प्रेषित;+ दुसरे संदेष्टे;+ तिसरे शिक्षक;+ मग, महान कार्यं करणारे;+ त्यानंतर, बरं करण्याचं दान असणारे,+ उपयोगी सेवा करणारे, मार्गदर्शन करण्याच्या क्षमता असणारे+ आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे.+ २९ तर मग, सगळेच प्रेषित आहेत का? सगळेच संदेष्टे आहेत का? सगळेच शिक्षक आहेत का? सगळेच महान कार्यं करतात का? ३० सगळ्यांजवळच रोग बरे करण्याचं दान आहे का? सगळेच वेगवेगळ्या भाषा बोलतात का?+ सगळेच भाषांतर करणारे आहेत का?+ ३१ तुम्ही तर याहून मोठी दानं मिळवण्याचा प्रयत्न करत राहा.*+ पण, मी तुम्हाला यांपेक्षाही चांगला असा एक मार्ग दाखवतो.+
१३ जर मी माणसांच्या आणि स्वर्गदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी ठणठणणाऱ्या थाळीसारखा किंवा झणझणणाऱ्या झांजेसारखा आहे. २ आणि मला भविष्यवाणी करण्याचं, सगळी पवित्र रहस्यं समजण्याचं आणि सर्व प्रकारच्या ज्ञानाचं दान मिळालं असलं;+ तसंच, डोंगर इथून तिथे हलवण्याइतका माझा विश्वास मजबूत असला, पण माझ्यात प्रेम नसलं तर मी काहीच नाही.+ ३ मी गोरगरिबांना जेवू घालण्यासाठी माझी सगळी संपत्ती दिली+ आणि मोठेपणा मिरवता यावा म्हणून मी आपलं जीवन अर्पण करायला तयार झालो, पण माझ्यात प्रेम नसलं,+ तर या सगळ्याचा मला काहीच उपयोग होणार नाही.
४ प्रेम+ सहनशील+ आणि दयाळू+ असतं. प्रेम हेवा करत नाही,+ बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही;+ ५ प्रेम असभ्यपणे वागत नाही,+ स्वार्थ पाहत नाही,+ लगेच चिडत नाही,+ आपल्याविरुद्ध केलेल्या चुकांचा* हिशोब ठेवत नाही.+ ६ ते अनीतीमुळे आनंदित होत नाही,+ तर सत्यामुळे आनंदित होतं. ७ प्रेम सगळं सहन करतं,+ सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं,+ सगळ्या गोष्टींची आशा धरतं,+ सगळ्या बाबतींत धीर धरतं.+
८ प्रेम कधीही नाहीसं होत नाही. पण भविष्यवाणी करण्याचं, इतर भाषा बोलण्याचं* किंवा ज्ञान मिळण्याचं दान असेल तर ते नाहीसं होईल. ९ कारण आपल्याजवळ असलेलं ज्ञान अपूर्ण आहे+ आणि आपलं भविष्यवाणी करणं हेसुद्धा अपूर्ण आहे. १० पण जे पूर्ण ते येईल, तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. ११ मी लहान होतो तेव्हा लहान मुलासारखा बोलायचो, लहान मुलासारखा विचार करायचो, लहान मुलासारख्या माझ्या समजुती होत्या. पण, आता मी प्रौढ झालो आहे, त्यामुळे लहानपणीच्या गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. १२ कारण आता आपल्याला धातूच्या आरशात अंधूक* दिसतं, पण पुढे सगळं स्पष्ट होईल. सध्या माझं ज्ञान अपूर्ण आहे, पण त्या वेळी, देव जसा मला पूर्णपणे ओळखतो, तसंच मलाही पूर्ण* ज्ञान मिळेल. १३ शेवटी विश्वास, आशा आणि प्रेम या तीन गोष्टी टिकून राहतील; पण, प्रेम या सगळ्यांत श्रेष्ठ आहे.+
१४ एकमेकांसोबत प्रेमाने वागायचा होताहोईल तितका प्रयत्न करा. पण, त्याच वेळी देवाकडची दानं आणि खासकरून भविष्यवाणी करायचं दान मिळवायचा प्रयत्न करत राहा.*+ २ कारण इतर भाषेत बोलणारा माणसांशी नाही, तर देवाशी बोलतो. तो देवाच्या पवित्र शक्तीच्या* मदतीने पवित्र रहस्यं+ सांगत असला, तरी कोणालाही ती समजत नाहीत.+ ३ पण, भविष्यवाणी करणारा आपल्या बोलण्याने इतरांना प्रोत्साहन, मदत आणि सांत्वन देतो. ४ इतर भाषेत बोलणारा स्वतःचाच विश्वास मजबूत करतो, तर भविष्यवाणी करणारा संपूर्ण मंडळीचा विश्वास मजबूत करतो. ५ खरं पाहिलं, तर तुमच्यापैकी सर्वांनीच इतर भाषा बोलाव्यात अशी माझी इच्छा आहे;+ तरी तुम्ही भविष्यवाणी केली तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतं.+ कारण इतर भाषेत बोलणारा, मंडळीचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून भाषांतर करत नसेल, तर भविष्यवाणी करणारा त्याच्याहून श्रेष्ठ आहे. ६ आता बांधवांनो, मी जर तुमच्याकडे येऊन इतर भाषांमध्ये बोलू लागलो, पण देवाने प्रकट केलेल्या गोष्टी,+ ज्ञान,+ भविष्यवाणी किंवा शिक्षण यांबद्दल बोललो नाही, तर त्याचा काय फायदा?
७ बासरी किंवा वीणा* यांसारख्या वाद्यांचंच उदाहरण घ्या. प्रत्येक स्वर स्पष्टपणे निघाल्याशिवाय, बासरीवर किंवा वीणेवर काय वाजवलं जात आहे, हे कोणाला कसं कळेल? ८ युद्धाचा इशारा देण्यासाठी कर्णा वाजवणाऱ्याने जर तो नीट वाजवला नाही, तर युद्धासाठी कोण तयार होईल? ९ त्याचप्रमाणे, जर तुम्ही सहज समजेल अशा भाषेत बोलला नाहीत, तर तुम्ही काय म्हणत आहात हे कोणाला कसं कळेल? उलट, ते वाऱ्याशी बोलण्यासारखं ठरेल. १० तसं पाहिलं तर जगात बऱ्याच भाषा आहेत, पण त्यांपैकी एकही अर्थहीन नाही. ११ कारण मी जे बोलत आहे त्याचा अर्थच मला समजत नसेल, तर ज्याच्याशी मी बोलत आहे, त्याच्यासाठी मी एखाद्या विदेश्यासारखा असेन आणि माझ्याशी बोलणाराही माझ्यासाठी विदेश्यासारखा असेल. १२ तर मग, पवित्र शक्तीची दानं मिळवण्यासाठी उत्सुक असलेले तुम्हीसुद्धा, मोठ्या प्रमाणात अशी दानं मिळवायचा प्रयत्न करा. त्यामुळे मंडळीचा विश्वास मजबूत होईल.+
१३ म्हणून, इतर भाषेत बोलणाऱ्याने आपण जे सांगत आहोत त्याचं भाषांतर करता यावं, म्हणून प्रार्थना करावी.+ १४ कारण, जेव्हा मी इतर भाषेत प्रार्थना करतो, तेव्हा पवित्र शक्तीचं दान मिळाल्यामुळे मी ती प्रार्थना करत असतो, पण मला त्याचा अर्थ समजत नाही. १५ तर मग, काय करावं? मी पवित्र शक्तीच्या दानामुळे प्रार्थना करीन, पण त्यासोबतच मला समजेल अशा रितीने ती करीन. तसंच, मी पवित्र शक्तीच्या दानामुळे स्तुतिगीतं गाईन, पण ती मला समजतील अशा रितीने गाईन. १६ नाहीतर, फक्त पवित्र शक्तीच्या दानामुळे तू उपकारस्तुती केली, तर तुमच्यामध्ये असलेला सामान्य माणूस तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेला “आमेन” कसा म्हणेल? कारण प्रार्थनेत तू काय म्हणतोस हे त्याला समजत नाही. १७ तू खूप चांगल्या प्रकारे उपकारस्तुती करत असशील, पण त्यामुळे दुसऱ्याला प्रोत्साहन मिळत नाही. १८ मी तुमच्या सर्वांपेक्षा जास्त भाषा बोलू शकतो, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. १९ असं असलं तरी, एखाद्या मंडळीत इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माझ्या बुद्धीला समजतील असे पाच शब्द बोलणं मी पसंत करीन. म्हणजे मला त्यांतून इतरांना काही शिकवता येईल.*+
२० बांधवांनो, समजण्याच्या बाबतीत लहान मुलांसारखं होऊ नका,+ तर वाईट गोष्टींच्या बाबतीत लहान मुलांसारखं व्हा;+ आणि समजण्याच्या बाबतीत प्रौढांसारखं व्हा.+ २१ नियमशास्त्रात असं लिहिलं आहे: “ ‘मी या लोकांशी विदेश्यांच्या भाषांत आणि परक्यांच्या बोलींत जरी बोललो, तरी ते माझं ऐकणार नाहीत,’ असं यहोवा* म्हणतो.”+ २२ त्यामुळे इतर भाषा, विश्वासात असलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात नसलेल्यांसाठी एक चिन्ह आहेत.+ पण, भविष्यवाणी मात्र विश्वासात नसलेल्यांसाठी नाही, तर विश्वासात असलेल्यांसाठी आहे. २३ त्यामुळे, संपूर्ण मंडळी एका ठिकाणी एकत्र जमली आणि सगळे इतर भाषा बोलू लागले, तर तिथे येणारे सामान्य लोक किंवा विश्वासात नसलेले लोक, तुम्हाला वेडे म्हणणार नाहीत का? २४ पण तुम्ही सगळे भविष्यवाणी करत असताना, एखादा विश्वासात नसलेला किंवा सामान्य माणूस तिथे आला, तर तुमच्या सर्वांच्या बोलण्यामुळे तो स्वतःचं बारकाईने परीक्षण करायला आणि स्वतःमध्ये सुधारणा करायला प्रवृत्त होईल. २५ मग, त्याच्या मनातल्या गुप्त गोष्टींची त्याला जाणीव होईल आणि तो दंडवत घालून देवाची उपासना करेल आणि म्हणेल: “देव खरंच तुमच्यामध्ये आहे.”+
२६ तर मग बांधवांनो, आपण काय करावं? तुम्ही एकत्र येता तेव्हा कोणाला एखादं स्तोत्र गायचं असतं, कोणाला शिक्षण द्यायचं असतं, कोणाला देवाने प्रकट केलेल्या गोष्टी सांगायच्या असतात, कोणाला इतर भाषेत बोलायचं असतं, तर आणखी कोणाला भाषांतर करायचं असतं.+ पण, सर्व गोष्टी एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी होऊ द्या. २७ कोणाला इतर भाषेत बोलायचं असेल, तर असे दोघं किंवा जास्तीत जास्त तिघं असावेत; आणि त्यांनी एकेक करून बोलावं आणि कोणीतरी त्यांच्या बोलण्याचं भाषांतर करावं.+ २८ पण भाषांतर करणारा कोणी नसेल, तर त्यांनी मंडळीत शांत राहावं आणि मनातल्या मनात देवाशी बोलावं. २९ भविष्यवाणी करणाऱ्यांपैकी+ दोघा किंवा तिघांनी बोलावं आणि बाकीच्यांनी त्याचा अर्थ शोधून काढावा. ३० पण तिथे बसलेले असताना एखाद्याला देवाने काही प्रकट केलं, तर जो बोलत आहे त्याने शांत राहावं. ३१ कारण, एकेक करून तुम्ही सर्व जण भविष्यवाणी करू शकता. म्हणजे सगळेच शिकतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल.+ ३२ संदेष्ट्यांना पवित्र शक्तीचं जे दान मिळालं आहे, त्यावर त्यांनी नियंत्रण ठेवावं. ३३ कारण देव अव्यवस्थेचा नाही, तर शांतीचा देव आहे.+
पवित्र जनांच्या सगळ्या मंडळ्यांमध्ये जशी रीत आहे त्याप्रमाणे, ३४ स्त्रियांनी मंडळ्यांमध्ये शांत राहावं. कारण त्यांना बोलायची परवानगी नाही.+ उलट त्यांनी अधीनता दाखवावी.+ नियमशास्त्रातसुद्धा असंच म्हटलं आहे. ३५ त्यांना काही प्रश्न असतील, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या नवऱ्याला घरी विचारावं, कारण स्त्रीने मंडळीत बोलणं हे लज्जास्पद आहे.
३६ देवाचं वचन तुमच्यापासून आलं आहे का? किंवा ते फक्त तुम्हालाच देण्यात आलं आहे का?
३७ जर कोणाला वाटत असेल, की आपण संदेष्टे आहोत किंवा आपल्याला पवित्र शक्तीचं दान मिळालं आहे, तर ज्या गोष्टी मी तुम्हाला लिहीत आहे त्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आहेत हे त्याने मान्य करावं. ३८ पण जर कोणी ही गोष्ट नाकारली, तर त्यालाही नाकारलं जाईल.* ३९ तर माझ्या बांधवांनो, भविष्यवाणी करायचा प्रयत्न करत राहा.+ त्याच वेळी, इतर भाषा बोलायचीही मनाई करू नका.+ ४० पण, सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आणि व्यवस्थितपणे* होऊ द्या.+
१५ आता बांधवांनो, जो आनंदाचा संदेश मी तुम्हाला घोषित केला,+ जो तुम्ही स्वीकारला आणि ज्याच्या बाजूने तुम्ही ठाम भूमिका घेतली, त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. २ मी घोषित केलेल्या आनंदाच्या संदेशाला जर तुम्ही पक्कं धरून ठेवलं, तर त्याद्वारे तुमचं तारण होईल;* नाहीतर, तुमचं विश्वास ठेवणं व्यर्थ ठरेल.
३ कारण, ज्या गोष्टी मला समजल्या, त्यांपैकी मी तुम्हाला शिकवलेली मुख्य गोष्ट ही, की शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला+ ४ आणि त्याला पुरण्यात आलं;+ आणि शास्त्रवचनांत सांगितल्याप्रमाणे,+ तिसऱ्या दिवशी+ त्याला उठवण्यात आलं.+ ५ तो केफाला*+ आणि मग १२ प्रेषितांना दिसला.+ ६ त्यानंतर, तो एकाच वेळी पाचशेहून जास्त बांधवांना दिसला.+ त्यांच्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे, तर बहुतेक जण अजूनही आपल्यात आहेत. ७ नंतर, तो याकोबला+ आणि मग सगळ्या प्रेषितांना दिसला.+ ८ पण सर्वात शेवटी, अकाली जन्मलेल्यासारखा जो मी, त्या मलासुद्धा तो दिसला.+
९ कारण, प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे. इतकंच काय, तर प्रेषित म्हणवून घ्यायचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.+ १० पण आज मी जो काही आहे, तो देवाच्या अपार कृपेमुळेच आहे. आणि त्याने मला दाखवलेली अपार कृपा मुळीच व्यर्थ ठरली नाही. कारण मी इतर सगळ्या प्रेषितांपेक्षा जास्त मेहनत केली; अर्थात, ती मी स्वतःच्या बळावर केली असं नाही, तर माझ्यावर असलेल्या देवाच्या अपार कृपेमुळे केली. ११ तर मग, मी असो किंवा इतर प्रेषित असोत, आम्ही याच प्रकारे प्रचार करतो आणि तुम्हीही याच प्रकारे विश्वास ठेवला.
१२ आता, जर ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला अशी घोषणा केली जात आहे,+ तर मग, मेलेल्यांचं पुनरुत्थान* होणार नाही, असं तुमच्यापैकी काही जण कसं म्हणतात? १३ जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. १४ पण, जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर नक्कीच आपलं प्रचार करणं व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वाससुद्धा व्यर्थ आहे. १५ तसंच, आपण देवाबद्दल खोटी साक्ष देणारे ठरलो आहोत.+ कारण, देवाने ख्रिस्ताला उठवलं असं बोलून आपण देवाच्या विरोधात साक्ष दिली आहे;+ जर मेलेले लोक खरोखर उठवले जाणार नसतील, तर याचा अर्थ देवाने ख्रिस्तालाही उठवलं नाही. १६ कारण जर मेलेले उठवले जाणार नाहीत, तर मग ख्रिस्तही उठवला गेला नाही. १७ आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमच्या विश्वासाला काहीच अर्थ नाही; तुम्ही अजूनही तुमच्या पापांतच आहात.+ १८ तसंच, जे ख्रिस्ती लोक मरण पावले त्यांचासुद्धा कायमचा नाश झाला आहे.+ १९ जर आपण फक्त याच जीवनासाठी ख्रिस्तावर आशा ठेवली असेल, तर आपली सगळ्यांपेक्षा जास्त दयनीय स्थिती आहे.
२० पण, आता ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे; तो मरण पावलेल्यांपैकी पहिलं फळ आहे.+ २१ कारण मृत्यू हा एकाच माणसाद्वारे आला आहे,+ त्यामुळे पुनरुत्थानसुद्धा एकाच माणसाद्वारे होतं.+ २२ कारण ज्याप्रमाणे आदाममुळे सगळे मरत आहेत,+ त्याचप्रमाणे ख्रिस्तामुळे सगळे जिवंत केले जातील.+ २३ पण प्रत्येकाला त्याच्या योग्य क्रमाप्रमाणे: ख्रिस्त, जो पहिलं फळ आहे.+ त्यानंतर, जे ख्रिस्ताचे आहेत ते त्याच्या उपस्थितीदरम्यान उठवले जातील.+ २४ मग, अंत होईल. त्या वेळी, सगळी सरकारं, अधिकारी आणि सत्ता नाहीशा केल्यावर तो आपल्या देवाला आणि पित्याला राज्य सोपवून देईल.+ २५ कारण देव सर्व शत्रूंना ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवेपर्यंत ख्रिस्ताने राजा म्हणून राज्य केलं पाहिजे.+ २६ आणि शेवटचा शत्रू, म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.+ २७ कारण देवाने, “सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून त्याच्या पायांखाली ठेवल्या आहेत.”+ ‘सर्व गोष्टी त्याच्या अधीन करून,’+ असं जे तो म्हणतो त्यावरून स्पष्टच आहे, की ज्याने सर्व गोष्टी मुलाच्या अधीन केल्या, तो स्वतः त्याच्या अधीन नाही.+ २८ पण सगळ्या गोष्टी मुलाच्या अधीन केल्या जातील, तेव्हा ज्याने सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन केल्या, त्याला मुलगाही अधीन होईल.+ हे यासाठी, की देवाने सगळ्यांसाठी सर्वकाही व्हावं.+
२९ मग, मृत्यूसाठी बाप्तिस्मा घेणाऱ्यांचं काय?+ जर मेलेल्यांचं पुनरुत्थानच होणार नसेल, तर ते मृत्यूसाठी बाप्तिस्मा तरी का घेतात? ३० आणि आपणसुद्धा नेहमी* आपला जीव धोक्यात का घालतो?+ ३१ बांधवांनो, मी तर दररोज मृत्यूचा सामना करतो. आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्यामध्ये मला तुमच्याबद्दल असलेल्या अभिमानावरून, मी हे खातरीने सांगतो. ३२ इतर माणसांप्रमाणे* जर मीसुद्धा इफिसमध्ये हिंस्र प्राण्यांशी लढलो असेन,+ तर त्याचा मला काय फायदा? जर मेलेल्यांचं पुनरुत्थान होणार नसेल, तर “चला, आपण खाऊ-पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे.”+ ३३ फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.*+ ३४ शुद्धीवर या आणि चांगली कामं करा; पाप करत राहू नका. कारण काहींना देवाबद्दल जराही ज्ञान नाही. तुम्हाला लाज वाटावी म्हणून मी हे बोलत आहे.
३५ पण, कोणी म्हणेल: “मेलेल्यांना कसं उठवलं जाईल? ते कोणत्या प्रकारच्या शरीराने उठतील?”+ ३६ अरे मूर्ख माणसा! तू जे काही पेरतोस ते जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत जिवंत केलं जात नाही. ३७ आणि तू जे पेरतोस ते वाढलेलं रोपटं नाही, तर फक्त बी असतं; मग, ते गव्हाचं बी असेल किंवा दुसरं एखादं बी. ३८ पण, देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो त्याला वाढवतो आणि प्रत्येक बी वाढतं तेव्हा ते वेगवेगळं असतं. ३९ सगळीच शरीरं एकसारखी नसतात. माणसांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर प्राण्यांचं शरीर दुसऱ्या प्रकारचं; पक्ष्यांचं शरीर एक प्रकारचं असतं, तर माशांचं शरीर दुसऱ्या प्रकारचं. ४० तसंच, जे स्वर्गात आहेत त्यांचं शरीर+ पृथ्वीवर राहणाऱ्यांपेक्षा+ वेगळं असतं; स्वर्गात असलेल्यांच्या शरीराचं तेज एक प्रकारचं, तर पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या शरीराचं तेज दुसऱ्या प्रकारचं असतं. ४१ सूर्याचं तेज एक प्रकारचं आहे, तर चंद्राचं तेज एक प्रकारचं+ आणि ताऱ्यांचं तेज आणखी वेगळ्या प्रकारचं. खरंतर, प्रत्येक ताऱ्याचं तेज दुसऱ्या ताऱ्याच्या तेजापेक्षा वेगळं असतं.
४२ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाच्या बाबतीतसुद्धा हेच खरं आहे. शरीर नाशवंत स्थितीत पेरलं जातं आणि अविनाशीपणात उठवलं जातं.+ ४३ ते अपमानात पेरलं जातं आणि गौरवात उठवलं जातं.+ ते अशक्तपणात पेरलं जातं आणि सामर्थ्यात उठवलं जातं.+ ४४ ते हाडामांसाचं शरीर म्हणून पेरलं जातं आणि अदृश्य शरीर म्हणून उठवलं जातं. जसं हाडामांसाचं शरीर असतं, तसं अदृश्य शरीरसुद्धा असतं. ४५ म्हणून असं लिहिलं आहे: “पहिला माणूस आदाम हा जिवंत प्राणी बनला.”+ शेवटला आदाम जीवन देणारा अदृश्य प्राणी बनला.+ ४६ पण, पहिलं शरीर अदृश्य नाही. पहिलं शरीर हाडामांसाचं आणि त्यानंतर अदृश्य शरीर आहे. ४७ पहिला माणूस पृथ्वीवरचा आहे आणि त्याला मातीपासून बनवण्यात आलं;+ तर दुसरा माणूस स्वर्गातून आहे.+ ४८ या जगातले लोक, देवाने ज्याला मातीपासून बनवलं त्याच्यासारखे आहेत; आणि स्वर्गात असणारे, जो स्वर्गातून आला त्याच्यासारखे आहेत.+ ४९ ज्याप्रमाणे आपण मातीपासून बनवलेल्याच्या स्वरूपात आहोत,+ त्याचप्रमाणे आपण स्वर्गातून आलेल्याच्या स्वरूपात असू.+
५० पण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो की मांस आणि रक्त देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही; तसंच, जे नाशवंत आहे त्याला अविनाशीपण मिळू शकत नाही. ५१ पाहा! मी तुम्हाला एक पवित्र रहस्य सांगतो: आपण सगळेच मृत्यूची झोप घेणार नाही, तर आपण सगळे बदलून जाऊ.+ ५२ शेवटचा कर्णा वाजण्याच्या वेळी, एका क्षणात, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आपण बदलून जाऊ. कारण कर्णा वाजेल+ आणि जे मेलेले आहेत ते अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. ५३ कारण हे जे नाशवंत शरीर आहे, ते अविनाशीपण धारण करेल+ आणि हे जे मरण पावणारं शरीर आहे, ते अमरत्व धारण करेल.+ ५४ पण जेव्हा हे नाशवंत शरीर, अविनाशीपण धारण करेल आणि हे मरणारं शरीर अमरत्व धारण करेल, तेव्हा शास्त्रवचनांतले हे शब्द पूर्ण होतील: “मृत्यूला कायमचं गिळून टाकण्यात आलं आहे.”+ ५५ “अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी* कुठे आहे?”+ ५६ मरण आणणारी नांगी* म्हणजे पाप,+ आणि पापाचं बळ* नियमशास्त्र आहे.+ ५७ पण, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्याला विजय देतो याबद्दल त्याचे आभार!+
५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे.
१६ आता पवित्र जनांसाठी दान गोळा करण्याच्या बाबतीत,+ मी गलतीयातल्या मंडळ्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याच तुम्हीही पाळा. २ दर आठवड्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे काही रक्कम बाजूला काढून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यावर दान गोळा करायची गरज पडणार नाही. ३ पण ज्या माणसांची तुम्ही तुमच्या पत्रांत शिफारस केली,+ त्यांना मी आल्यावर तुमची उदार देणगी नेण्यासाठी यरुशलेमला पाठवीन. ४ जर माझंही तिथे जाणं आवश्यक असेल, तर मी त्यांच्यासोबत जाईन.
५ मासेदोनियाचा दौरा पूर्ण केल्यावर मी तुमच्याकडे येईन, कारण मी मासेदोनियातून जाणार आहे.+ ६ आणि कदाचित मी तुमच्याकडे राहीन किंवा तुमच्या इथे हिवाळाही घालवीन. मग, मी पुढच्या प्रवासाला निघेन तेव्हा तुम्हाला काही अंतरापर्यंत माझ्यासोबत येऊन मला निरोप देता येईल. ७ कारण या वेळी तुम्हाला फक्त धावती भेट द्यायची माझी इच्छा नाही. उलट यहोवाची* इच्छा असेल, तर तुमच्याकडे काही काळ राहायची मी आशा करतो.+ ८ पण, पेन्टेकॉस्टच्या सणापर्यंत मी इफिसमध्येच राहणार आहे.+ ९ कारण प्रभूची जास्त प्रमाणात सेवा करता यावी, म्हणून संधीचं एक मोठं दार माझ्यासाठी उघडण्यात आलं आहे;+ पण विरोध करणारे बरेच आहेत.
१० आता तीमथ्य+ तिथे आला तर त्याला निश्चिंतपणे सेवा करता यावी म्हणून त्याला सहकार्य करा. कारण माझ्याप्रमाणेच तोही यहोवाची* सेवा करतो.+ ११ तेव्हा कोणीही त्याला कमी लेखू नका. त्याला शांतीने निरोप द्या म्हणजे तो माझ्याकडे येऊ शकेल; कारण मी इतर बांधवांसोबत त्याची वाट पाहत आहे.
१२ आपला भाऊ अपुल्लो+ याला मी इतर बांधवांसोबत तुमच्याकडे येण्याची गळ घातली. आताच तुमच्याकडे येण्याचा त्याचा विचार नव्हता; पण संधी मिळताच तो तुमच्याकडे येईल.
१३ जागे राहा,+ विश्वासात स्थिर राहा,+ धैर्यवान*+ आणि सामर्थ्यशाली व्हा.+ १४ तुम्ही जे काही करता ते सगळं प्रेमाने करा.+
१५ आता बांधवांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो: तुम्हाला माहीत आहे, की स्तेफनाचं घराणं हे अखयाचं पहिलं फळ आहे आणि पवित्र जनांची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. १६ तुम्हीसुद्धा अशा लोकांच्या, तसंच सहकार्य आणि मेहनत करणाऱ्या सर्वांच्याच अधीन राहा.+ १७ स्तेफना,+ फर्तूनात आणि अखायिक हे इथे असल्यामुळे मला आनंद होतो. कारण तुम्ही इथे नसल्याची कमी त्यांनी भरून काढली आहे. १८ त्यांनी मला आणि तुम्हालाही प्रोत्साहन दिलं आहे. तेव्हा, अशा माणसांची नेहमी कदर करा.
१९ आशियातल्या मंडळ्या तुम्हाला नमस्कार सांगतात. तसंच, अक्विल्ला आणि प्रिस्का आणि त्यांच्या घरात जमणारी मंडळी+ हे सर्व तुम्हाला सप्रेम नमस्कार सांगतात. २० सगळ्या बांधवांचा तुम्हाला नमस्कार. एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचं चुंबन घ्या.
२१ आता मी पौल, माझ्या स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार लिहितो.
२२ जर कोणी प्रभूवर प्रेम करत नसेल, तर तो शापित असो. हे आमच्या प्रभू, ये! २३ प्रभू येशूची अपार कृपा तुमच्यावर असो. २४ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या तुम्हा सगळ्यांना माझं प्रेम.
किंवा “वाटेकरी.”
याला पेत्र असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “चलाखीने बोलून.”
किंवा “ज्यांचं तारण होत आहे.”
किंवा “बाजूला सारीन.”
म्हणजे, नियमशास्त्राचे जाणकार.
किंवा “सध्याच्या काळातले.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “ठेवणाऱ्यांचं तारण करणं.”
शब्दशः “चिन्हं.”
किंवा “शारीरिक रितीने.”
किंवा “आणि ज्या नाहीत अशा.”
किंवा “त्यांद्वारे ज्या आहेत अशा.”
अति. क५ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सध्याच्या काळाची.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मृत्युदंड दिला नसता.”
किंवा “सखोल गोष्टींचाही.”
किंवा “पवित्र शक्तीशी मेळ बसणाऱ्या शब्दांत.”
किंवा “देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे विचार करणारा.”
अति. क५ पाहा.
किंवा “ख्रिस्ताची विचारसरणी.”
किंवा “देवाच्या पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे विचार करणाऱ्या.”
शब्दशः “शारीरिक.”
किंवा “यांचा हेतू एकच आहे.”
किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
याला पेत्र असंही म्हणतात.
किंवा “ख्रिस्ताच्या हाताखालचे.”
किंवा “न्यायालयाने.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “आम्ही उघडेवाघडे आहोत.”
किंवा “ठोसे मारले जात आहेत.”
शब्दशः “विनवणी करतो.”
किंवा “टाकाऊ माल.”
किंवा “शिक्षक.”
शब्दशः “माझ्या मार्गांची.”
अति. क५ पाहा.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आंबवतं.”
शब्दशः “तुम्ही बेखमीर आहात.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
हे समलैंगिक संबंधात स्त्रीसारखा संभोग देणाऱ्या पुरुषांना सूचित करतं.
किंवा “पुरुषांसोबत संभोग करणारे पुरुष.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मला सर्व गोष्टींची परवानगी आहे.”
किंवा “गोष्टीचा स्वतःवर अधिकार चालू देणार नाही.”
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, लैंगिक संबंध.
ग्रीक, पोर्निया अनेकवचन. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “वेगळं व्हायचं.”
किंवा “नवऱ्याला वाचवलं जाणार नाही हे तुला कसं माहीत?”
किंवा “बायकोला वाचवलं जाणार नाही हे तुला कसं माहीत?”
अति. क५ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कौमार्यात.”
शब्दशः “फास घालण्यासाठी.”
किंवा “आपल्या कौमार्याच्या बाबतीत.”
किंवा “आपलं कौमार्य टिकवून ठेवायचं.”
किंवा “लग्न करून आपलं कौमार्य देतो.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “अधिकार.”
याला पेत्र असंही म्हणतात.
शब्दशः “अधिकाराचा.”
किंवा “हक्कांचा.”
किंवा “काहींना वाचवावं.”
किंवा “खेळाडू.”
किंवा “शिक्षा देतो; कठोरपणे शिस्त लावतो.”
किंवा “अपात्र ठरू नये.”
किंवा “तो खडक ख्रिस्त होता.”
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “सर्व गोष्टींची परवानगी असली.”
अति. क५ पाहा.
किंवा “बऱ्याच जणांना वाचवलं जावं.”
किंवा “ज्या परंपरा तुम्हाला घालून दिल्या.”
किंवा “झाकण्यासाठी.”
किंवा “तुमच्यामध्ये फुटी.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “मृत्यूत झोपले आहेत.” हे खरोखरच्या मृत्यूला नाही, तर देवासोबत त्यांच्या तुटलेल्या नात्याला सूचित करतं.
अति. क५ पाहा.
म्हणजे, विश्वासात नसलेले.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “बुद्धीचा संदेश.”
किंवा “आवेशाने प्रयत्न करत राहा.”
किंवा “हानीचा.”
म्हणजे, चमत्कारिक रितीने वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं दान.
किंवा “अस्पष्ट.”
किंवा “अचूक.”
किंवा “आवेशाने प्रयत्न करत राहा.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तोंडी शिकवता येईल.”
अति. क५ पाहा.
किंवा कदाचित, “जर कोणी अज्ञानी असेल, तर तो अज्ञानी राहील.”
किंवा “शिस्तीत.”
किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”
याला पेत्र असंही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सतत.”
किंवा कदाचित, “माणसाच्या दृष्टिकोनाने.”
किंवा “नीती बिघडते.”
किंवा “तुझा डंख.”
किंवा “आणणारा डंख.”
किंवा “जे पापाला बळ देतं ते.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “मर्दासारखं वागा.”