योहानला झालेलं प्रकटीकरण
१६ मग, पवित्र स्थानातून* एक मोठा आवाज मला ऐकू आला.+ तो त्या सात स्वर्गदूतांना म्हणाला: “जा आणि देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”+
२ पहिला स्वर्गदूत निघून गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली.+ तेव्हा, ज्या लोकांवर जंगली पशूची खूण+ होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करत होते,+ त्यांना वेदनादायक आणि भयंकर फोड आले.+
३ दुसऱ्या स्वर्गदूताने आपली वाटी समुद्रावर ओतली,+ तेव्हा समुद्रातलं पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखं झालं+ आणि प्रत्येक जिवंत प्राणी,* हो, समुद्रात असलेलं सर्वकाही मरून गेलं.+
४ तिसऱ्या स्वर्गदूताने आपली वाटी नद्यांवर आणि पाण्याच्या झऱ्यांवर ओतली,+ तेव्हा त्यांचं रक्त झालं.+ ५ मग, पाण्यावर अधिकार असलेल्या स्वर्गदूताला मी असं म्हणताना ऐकलं: “हे एकनिष्ठ देवा,+ तू जो आहेस आणि होतास,+ तू नीतिमान आहेस, कारण तू हा न्यायनिवाडा केला आहेस.+ ६ त्यांनी पवित्र जनांचं आणि संदेष्ट्यांचं रक्त सांडलं,+ आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलं आहेस;+ ते याच लायकीचे आहेत.”+ ७ मग मी वेदीला असं म्हणताना ऐकलं: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ खरंच, तुझे निर्णय* खरे आणि न्यायाला धरून आहेत.”+
८ चौथ्या स्वर्गदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली+ आणि लोकांना अग्नीने होरपळून टाकण्याचा अधिकार सूर्याला देण्यात आला. ९ आणि भयंकर उष्णतेमुळे लोक होरपळून गेले, पण त्यांनी पश्चात्ताप केला नाही. उलट, त्यांनी देवाच्या नावाची निंदा केली आणि या पीडांवर अधिकार असलेल्या देवाचा गौरव केला नाही.
१० पाचव्या स्वर्गदूताने आपली वाटी जंगली पशूच्या राजासनावर ओतली, तेव्हा त्याच्या राज्यावर अंधार पसरला,+ आणि वेदनेमुळे लोक जिभा चावू लागले. ११ पण त्यांनी पश्चात्ताप केला नाही. उलट, आपल्या वेदनांमुळे आणि फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली.
१२ सहाव्या स्वर्गदूताने फरात महानदीवर+ आपली वाटी ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून* येणाऱ्या राजांसाठी मार्ग तयार व्हावा म्हणून+ नदीतलं पाणी आटून गेलं.+
१३ आणि अजगराच्या+ तोंडातून, जंगली पशूच्या तोंडातून आणि खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून बेडकांसारखी दिसणारी तीन अशुद्ध प्रेरित वचनं बाहेर येताना मला दिसली. १४ ती मुळात, दुष्ट स्वर्गदूतांनी* प्रेरित केलेली वचनं आहेत आणि ती चमत्कार करतात.+ तसंच, ती संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांकडे जाऊन त्यांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी+ एकत्र करतात.+
१५ “पाहा! मी चोरासारखा येत आहे.+ जो जागा राहतो,+ तसंच आपण उघडंवाघडं फिरू नये आणि लोकांसमोर लज्जित होऊ नये म्हणून आपली बाहेरची वस्त्रं राखतो, तो सुखी आहे.”+
१६ आणि त्यांनी इब्री भाषेत हर्मगिदोन* म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणलं.+
१७ सातव्या स्वर्गदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा पवित्र स्थानातून,* राजासनापासून एक आवाज ऐकू आला.+ तो म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” १८ आणि विजा चमकल्या, आवाज आणि ढगांचे गडगडाट ऐकू आले आणि पृथ्वीवर मानव निर्माण झाल्यापासून कधीही आला नव्हता, इतका मोठा आणि भयंकर भूकंप आला.+ १९ त्या मोठ्या नगरीचे+ तीन भाग झाले, आणि राष्ट्रांतली शहरं कोसळून पडली; आणि देवासमोर मोठ्या बाबेलची+ आठवण करण्यात आली. हे यासाठी, की त्याने त्याच्या क्रोधाच्या आणि संतापाच्या द्राक्षारसाचा प्याला तिला द्यावा.+ २० तसंच, प्रत्येक बेट नाहीसं झालं आणि पर्वतांचा ठावठिकाणा राहिला नाही.+ २१ मग, लोकांवर आकाशातून मोठमोठ्या गारा पडल्या+ आणि प्रत्येक गारेचं वजन सुमारे २० किलो* इतकं होतं. गारांच्या या पीडेमुळे+ लोकांनी देवाची निंदा केली, कारण ती पीडा खरोखरच महाभयंकर होती.