स्तोत्र
४३ हे देवा, माझा न्याय कर.+
गद्दार* राष्ट्राविरुद्ध माझ्या बाजूने वाद कर.+
फसवणूक करणाऱ्या अनीतिमान माणसापासून माझी सुटका कर.
२ कारण तू माझा देव, माझा गड आहेस.+
तू मला का सोडून दिलंस?
माझ्या शत्रूच्या जुलमांमुळे मी असा शोक करत का फिरावं?+
३ तुझा प्रकाश आणि तुझं सत्य माझ्यावर प्रकट कर.+
त्यांनी मला मार्ग दाखवावा+
तुझ्या पवित्र पर्वताकडे आणि तुझ्या वैभवी उपासना मंडपाकडे त्यांनी मला न्यावं.+
४ म्हणजे माझा सर्वात मोठा आनंद असलेल्या देवाजवळ,
त्याच्या वेदीजवळ मी येईन.+
हे देवा, माझ्या देवा, मी वीणा* वाजवून तुझी स्तुती करीन.+
५ मी* का असा निराश झालोय?
माझं मन का असं बेचैन झालंय?
मी तर देवाची वाट पाहीन.+
माझं तारण करणाऱ्या महान देवाचं मी गुणगान करत राहीन.+