उत्पत्ती
२१ यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने साराची आठवण केली आणि साराविषयी दिलेलं वचन यहोवाने पूर्ण केलं.+ २ सारा गरोदर राहिली+ आणि अब्राहामच्या म्हातारपणी, देवाने त्याला वचन दिलेल्या वेळी,+ तिने अब्राहामच्या मुलाला जन्म दिला. ३ अब्राहामने सारापासून झालेल्या आपल्या मुलाचं नाव इसहाक+ ठेवलं. ४ देवाच्या आज्ञेप्रमाणे,+ अब्राहामने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता केली. ५ इसहाक झाला तेव्हा अब्राहाम १०० वर्षांचा होता. ६ तेव्हा सारा म्हणाली: “देवाने मला हसवलं आहे; जो कोणी हे ऐकेल तोही माझ्यासोबत हसेल.”* ७ मग ती म्हणाली: “‘सारा मुलांना दूध पाजेल,’ असं अब्राहामला कोणी म्हणालं असतं का? तरीही मी त्याच्या म्हातारपणी त्याच्या मुलाची आई झाले आहे.”
८ इसहाक मोठा झाला. त्याचं दूध तोडण्याच्या दिवशी अब्राहामने मोठी मेजवानी दिली. ९ पण इजिप्तच्या हागारला+ अब्राहामपासून जो मुलगा झाला होता, तो इसहाकला चिडवत आहे+ असं साराने पाहिलं. १० म्हणून ती अब्राहामला म्हणाली: “या दासीला आणि तिच्या मुलाला इथून हाकलून द्या. या दासीचा मुलगा माझ्या मुलासोबत, इसहाकसोबत वारस होणार नाही!”+ ११ पण आपल्या मुलाबद्दल साराचं हे बोलणं अब्राहामला मुळीच आवडलं नाही.+ १२ तेव्हा देव अब्राहामला म्हणाला: “तुझ्या मुलाबद्दल आणि दासीबद्दल सारा जे बोलली त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तिचं* ऐक, कारण जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल.+ १३ आणि या दासीच्या मुलापासूनही+ मी एक राष्ट्र बनवीन,+ कारण तोही तुझा मुलगा* आहे.”
१४ मग अब्राहामने पहाटे उठून हागारला भाकर आणि चामड्याच्या पिशवीत पाणी भरून दिलं. त्याने ते तिच्या खांद्यावर ठेवलं आणि तिला तिच्या मुलासोबत पाठवून दिलं.+ तेव्हा ती निघून गेली आणि बैर-शेबाच्या+ रानात भटकत राहिली. १५ शेवटी त्या चामड्याच्या पिशवीतलं पाणी संपलं, तेव्हा तिने आपल्या मुलाला झुडपांच्या खाली ठेवलं. १६ मग ती काही अंतरावर जाऊन बसली, कारण ती म्हणाली: “मी माझ्या मुलाला मरताना पाहू शकत नाही.” असं म्हणून ती तिथेच बसून मोठ्याने रडू लागली.
१७ तेव्हा देवाने त्या मुलाचा आवाज ऐकला+ आणि देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारला विचारलं:+ “हागार, काय झालं? घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्या मुलाचा आवाज ऐकला आहे. १८ ऊठ आणि आपल्या मुलाला उभं राहायला मदत कर आणि त्याला आपल्या हाताचा आधार दे, कारण मी त्याला एक मोठं राष्ट्र बनवीन.”+ १९ तेव्हा देवाने तिचे डोळे उघडले आणि तिला एक विहीर दिसली. मग तिने जाऊन चामड्याच्या पिशवीत पाणी भरलं आणि ते आपल्या मुलाला प्यायला दिलं. २० तो मुलगा+ मोठा होत गेला आणि देव त्याच्यासोबत होता. तो रानात राहू लागला आणि तिरंदाज* झाला. २१ तो पारानच्या रानात+ राहू लागला आणि त्याच्या आईने इजिप्तच्या एका मुलीशी त्याचं लग्न करून दिलं.
२२ त्याच काळात अबीमलेख आणि त्याचा सेनापती पीकोल अब्राहामला म्हणाले: “तू जे काही करतोस त्यात देव तुझ्यासोबत आहे.+ २३ म्हणून आता तू इथे देवाची अशी शपथ घे, की तू माझ्याशी, माझ्या मुलांशी आणि माझ्या वंशजांशी कधीही बेइमानी करणार नाहीस; आणि जसं मी तुला एकनिष्ठ प्रेम दाखवलं आहे, तसंच एकनिष्ठ प्रेम तूही मला आणि ज्या देशात तू राहत आहेस त्या देशाच्या लोकांना दाखवशील.”+ २४ तेव्हा अब्राहाम म्हणाला: “मी शपथ घेतो.”
२५ पण अबीमलेखच्या सेवकांनी जबरदस्तीने बळकावलेल्या विहिरीबद्दल+ अब्राहामने त्याच्याकडे तक्रार केली. २६ अबीमलेखने उत्तर दिलं: “मी याबद्दल आजच ऐकतोय. हे कोणी केलं मला माहीत नाही; तूही मला काही सांगितलं नाहीस.” २७ तेव्हा अब्राहामने अबीमलेखला मेंढरं आणि गुरंढोरं दिली आणि त्या दोघांनी एकमेकांशी करार केला. २८ अब्राहामने कळपातून सात मेंढ्या वेगळ्या केल्या, २९ तेव्हा अबीमलेखने अब्राहामला विचारलं: “तू या सात मेंढ्या वेगळ्या का काढल्यास?” ३० तेव्हा अब्राहाम म्हणाला: “ही विहीर मी खोदली आहे, याची साक्ष म्हणून या सात मेंढ्या तू माझ्याकडून घे.” ३१ यावरून त्याने त्या ठिकाणाचं नाव बैर-शेबा* असं ठेवलं,+ कारण तिथे त्या दोघांनी शपथ घेतली होती. ३२ अशा रितीने, त्यांनी बैर-शेबा इथे एकमेकांशी करार केला.+ त्यानंतर अबीमलेख आणि त्याचा सेनापती, पीकोल हे पलिष्ट्यांच्या+ देशात निघून गेले. ३३ मग अब्राहामने बैर-शेबा इथे एशेलचं* झाड लावलं आणि तिथे त्याने सर्वकाळाचा देव+ यहोवा, याचं नाव घेऊन प्रार्थना केली.+ ३४ अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात बराच काळ* राहिला.*+